रेखीव वाटाडय़ा
By Admin | Published: February 6, 2016 02:45 PM2016-02-06T14:45:17+5:302016-02-06T14:45:17+5:30
हजारो किलोमीटर स्थलांतर करणा:या पक्ष्यांच्या वाटेचा नकाशा त्यांच्या जीन्समध्येच नोंदलेला असतो. माणसाला मात्र त्याच्या भटकंतीचा नकाशा सुरुवातीला आपल्या मनावर गोंदवावा लागला. माणसाचं प्रवासवेड आणि गरज वाढत गेली तसतसा नकाशाही उत्क्रांत झाला. भिंतींवरचे नकाशे कागदी घडय़ांत आले, खिशात मावले. उपग्रहांवरून टिपलेले, हवी ती माहिती देणारे हालतेबोलते नकाशे मग मुठीतल्या मोबाइलमध्येही सामावले.
- डॉ. उज्ज्वला दळवी
स्थलांतर करणा:या पक्ष्यांच्या वाटेचा नकाशा त्यांच्या जीन्समध्ये नोंदलेला असतो. इतिहासापूर्वीच्या शोधी-पारधी मानवाला त्याच्या भटकंतीच्या परिघातल्या आसमंताचा नकाशा मनावर गोंदणं अत्यावश्यक होतं. टोळीतल्या सगळ्यांच्या मनातल्या नकाशांचा मिळून एकसंध माहितीपट बनवायला खाणाखुणा पुरेनाशा झाल्या. म्हणून दिशा-अंतर-काळ सारे संदर्भ शब्द-नकाशात बसवायला भाषेचा उगम झाला असावा. सुमारे 36क्क्क् वर्षांपूर्वी मानवाला चितारणं-कोरणं-रंगवणं जमलं. चित्तनकाशांची भित्तिचित्रं झाली. विस्तारलेल्या जमातींच्या टोळ्या-टोळ्यांपर्यंत माहिती पोचली.
तसं ङोकोस्लोव्हाकियात 25क्क्क्, तर युक्रेनमध्ये 12क्क्क् वर्षांपूर्वीचं नकाशाचित्रण आहे. फ्रान्समधल्या एका गुंफेच्या भिंतीवर रात्रीच्या वाटाडय़ांचं, ता:यांचं नक्षत्रचित्र आहे. तुर्कस्तानातल्या 8क्क्क् वर्षांपूर्वीच्या भित्तिचित्रत अख्ख्या गावाचा आराखडा आहे. त्यानंतरच्या सिंधू संस्कृतीत जमिनीच्या सर्वेक्षणाची आयुधं आणि मिश्रधातूचे मापक गज सापडले आहेत. सिंधू संस्कृतीतल्या बांधकामांचा विस्तार पाहता तेव्हा नकाशे असावे असं शास्त्रज्ञांचं मत आहे.
युक्रेनचा, मॅमथच्या सुळ्यावरचा नकाशा
वेगवेगळी ठिकाणं आणि वाटा यांचं एकमेकांशी नातं सांगणारं, एकाच कालखंडात नोंदलेलं आणि प्रवासाच्या सोयीसाठी सर्वांना समजतील अशा खुणा वापरणारं चित्रण म्हणजे नकाशा. आल्प्समधल्या माँट बेगोमधलं 75क्क् वर्षांपूर्वीचं अत्यंत साधं चित्रण त्या तिन्ही कसोटय़ांना उतरतं. इजिप्शियन पॅपायरसवरचा 3क्क्क् वर्षांपूर्वीचा नकाशा सभोवतालच्या प्रदेशाचा तपशील तर टीपांसहित सांगतोच; पण तिथल्या दगडांचे आणि वाळूचे प्रकारही विविध रंगांनी दर्शवतो.
माणसाच्या प्रवासाचा पल्ला विस्तारला आणि मार्गदर्शनाच्या गरजा वाढल्या. सुमारे पंचवीसशे वर्षांपूर्वी ग्रीक खलाशांनी आपल्या सागरभ्रमंतीच्या रोजनिश्या लिहिल्या. त्यांच्यातली काटेकोर माहिती नकाशे बनवताना ग्रीक शास्त्रज्ञांच्या उपयोगी पडली. पण त्यांची जगाची कल्पना युरोप, आशिया आणि लिबिया ‘ऊर्फ’ आफ्रिका अशी त्रिखंडीच होती. त्याच सुमाराला भूमितीवाल्या पायथागोरसनं पृथ्वीच्या नकाशात उष्ण, समशीतोष्ण आणि शीत कटिबंधांचे पाच भाग दाखवले. पृथ्वी गोल असल्याचा दावाही केला. पुढे तो दावा अॅरिस्टॉटलनं पुराव्यांनिशी सिद्ध केला. मग एरॅटोस्थेनिसनं गणित करून विषुववृत्ताची लांबी ठरवली आणि माहीत असलेल्या देशांचा नकाशा काल्पनिक उभ्या-आडव्या समांतर रेषांच्या आधाराने बसवला. त्या जाळ्यामुळे नकाशा काढणं सोपं झालं.
ग्रीकांनी नकाशाशास्त्रत इतकी प्रगती केली तरी अवाढव्य साम्राज्य असलेल्या रोमनांनी मात्र ढोबळ आराखडेच काढले. रोमनांना गणितात फारसा रस नव्हता. त्यांचा पाचव्या शतकातला आराखडासुद्धा मोजमापांचा, दिशांचा मुलाहिजा ठेवत नाही. पण त्यांच्या साम्राज्याच्या कोन्याकोप:यातल्या ठिकाणावाटांचं परस्पर नातं सांगणारे ते आराखडे राज्य शासन-रक्षण-विस्तार सा:याला उपयोगी पडले.
हिंदुस्थानात मौखिक परंपरेमुळे मेघदूतासारखे शाब्दिक नकाशे प्रचलित होते. शिवाय भूर्जपत्रवर नकाशाच्या जागेत शब्दांतलं अधिक यथार्थ वर्णन मावत असे. बंधनकारक नियमही नव्हते. त्यामुळे नकाशे कमलाकृती-मनुष्याकृतीही असत.
ग्रीकांनीही नकाशे नियमांच्या चौकटीत बसवले नव्हते. त्यामुळे नकाशांच्या हुबेहूब खात्रीलायक प्रती बनवणं शक्य नव्हतं. दोन हजार वर्षांपूर्वी टोलेमीने विषुववृत्तापासून वर-खाली भूगोलाच्या 36क्क्च्या आडव्या चकत्या म्हणजे अक्षांश आणि जिब्राल्टरपासून पृथ्वीभोवती 36क्क्च्या उभ्या रेषा म्हणजे रेखांश कल्पून पृथ्वीवरच्या प्रत्येक ठिकाणाला नकाशात नि:संदिग्ध अढळपद ठरवून दिलं.
हजार वर्षांपूर्वी अल्-बैरूनीने भू-गोलाच्या ध्रुवाजवळचे भाग त्रिकोणाकारात सोडवले आणि गोल पृथ्वीचा नकाशा सपाट कागदावर उतरवला. त्याच्या पुस्तकात त्याने पश्चिम हिंदुस्थानातल्या अनेक शहरांसह सहाशे ठिकाणांचे बिनचूक अक्षांश-रेखांश मांडले! अकराव्या शतकातल्या अल्-इद्रिसीने त्याच्या सत्तर-तुकडी, दक्षिण-वर-उत्तर-खाली दाखवणा:या उफराटय़ा अॅँटलसमध्ये हिंदुस्थानासह प्रत्येक ठिकाणाची भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक माहितीही दिलेली होती.
तेराव्या शतकात युरोप थोडा मागासला. हेरेफोर्डच्या मापा मुंडीमध्ये पृथ्वी सपाट दाखवली गेली. पण मग सागरसाहसांची पूर्वतयारी सुरू झाली आणि दृष्टिकोन बदलला. चौदाव्या शतकात युरोपियन ख्रिस्ती खलाशांनी त्यांच्या दर्यावर्दी मार्गांची, वाटेत लागणा:या किनारपट्टीची आणि बंदरांची काटेकोर नोंद नकाशांमध्ये केली. त्यांनी त्यासाठी अक्षांश-रेखांश-जाळ्याऐवजी होकायंत्रच्या गिरकीच्या 36क् अंशी रेखाफुलांचं जाळं वापरलं. पंधरावं शतक तर शोधमोहिमांचं. त्या धाडसी दर्यासारंगांना होकायंत्र-सेक्स्टंट- अॅस्ट्रोलेब वगैरे अनेक आयुधांचं पाठबळ तर होतंच, पण टेहळ्या खलाशांच्या माहितीवरून शास्त्रज्ञांनी काढलेल्या उत्तम नकाशांचीही त्यांना साथ होती. त्यांच्या प्रत्येक दिग्विजयानंतर नकाशात सामावणारं जग विस्तारत गेलं.
होकायंत्नाच्या रेखाफुलांतला
स्पॅनिश दर्यावर्दी नकाशा
गोल पृथ्वीवरचं ते विस्तारलेलं जग सपाट नकाशात बसवताना अक्षांश-रेखांशांचं जाळं वेडंवाकडं चुणलं जाई आणि त्याच्या आधाराने जहाज हाकारणं अवघड होई. साडेचारशे वर्षांपूर्वी मर्कॅटर नावाच्या फिनिश भूगोलतज्ज्ञाने नकाशातले ध्रुवबिंदू उसवले, तिथल्या मापांचं प्रमाण अनंतपट केलं आणि रेखांश एकमेकांना समांतर करून भू-गोलाला आयताकृतीत बसवलं. तशा नकाशात ध्रुवांजवळचे भूभाग तुलनेनं मोठे दिसतात. मर्कॅटरचा प्रक्षेपित नकाशा ही सागरी प्रवासासाठी उपकारक क्रांती होती.
मर्कॅटरचा समांतर रेखांशांतला नकाशा
त्या काळातही हिंदुस्थानी नकाशांत मोजमापांना महत्त्व नव्हतं. मराठय़ांच्या किल्ल्यांचा तसा बिनमापाचा नकाशा मिङरराजे जयसिंगांनी त्यांच्या सतराव्या शतकातल्या अहवालात वापरला. तो अजूनही जयपूरच्या राजांच्या संग्रही आहे. तसे अनेक नकाशे भारतातल्या राजवाडे-महालां-मंदिरांत दडलेले असतील. त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे.
नकाशे रेखाटणा:यांच्या इच्छेनुसार जगाचं केंद्रस्थान जिब्राल्टर, जेरुसलेम, चिनी शहरं वगैरे ब:याच ठिकाणी फिरलं. शेवटी 1884 साली रेखांशांची शून्यरेषा ग्रीनिचमधून जावी याबद्दल आंतरराष्ट्रीय एकमत झालं आणि नकाशांना जागतिक नियमन लाभलं.
विसाव्या शतकात दुर्बिणी, विमानातून घेतलेली छायाचित्रं, संगणक वगैरेंनी नकाशे झपाटय़ाने सुधारले. लेसरचित्रंनी सागरतळाचा वेध घेतला. त्याचसोबत छपाई सोपी झाली. सर्वसामान्यांचा प्रवास वाढला. भिंतींवरच्या ताम्रपटांतले अवाढव्य नकाशे कागदी घडय़ांत आले, खिशात मावले. एकविसाव्या शतकात उपग्रहांवरून टिपलेले, हरघडीचा सांगोपांग तपशील सांगणारे, हवी तेवढी माहिती देणारे हालतेबोलते नकाशे मुठीतल्या मोबाइलमध्ये सामावले.
आता संगणकामुळे भौगोलिक माहितीशास्त्र स्वेच्छेनुसार शिकता येतं. शंकानिरसन होऊन मिळालेल्या माहितीचं विश्लेषण, संपादन करून त्याचे निष्कर्ष नकाशांत गुंफता येतात. सर्वसामान्यांना खुलेपणाने मिळणा:या त्या माहितीचा दळणवळण, व्यवस्थापन, दूरसंचार, उद्योगधंदे, पायाभूत प्रकल्पांची आखणी वगैरे अनेक विधायक कामांसाठी उपयोग होतो.
पण आतंकवाद्यांच्या विध्वंसक कामांनाही तिचा फायदा होऊ शकतो. कित्येक सहस्रकांच्या परिश्रमांनी जमवलेल्या ज्ञानाचा गैरवापर होऊ न देणं हे आपलं सर्वाचंच कर्तव्य आहे.
नकाशा म्हणजे माणसानं बनवलेलं त्याच्या जगाचं प्रतीक. पृथ्वीच्या तळहाताच्या रेषांचा अंदाज घेत मानवजातीनं आपलं भविष्य घडवलं. नक्षत्रनकाशांमुळे शेतीचं, प्रवासाचं वेळापत्रक ठरलं. शेतजमिनींच्या नकाशांवरून सारा ठरला. युद्धांत शत्रूचा जीव घेणं आणि नैसर्गिक आपत्तीत आपद्ग्रस्तांचे जीव वाचवणं या दोहोंतही नकाशांनी हातभार लावला. साम्राज्याच्या विस्ताराचं, धर्माच्या प्रसाराचं जगाशी तौलनिक नातं ठरवायला नकाशे उपयोगी पडले. कित्येक शतकं नकाशांचं तंत्र राजसत्ता, धर्मसत्ता, ज्ञानपीठं यांच्या कबजात राहिलं. धर्माची माहिती लोकांपर्यंत पोचवायला चित्रनकाशे वापरले गेले. देशप्रेम, राष्ट्रकल्पना, शत्रुद्वेष यांनाही नकाशांमुळेच मूर्तस्वरूप आलं. नकाशांच्या आकारांचा, रंगांचाही जनमानसावर परिणाम झाला. हिटलर-मुसोलिनीसारख्या हुकूमशहांनी त्याचा गैरफायदा घेतला.
लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया
आणि त्याआधी इंग्लंडमध्ये वास्तव्याला होत्या. ‘मानवाचा प्रवास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.
ujjwalahd9@gmail.com