LMOTY 2020: देवेंद्र फडणवीस यांनी दगाफटका केला, म्हणून...; नवाब मलिकांनी सांगितले सत्ताकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 05:15 PM2021-03-22T17:15:13+5:302021-03-22T17:17:17+5:30
Lokmat Maharashtrian of the year award 2020: आमचे सरकार तीन पक्षांचे बनले असून, ते मजबुतीने चालावे यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत. महाराष्ट्राचा विकास व्हावा हीच आमची प्रमुख भूमिका आहे. सरकार आपली कारकीर्द चांगल्या पद्धतीने पूर्ण करेल असा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना पक्का विश्वास आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
समाजात चांगले काम करणाऱ्या लोकांचे लोकमत कौतुक करत आहे हे स्तुत्य आहे. अभिनंदनास्पद आहे, अशा भावना व्यक्त करतानाच महाविकास आघाडीचे सरकार सहज पाच वर्षं पूर्ण करेल, असा विश्वास या सरकारमधील मंत्र्यांनी व्यक्त केला. आमचे सरकार तीन पक्षांचे बनले असून, ते मजबुतीने चालावे यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत. महाराष्ट्राचा विकास व्हावा हीच आमची प्रमुख भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या सत्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि परिवहन मंत्री अनिल परब हे तिघेही बोलत होते.
मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी होऊ शकतो !
आमचे सरकार तीन पक्षांचे बनले असून, ते मजबुतीने चालावे यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत. आम्ही शिवसेनेसोबत काम करत आहोत त्यास वर्ष झाले, कुठेच अडचण आली नाही. आम्ही चर्चेतून मार्ग काढत आहोत. आमचे सरकार चांगलेच चालत आहे. मात्र विरोधकांना जास्तच घाई झाली असून, ते अस्वस्थ आहेत. चालू वर्षी निधीची कमतरता आहे. तुटवडा अनुभवास येत आहे. हा कोविडचा परिणाम आहे. आम्ही पायाभूत सेवासुविधांवर भर देत आहोत. रोजगारनिर्मितीवर भर देत आहोत. कोरोनामुळे वर्षभरात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती महाराष्ट्राने पाहिली नव्हती. पैशांची चणचण आहे आणि हे मान्य करावेच लागेल.
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पहिल्या तीन दिवसांत ज्यांनी विरोध केला त्यांनी आपले म्हणणे मांडले. मात्र राज्याच्या अधिकारांना बाधा येत नाही, अशी स्वागताची भूमिका ॲटर्नी जनरल यांनी मांडली आहे. सात दिवस सुनावणी चालणार आहे. जय्यत तयारी सुरु आहे. आरक्षणाचा लढा यशस्वी होऊ शकतो.
- अशोक चव्हाण
सरकार पाच वर्षे चालणार!
आमच्या सरकारमध्ये एकवाक्यता आहे. अधिवेशनाचे काम करताना तिन्ही पक्षांच्या बैठका होत होत्या. आम्ही कामाचे नियोजन करत होतो. सचिन वाझे प्रकरणातही आमच्यात एकवाक्यता आहे. शिवसेना अधिवेशनात कधीही एकटी पडली नव्हती. मात्र विरोधकांना वातावरणनिर्मिती करायची आहे. आमचे म्हणणे एवढेच आहे की कागदपत्रे द्यावीत. पुरावा द्यावा. मात्र अद्याप विरोधकांनी पुरावा दिलेला नाही. बिनबुडाचे आरोप करण्याचे, लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. वावड्या उठविल्या जात आहेत. विरोधकांच्या कामाचा हा भाग आहे. त्यात आम्ही हस्तक्षेप करत नाही; पण आम्ही शब्द पाळणारे लोक आहोत हे देशाला माहीत आहे. किमान समान कार्यक्रमावर हे सरकार आले आहे. पाच वर्षे हे सरकार चालणार आहे आणि पुढील २५ वर्षे विरोधकांना विचारच करावा लागणार आहे.
- अनिल परब
देवेंद्र फडणवीस यांनी दगाफटका केला, म्हणून...
एखादा अधिकारी चुकत असेल तर कारवाई होणार. वाझे प्रकरणात चुका झाल्याने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दगाफटका केल्याने हे सरकार आले. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे सरकार आले.
- नवाब मलिक