लाईट.. ओके. कॅमेरा.. रोलिंग, अँक्शन.. जपून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 06:04 AM2020-07-05T06:04:00+5:302020-07-05T06:05:16+5:30

निसर्गरम्य परिसर आणि ऐतिहासिक वारसा. त्यामुळे सातारा जिल्ह्याची ओळख आता  ‘सॉलीवूड’ म्हणूनही होऊ लागली आहे.  मालिकांचं चित्रिकरणही तिथे सुरू झालं आहे. पण काय दृष्य दिसतंय सेटवर? मुख्य कलाकरांचा रुबाब? सेटवरची दंगामस्ती? अघळपघळ गप्पा? कि सगळ्याच गोष्टींवर आलेल्या कोरोना र्मयादा?.

Light.. OK, Camera.. Rolling, Action .. Be careful! | लाईट.. ओके. कॅमेरा.. रोलिंग, अँक्शन.. जपून!

लाईट.. ओके. कॅमेरा.. रोलिंग, अँक्शन.. जपून!

Next
ठळक मुद्देकोरोना संक्रमण काळातही प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी चेहर्‍यावर रंग लावून, मनातल्या भीतीचे ढग दूर लोटून ही मंडळी शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. 

- प्रगती जाधव-पाटील

ऐतिहासिक वारसा असलेला सातारा जिल्हा ‘सॉलीवूड’ म्हणूनही ओळख निर्माण करतोय. डोंगर, दर्‍या, घाट अशा निसर्गसंपन्न वातावरणाबरोबरच ग्रामीण भागातील चित्र उभं करण्यासाठी सातार्‍याला प्राधान्य दिलं जातंय. अनलॉक-1 मध्ये सातार्‍यात ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेचे चित्रिकरण प्रभुची वाडी येथे सुरू आहे. प्रचंड काळजी घेऊन सुरू असलेल्या या चित्रीकरणात कोरोनाची दहशत दिसत असली तरी कला सादर करायची उर्मी आणि कमी संसाधनात उत्कृष्ट काम करण्याची जिद्दही पाहायला मिळते आहे.
दूरचित्रवाणीवरील मालिकेशी सामान्यांची नाळ इतकी घट्ट जोडली गेली आहे की आठवड्यातील एका दिवसाचा विरहही प्रेक्षकांना सोसवत नाही. पण मार्च महिन्यापासून मालिकांच्या विश्वातून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांसाठी या मालिका पुन्हा सुरू होताहेत. सातार्‍यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर प्रभूचीवाडी हे अवघ्या 50 -60 उंबर्‍यांचं गाव. गावाच्या अगदी शेवटच्या टोकावर प्रशस्त बंगल्यात हे चित्रिकरण सुरु आहे. तिथलं मोठ्ठं गेट उघडून कलावंतांनी सकाळी 7 वाजता आत प्रवेश केला की गेट थेट संध्याकाळी सात वाजता शिफ्ट संपल्यावरच पुन्हा उघडतं. 
छोट्या पडद्यावर मोठं भावविश्व निर्माण करणार्‍या मालिकांचं जग सर्वांच्याच आवडीचं! लॉकडाऊनमुळं गेल्या 100 दिवसांत प्रेक्षक, मालिका आणि कलाकारांची ताटातूट झाली. हा दुरावा सहन न करू शकणार्‍या अनेकांनी पुन्हा एकदा या मालिकांचं अक्षरश: पारायण केलं. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे दुपारच्या गप्पांमध्येही ज्या पात्रांचा उल्लेख व्हायचा, ज्यांच्या काळजीनं आयाबायांच्या डोळ्यांत पाणी यायचं ती सगळी मंडळी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी कोरोना महामारीच्या काळातही सरसावली आहेत. 
शासनाने आदेश काढल्यानंतर राज्यातील विविध ठिकाणी पुन्हा एकदा लाईट.. कॅमेरा, अँक्शनची लगबग सुरू झालीय. तशीच लगबग प्रभूची वाडीमध्येही पहायला मिळाली. पण चित्रीकरणाच्या ठिकाणी आता पूर्वीइतकं मोकळं वातावरण राहिलेलं नाही. 50 जणांची घालून दिलेली र्मयादा, तोंडावर मास्क अन् शिल्डचं आवरण आल्याने नैसर्गिक हालचालींवरही र्मयादा आल्या आहेत. तोंडावर मास्क, हातात ग्लोव्ह्ज लावल्याने हे कलाकार थोडं आकसून गेलेत. 
मराठी मालिकांची पटकथा ही बहुतांशी कुटुंबाला केंद्रबिंदू मानून नटवलेली असते. मालिका कौटुंबिक बाजाची असो की भयकथा, ती फिरते एका विशिष्ट कुटुंबाभोवतीच. या कुटुंबांतही सामान्यांच्या घरातली सर्व नाती आढळतात. विशेष म्हणजे नात्यांचा बारकाईने अभ्यास केलेल्या पटकथा लेखकांनी अत्यंत मार्मिकपणे गुणदोषांसह ही नाती रंगवली की प्रेक्षकांची त्यांच्याशी असलेली जवळीक अधिक घट्ट होते. 
घरातील प्रत्येक नात्याचं रुप या मालिकांमध्ये पाहायला मिळतं. ती वास्तवाशी जोडलेली असली, तर या मालिकांशी नाळ जोडणं मग अधिकच सहज, सोपं होऊन जातं. त्यामुळेच मालिकांमधले छोट्यांतले छोटे सोहळेही सामान्यांच्या घरातील आनंद बनून जातात. 
अनलॉक-1 मध्ये सुरू झालेल्या चित्रीकरणाचं रुपडं पूर्णपणे बदलून गेलंय. पूर्वी शिफ्टच्या वेळा ठरलेल्या असायच्या. त्यामुळे निर्धारित वेळेत कलाकार सेटवर पोहोचायचे. त्यानंतर पात्राच्या आवश्यकतेनुसार वेश करून ही मंडळी चित्रीकरणासाठी सज्ज व्हायची. आता मात्र आलेल्या प्रत्येकाला सॅनिटायझ करूनच आत यावं लागतंय. थर्मल चेकअप, ऑक्सिजन मात्रा पाहिल्यानंतर आपापली पादत्राणं स्वतंत्र पिशवीत ठेवून मगच सेटवर पाय ठेवला जातो. पूर्वी सारखं आल्या-आल्या सर्वांच्या गळाभेटी आता लुप्त झाल्यात. अत्यंत रुक्षपणे एकमेकांकडे बघून हातानेच हाय करून कामाला सुरुवात केली जाते. त्यामुळे सेटवरचा ‘दंगा’ही आता कमी झालाय. त्यामुळे पूर्वीइतका गलका आता अनुभवायला मिळत नाही.
उत्तम अदाकारी करणारे हे कलाकार सेटवर अगदी सामान्यांप्रमाणे राहतात. पूर्वी एकाच बॅगेत येणारं मेकअप किट आता स्वतंत्र झालंय. कंगवा, पाणी पिण्याचा ग्लास, चहाचा कप, जेवणाची भांडी या प्रत्येक गोष्टीसाठी सर्वच आत्मनिर्भर झालेत. कोणाची वस्तू कुठं आहे याचा ताळमेळ लावता-लावता स्पॉट दादा दोन दिवस गोंधळला; पण त्यालाही आता ज्याच्या त्याच्या वस्तू ‘सवत्या’ ठेवायची आणि गोळा करायची सवय पडलीय.   
दोन शॉटच्या मध्ये एकमेकांच्या खोड्या काढणं, स्पॉट दादाची चेष्टा मस्करी करणं, दिग्दर्शकांच्या कामात लक्ष घालणं, पाय मोकळे करायला बाहेर डोकावणं यातलं काहीही करणं आता अशक्य होऊ लागलंय. शॉट झाला की लगेचच सॅनिटायझ करण्याची लगबग सुरू असल्यानं तिथंही कोरोनाची छुपी दहशत पाहायला मिळतेय. परस्परांच्या जवळ येऊन मोबाइलमधल्या गमती-जमती बघण्यासाठीही कोणी कोणाच्या जवळ बसेना अशी स्थिती आहे. कोरोनाच्या या दहशतीचा परिणाम अभिनयावर होण्याची शक्यता आहे. आऊटडोअर शूटिंगला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सलग बेडरूम, हॉल, किचन, गॅलरी, अंगण या पलीकडे कुठेही चित्रीकरणाचा अवकाशही सीमित झाला आहे. 
कलाकार राज्यभरातून एकत्र आलेले असतात. वषार्नुवषर्ं एकत्र काम केल्यानं परस्परांशी त्यांचं भावनिक नातं निर्माण झालेलं असतं. अमुक काम माझं नाही, असं म्हणून कोणीच जबाबदारी झटकत नव्हतं. काम लवकर व्हावं, या उद्देशानं हे सगळे एकदिलाने परस्परांना मदत करायचे; पण आता प्रत्येकाला केवळ स्वत:वर सोपविलेली जबाबदारी पार पाडण्याचं बंधन आलं आहे. शेजारी-शेजारी बसणार्‍या दिग्दर्शकांतही अंतर पडलं आणि संवादांवरही र्मयादा आल्याचं सेटवर पाहायला मिळतं आहे. 
लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या काळात प्रेक्षकांच्या हाती करमणुकीसाठी विविध माध्यमं होती. त्यामुळे पुन्हा मालिका प्रेक्षकांपयर्ंत पोहोचविण्यासाठी सर्वांनीच शर्थीचे प्रय} सुरू केले आहेत. कोरोना संक्रमण काळातही प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी चेहर्‍यावर रंग लावून, मनातल्या भीतीचे ढग दूर लोटून ही मंडळी शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. कोरोनानंतरचा हा बदल त्यांनाही फार मानवलेला नाही; पण मायबाप प्रेक्षकाची संध्याकाळ कुटुंबवत्सल बनवायला ते पुन्हा सज्ज होताहेत.  

पीपीई कीट घालून मेकअप!
चित्रीकरणाच्या स्थळावर पोहोचल्यानंतर शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे सुरक्षित अंतर ठेवून चित्रीकरण सुरू आहे. कलाकारांच्या सर्वाधिक जवळ जाऊन त्यांचा मेकअप करावा लागतो. त्यामुळे मेकअप आर्टिस्टला पीपीई कीट घालणं सक्तीचं करण्यात आलं आहे. परिणामी अत्यंत त्रासात हे काम करण्याची वेळ या कलाकारांवर आली आहे. चित्रीकरण सुरू झाल्यापासून संपेपर्यंत मेकअप आर्टिस्टला किटमध्ये राहणं कठीण जातंय. प्रत्येक वेळी कीटची काढ-घाल करणं शक्य नाही, कारण प्रत्येक शॉटनंतर कलाकारांना ‘टचअप’ द्यावा लागतो. चित्रीकरणाच्या ठिकाणी मोठय़ा लाईटस्मुळे उकडणं आणि अंगात पिपीई कीट असल्याने गुदमरणं अशा अडचणींमुळे या आर्टिस्ट्सचे हाल सुरु आहेत. 

वनडे आर्टिस्टवर कुर्‍हाड!
लहान पडद्यांवर नायक-नायिकेच्या अवतीभवती विविध पात्रं निर्माण केली जातात. मुख्य पात्र आणि त्याच्या कुटुंबीयांवर वारंवार चित्रीकरण झाल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याला र्मयादा येतात. त्यामुळे मालिकांमध्ये मित्र, नातेवाईक, ग्रामस्थ, पाहुणे कलाकार यांची रेलचेल असते. अनलॉक-1 मध्ये चित्रीकरण करण्यासाठी अवघ्या 50 जणांच्या क्रूला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मालिकेत छोटे-छोटे पात्र साकारणार्‍या कलाकारांच्या कामावर गंडांतर आले आहे.  

स्थानिक रोजगारावर गंडांतर
चित्रीकरण सुरू असलेल्या गावांची ओळख या मालिकांमधून झाल्यानंतर राज्यातील कानाकोपर्‍यातून गावांना भेटी देणार्‍या पर्यटकांची संख्या वाढते. या पर्यटकांना आवश्यक असणार्‍या छोट्या मोठय़ा गोष्टींची दुकानं चित्रीकरण कालावधीत उत्तम चालतात. चित्रीकरणाच्या ठिकाणी मुक्कामी असणार्‍या तंत्रज्ञांना अनेकदा गावातच जेवणाची सोय केली जाते. सकाळी नाष्टा, संध्याकाळी चहा आणि दोन वेळच्या जेवणाचं नियोजन काही ग्रामस्थांकडे दिलं जातं. या माध्यमातून अर्थाजनाची संधीही उपलब्ध होत होती. आता मात्र शासनाने परवानगी दिलेल्या हॉटेल्समधूनच जेवण आणावं लागतं. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार बुडला. 

pragatipatil26@gmail.com
(लेखिका लोकमतच्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

Web Title: Light.. OK, Camera.. Rolling, Action .. Be careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.