LMOTY 2020: आजीला भेटायला संगमनेरला जाणार आहे! अजिंक्य रहाणेला येतेय आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 05:28 PM2021-03-22T17:28:33+5:302021-03-22T17:28:54+5:30
Lokmat Maharashtrian of the year award 2020: तुमच्याकडे सोयीसुविधा नसल्या, तरी मनामध्ये जिद्द असावी लागते. तुमच्या कुटुंबाची परिस्थिती कशीही असू दे; तुमच्यात जिद्द नसेल तर तुम्ही क्रिकेटच काय, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकणार नाही. - अजिंक्य रहाणे
अजिंक्य, तू संघर्ष करून पुढे आला आहेस, तर तरुणांना काय मार्गदर्शन करशील?
- मी आयुष्यात जे काही यश मिळवले, ते माझ्या कुटुंबामुळे. माझ्या आई-वडिलांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून संघर्ष आणि त्याग केला. त्यांनी मला कोणत्याही अडचणीची झळ पोहोचू दिली नाही. मला ज्या ज्या गोष्टींची गरज होती, ती त्यांनी पूर्ण केली. तुमच्याकडे सोयीसुविधा नसल्या, तरी मनामध्ये जिद्द असावी लागते. तुमच्या कुटुंबाची परिस्थिती कशीही असू दे; तुमच्यात जिद्द नसेल, तर तुम्ही क्रिकेटच काय, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकणार नाही. मनामध्ये स्वप्न बाळगणे खूप गरजेचे आहे. आज ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’च्या निमित्ताने मी हे पुन्हा सर्वांना सांगतो, जिद्द बाळगा. कोणत्याही क्षेत्रात जिद्दीने काम करा, तुम्ही जे काही काम कराल, त्याचा आदर करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबाचा सन्मान करा.
जेव्हा तू संघाबाहेर असतोस तेव्हा आम्हालाही त्याची खंत असते. पण, त्यावेळी तुझी भावना काय असते?
- एक खेळाडू म्हणून प्रत्येकाला वाटतं की आपण प्रत्येक सामन्यात खेळावं. पण या गोष्टी खेळाडूंच्या हातात नसतात. मला जी काही संधी मिळते किंवा ज्या प्रकारात खेळण्याची संधी मिळते, त्यात मी कसा सर्वोत्तम ठरेन, हेच माझं लक्ष्य असतं. मी कधीच स्वत:चा विचार करून खेळत नाही. मला संघासाठी, देशासाठी कशाप्रकारे चांगलं करता येईल, हेच ठरवून मी खेळत असतो.
सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली अशा दिग्गजांसोबत खेळण्याची संधी मिळाली. या तिघांचं वैशिष्ट्य काय सांगशील?
- हे तिन्ही खेळाडू दिग्गज आहेत. सचिन तेंडुलकर माझा रोल मॉडेल आहे. त्यांच्यासोबत, धोनीसोबत खेळण्याची संधी मिळाली आणि आता विराट कोहलीसोबत खेळतोय. हे तिघेही स्पेशल आहेत. तिघांकडून खूप शिकलो. सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या अखेरच्या सामन्यादरम्यान मला बाजूला नेऊन जी कानगोष्ट सांगितली, त्यातून मला प्रोत्साहन मिळाले. धोनीकडून मी नेतृत्वगुण शिकलो. खेळाडूंचं निरीक्षण कसं करावं, हीही त्याच्याकडून शिकलो. कोहली एक वेगळ्या प्रकारचा खेळाडू आहे आणि त्याच्याकडूनही मी शिकतो.
अचानक कोरोनाचं संकट आलं आणि लॉकडाऊन सुरु झालं. हा काळ तुझ्यासाठी कसा होता?
- लॉकडाऊनमुळे मला माझ्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवता आला. आम्ही वर्षातील ९-१० महिने बाहेर असतो. त्यामुळे कोरोनामुळे आम्हाला आमच्या घरच्यांसोबत खूप वेळ घालवता आला. आई-बाबा, पत्नी आणि मुलीला वेळ देता आला. माझ्या मुलीसोबतचा वेळ खूप आनंददायी होता. तिच्यामध्ये झालेले बदल जवळून अनुभवता आले. बराच वेळ प्रवास सुरू असल्याने बाहेरचं जग बघायला मिळतं; पण बाहेरचं जग आणि घरचं जग हे पूर्ण वेगळं असतं. कोरोनाने साधेपणानेही कसं जगता येतं हे शिकवलं. जिममध्ये जाऊ शकत नव्हतो, तर सोसायटीच्या पार्किंगमध्ये तासन्तास वर्कआऊट केलं. आंबे, चॉकलेट आणि इतर चमचमीत पदार्थ खायचा मोह टाळणं खूप अवघड होतं, पण त्याचा मला फायदाच झाला.
ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर तुझ्या सोसायटीनं जंगी स्वागत केलं; पण आता संगमनेरलाही तुझं स्वागत करायचं आहे, तर कधी वेळ देशील?
- कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली की मी संगमनेरला जाणार आहे. माझी आजी तिथे असते, खूप दिवस झाले तिलाही भेटलेलो नाही. त्यामुळे वेळ मिळाला की, मी नक्की संगमनेरला येईन. भारताने, महाराष्ट्राने जे प्रेम दिलं, ते खूप मोलाचं आहे. ऑस्ट्रेलियाहून परतल्यावर माझ्या सोसायटीने केलेले स्वागत, माझ्यासाठी सुखद धक्का होता. त्यामुळे लोकांकडून मिळणारे हे प्रेम पाहिलं की, मन भरून येतं.