छोटे साहेब
By admin | Published: October 17, 2015 03:08 PM2015-10-17T15:08:06+5:302015-10-17T15:08:06+5:30
मार्च 1980 ला मी धारणीत अवतरलो. ‘नवा साहेब’ वरून ‘छोटे साहेब’ असं माझं नामकरण झालं होतं. पूर्वीच्या मध्य प्रांतात सहायक वन संरक्षक (एसीएफ) किंवा उपविभागीय वनाधिका:यासाठी (सब डीएफओ) ही आवडती उपाधी होती. ‘मोठा साहेब’ म्हणजेच विभागीय वनाधिकारी (डीएफओ) होण्यापूर्वी मला दोन वर्षं ‘छोटे साहेब’ म्हणून काम करायचं होतं.
Next
>प्रकाश ठोसरे
अनुवाद : अरविंद आपटे
मार्च 1980 ला मी धारणीत अवतरलो. ‘नवा साहेब’ वरून ‘छोटे साहेब’ असं माझं नामकरण झालं होतं. पूर्वीच्या मध्य प्रांतात सहायक वन संरक्षक (एसीएफ) किंवा उपविभागीय वनाधिका:यासाठी (सब डीएफओ) ही आवडती उपाधी होती. ‘मोठा साहेब’ म्हणजेच विभागीय वनाधिकारी (डीएफओ) होण्यापूर्वी मला दोन वर्षं ‘छोटे साहेब’ म्हणून काम करायचं होतं. धारणी हे माङया आधीच्या जागेपासून, तारुबंद्यापासून, जवळपास साठएक किलोमीटरवरचं अमरावती जिल्ह्यातील तालुक्याचं गाव होतं. मध्य प्रदेशची आंतरराज्यीय हद्द इथून फारशी दूर नव्हती. मेळघाट टॉकिज हे सिनेमागृह आणि नागपूर-इंदूर रस्त्यावरचा वन तपासणी नाका ही धारणीतली महत्त्वाच्या घडामोडींची ठिकाणं होती.
धारणीसारख्या लहानशा गावात ‘छोटे साहेब’ हे बडं प्रस्थ होतं. माझा जिवलग मित्र आणि बॅचमेट तसनीम अहमद एकदा चिखलद:याहून धारणीला आला होता. चिखलद:याला सिनेमागृह नव्हतं आणि मला मिरवण्यासाठी धारणीला ते होतं. त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं की मेळघाट टॉकिजमध्ये चित्रपट बघायला जायचं. मध्यंतराच्या वेळी मॅनेजरने त्याच्या ऑफिसमध्ये आम्हाला चहासाठी आमंत्रित केलं. तसनीमने त्याच्या नेहमीच्या सवयीनुसार मॅनेजरशी गप्पा मारायला सुरुवात केली. आम्ही गप्पात इतके गुंगून गेलो की आम्ही चित्रपट बघायला आलो आहोत हेच विसरून गेलो. असाच अर्धा तास उलटून गेला. आम्ही भानावर आलो आणि चित्रपटाचा महत्त्वाचा भाग चुकू नये म्हणून घाई करू लागलो. आमची चुळबुळ पाहून मॅनेजरने आम्हाला दिलासा दिला. ‘साहेब, ‘छोटे साहेब’ सिनेमागृहात नसताना आम्ही चित्रपट सुरू करायचं धारिष्टय़ कसं करू शकतो?’ आम्ही सिनेमागृहात परत प्रवेश केला तेव्हा आमचं दबक्या नाराजीत स्वागत झालं. मध्यंतराच्या वाढीव अध्र्या तासाच्या खंडामुळे धूम्रपान करणा:यांना आणखी काही विडय़ा/सिगरेटी फुंकायची संधी मिळाली होती आणि त्यांनी ती कारणी लावली होती. त्या धुराच्या पडद्यातून आमच्यासारख्या मागच्या बाकडय़ावरील प्रेक्षकांना समोरचं काही दिसणं शक्य नव्हतं. आमची ही अडचण जेव्हा मॅनेजरच्या लक्षात आली तेव्हा त्याने फक्त सिनेमागृहाचे सर्व दरवाजेच उघडले नाही, तर आम्ही धूसरपणो पाहिलेला सर्व भाग रिवाईंड करून परत दाखवला. ‘छोटय़ा साहेबां’चं एवढं माहात्म्य होतं की त्यांच्या मर्जीशिवाय कोणतीही पॅसेंजर बस धारणीत येऊ शकत नव्हती की बाहेर पडू शकत नव्हती (वनोपज तपासणी नाक्याची कृपा)!
3-4 वनपरिक्षेत्रच्या कामावर देखरेख, इमारती लाकडाचा एक डेपो, वीसएक ट्रक व दहा ट्रॅक्टर असणा:या लॉगिंग युनिटचं व्यवस्थापन अशी माङया कामाची व्याप्ती होती. आमचे ट्रक मुख्यत्वे जवळपासच्या जंगलातून सागाचं इमारती लाकूड वाहतूक करत असत. या लाकडांची दर्जानुसार वर्गवारी करून त्यांचा जाहीर लिलाव होत असे. नजरअंदाजाने निर्धारित किंमत ठरवली जाई. लिलावाची वर्तमानपत्रतून जाहिरात केली जात असे. नेहमीच्या खरेदीदारांना पत्रने कळवलं जाई. इच्छुक खरेदीदार लिलावाच्या दिवसाच्या अगोदर येऊन मालाची पाहणी करून आपल्या गरजेचा माल हेरून ठेवत. त्यांच्या त्यांच्यात स्पर्धा होऊ नये म्हणून परिचित खरेदीदार व्यापारी एकमेकांशी आधीच बोलून ठेवत असत. त्यामागे लिलावात चढाओढीमुळे भाव वाढू नये हा उद्देश असे.
लाकडांजवळ आल्यावर वनक्षेत्रपाल किंवा वनपाल थप्पीचा पुकारा करत. कोणीतरी एखादा आकडा मोठय़ाने सांगत असे. ब:याच वेळा तो निर्धारित किमतीच्या जवळपासचा असे. रक्कम अगदीच कमी असल्यास लिलाव करणारा अधिकारी जास्त आकडय़ाचा पुकारा करत असे. माल चांगला असल्यास सुरुवातीपासूनच चढाओढ असे. अशा वेळी खरेदीदार तोंडाने कमी बोलत, सगळं नजरेचे इशारे, हातवारे, खाणाखुणांनी चालत असे. काहीवेळा व्यापा:यांचं संगनमत होऊन (रिंग) बोली ठरावीक रकमेवर येऊन अडून बसे. अशावेळी लिलाव करणारा अधिकारी त्याचं कसब वापरून रिंग तोडून बोली वाढवत जाई. त्याकरता त्याला त्याच्या ऐकण्यातले काही खरेदीदार हाताशी ठेवावे लागत. त्यांना एखादी थप्पी महाग पडली तरी त्याची भरपाई दुस:या एखाद्या थप्पीत केली जाई. या व्यवहारात सरकारचा फायदा व्हावा हाच शुद्ध हेतू असे. पण काही अधिकारी या रिंगमध्ये सामील असत. त्यामुळे अशी रिंग होत तर नाही ना हे पाहण्यासाठी वरिष्ठ अधिकारी अचानक भेटही देत असत.
असे लिलाव करायची संधी मला नोकरीच्या सुरुवातीलाच मिळाली. धारणी आगारात चांगल्या दर्जाचा सागवानी माल असे. त्यामुळे मोठाले व्यापारी दुरून दुरून येत. मला आठवतं मी त्या काळात एक कोटीचा माल विकला होता. त्याकाळी एक कोटी ही फार मोठी रक्कम होती. माझा पगारच जेमतेम एक हजाराच्या आसपास होता (लग्नाच्या बाजारात चार आकडी पगार म्हणजे फार मोठी जमेची बाजू होती). अल्लूमवार नावाचे माङो आगार अधिकारी होते. हा माणूस नोकरीच्या शेवटास वनपालावरून वनक्षेत्रपाल पदावर पदोन्नत झाला होता. त्यामुळे त्यांचा अनुभव फार दांडगा होता. त्यांच्याकडून मला आगाराच्या, लिलावाच्या ब:याच खुब्या समजल्या.
वनोपजाच्या, ज्यात इमारती लाकूड असे, वाहतुकीवर पाळत ठेवण्यासाठी वनोपज तपासणी नाके असत. त्यातलाच एक वनरक्षक होता बैरागी. त्याला दोन मुलगे होते, सोमदास आणि रामदास. दोघे विशीतले होते. एके दिवशी सोमदास माङयाकडे रडत आला आणि सांगू लागला की त्याचे वडील गेले. बैरागी कामावर असतानाच गेले होते. मी त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या दु:खी कुटुंबीयांचे सांत्वन केलं, सोमदासला ड्रायव्हरची नोकरी देतो असं आश्वासन देऊन (त्याकाळी ते शक्य होतं) माङया कामावर निघून गेलो. मी कामावरून परतलो तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. बैरागी कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी माझी वाट पाहत थांबले होते! छोटय़ा साहेबांच्या अनुपस्थितीत बैरागीला अंतिम निरोप देण्याचा ते विचारही करू शकले नव्हते! लवकरच सोमदासचा ड्रायव्हर म्हणून खात्यात प्रवेश झाला आणि आजही तो वन विभागात काम करत आहे.
गवई नावाचा तरुण वनपाल माङया लॉगिंग युनिटचा मुख्य होता. या युनिटचे वर्कशॉप, स्पेअर पार्ट काउंटर, सव्र्हिस सेंटर आणि पेट्रोल/डिङोल वाटप काउंटर असे मुख्य भाग होते. माङया तीस गाडय़ांचा ताफा तंदुरुस्त ठेवण्याचे काम हनीफ नावाचा आमचा मेकॅनिक करत असे. त्याचा जुळा भाऊ युसुफ आमच्याकडे ड्रायव्हर होता. हनीफ वाहन अतिशय अल्लद चालवत असे. त्याच्यापेक्षा तरबेज ड्रायव्हर मी आजतागायत पाहिलेला नाही.
माझं ड्रायव्हरच्या कामकाजावर बारकाईनं लक्ष असायचं. काही ड्रायव्हर अवैध प्रवासी वाहतूक करत. विशेषत: बाजाराच्या दिवशी हा प्रकार चालत असे. अशा ड्रायव्हर्सविरुद्ध कारवाई करणं मला भाग पडत होतं. आठवणीत राहणारा एक अपघात माङया कालावधीत झाला होता. यावेळी ड्रायव्हर होते कुंजीलाल आठवले. पावसाळ्याचे दिवस होते. सिद्दुकुंड नावाच्या ठिकाणी त्यांचा ट्रॅक्टर घसरला आणि एका मोरीवरून उलटला. आश्चर्यकारकरीत्या कुंजीलालला कुठे खरचटलंसुद्धा नाही. मला संदेश देण्यासाठी तो धावतच ढाकणा वायरलेस स्टेशनला गेला. गमतीचा एक भाग म्हणजे स्थानिक भाषेत ‘सिद्दू’ म्हणजे दारू आणि कुंड हा शब्द तर मराठीतही आपण वापरतोच. घटनास्थळ तारुबंदा रेंजच्या ढाकणा परिमंडळात होतं आणि तिथे वन्य श्वापदांचा मुक्त संचार होता. धारणीला ही बातमी कळताच वीस उत्साही तरुण जमवून मी ट्रकने घटनास्थळाकडे धाव घेतली. पाऊस सुरूच होता. रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळे आम्ही घटनास्थळावर पोहचलो तोवर रात्रीचे नऊ झाले होते.
त्या कोसळत्या पावसात ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण त्यात यश मिळालं नाही. उलट आमचा ट्रकच चिखलात रुतून बसला. वीस तरुण हातांच्या जोडय़ा तो ट्रक तसूभरही हलवू शकली नाही. सरतेशेवटी मध्यरात्री आम्ही हार मानून आमचे प्रयत्न सोडून दिले. जवळचं गाव होतं आढाव तेही दहा किलोमीटरवर! घनदाट जंगलात रात्रीच्या वेळी आणि तेही मुसळधार पावसात आम्ही दोन तास चालत होतो. वन्य श्वापदं दूर राहावीत म्हणून आम्ही मोठय़ाने गाणी म्हणत होतो. थकून भागून, चिंब भिजून आम्ही आढावला पोचलो तेव्हा पहाटेचे दोन वाजले होते. आम्हाला प्रचंड भूक लागली होती. आता माङयापुढे प्रश्न होता तो म्हणजे वीस तरुणांच्या भुकेल्या पोटात काय घालायचं?
सुदैवाने आमची लक्ष्मी हत्तीण आढावा मुक्कामी होती. सर्व नियमांना मुरड घालून लक्ष्मीचा शिधा वापरून पोळ्या बनवण्याची मी परवानगी दिली. (त्या शिध्याची नंतर भरपाई केली.) एका शाळेतील खोलीत आम्ही दोन तास आडवे झालो. तिथली धूळ ब:याच वर्षात झटकलेली नव्हती. दुस:या दिवशी सकाळी मी अपघाताच्या जागी हत्तीला घेऊन गेलो आणि काही मिनिटांतच हत्तीने ट्रॅक्टर आणि ट्रक बाहेर ओढून काढला. त्या जनावराची अचाट ताकद पाहून आम्ही थक्क झालो. खरोखरच लक्ष्मीच आमच्या मदतीकरता धावून आली.
मी जेव्हा धारणीला छोटा साहेब बनलो होतो तेव्हा माझा बॅचमेट तसनीम चिखलद:याला छोटा साहेब झाला होता. तो मला वरेचवर त्याच्याकडे बोलवत असे. मीही ब:याचदा चिखलद:याला गेलो, तसनीमसोबत राहिलो. त्यावेळी आम्ही दोघं सडेफटिंग होतो. लग्नाच्या बाजारात स्थळ म्हणून नजरेस भरणारे होतो. तसनीम ‘मेळगिरी’ नावाच्या एका टुमदार, सुंदरशा स्वतंत्र बंगल्यात राहत होता. तसनीम मेळगिरीत येण्यापूर्वी एक गमतीदार घटना घडली होती. मेळगिरीच्या परसदारी वडाचं झाड होतं, त्याची एक फांदी परसदारी उतरली होती. परसदराला मागच्या बाजूस जंगलात उघडणारं फाटक होतं. सहसा हे फाटक आतून कुलूपबंद असे. एके दिवशी एक अस्वल मधासाठी वडाच्या झाडावर चढलं. मधाच्या लालसेने पोळ्यापर्यंत जाण्याकरता एका कमजोर फांदीवर ते सरकलं. त्याच्या वजनाने ती फांदी मोडली आणि महाशय परसदारी धप्पकन पडले. अशा प्रकारे अपघाताने अस्वल परसदारी बंदिस्त झालं. महत्प्रयासाने त्याला तिथून बाहेर काढण्यात आलं.
तसनीम उत्कृष्ट बल्लवाचार्य आहे. मी जेव्हा पहिल्यांदा मेळगिरीत गेलो होतो तेव्हा सामिष पदार्थांची एक भलीमोठी यादीच त्यानं पेश केली. मी पसंती सांगितल्यावर तो बाजारहाट करायला निघाला. मला नंतर कळलं की चिखलद:यातील समस्त बोकडांना निवडीसाठी तसनीमच्या पुढय़ात उभं केलं गेलं होतं. सरतेशेवटी तसनीमने निरखून पारखून त्याच्या पसंतीचा एक बोकड निवडला! पुढचे तीन-चार दिवस मी त्याच्याकडे पुख्खा झोडत होतो!
खूप विलक्षण दिवस होते ते. हे सोनेरी दिवस परतून येणार नाहीत हे आम्ही दोघं ‘छोटे साहेब’ मनोमनी ओळखून होतो.
(लेखक महाराष्ट्राचे सेवानिवृत्त
प्रधान मुख्य वनसंरक्षक आहेत.)
pjthosre@hotmail.com