एलओसीवर.
By admin | Published: March 26, 2016 08:57 PM2016-03-26T20:57:23+5:302016-03-26T20:57:23+5:30
घर, कुटुंबापासून दूर, कायमच विपरीत असलेला निसर्ग, शारीरिक आणि मानसिक बळ पणाला लावणारी परिस्थिती, मर्यादित स्रोत, आजूबाजूला शत्रुसैन्याचा डेरा आणि डोक्यावर मृत्यूची सतत टांगती तलवार. पाकिस्तानी सैनिक कधी बॉम्बगोळे टाकतील काहीच सांगता येत नाही. आमची धडधड वाढली होती, पण आपले जवान तर निडरपणे अंगणात फिरावं तसं फिरत होते!
Next
- संकेत सातोपे
भारत-पाक सीमेवरील लष्करी तळावर नुकताच काही पत्रकारांनी दौरा केला. त्याचा थरारक अनुभव.
शीर तळहातावर घेऊन, रात्रीचा दिवस करून आणि डोळ्यांत तेल घालून भारतीय जवान सीमेवर रात्रंदिवस जागता पहारा देत असतात, म्हणूनच आपापल्या घरांत आपल्याला निवांत झोपता येतं, हे तर खरंच; पण भारतीय लष्कराच्या जिवावर आपल्या घरातच नाही, तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि त्यातही भारताचा हाडवैरी असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या पोस्टपासून केवळ पाचशे मीटर अंतरावरही तितक्याच निवांत झोपता येतं.
महाराष्ट्रातील काही पत्रकारांनी हा जिवंत अनुभव नुकताच घेतला. जम्मूचा पूॅँछ जिल्हा आणि परिसरातील कायमच जागती, अस्वस्थ असलेली तिथली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा. हमीरपूरजवळ तैनात असलेल्या भारताच्या मेंढर बटालियनसोबत घालविलेली एक रात्र आम्हा सर्वासाठीच अविस्मरणीय, डोळ्यांत अंजन घालणारी आणि आपल्यासारख्या सर्वसामान्यांना माहीत नसणा:या अनेकानेक गोष्टींवर प्रकाश टाकणारी होती.
पाकिस्तानकडून वारंवार होणारं शस्त्रसंधी उल्लंघन, सतत आगगोळ्यांचा वर्षाव, कधी कुठून गोळी येईल, कधी कुठे स्फोट होईल याची काहीच शाश्वती नाही. तिथलं वातावरणच आमच्या छातीत धडकी भरवण्यासाठी पुरेसं होतं. पण अशा परिस्थितीत आणि अशा ठिकाणीही आपले जवान घराच्या अंगणात फिरत असल्यासारखे शांत आणि सुनियोजितपणो त्यांचे दैनंदिन व्यवहार करीत होते.
मिसरु डही न फुटलेली अवघ्या विशीतली कोवळी मुलं, दोन-पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेले तरु ण, तर काही निवृत्तीला आलेले जवान, पण सर्वांच्याच चेह:यावर तोच दांडगा उत्साह. समुद्रसपाटीपासून 8-9 हजार फूट उंचीवर असल्यामुळे या ठिकाणी प्राणवायूही विरळ. चार पावलं भराभर टाकायची तरी सामान्य माणसाला धाप लागते. अशा ठिकाणी दैनंदिन कामे, गस्त देणो आदिंसाठी पाच-पाच किलोमीटरची धावपळ हे जवान अगदी सहजतेने करत होते.
पूॅँछमधील याच भागात काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या पोस्टवर हल्ला करून आपल्या जवानाचे शीर कापून नेल्यानं मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यामुळे या भागातील जवान सतत प्रचंड तणावाखाली जगत असतील, अशी आपली समजूत. परंतु प्रत्यक्ष अनुभवाने ती पूर्ण खोटी ठरवली. इथला प्रत्येक सैनिक शत्रूच्या तोफांच्याच नव्हे, तर बंदुकीच्याही टप्प्यात असला तरी कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला ते कायम सज्ज असतात. त्यामुळेच सर्व धर्मस्थळांवर इथे रोज यथासांग पूजारती होते. सर्वसुविधांनी युक्त अगदी पंचतारांकित कार्यालयात इथले कमांडिंग अधिकारी बसतात, एलसीडी टीव्ही, फ्रीजपासून ते मोबाइलपर्यंत सामान्य नागरी जीवनातील कोणत्याही सोयीचा येथे अभाव नाही. सूप-स्टार्टरपासून ते मुखवासापर्यंत साग्रसंगीत भोजनाची व्यवस्था इथे लष्करासाठी करण्यात आली आहे. त्यामुळेच इथले अधिकारी या पोस्टला आपले दुसरे घरच मानतात.
घर, कुटुंबापासून दूर, कायमच विपरीत असलेला निसर्ग, शारीरिक आणि मानसिक बळ पणाला लावणारी परिस्थिती, मर्यादित स्रोत, आजूबाजूला शत्रुसैन्याचा डेरा आणि डोक्यावर मृत्यूची सतत टांगती तलवार. कसे राहत असतील हे जवान इथे? उत्सुकतेनं एका जवानाला विचारलं, ‘भारतीय जवान तर इथे मर्यादितच दिसताहेत, तुमचं मुख्यालयही इथून कितीतरी दूर आहे, उद्या शत्रूनं हल्ला केला तर तुम्हाला मदत कधी आणि कशी मिळणार?’
त्या जवानानं क्षणात उत्तर दिलं, ‘मागून येणा:या मदतीच्या आशेवर आम्ही इथे छाती ताणून बसलेलो नाही. येऊ देत किती शत्रू यायचेत ते. प्राण असेर्पयत आणि शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेर्पयत एकाही शत्रूला वर चढू देणार नाही. मागाहून येणारी मदत मिळायची तेव्हा मिळेल. त्याचा विचार करणं माझं काम नाही. मी माझं कर्तव्य चोख जबावणार!’
स्वत:च्या प्राणांची आहुती देण्यासाठी कायम सज्ज असलेले आणि देशाच्या सीमेवर चारही बाजूंनी खडा पहारा देणा:या जवानांमुळेच भारतीय नागरिक, देश सुरक्षित आहे ते त्यांच्या या मानसिकतेमुळेच!
पाकव्याप्त काश्मीरमधून होणा:या अतिरेकी कारवाया, सततची गोळाबारी यामुळे येथील स्थानिकांचे जीवन अतिशय अशांत आणि अस्थिर झाले आहे. शेतात काम करत असताना, परीक्षेसाठी जात असताना, रु ग्णाला घेऊन जाताना, कधीही अचानक सीमेपलीकडून बॉम्बवर्षाव होऊ लागतो. कुणाचा कधी बळी जाईल याचा नेम नाही.
सीमेवरील या गावांचं सर्वात मोठं दुखणं म्हणजे इथली दुर्गमता आणि मुख्य शहरापासूनची विलगता. त्यामुळेच इथे आरोग्यसेवा, शिक्षण आदिंसारख्या मूलभूत नागरी सुविधाही पोहोचू शकत नाहीत. ‘लष्कर इथे आहे म्हणून, नाहीतर आमचे हाल कुत्रे खाणार नाही’, असं भरूती गावचा तरुण जावेद खान सांगत होता, ‘भारतीय लष्कर त्यांच्या वाटय़ाच्या सेवासुविधांचा लाभ आम्हाला अगदी सहज उपलब्ध करून देते. रात्री अपरात्री कुणी आजारी पडलं तर आम्ही लष्करालाच हाक मारतो आणि लष्करी डॉक्टरकडून आम्हाला तातडीने साहाय्यसुद्धा मिळते. गावातील काही वृद्धांच्या मोतीबिंदूसारख्या शस्त्रक्रियासुद्धा लष्कराने करून दिल्या आहेत.’
गावक:यांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन हाच आहे. परंतु, एकरावारी शेतजमीन असूनही सततच्या गोळाबारीमुळे या दोन्ही व्यवसायांवर गदा येते. एकदा का दुतर्फा गोळाबारी सुरू झाली की, 2-2, 3-3 दिवस घराबाहेर पडता येत नाही. शेतीचे नुकसान होते, जनावरे मरतात. ‘आता ऑगस्टमध्येही झालेल्या गोळाबारीमध्ये माङया पाच शेळ्या मेल्या. आता मी काय खाऊ?,’ असा अगतिक प्रश्न भरुती गावातील काला खान यांनी विचारला. शिवाय फक्त गोळाबारीच्या काळातच इथे धोका असतो,
असं नाही. पाकिस्तानकडून येणार सर्वच तोफगोळे त्याच वेळी फुटत नाहीत. त्यातील बरेचसे शेतात तसेच पडून राहतात. असे तोफगोळे शेतात कधीतरी नांगर फिरवताना, कधी भाजणी करताना अचानक फुटतात आणि जीवितहानी होते. लष्करी कारवायांमध्ये ब:याचदा भूसुरु ंगांचा वापर केला जातो, तोही नंतर गावक:यांच्या जिवावर बेततो. उजवा पाय तुटलेले खादीम खान हे वृद्ध गृहस्थ लंगडत लंगडत पत्रकारांना सामोरे गेले. शेताजवळ फिरत असताना अचानक भूसुरु ंगावर पाय पडल्याने त्यांना एक पाय गमवावा लागला होता. त्यातच आता पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात त्यांचा कर्ता मुलगा मारला गेला आहे. त्यामुळे आता मी कशासाठी जगायचं, असा प्रश्न विचारून ते ढसाढसा रडत होते.
आमच्या घरांजवळ बंकर बांधून द्या म्हणजे आम्ही गोळाबारीच्या काळात निदान त्यात बसून तरी जीव वाचवू, असे इथल्या वृद्धांचे म्हणणो आहे. लष्कर आणि नागरी अधिका:यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सीमाभाग विकास समितीच्या माध्यमातून येथे बंकर बांधण्याची योजना आहे, परंतु अजून ती प्रत्यक्षात उतरलेली नाही. या गावांतील तरु णांना मात्र बंकरचाही पर्याय कुचकामी वाटतो. त्यांचे म्हणणो आहे की, बंकरमध्ये आम्ही किती वेळ बसून राहणार? बंकरमध्ये पोहोचेपर्यंत जीवितहानी होणारच आणि बंकर आमच्या मालमत्तेचे नुकसानही रोखू शकत नाही. त्यामुळे आमच्या 5क्-5क् एकर जमिनीऐवजी अगदी 2-5 एकरच शेतजमिनी द्या, पण आमचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा.
जावेद हा पदवीधर तरु ण सांगत होता की, इतकी बिकट परिस्थिती आहे, तरीही आमच्या गावातील बहुतेक तरु ण सुशिक्षित आहेत. मैलोन्मैल चालत जाऊन ते आपलं शिक्षण पूर्ण करतात. कुणी बी.एस्सी. केलयं, कुणी बी.एड. पण त्यांनाही सलग शिक्षण करता येत नाही. कारण परीक्षेच्या काळातच गोळाबारी सुरू झाली किंवा पावसामुळे रस्तेच बंद झाले की इथल्या मुलांचे दहावी-बारावीसारख्या महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर हुकतात. तयारी वाया जाते. मग पुन्हा तयारी करायची आणि पुढल्या वर्षी परीक्षा द्यायची, असे करतच आम्हाला शिक्षण घ्यावे लागते. त्यामुळे सामान्य शहरी मुलांपेक्षा आम्हाला पदवी पूर्ण करण्यासाठी जास्त र्वष लागतात. म्हणूनच आम्ही म्हणतो की, बंकरसारख्या पर्यायांनी आमच्या या समस्यांवर तोडगा निघणार नाही, आमचे स्थलांतरच करा. हमीरपूरजवळच्या 14 गावांप्रमाणोच दयनीय अवस्था आहे बफ्लीयाजजवळच्या कुलाली आणि हिलकाका परिसराची. जम्मू आणि काश्मीरला विभागणा:या पिरपंजाल पर्वतरांगांजवळचा तब्बल नऊ हजार फूट उंचावरचा हा संपूर्ण भाग लष्करी आणि सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पर्वतराजीतील हा असा भाग आहे, जेथून पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे काश्मीरखोरे दोन्हीही 2-3 तासांच्या अंतरावर आहेत. हिलकाका हे नाव प्रथम गाजले ते 2क्क्3 मध्ये येथे झालेल्या ऑपरेशन सर्पनाशमुळे. या ऑपरेशनमध्ये सक्रिय सहभाग घेतलेल्या ताहीर फाजल चौधरी या स्थानिकांच्या म्होरक्याने या पूर्ण ऑपरेशनची कहाणी पत्रकारांपुढे उलगडली. नव्वदीच्या दशकापासूनच या मोक्याच्या भागात अतिरेक्यांचा वावर वाढला होता. हिलकाका या ठिकाणी अतिरेक्यांनी त्यांचा अड्डा बनवला होता. सुमारे तीनशे ते चारशे अतिरेक्यांना इथे रीतसर लष्करी प्रशिक्षण देण्यात येत होते. जिहादच्या नावाखाली स्थानिक मुसलमानांमध्ये भारतद्वेषाचे बीज पेरण्याचे कामही त्यांच्यातील काही मौलवींकडून करण्यात येत होते. परंतु इथल्या गुज्जर मुसलमानांनी कधीच त्यांना भीक घातली नाही. ते कायमच भारताशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे अखेर या अतिरेक्यांनी स्थानिकांना धाकदपटशा दाखविण्यास सुरु वात केली. येता-जाता त्यांच्या मुलीबाळींवर हात टाकणो, दारातून शेळ्या-मेंढय़ा उचलून नेणो, रसद पुरविण्याची सक्ती करणो अशा रोजच्या जाचाला स्थानिक कंटाळले होते. त्यातच उमर मुसाच्या या अतिरेक्यांनी ताहीर चौधरी यांच्या भावाची, हाजी मो. आरिफ यांची 2क्क्2 मध्ये हत्त्या केली. त्यामुळे चौधरी यांच्या मनात सुडाग्नी पेटला. त्यांनी भारतीय लष्कराला मदत करण्याचा निर्णय घेतला. अनेक स्थानिक तरु ण त्यांना येऊन मिळाले.
उत्तुंग पर्वतराजीने वेढलेली ही जागा अशा ठिकाणी आहे की जेथे स्थानिकांच्या साहाय्याविना भारतीय लष्कराला कारवाई करणो अशक्यप्राय होते. त्यामुळे लष्कराने स्थानिकांशी करार केला. त्यानुसार लष्कराला साहाय्य करण्याच्या मोबदल्यात त्यांना 52 लाख रु पये देण्याची तयारी सरकारने दर्शविली. परंतु ‘हम भी भारतवासी है, हम हमारा फर्ज अदा कर रहे है’, असे म्हणत स्थानिकांनी हे पैसे नाकारले. सरकारला काही करायचेच असेल, तर आम्हाला मुख्य भारताशी जोडण्यासाठी बिफ्लयाज ते हिलकाका रस्ता बांधून द्यावा आणि आमच्यातील पात्र तरु णांना लष्कर किंवा अन्य सुरक्षा दलांमध्ये भरती करून घ्यावे, अशा काही मागण्या स्थानिकांनी केल्या. मात्र यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची आग्रही मागणी होती, ती म्हणजे स्थानिकांच्या हातात बंदुका द्याव्यात. या सर्व मागण्या मान्य करीत लष्कराने ऑपरेशन सर्पनाशला सुरु वात केली.
स्थानिकांना बंदुका चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या माध्यमातून अतिरेक्यांच्या गोटातील बित्तंबातमी काढण्यात आली. अखेर लष्कराच्या सहा सेक्टर राष्ट्रीय रायफल विभागाच्या रोमिओ फोर्सच्या नेतृत्वाखाली 23 एप्रिल 2क्क्3 रोजी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. उंच टेकडय़ावर तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर जवानांना उतरविण्यात आले. स्थानिक आणि लष्कराच्या तुकडय़ांनी अतिरेक्यांना घेरले. घनघोर युद्ध पेटले. लष्कर आणि स्थानिकांमधील अनेकांना हौतात्म्य आले. परंतु शेवटी येथील अतिरेक्यांचा समूळ नायनाट करून 27 मे 2क्क्3 रोजी हे ऑपरेशन यशस्वी झाले. इथल्या तब्बल 72 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले आणि तिघांना अटक करण्यात आली, तर काही अतिरेकी पळून जाऊ शकले. अतिरेक्यांची बंकर, खंदके उद्ध्वस्त करण्यात आली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे भारतीय लष्कराची एक कायमस्वरूपी पोस्ट अस्तित्वात आली. त्यामुळे भविष्यातील अतिरेकी कारवायांनाही पायबंद बसला. मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा आणि अन्य सामग्री हस्तगत करण्यात आली. यासंदर्भातला आपला थरारक अनुभवही चौधरी यांनी सांगितला. ‘या ऑपरेशनदरम्यान फिरताना मी एका खोल खड्डय़ात पडलो. आत पाहिलं तेव्हा कळलं अतिरेक्यांचा तो सर्वसुविधांनी युक्त असा एक बंकर होता. असे अनेक बंकर आम्हाला सापडले. तोराबोरामध्ये ओसामा बिन लादेनने जसे खंदक बनवले होते, तशीच यांची रचना होती.’
स्थानिक आणि लष्कर यांनी संयुक्तपणो लढलेल्या या अतिरेकीविरोधी लढाईचे स्मरण म्हणून येथील कुलाली टेकडीवर ‘अवाम और जवान’ स्मारक बांधण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरचे राजकीय आणि सामाजिक संदर्भ देशातील अन्य कोणत्याही राज्यांपेक्षा भिन्न आहेत. त्यामुळे येथे तैनात असलेल्या भारतीय सैन्याच्या जबाबदा:यांचे स्वरूपही भिन्न आहे. इथे लष्कराला केवळ सीमेपलीकडून येणा:या शत्रूला तोंड द्यायचे नाही, तर त्या शत्रूला स्थानिकांमध्ये हितसंबंध तयार करता येऊ नयेत याचीही खबरदारी घ्यायची आहे. म्हणजे एकाच वेळी समाजकंटक फुटीरतावाद्यांना धोपटणो आणि समाजपूरक राष्ट्रनिष्ठांना थोपटणो, अशी दुहेरी भूमिका याठिकाणी लष्कराला बजवावी लागते. त्यामुळे लष्कराचा एक गट जेव्हा हातात बंदूक घेऊन वज्रदीप कठोरपणो वागत असतो, त्याच वेळी दुसरा गट मृदुनि कुसुमादपि होऊन सेवाकार्य करीत असतो. ही दुहेरी भूमिका व्यवस्थित पार पाडली गेली, तरच लष्कराला इथे आम्र्ड फोर्सेस स्पेशल पॉवर अॅक्ट 199क् (आफ्स्पा) सारखे कायदे प्रभावीपणो राबविणो शक्य आहे. त्यामुळे सद्भावना मिशनअंतर्गत लष्कराने या भागात सेवाप्रकल्पांची मालिकाच उभी केली आहे. जम्मूमध्ये तैनात असलेल्या 16 कॉर्प या भारतीय लष्कराच्या साउदन कमांडच्या विभागाचे प्रमुख लेफ्ट. जनरल आर. आर. निंभोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 कॉर्पच्या अखत्यारित येणा:या सुमारे 2क्क् चौ. किमीच्या परिसरामध्ये आठ शाळा लष्कराकडून चालविण्यात येत आहेत. शाळेतील मुलांना देशाबद्दल आत्मीयता वाटावी, देशाची ओळख व्हावी यासाठी दरवर्षी त्यांना राष्ट्रीय एकात्मता दौ:यांवर नेण्यात येते. आरोग्य शिबिरांसारख्या माध्यमातून चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचेही प्रयत्न केले जातात. 2क्14 साली आलेल्या भीषण पूरस्थितीमध्येही ऑपरेशन मेघराहत राबवून तब्बल दोन लाख लोकांचे प्राण वाचविण्यात लष्कराला यश आले आहे.
अर्धं गाव भारतात, अर्धं पाकमध्ये!
घुसखोरी रोखण्यासाठी भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलओसी) काही अंतर मागे तारांचे कुंपण केले आहे. या कुंपणावर रात्री दिवे लावले जातात आणि त्यातून विद्युत प्रवाहही सोडण्यात येतो. त्यामुळे घुसखोरी रोखण्यास ब:याच अंशी मदत झाली आहे. परंतु सर्वात बिकट समस्या आहे ती या कुंपणाच्याही पुढे एलओसीलगत असणा:या गावांची. बीएसएफमधून सेवानिवृत्त झालेले आणि सीमावर्ती गावांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नरत असणारे देहरी गावचे वयोवृद्ध सरपंच बी. जी. साबर यांच्याशी गप्पा रंगल्या. त्यांनी सांगितलं, पूॅँछ भागात देहरी, धारती, सोहला, भरुती, बालाकाब, डब्बी, पांजनी, रामलुता, गोलुता, सासुता, चप्पर धारा, कंगा, डटोट, बासुनी फॉर्वड अशी 14 गावे आहेत, जी तारांचे कुंपण आणि एलओसीच्या मध्ये वसलेली आहेत. यातील देहरी हे गाव तर निम्मे पाकिस्तानात आणि निम्मे भारतात आहे. एलओसीमुळे त्याचे पाक देहरी आणि भारतीय देहरी असे विभाजन झाले आहे. त्यामुळे गावातीलच नातेवाइकांना परस्परांना भेटायचे झाले, तरी लष्कराकडून विशेष परवाना घ्यावा लागतो. वर्षातून अधिकाधिक चाळीस दिवसांसाठी असा परवाना गावातील प्रत्येक व्यक्तीला मिळू शकतो. हा परवाना घेऊन दोन्ही बाजूच्या लोकांना विरु द्ध देशांतील गावात आणि ते गाव असलेल्या केवळ जिल्ह्याच्या हद्दीत फिरता येते.
करामत उल्ला यांची हिंमत
ऑगस्ट 2015 ची गोष्ट. स्थानिकांसाठी हमीरपूरजवळ लष्कराकडून चालविण्यात येणा:या शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत होता. शाळांतील लहान मुलं, शिक्षक सर्वच जण या समारंभात सहभागी झाले होते. अचानक आकाश पेटलं. सू-सू करीत आगीचे गोळे येऊन पडू लागले. नेहमीप्रमाणोच पाकिस्तानी तोफखान्याकडून नागरी भागावर गोळाबारी सुरू झाली होती. सगळ्यांची एकच पळापळ उडाली. लष्करी जवानांनी नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी शर्थ करतानाच पाकच्या तोफगोळ्यांना प्रत्युत्तर देणंही सुरू केलं. गावक:यांना सुरक्षित स्थळी नेण्याचे प्रयत्न चालूच होते. त्यापैकीच एक होते, बसुरीचे सरपंच करामत उल्ला खान. बॉम्बगोळे पडू लागल्यावर घरातून बाहेर पडून त्यांनी गावक:यांना सुरक्षित स्थळी न्यायला प्रारंभ केला, परंतु शत्रूच्या एका तोफगोळ्यावर करामत उल्ला यांचेच नाव कोरलेले होते. गाव वाचविण्यासाठी धावणा:या खान यांचा पाकिस्तानच्या कुरापतींनी जीव घेतला होता. ‘वो लोगोने मेरे अब्बू को मार डाला, हम हर वक्त खतरे मेंही जीते है’, हे सांगताना करामत यांची बारावीत शिकणारी मुलगी समरेज कौसरचे डोळे पाणावले होते.
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
sanket.satope@gmail.com