‘लिटल पोलंड’  इन वळिवडे कॅम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 04:48 PM2019-10-02T16:48:30+5:302019-10-02T16:52:40+5:30

तब्बल 75 वर्षं झाली या घटनेला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात  पोलंडच्या पाच हजार नागरिकांनी  कोल्हापूर संस्थानात आसरा घेतला. वळिवडे या लहानशा गावात त्यांच्यासाठी छावणी उभारली गेली. काही वर्षे ते तिथेच राहिले. युद्ध संपल्यावर आपल्या मायदेशी परत गेले. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा कोल्हापूरला भेट दिली, तेव्हा त्या आठवणींच्या हिंदोळ्यांनी सारेच गदगदले.

'Little Poland' in Valiwade Camp.. Recollection of memories after 75 years, when Polish and Indian nationals met face to face again.. | ‘लिटल पोलंड’  इन वळिवडे कॅम्प

‘लिटल पोलंड’  इन वळिवडे कॅम्प

Next
ठळक मुद्देदुसर्‍या महायुद्धात कोल्हापूरच्या छत्रपतींनी पाच हजार पोलिश निर्वासितांना पदराखाली घेतलं आणि मराठमोळ्या वळीवडे गावात साकारलं ‘वळिवडे कॅम्प’ नावाचं लिटल पोलंड. 

- इंदुमती गणेश 

हिटलरच्या नाझी साम्राज्यवादाच्या संघर्षातून 1939 साली दुसर्‍या महायुद्धाची ठिणगी पेटली. या महायुद्धाचा सर्वांत पहिला आणि मोठा फटका बसला तो पोलंडला. जगाच्या इतिहासातून दोन वेळा नामशेष झालेला हा देश आर्शयासाठी हाक देत होता. ही हाक ऐकली भारतातील जामनगर (गुजरात) आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर या संस्थानांनी. कोल्हापूरच्या छत्रपतींनी पाच हजार पोलिश निर्वासितांना पदराखाली घेतलं आणि मराठमोळ्या वळीवडे गावात साकारलं ‘वळिवडे कॅम्प’ नावाचं लिटल पोलंड. तेव्हा पाच वर्षांनी मायदेशी परतलेल्या या नागरिकांनी 75 वर्षांनी पुन्हा वळिवडेला भेट दिली आणि त्यांच्या आठवणींच्या अत्तराची कुपी पुन्हा एकदा दरवळली..
**
‘वळिवडेत आईसोबत आले तेव्हा मी नऊ वर्षांची होते. इथल्या मुली हातात बांगड्या घालायच्या. माझ्या हातातील काचेच्या बांगड्या सारख्या फुटायच्या म्हणून आईने ख्रिसमसला माझ्या हातात इथे बनवून घेतलेली मेटलची बांगडी घातली. ही बांगडी मी गेली 72 वर्षे हातातून काढलेली नाही. मी मरेन तेव्हा माझ्यासोबत ही बांगडी आणि कोल्हापूरच्या आठवणीही सोबत असतील..’ 
- 81 वर्षांच्या लुडा हातातील बांगडी दाखवत जुन्या आठवणींत रमल्या होत्या. त्यांच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर या भेटीचा निर्मळ आनंद ओसंडून वाहत होता. अंबाबाईच्या दर्शनाला गेल्यावर त्या म्हणाल्या, ‘व्हेअर इज द एलिफंट?. राजघराण्याचा हत्ती कुठंय.?’ इतक्या त्यांच्या स्मृती जागृत होत्या. 
‘दुसर्‍या महायुद्धाने होरपळत असताना कोल्हापूर संस्थानने आम्हांला आर्शय दिला. पाच वर्षांनी आम्ही परत निघालो, त्यावेळी डोळ्यांत पाणी दाटलेलं होतं. आज पुन्हा एकदा त्याच गावाला भेट देताना माझे डोळे परत एकदा भरून आले आहेत. आम्ही पाहिलेलं कोल्हापूर फार वेगळं होतं. त्यावेळी ब्रिटिशांचा अंमल होता. ग्रामीण आणि गरीब जीवनशैली होती. आता सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन, अत्याधुनिक साधनं आणि बदललेलं कोल्हापूर पाहताना मी चकित झालोय. मी तिसर्‍यांदा भारतात आलो असून, ही माझी शेवटची भेट असेल..’ 80 वर्षांचे ज्ॉनुज्झ ओसिन्स्की भूतकाळातल्या आठवणींत रमले होते.
वयाचा अमृतमहोत्सव साजरा करणार्‍या क्रिस्तिना यांचा तर जन्मच वळिवडेत झाला. मुंबई विमानतळावर पाय ठेवताच त्या राजदूताला म्हणाल्या, ‘आय अँम अँन इंडियन, आय बॉर्न इन वलिवडे.. आय अँम हॅपी फॉर दॅट..’ 
- आपण जन्मलो त्या भूमीला 75 वर्षांनी भेट देतानाचा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होता.  दनुता प्निवस्का या 95 वर्षांच्या आजींसह पोलिश नागरिक कोल्हापूरच्या पद्मा पथकातील खेळाडूंसोबत हॉकी, फुटबॉल खेळायचे. पोलंडचे हे मित्र कोल्हापुरात आल्याचे कळताच पद्मा पथकातील त्यावेळचे खेळाडू बापूसाहेब शिंदे व ज्ञानदेव जाधव त्यांना भेटण्यासाठी आले. त्यांच्या हातात 1947 सालाचे छायाचित्र होते. त्यात तरुणपणातील 23 वर्षांंच्या दनुता होत्या. हे छायाचित्र व त्यातील माणसांना प्रत्यक्ष पाहताना आजींचे डोळे चमकले आणि गप्पांतून पद्मा पथकाच्या आठवणी ताज्या केल्या.. 

पोलंडपासून कोसो दूर असलेला भारत आणि त्यातही कोल्हापुरातील वळिवडे या छोट्याशा गावाशी पोलिश नागरिकांचं भावनिक नातं जडलं होतं. एकीकडे शत्रुदेशातील नागरिकांच्या जिवाचा घोट घेण्यासाठी चढाओढ सुरू असताना, आपला देश सोडून परागंदा व्हावं लागलेल्या नितळ गोरी त्वचा, भुरे डोळे, पोलिश भाषा, जगण्याची पद्धती अशा सगळ्याच पातळीवर खूप वेगळ्या असलेल्या या परदेशी पाहुण्यांना रांगड्या कोल्हापूरनं आपलंसं केलं होतं.
युद्धाचा निखारा विझल्यावर हे नागरिक मायदेशी परतले; पण कोल्हापूरच्या आठवणींचा सुगंध हृदयाच्या एका कुपीत बंद ठेवून. पोलंड आणि कोल्हापूरच्या मैत्रीची, ऋणाची अत्तराची कुपी तब्बल 75 वर्षांनी पुन्हा एकदा उघडली गेली ती 12 ते 14 सप्टेंबरदरम्यान पोलिश नागरिकांच्या कोल्हापूरच्या भेटीने.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री र्मसिन प्रिझिडॅक्झ, पोलंडचे राजदूत अँडम बुरॉकोस्की, पोलिश एअरलाइनचे अध्यक्ष मिल्झाक्झास्र्की, कौन्सुलेट जनरल डॅमियन आयर्झिक यांच्यासह एकूण 30 जणांचे शिष्टमंडळ कोल्हापूरच्या भेटीला आले होते. त्यापैकी 1942 ते 1948 या कालावधीत वळिवडे येथे वास्तव्य केलेल्या 12 पोलिश नागरिकांनी जागविलेल्या या आठवणींचा दरवळ पुन्हा एकदा सगळ्यांना सुगंधित करून गेला. 

पोलंड.. युरोपीय संघातील सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश. पश्चिमेला र्जमनी, दक्षिणेला गणराज्य स्लेवाकिया आणि पूर्वेला लिथुआनिया, युक्रेन, रुस या देशांच्या सीमांशी जोडलेला. 1772 ते 1795 या कालावधीत तीन वेळा हा देश ऑस्ट्रिया, रुस आणि प्रशियामध्ये वाटला गेला आणि जगाच्या नकाशावरून पहिल्यांदा या देशाचे अस्तित्व संपले. तब्बल 123 वर्षे पोलंडला देश म्हणून स्वतंत्र अस्तित्व नव्हते. मात्र पहिले महायुद्ध संपल्यानंतर 1918 मध्ये हा देश पुन्हा स्वतंत्र झाला. 1939 सालापर्यंंत या देशाने स्थिरता, समृद्धी अनुभवली. विकसित राष्ट्र म्हणून तो पुढे आला. मात्र हा आनंद दीर्घकाळ टिकला नाही. हिटलरने 1939 मध्ये पोलंडवर हल्ला करण्याचे आदेश दिले. दुसर्‍या महायुद्धाची ठिणगी पेटली. र्जमनी आणि सोवियत रशियाच्या हल्ल्यात पुन्हा एकदा हा देश उद्ध्वस्त झाला. 90 टक्के लोक मारले गेले. त्यावेळी भारत ब्रिटिश साम्राज्याचाच एक भाग असल्याने भारताने र्जमनीच्या विरोधात पोलंडला मदत केली.
पोलंडच्या निर्वासितांची जगण्याची धडपड सुरू असताना त्यांना मदत केली भारतातील जामनगर आणि कोल्हापूर या दोन संस्थानांनी. जामनगरमध्ये 500, तर कोल्हापूरमध्ये तब्बल पाच हजार पोलिश निर्वासित आले. कोल्हापूरचे छत्रपती होते शहाजीराजे. कोल्हापुरातील वळिवडे या लहानशा गावात पोलिश नागरिकांची स्वतंत्र वसाहत स्थापन करण्यात आली त्याचे नाव होते ‘वळिवडे कॅम्प.’ या नागरिकांना छत्रपतींनी रस्ते, पाणी, शाळा, दवाखाने, सिनेमा हॉल, ग्रंथालय, दुकानांसारख्या सगळ्या सोईसुविधा निर्माण करून दिल्या आणि मराठमोळ्या कोल्हापुरात आकाराला आलं ‘लिटल पोलंड.’ दिलदार मनाचे रांगडे कोल्हापूरकर आणि पोलंडवासीय गुण्यागोविंदाने नांदत होते. पंचगंगेच्या पात्रात सूर मारण्यापासून ते कोल्हापूरची खासियत असलेली कुस्ती हॉकी, फुटबॉलसारखे खेळ ते खेळायचे. 
वांदा नोविच्का यांनी तर मराठी तरुणाशी लग्न केले आणि त्या मालती काशीकर म्हणून कोल्हापूरच्या सूनबाई झाल्या. पापा परदेशी, कर्नल गायकवाड, सोळंकी, महागांवकर, अशा अनेक कोल्हापूरकरांशी त्यांचे कौटुंबिक नाते तयार झाले होते. कोल्हापूरच्या भेटीदरम्यान त्यांनी या कुटुंबांची केवळ आठवणच काढली नाही, तर घरी जाऊन भेटही दिली. ‘ही आमची शेवटची भेट आहे.. कोल्हापूरने आम्हाला ग्रेट मेमरीज दिल्या आहेत.. दिज मेमरीज विल डाय विथ मी..’ असं सांगत या इंडो-पोलिश नागरिकांनी कोल्हापूरचा निरोप घेतला.. मैत्रीचा धागा अखंड ठेवण्यासाठी..

मैत्रीचा नवा अध्याय
पोलिश नागरिकांना आर्शय दिल्याबद्दल पोलंड कायम कोल्हापूरच्या ऋणात राहील. मैत्रीच्या या भावनिक नात्याबरोबरच कोल्हापूरच्या परिसरात उद्योग, व्यवसाय, सांस्कृतिक, पर्यटन यांमध्ये आदानप्रदान केले जाईल. दिल्लीप्रमाणे वॉर्सा ते मुंबई थेट हवाई वाहतूक सुरू करू, असा मनोदय पोलंडच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला; तर पोलंडचे भारतातील राजदूत अँडम बुरॉकोस्की यांनी ‘नमस्ते कोल्हापूर’ म्हणत ‘चमका कोल्हापूर हमारा’चा नारा दिला. ‘नमस्कार’ अशी मराठीतून सुरुवात करीत कौन्सुलेट जनरल डॅमियन आयर्झिक यांनी चक्क मराठीतूनच संवाद साधला. कोल्हापूर आणि पोलंडच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून वळिवडेत आता मेमोरिअल म्युझिअम आकाराला येत आहे. 
स्वातंत्र्याचे साक्षीदार
पोलंडच्या या नागरिकांनी ब्रिटिश पारतंत्र्यातून भारत स्वतंत्र झाल्याचे पाहिले आहे. त्यात ‘पोल्स इन इंडिया’चे प्रमुख आंद्रेस झिनेक्सी यांचाही समावेश आहे. एका हातात भारताचा आणि दुसर्‍या हातात पोलंडचा झेंडा घेऊन मनोगतातून त्यांनी इतिहासाची पानं पुन्हा उलटली. देश स्वतंत्र झाला म्हणून पापा परदेशी यांनी चित्रपटांची तिकिटे मोफत वाटली होती. हे तिकीट अजूनही तेरेस्का या आजींनी जपून ठेवलं आहे. दनुता तर गांधीजींच्या चळवळीने प्रभावित झाल्या होत्या. 15 ऑगस्टला हे पोलंडवासीयदेखील भारताचा झेंडा आनंदोत्सव साजरा करत होते. परतीचा प्रवास सुरू झाल्यावर पुण्यात रेल्वेस्थानकावर एका मुलगा मागून ज्ॉनुज्झ ओसीन्स्की यांच्या डोक्यावर जोरात टपली मारून पळून गेला. ज्ॉनुज्झ त्याला मारण्यासाठी पळणार इतक्यात आई त्याला थांबवत म्हणाली, ‘तुला तो ब्रिटिश समजलाय. त्याला माफ कर..’
indu.lokmat@gmail.com
(लेखिका ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीत वरिष्ठ बातमीदार आहेत.)

Web Title: 'Little Poland' in Valiwade Camp.. Recollection of memories after 75 years, when Polish and Indian nationals met face to face again..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.