हिंदकेसरी दीनानाथसिंह की जीवन कहानी ! रविवार विशेष -- जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:42 AM2018-12-30T00:42:25+5:302018-12-30T00:43:14+5:30

हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहानी सांगणाऱ्या ‘लालमाती’ या सदरामुळे २०१८ हे वर्ष ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीसाठी अविस्मरणीय राहणार आहे. हे सदर आज समाप्त होत आहे. शाहूनगरीत येऊन यशस्वीतेची गदा कायमस्वरूपी खांद्यावर घेऊन मिरविणाºया एका कुस्तीपटूचे आत्मवृत्त मांडण्याची ‘लोकमत’ला संधी मिळाली, ही शाहूनगरीची सेवा आहे.

Life story of Hindakesari Dinanath Singh! Sundays Special - Jagar | हिंदकेसरी दीनानाथसिंह की जीवन कहानी ! रविवार विशेष -- जागर

‘लालमाती’ या सदराचे नायक दिनानाथसिंह यांनी हे सदर शब्दबद्ध करणारे ‘लोकमत’चे कोल्हापुरचे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांचा पाच नारळाचे तोरण देऊन सत्कार केला. दुसºया छायाचित्रात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेले कोल्हापुरातील खासबाग मैदान.

googlenewsNext

- वसंत भोसले

हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहानी सांगणाऱ्या ‘लालमाती’ या सदरामुळे २०१८ हे वर्ष ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीसाठी अविस्मरणीय राहणार आहे. हे सदर आज समाप्त होत आहे. शाहूनगरीत येऊन यशस्वीतेची गदा कायमस्वरूपी खांद्यावर घेऊन मिरविणाºया एका कुस्तीपटूचे आत्मवृत्त मांडण्याची ‘लोकमत’ला संधी मिळाली, ही शाहूनगरीची सेवा आहे.

कमतच्या कोल्हापूर आवृत्तीसाठी २०१८ हे वर्ष एका सदरासाठी अविस्मरणीय राहणार आहे. देशाचे पाचवे हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहानी सांगणारे ‘लालमाती’ हे सदर आज अठ्ठेचाळिसाव्या भागासह समाप्त होत आहे. हे सदर म्हणजे गंगेच्या खोºयात वाराणसीजवळ एका छोट्या खेड्यातील सामान्य कुटुंबातील माणसाची कहानी आहे. ‘लोकमत’चे कोल्हापूर आवृत्तीप्रमुख आणि मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी हे सदर दीनानाथसिंह यांच्या स्मृतिपटाच्या आधारे शब्दबध्द केले. त्यातील बारकावे इतके महत्त्वाचे होते की, महाराष्ट्राच्या कुस्तीचा सत्तर वर्षांचा प्रवास त्यात नोंदविला गेला आहे. मराठी माणसांचे कुस्तीप्रेम त्यातून व्यक्त होत होते. इतिहास, भूगोल आणि मानसशास्त्रही प्रकट होत राहिले. राजाश्रयाबरोबरच लोकाश्रयाच्या आधारे महाराष्ट्राची कुस्ती परंपरा कशी प्रवास करती झाली, याचाही तो आढावा आहे. विशेष म्हणजे दीनानाथसिंह या गाजलेल्या कुस्तीवीराकडे तारीख-वार, नावांनिशी आणि गावांसह वाड्या-वस्त्यांची नावे तपशीलासह स्मरणात आहेत. त्यांच्या कोल्हापूरच्या कायमच्या वास्तव्यामागील कहानीदेखील कोल्हापूरच्या माणसांचा दिलदारपणा स्पष्ट करणारी आहे.

दर रविवारी ‘लालमाती’ हे सदर सुरू करण्यासाठी दोन वर्षे चर्चा चालू होती. मात्र, काही प्रश्न मनात रुंजी घालत होते. सन १९७८ मध्ये कुस्तीगीर म्हणून निवृत्त झालेल्या माणसाची कहानी आता वाचकांना वाचायला आवडेल का? शिवाय आता कुस्तीचे क्षेत्र पार बदलून गेले आहे. मातीवर खेळणारा हा कुस्तीगीर आहे. सन १९५८ मध्ये हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा अखिल भारतीय पातळीवर सुरू झाली. ती देशातील सर्वोच्च मानाची पाचवी स्पर्धा जिंकलेला कुस्तीगीर विस्मृतीत गेला असेल का? त्यावेळची परंपरा, पद्धत, व्यवहार, संयोजन, आदी सर्व काही बदलून गेले आहे. त्यामुळे ही कहानी वाचली जाईल का? असे प्रश्न वारंवार उपस्थित होत होते; पण त्या कुस्तीगीराच्या जीवन कहानीतच इतका दम होता की, त्यांनी ‘लालमाती’ला पुन्हा एकदा हात घातला, असेही त्यांची कहानी दर रविवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताना वाटू लागले. नियोजन झाले. विश्वास पाटील यांनी जबाबदारी घेतली. दर पंधरा दिवसांतून एकदा भेटायचे आणि त्यांनी वाराणसी ते कोल्हापूर व्हाया-मुंबई तसेच सांगली हा प्रवास सांगायचा असे ठरले. माणूस घडत असतो, तसा त्या-त्यावेळची परिस्थितीही त्याला नवीन वळण घ्यायला भाग पाडते. वाराणसी परिसरातील भैया मंडळींचे मुंबई आणि महाराष्ट्राचे एक नाते आहे. त्यांची वडीलधारी मंडळी दुधाचा व्यवसाय करण्यासाठी मुंबईत राहत होती. तबेले करून म्हशी पाळून दुधाचा धंदा चालत असे. त्याच कौटुंबिक पार्श्वभूमीचे दीनानाथसिंह लहानपणीचे टक्केटोणपे खात मुंबईला आले. उत्तरेकडील भैया मंडळींना दुधाच्या व्यवसायाबरोबरच कुस्तीचा मोठा शौक होता. ती परंपरा दीनानाथसिंह यांना कुस्तीच्या मैदानाकडे घेऊन आली. त्यांनी हा सर्व प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कहानीप्रमाणे उभा केला आहे. त्यांचेच ते आत्मकथन आहे. त्यांनी जी जगण्यासाठी धडपड केली, त्यांचीच ती कहानी आहे.

मुंबईच्या त्यांच्या वास्तव्याने महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेत त्यांना आणून सोडले आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या कुस्तीच्या इतिहासाचे अनेक पैलू या आत्मकथनात मांडले आहेत. याचे भारी कौतुक वाटते. त्यांचे निरीक्षण एखाद्या संशोधकाला, इतिहास लिहिणाºयाला किंवा विश्लेषण करणाºयालाही लाजवेल असे आहे. मुंबईमध्ये त्याकाळी होणारी कुस्ती मैदाने कशी गर्दीने फुलत होती, त्यासाठी तिकिटे लावली जात होती. त्यांच्या मांडणीतून मुंबईतील कापड गिरण्यांशी संबंधित मराठी माणसांचे जीवन प्रकट होते. सातारा, सांगली, कोल्हापूरसह कोकणातील आणि खानदेशातील मराठी माणसांच्या गावच्या कुस्तीच्या प्रेमाचा तो महानगरातील आविष्कार कसा असायचा, याचे हुबेहूब चित्रण त्यांनी केले आहे.

महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला राजाश्रय तसेच लोकाश्रय कसा मिळत होता, याचे बारकावे त्यांनी अनेक प्रसंगांतून मांडले आहेत. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, जवाहरलाल दर्डा, जांबुवंतराव धोटे, आदी नेतेही कुस्ती कला मुंबईत सादर होत असताना या कुस्तीगीरांकडे लक्ष देऊन होते याची प्रचिती येते. वसंतदादा पाटील यांच्या नजरेत बसलेले दीनानाथसिंह यांना सांगलीला येण्याचे निमंत्रण मिळाले आणि त्यांचा प्रवास शाहूप्रेमीनगरी कोल्हापूरकडे कसा झाला, याची रंजक माहिती त्यांनी मांडली आहे.
घरच्या मंडळींचे प्रोत्साहन, मुंबईतील मराठी भाषिक कुस्तीप्रेमींनी दिलेले बळ आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाने दाखविलेल्या दिशेने ते सांगली व्हाया कोल्हापूरकडे आले. त्यांना कोल्हापूरच्या कुस्तीने आपलेसे करून सोडले आणि त्यांनीही कोल्हापूरला आपलं मानत परत वाराणसीला न जाण्याचा निर्णय घेऊन टाकला. कुस्तीचा जोश होता, मैदानामागून मैदाने गाजवत हा कुस्तीगीर महाराष्ट्रभर फिरत होता, गाजत होता. सन १९६६ मध्ये जळगावला झालेल्या मैदानात ते महाराष्टÑ केसरी झाले. १९७१ मध्ये नागपुरच्या मैदानावर देशाचा पाचवा हिंदकेसरी होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला. १९७३ मध्ये वाराणसीतील मैदानात ते भारतमल्ल केसरी बनले. त्यांच्या या जडणघडणीस खरा आकार मिळाला तो कोल्हापूरच्या गंगावेश तालमीच्या मातीनेच!
कोल्हापूरची कुस्ती परंपरा मोठी आहे. त्याची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सन १८९७ मध्ये राजाराम महाराज यांच्या बारशानिमित्ताने आयोजित केलेल्या कुस्ती मैदानाने झाली. यामुळे कुस्ती मैदानांचे मोठ्या प्रमाणात वारे वाहू लागले. कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ तालमीची स्थापना सन १८३८ ची आहे. जवळपास वीसएक तालमी या काळात होत्या. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जेव्हा उत्तरेकडील मल्लांना पंचगंगेचे पाणी पाजले पाहिजे असा निर्धार केला, तेव्हा या कुस्तीला नवे वळण लागले. उत्तरेकडील अनेक नामवंत कुस्तीगीरांना आमंत्रित करून त्यांनी तयारी सुरू केली. बाबूजमाल तालीम, बोडके तालीम, आदींमध्ये उत्तरेकडील कुस्तीगीरांची व्यवस्था केली होती. हरिसिंग, धर्मसिंग, वस्सा, केसरसिंग, कल्लू, गामा पैलवान, लाबू, कमरुद्दीन, चंदन, गुलाब , मोहिद्दीन, रमजान, गजानन पंडत, इमामबक्ष, हसनबक्ष, गुलाम कादर, भोला पंजाबी, भगवानसिंह, आदी कुस्तीगीर कोल्हापूरला आले. त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आश्रय दिलाच, पण स्थानिक कुस्तीगीर घडविण्यासाठीही त्यांचा उपयोग करून घेतला.

एवढे करून शाहू महाराज यांचे कार्य थांबले नाही. पंजाबी कुस्तीगीरांबरोबरच कोल्हापूरच्या मल्लांनी दोन हात करून कोल्हापूरचे नाव गाजवावे, यासाठी त्यांनी सर्व तालमींना भेटी दिल्या. त्यांची पडझड पाहून महाराज अस्वस्थ झाले. सर्व तालमींना मदत करायला सुरुवात केली. बाबूजमाल तालमीचा जीर्णोद्धार केला. सुमारे पन्नासहून अधिक तालमींचे त्यांनी पुनरुज्जीवन केले. नव्याने तालमी बांधण्यासाठी जागा आणि आर्थिक मदत केली. व्यायामाची साधने पुरविली. मर्दानी खेळास प्रोत्साहन दिले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सन १९०२ मध्ये युरोपचा दौरा केला. सप्तम एडवर्ड बादशहाच्या राज्यारोहण सोहळ्यानिमित्त हा दौरा होता. इंग्लंडबरोबरच फ्रान्स आणि इटलीला भेट दिली. रोममध्ये त्यांनी आॅलिम्पिक कुस्ती स्टेडियमला भेट दिली. एक आठवण अशीही नोंदविली आहे की, महाराजांच्या बरोबर कृष्णा मर्दाने हा त्या काळात गाजत असलेला पैलवान होता. सुमारे ९० हजार प्रेक्षक क्षमता असलेले ते मैदान पाहून कृष्णा मर्दानेला महाराजांनी सांगितले की, ‘आपणही कोल्हापूरला असे मैदान उभे करूया ! त्यात तुझीच पहिली कुस्ती होईल.’ त्यातूनच आताचं खासबाग मैदान महाराजानी उभ केलं. महाराजांच्या जागतिक दृष्टिकोनाचे ते प्रतीक आहे. त्यांनी जागतिकीकरणाचा मंत्र तेव्हाच स्वीकारला आणि जगाशी स्पर्धा करणारी साधने आपल्या कोल्हापुरात उभी करण्याचा निर्णय घेतल्याचे यातून दिसते.

आपल्या पैलवानांना आव्हान देतील आणि त्यांचा सामना करत आपले पैलवान तयार होतील, या दृष्टिकोनातून महाराजांनी उत्तरेकडील पैलवान आणले. त्यांचे पालनपोषण केले. तालमींचा जीर्णोद्धार केला. नव्या तालमी उभ्या केल्या. पैलवानांची कुस्ती सुटली की, त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहतो याचाही विचार त्यांनी केला आणि असंख्य पैलवानांना जमिनी दिल्या, घरे दिली, आर्थिक मदत केली. तसेच कायमचा निधीही उभारला. त्याला ‘हजारी फंड’ म्हटले जात होते. त्यासाठी कुस्ती मैदाने तिकिटे लावून ठेवण्याची पद्धत महाराजांनी सुरू केली. याची सुरुवात सन १९१२ मध्ये खासबाग मैदानाच्या उद्घाटनापासूनच करण्यात आली. खर्च वजा जाऊन उरलेली तिकिटांची रक्कम या हजारी फंडात जमा केली जाऊ लागली. त्यातून उतारवयातील पैलवानांना मानधन देण्यात येऊ लागले. (राज्य शासनाने महाराष्ट केसरी, हिंदकेसरी कुस्तीगीरांना दरमहा मानधन मंजूर केले आहे पण ते देण्याचे नियोजन नाही. वर्षातून एकदा ते दिले जाते. इतकी उदासिनता आहे.)

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केलेली ही कुस्तीची परंपरा आज हिंदकेसरी दीनानाथसिंह यांच्या आत्मवृत्तानिमित्त समोर येते आहे. तीच परंपरा कोल्हापूरच्या पुढील पिढीने जीवंत ठेवली. सांभाळली आहे. दीनानाथसिंह हे उत्तरेतून कुस्ती शिकण्यासाठी आले, तयार झाले, नाव कमावलं आणि लोकांच्या आश्रयामुळे कोल्हापूरकरच होऊन गेले. राजर्षी शाहू महाराज यांनी सन १८९७ मध्ये सुरू केलेली ही परंपरा आहे. त्याच माळेतील हा प्रवास आहे. अनेकवेळा त्यांना परत गावी जावे, असे वाटत होते. किंबहुना व्यक्तिगत आयुष्यात तसे प्रसंगही येत राहिले. पण, शाहू विचाराने वाटचाल करणाऱ्या येथील नेतृत्वाने आणि जनतेने त्यांना जाऊ दिले नाही. ही खरी शाहू विचारांची परंपरा आहे. ही इतिहासातून घेण्याची प्रेरणा आहे. अशाप्रकारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी लावलेल्या या कुस्तीच्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. त्यांनी कुस्तीची परंपरा अशी निर्माण केली की, त्याला राज्य नव्हे, देश नव्हे, तर जागतिक आयाम आले, म्हणूनच कोल्हापूर ही देशाची कुस्तीपंढरी झाली.
हिंदकेसरी दीनानाथसिंह यांनी या खासबाग मैदानासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक गाजलेल्या कुस्तींची रसरशीत वर्णने आत्मवृत्तात मांडली आहेत. त्यांचे अनेक तपशीलही दिले आहेत, शिवाय त्या-त्या वेळच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच क्रीडा संस्कृतीचे वर्णनही मांडले आहे. बाळासाहेब देसाई यांनी दिलेली बिदागी, वसंतदादा पाटील यांचा सल्ला, उदयसिंहराव गायकवाड यांचे पाठबळ, अनेक नामवंत कुस्तीगीरांचा सहवास असे अनेक प्रसंग त्यांनी सांगितले आहेत. पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असतानाची भेट आणि त्यांच्यात झालेला संवाद हा साहित्य, भाषा, संस्कृती यांच्या मिलनाचा आहे. दीनानाथसिंह कुस्तीगीर असले तरी एक उत्तम भाषाशैलीत बोलणारे अस्सल हिंदी भाषिक आहेत. त्यात उर्दू आणि संस्कृत भाषेचा मिलाफ आहे. त्यांच्या भाषेत शेरो-शायरी ऐकण्याचा योग हा एका मनस्वी क्रीडापटूला भेटल्याचा आनंद देऊन जातो.
शाहूनगरीत येऊन आयुष्याशी डाव खेळून यशस्वीतेची गदा कायमस्वरूपी खांद्यावर घेऊन मिरविणाºया अशा एका कुस्तीपटूचे आत्मवृत्त मांडण्याची संधी ‘लोकमत’ला मिळाली, ही शाहूनगरीची सेवा आहे. शाहू विचार आणि कार्याच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. त्याच वाटेवर घडलेले दीनानाथसिंह आहेत.

 

Web Title: Life story of Hindakesari Dinanath Singh! Sundays Special - Jagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.