थोडी तत्त्वनिष्ठा, बराचसा अहंगंड!

By admin | Published: September 9, 2016 05:33 PM2016-09-09T17:33:52+5:302016-09-09T17:33:52+5:30

वेलिंगकरांचा गोमंतकीय ‘संघ’ मूळ संघाशी बंड करायला प्रवृत्त झालाय, असे मानण्याचे काही कारण नाही. त्यांच्या या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला राजकीय किनार आहे . वेलिंगकर हे संघाला प्रार्थनीय मानत असले तरी बहुजन समाजाशी त्यांचे भावनिक नाते संघाच्या नात्यापेक्षाही- म्हणजेच रक्ताइतकेच दाट आहे. हेच रक्त त्यांना उसळी मारायला, संघाविरुद्ध जायला, बंड करायला प्रवृत्त करीत आहे.

A little honesty, a great deal! | थोडी तत्त्वनिष्ठा, बराचसा अहंगंड!

थोडी तत्त्वनिष्ठा, बराचसा अहंगंड!

Next
- राजू नायक
वेलिंगकरांचा गोमंतकीय ‘संघ’ मूळ संघाशी बंड करायला प्रवृत्त झालाय, असे मानण्याचे काही कारण नाही. त्यांच्या या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला राजकीय किनार आहे . वेलिंगकर हे संघाला प्रार्थनीय मानत असले तरी बहुजन समाजाशी त्यांचे भावनिक नाते संघाच्या नात्यापेक्षाही- म्हणजेच 
रक्ताइतकेच दाट आहे. हेच रक्त त्यांना उसळी मारायला, संघाविरुद्ध जायला, बंड करायला प्रवृत्त करीत आहे.


गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदच्युत संघचालक आणि राज्यात प्राथमिक शिक्षणाचे माध्यम स्थानिक भाषाच असावे असा आग्रह धरून आंदोलन पुकारलेल्या भारतीय भाषा सुरक्षा मंचचे (भाभासुमं) निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी संघाविरुद्धच्या आपल्या बंडाला कितीही तात्त्विक मुलामा दिलेला असो, वैयक्तिक स्वार्थ, महत्त्वाकांक्षा, सत्तेतील हिस्सा आणि महत्त्वाचे म्हणजे वरिष्ठ जातींविरुद्धचा राग याचीही किनार या अस्वस्थतेला आहे. 
सत्तरीकडे झुकलेल्या वेलिंगकरांनी ते १३ वर्षांचे असतानापासून संघ कार्यात झोकून दिले. बहुजन समाजातील वेलिंगकरांनी इवल्याशा गोव्यात, भटाबामणांची संघटना असे स्वरूप संघाला येऊ नये, यासाठी आयुष्य वेचले. त्यामुळे आज जेव्हा उच्चवर्णीयांचा चेहरा घेतलेला भाजपा बहुजन तत्त्वांपासून फटकून वागू लागल्याचे पाहाताच वेलिंगकरांना स्वत:वरच्या अन्यायाला सार्वजनिक स्वरूप द्यायची आयतीच संधी मिळाली. 
नागपूरच्या संघाने वेलिंगकरांविरुद्ध कारवाई केली, त्यांना संघप्रमुख म्हणून पदच्युत केले, तेव्हा त्यांनी राज्यातील सामाजिक परिस्थिती काय आहे याचा अंदाज घेतला नाही. नागपूरने गठडी वळली तर वेलिंगकर सुतासारखे सरळ येतील, असा पर्रीकरांचा कयास; परंतु नागपूरने कारवाई करूनही संघनेते इतर ठिकाणी जसे वागतात, तसे वेलिंगकर वागले नाहीत. ते तसे का वागले नाहीत, हे समजून घेण्यासाठी इतिहासाचा थोडा धांडोळा घ्यावा लागेल.
१९८० च्या दशकात भाजपाला नवचेतना देण्यासाठी संघाने दोन नावांची यादी तयार केली होती. सुभाष वेलिंगकर व मनोहर पर्रीकर ही ती नावे. त्या तुलनेने वेलिंगकर ज्येष्ठ. पर्रीकर आयआयटी मुंबईत शिकत होते, त्यामुळे सहा-सात वर्षे गोव्यापासून तसे दूरच. तोपर्यंत वेलिंगकर तळागाळात रुजले होते. संघाला वेलिंगकरांची गरज होती. शिवाय पर्रीकरांकडे काही विशेष राजकीय, सामाजिक गुण होते. ते सारस्वत समाजातील. हा समाज जरी हिंदू लोकसंख्येच्या केवळ तीन टक्के असला तरी तो गोव्यात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सत्ता ताब्यात घेऊन बसला आहे. त्यामुळे उच्च शिक्षित, सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठा या तुलनेने पर्रीकरांना समाजमान्यता होती. राजकारणात उच्च शिक्षित विरळा होते, तेव्हाचा तो काळ. त्या पुढच्या ३० वर्षांत पर्रीकरांनी जीवापाड काम केले. संघटन कौशल्य आणि बुद्धिचातुर्य या जोरावर भाजपाला राज्यात केंद्रस्थानी आणले. ख्रिस्ती लोकसंख्या विशेषत: चर्च धर्मसंस्था जी भगव्या पक्षाकडे बऱ्याच संशयाने पाहाते, तिलाही कवेत घेतले. त्यांच्या बरोबर रा. स्व. संघात कार्यरत असलेल्या वेलिंगकरांना राज्याबाहेर कोणी ओळखत नाही. गेल्या आठवड्यातील बंडाने त्यांना राष्ट्रीय पातळीवर येण्याची संधी मिळाली.
स्वत: वेलिंगकर सांगतात, या बंडानंतरच्या संपर्कातून त्यांना देशभरातील संघ कार्यकर्त्यांचे ेमानस समजले. संघाची एकछत्री प्रवृत्ती, वरून निर्णय लादण्याची परंपरा आणि अधिकारशाही याविरोधात सर्वत्र तिरस्काराची भावना आहे. याचे कारण गेल्या ३०-३५ वर्षांत ज्या प्रकारे भाजपाचा प्रभाव वाढला, त्यात सापडेल. सत्तेवर येण्यासाठी भाजपा नेते तडजोडी करीत राहिले. या दरम्यान अनेक नेत्यांनी केलेल्या ‘स्वत:च्या विकासा’चा कळत नकळत परिणाम संघ स्वयंसेवकांवर होत गेला. शिस्तीत राबवली जाणारी संघाच्या कार्यकर्त्यांची फळी प्रश्न विचारू लागली. संघामध्ये व्यक्ती कधीही मोठी होत नसते. व्यक्तीपेक्षा समूह महत्त्वाचा. सामूहिक हित महत्त्वाचे. संघापेक्षा व्यक्ती महत्त्वाची असल्याचा भास झालेल्या काही व्यक्ती इतिहासाजमा करण्यात आल्या. अटलबिहारी वाजपेयी आणि अडवाणीही त्यातून सुटले नाहीत. 
गोव्यात हे तत्त्व अनेकांची मुंडकी उडवायला यापूर्वीही वापरण्यात आलेले आहे. अनेक आमदार, मंत्री अस्वस्थ असण्याचे हे कारण आहे. 
गोव्यात संघ स्थापन झाला, त्यात अगदी सुरुवातीला महाराष्ट्राप्रमाणे ब्राह्मणी वर्चस्व नव्हते. किंबहुना येथे महाराष्ट्रापेक्षा वेगळे घडले. येथे गोवा मुक्त होताच बांदोडकर मुख्यमंत्री बनले. ते गोमंतक मराठा समाजातील. शेकडो वर्षांची पोर्तुगीज सत्ता, त्या काळात निर्माण झालेल्या सारस्वत वर्चस्वाला त्यांनी राजकीय सुरूंग लावला. ती चळवळ जोरात असताना संघाने येथे ब्राह्मणी वर्चस्वाला खतपाणी घातले असते तर ते वेडेपणाचेच ठरले असते. त्यामुळे राज्यात बिगर सारस्वत नेतृत्व कसोशीने पुढे आणण्यात आले. त्यात संघात श्रीपाद नाईक (सध्या केंद्रीय आयुष मंत्री), लक्ष्मीकांत पार्सेकर (मुख्यमंत्री), राजेंद्र आर्लेकर ( सध्याचे वनमंत्री) आणि त्यांच्या बरोबरीने वेलिंगकर यांचे नेतृत्व उदयाला आले.
ज्या काळात मगोप गोव्यात होता व भाजपाचे अस्तित्व नव्हते, तेव्हा ही मंडळी बांदोडकरांच्या कार्याने दीपून गेलेली होती. त्यांनी पुढे बांदोडकरांच्या निधनानंतर भाजपाला खतपाणी घातले. हा पक्ष जनमानसात, बहुजन समाजात रुजविला; परंतु त्यानंतर पर्रीकरांनी सत्ता मिळविली व एक जबरदस्त राजकीय तारा जन्माला आला. त्यांचा उदो उदो होत गेला तशी बहुजन समाजात अस्वस्थता पसरली. त्यांच्या सरकारने जमीन सुधारणा कायद्यात काही बदल करायचे ठरविले, तेव्हा तर बहुजनांचा जाहीर आक्रोशही नजरेस आला. 
पर्रीकर दिल्लीला गेल्यानंतरही वातावरणात बदल होईना. त्यामुळे भाजपाच्या विरोधात तयार झालेल्या लाटेचे राजकीय परिवर्तनात रूपांतर करण्यात काँग्रेसला अपयश आलेले आहे. दुसरा सक्षम पक्षही राज्यात नाही. तेव्हा बहुजनांमधूनच एक ताकद निर्माण होणे अपरिहार्य होते. ती संधी वेलिंगकर घेऊ पाहात आहेत. वेलिंगकरांनी भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनात संघाची संपूर्ण यंत्रणा वापरली. संघात कार्यकर्त्यांना सतत नवा कार्यक्रम देऊन त्यांना तल्लख आणि क्रियाशील ठेवले जाते. त्याच ध्येयाला अनुसरून वेलिंगकरांनी हा कार्यक्रम त्यांना दिला व प्रत्येक बिनीच्या शिलेदारापासून ते शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत सगळ््यांनाच त्यांनी या कार्यात जुंपले. ते राज्यात संघटनेचे प्रमुखच होते. ही संघटना जरी रा. स्व. संघाच्या मूळ तत्त्वांना बांधील असली तरी तिच्यातले बहुसंख्य सदस्य वेलिंगकरांना गुरूस्थानी मानतात.माध्यमासाठीच्या या लढ्यात वेलिंगकर सतत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या नेतृत्वाच्या निकट जाण्याच्या प्रयत्नात आहेत. याचे कारण बहुजन समाजाचे सुरुवातीपासून मगोप व बांदोडकरांबरोबर असलेले भावनिक नाते! वेलिंगकर याआधीही सतत बांदोडकरांच्या कन्येबरोबर, श्रीमती शशिकलाताई काकोडकरांबरोबर राहिले. संघात असतानाही वेलिंगकरांनी आपल्या समाजाबरोबरचे संबंध लपविलेले नाहीत. ते नेहमी उघडपणे गोमंतक मराठा समाजाच्या व्यासपीठावर वावरतात. भाभासुमंच्या सर्व सभा शशिकलातार्इंच्या मालकीच्या जागेत होतात. शिवाय मगोपचे सध्याचे तारणहार सुदिन ढवळीकर यांनाही मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पडत आहेत. (गोव्यात ‘ब्राह्मणांनीही’ स्वत:ला बहुजन मानले व ते सतत मगोपबरोबर राहिले. गोव्यात बहुजन म्हणजे बिगर सारस्वत ) ढवळीकर सध्या मंत्रीपद उपभोगत असले व नितीन गडकरी यांच्या कृपाआश्रयात असले तरी त्यांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा संधी शोधते आहे.
दिमतीला संघटनेचे बळ, बांदोडकरांबद्दलची श्रद्धा, मगोपशी असलेले भावनिक नाते, बहुजन समाजाला निकट असलेली या पक्षाची तत्त्वे हे सारे वेलिंगकरांच्या राग, उद्रेकाला बळ देणारेच आहे. वेलिंगकर हे संघाला प्रार्थनीय मानत असले तरी बहुजनांशी असलेले त्यांचे भावनिक नातेही रक्ताइतकेच दाट आहे. हेच रक्त त्यांना उसळी मारायला, संघाविरुद्ध जायला बंड करायला प्रवृत्त करीत आहे. त्यामुळे वेलिंगकरांचा गोमंतकीय ‘संघ’ स्वभाषेच्या चळवळीत मूळ संघाशी बंड करायला प्रवृत्त झालाय, असे मानण्याचे कारण नाही. त्यांच्या या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला राजकीय किनार आहे आणि या संघर्षात स्थानिक भाषेचा मुद्दा कधीच बाजूला पडलेला आहे. उद्या मगोप या संधीचा फायदा उठवून सत्तेवर आला तरी ते इंग्रजीचे अनुदान हटविणे कठीण; कारण राज्यात बहुजनांनाही इंग्रजी हवी आहे. ती केवळ ख्रिश्चनांना हवी आहे हे झूट!

दिगंबर कामतांचे उदाहरण घ्या. मूळचे संघाचे. भाजपामध्ये वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाळगता येईना तेव्हा ते फुटून काँग्रेसमध्ये गेले. पुन्हा जिंकून मुख्यमंत्रीही बनले. त्यांचा हा उत्कर्ष संघ आणि भाजपाचे इतर नेतेही पाहात आहेत. कामत फुटल्यानंतर मडगावातील अनेक संघ कार्यकर्ते त्यांच्याबरोबरच राहिले. अलीकडच्या काळात भाजपात आलेले काही ख्रिस्ती आमदार व कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत. भगव्या झेंड्याचा आधार कधी सोडता येईल, याची वाट तेही पाहात आहेत. २०१७ ची निवडणूक जाहीर होईपर्यंत काहीजण फुटतीलही. वेलिंगकरांनीही त्यांची अस्वस्थता आणखी वाढविण्याचे काम केले आहे. 
कमी-अधिक प्रमाणात देशभरात हेच वातावरण असल्याचे वेलिंगकर सांगतात. सर्वांना कधी ना कधी ते उपरे असल्याचा अनुभव भाजपाने दिला आहे.
त्यात आता संघ कार्यकतर््यांची भर पडली आहे, एवढेच!

(लेखक लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

raju.nayak@lokmat.com

Web Title: A little honesty, a great deal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.