योगसाधनेतून उजळलेला प्रकाश
By admin | Published: November 14, 2014 10:10 PM2014-11-14T22:10:53+5:302014-11-14T22:10:53+5:30
अनेक वर्षांचं दारूचं व्यसन असलेल्या चाळीस वर्षांच्या प्रकाश भोसलेंना घेऊन त्यांची पत्नी आणि सासरे माझ्याकडे आले.
Next
डॉ.संप्रसाद विनोद
(लेखक महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे योगगुरू आहेत.) -
अनेक वर्षांचं दारूचं व्यसन असलेल्या चाळीस वर्षांच्या प्रकाश भोसलेंना घेऊन त्यांची पत्नी आणि सासरे माझ्याकडे आले. भोसले बँकेत नोकरीला होते. त्यांचं मुळातलं आडदांड शरीर दारूने पार पोखरून गेलं होतं. कधी काळी केलेल्या व्यायामाची मावळती लक्षणं कुठेकुठे दिसत होती. शरीराचा काळपट वर्ण, त्यात सूजही आलेली. जागरणाने डोळे तारवटले होते. लाल झाले होते. बोलणंदेखील दारूड्या माणसासारखं अडखळत, थांबत-थांबत, बरळल्यासारखं होतं. बोलण्याचा धागा बर्याच वेळा भलतीकडेच भरकटत होता. रात्री प्यायलेल्या दारूचा आणि धूम्रपानाचा संमिश्र वास सगळ्या खोलीभर पसरला होता. ‘असला कसला विचित्र वास येतोय?’ असं विचारत माझा धाकटा मुलगा हळूच माझ्या कन्सल्टिंग रूममध्ये डोकावूनही गेला. त्याला पाहिल्यानंतर प्रकाशजींच्या चेहर्यावर काही क्षण का होईना पण एक छान प्रसन्न भाव तरळून गेला. मुलांविषयी त्यांना वाटणार्या सद्भावनेचं ते प्रतीक होतं. अशी माणसं खूप संवेदनशील आणि ग्रहणशील असतात. योगोपचारांसाठी माझ्या दृष्टीने हे खूपच चांगलं चिन्ह होतं. लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना माणसाचं मन छान समजतं. माणूस मनाने निर्मळ असेल तर त्याला पाहून, भेटून पाळीव जनावरं आणि मुलं लगेच त्यांच्याकडे आकृष्ट होतात. त्यांना बिलगतात. जनावरं तर चाटतातही. बर्याच मद्यपींच्या बाबतीत माझा असा अनुभव आहे, की ही माणसं मुळात खूपच चांगली असतात, पण भावनाप्रधानतेमुळे ती वाहवत गेलेली असतात. जवळच्या मित्रांना नाही कसं म्हणायचं असं वाटल्याने त्यांचं मन राखण्यासाठी ती बर्याच वेळा दारूच्या आहारी जातात. प्रकाशजी याच प्रकारातले असावेत असं मला वाटून गेलं.
प्रकाशजींनी माझ्याकडे अभिजात योगसाधनेला येण्याची इच्छा प्रकट केली. प्रत्यक्ष अभिजात योगसाधना सुरू झाल्यावर काही गोष्टी समोर आल्या- त्यातल्या काही त्यांनी सांगितल्या- काही त्यांच्या पत्नीने सांगितल्या. ‘आमच्या यांच्याकडे कोणी मदत मागायला आलं, की हे अगदी पदरमोड करून त्यांना मदत करतात. त्यांच्या या स्वभावाचा सगळेजण फायदा घेतात. पण, आमच्या या भोळ्या सांबाला काही कळतच नाही.’ पत्नी म्हणाली. अशा साध्यासुध्या, भोळ्याभाबड्या माणसाला तर मदत करायलाच हवी- मी मनाशी पक्कं ठरवलं.
‘मला दारू खरोखरच सोडायची आहे, पण कितीही प्रयत्न केला तरी ती काही सुटत नाही. काय करावं काही समजत नाही.’ असं काकुळतीने प्रकाशजींनी मला सांगितलं. दारू सोडण्याची प्रामाणिक इच्छा असणं हीदेखील माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट होती. त्यामुळे, योगोपचारांना ते उत्तम प्रतिसाद देतील याविषयी आधी निर्माण झालेला विश्वास अधिक दृढ झाला.
प्रकाशजींचा दिवस सकाळी १0 वाजता उठल्यावर सुरू व्हायचा. पटपट कसंबसं सगळं आटपून ते बँकेत जायचे. रात्रीच्या दारूचा प्रभाव दिवसभर राहिल्याने काम धड व्हायचं नाही. चुका व्हायच्या. वरिष्ठ अधिकारी रागवायचे. मेमो द्यायचे. प्रकाशजींचा मूड जायचा. हातून आणखी चुका व्हायच्या. परत मूड बिघडायचा. असं दुष्टचक्र अनेक महिने चालू राहिलं. संध्याकाळी घरी आले, की मूड बिघडलाय म्हणून ‘तथाकथित’ मित्रांबरोबर दारू प्यायची. दारूबरोबर एका पाठोपाठ एक अशा अनेक सिगारेट्स व्हायच्या. बरोबर फरसाण, भजी, खाणं चालूच असायचं. जोडीला घरी शिजवलेलं किंवा हॉटेलमधून आणलेलं मटण अथवा चिकनही रोज लागायचं. हे सगळं करता करता त्यांची पत्नी अगदी मेटाकुटीला यायची. शिवाय, या सगळ्यासाठी प्रचंड खर्च व्हायचा. त्यामुळे, घराचं सगळं आर्थिक गणित बिघडायचं. मुलांकडे, त्यांच्या अभ्यासाकडे, पोषणाकडे दुर्लक्ष व्हायचं. मुलांची शाळा कुठली, ती शाळेत जातात की नाही, अभ्यास करतात की नाही, कुठल्या वर्गात शिकतायत हेदेखील त्यांना माहीत नसायचं. पत्नी घरच्या काही अडचणी सांगू लागली, की प्रकाशजींचा भडका उडायचा. ते तिच्यावर खेकसायचे. प्रसंगी मारायचेदेखील. दारूची नशा उतरली, की तिची क्षमा मागायचे. त्यांच्या या अशा स्वभावामुळे आणि मुलांकडे पाहून ती माऊली सगळं सहन करायची. शेवटी, सगळं हाताबाहेर जायची वेळ आली. आधी केलेल्या चांगल्या कामाच्या बळावर बँकेने चार-सहा महिने प्रकाशजींना सांभाळून घेतलं. पण, अति झाल्यावर शेवटचा उपाय म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आणि त्याच वेळी ते योगोपचारासाठी माझ्याकडे आले.
पत्नीला आणि तिच्या वडिलांना या सगळ्याचा प्रचंड ताण आला. काय करावं काही सुचेनासं झालं. त्यांना प्रथम समजावून सांगावं लागलं, की ‘व्यसनाधीनता हा एक विकार आहे. प्रकाशजी व्यसनाधीन असले तरी माणूस म्हणून ते काही वाईट नाहीत’. त्यांचं ‘व्यसन’ फक्त वाईट आहे. या व्यसनातून त्यांना कायमचं मुक्त करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील. मार्ग खडतर आहे, पण अशक्य नाही. प्रथम, अवघड वाटलं तरी ते जसे आहेत तसा त्यांचा तुम्हाला सगळ्यांना स्वीकार करावा लागेल. दारू सोडण्यासाठी त्यांना प्रेमाने प्रवृत्त करावं लागेल. त्यासाठी प्रचंड धीर धरावा लागेल. अडचणी येतील, पण त्यातूनच मार्ग काढावा लागेल. घरच्यांनी सगळं काळजीपूर्वक ऐकून घेतलं. समजून घेतलं आणि बर्याच अंशी प्रत्यक्षातही आणलं.
प्रकाशजींशी बोलताना त्यांना सांगितलं, ‘‘दारू सोडायचा ‘नकारात्मक’ उपचार करण्यापेक्षा आपण योगसाधनेचा आनंद मिळवण्याचा ‘सकारात्मक’ उपचार करणं अधिक चांगलं. हा आनंद मिळायला लागला, की दारूचं आकर्षण आपोआप कमी होईल. पण त्यासाठी योगसाधना मात्र रोज आणि मनापासून करायला हवी. त्यात खंड पडायला नको.’’ झालंही तसंच. ध्यानामुळे त्यांचं मन शांत होत गेलं. प्रगाढ विश्रांती मिळायला लागली. योगसाधनेतली गोडी वाढत गेली. हळूहळू दारूचं आकर्षण कमी होऊ लागलं. त्यांच्या योगसाधनेला आता ‘संकल्पशक्ती’ ची मदत मिळाली तर व्यसनमुक्ती सोपी जाईल असं वाटल्यामुळे मी त्यांना रोज सकाळी उठल्यावर ‘मी आजचा दिवस दारू पिणार नाही’ असा संकल्प करून तो रोज यशस्वी करण्याविषयी सुचवलं. तसं त्यांनी केलं. त्यातून त्यांना खूप मोठा आत्मविश्वास मिळाला. दोन-तीन महिन्यांनी त्यांच्या पत्नीने येऊन चांगली बातमी दिली. त्या वेळी तिचा चेहरा कृतज्ञतेने उजळून निघाला होता. नंतर प्रकाशजींची दारू पूर्ण थांबली. धूम्रपान आणि मांसाहारही खूप कमी झाला. वाईट सवयी दूर झाल्या. चेहर्यावर एक तजेला आला. तब्येत सुधारली. पत्नीची आणि खरं तर सगळ्या ‘घराचीच तब्येत’ सुधारली. घरातल्यांचं सहकार्य, प्रकाशजींची प्रामाणिक इच्छा, संकल्पशक्ती आणि अभिजात योगसाधनेचा हा एकात्मिक परिणाम होता !!
विशेष म्हणजे, हल्ली प्रकाशजी व्यसनाधीन झालेल्या इतर मद्यपींना दारूच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी मदत करू लागले आहेत. अनेकांनी त्याचा लाभ घेतला आहे. घेत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना आपण शुभेच्छा देऊ या !!