लोकमान्य
By admin | Published: June 22, 2014 01:15 PM2014-06-22T13:15:30+5:302014-06-22T13:15:30+5:30
लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगातून परतले त्याला नुकतीच १00 वर्षे झाली. त्यानिमित्ताने ‘लोकमान्य टिळक विचार मंच’च्या वतीने लोकमान्यांचे चित्रमय चरित्र प्रकाशित करण्यात आले. अनेक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश असलेल्या या ग्रंथाची ओळख.
Next
राजू इनामदार
लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगातून परतले त्याला नुकतीच १00 वर्षे झाली. त्यानिमित्ताने ‘लोकमान्य टिळक विचार मंच’च्या वतीने लोकमान्यांचे चित्रमय चरित्र प्रकाशित करण्यात आले. अनेक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश असलेल्या या ग्रंथाची ओळख.
-------------------
‘लोकमान्य’ असं नुसतं नाव उच्चारलं, तरी प्रत्येक भारतीय माणसाची छाती अभिमानाने फुलून येते. वाणीनं आणि लिखाणानं त्यांनी सगळा भारत गाजवला. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ या इंग्रजांनी केलेल्या त्यांच्या टीकात्मक वर्णनातच लोकमान्य टिळकांची महत्ता स्पष्ट होते.
लोकमान्यांचे जीवनचरित्र अनेकांनी शब्दबद्ध केलं आहे. बर्याच भारतीय भाषांमधूनही ते गेलं आहे. मात्र, छायाचित्रांच्या माध्यमातून लोकमान्यांविषयी एकत्रितपणे असं फार काही झालेलं नव्हतं. ‘लोकमान्य टिळक विचार मंच’ने आता ही त्रुटी दूर केली आहे. ‘लोकमान्य’ अशाच नावानं त्यांनी लोकमान्यांचं एक छायाचित्रचरित्र तयार केलं आहे. लोकमान्यांच्या जन्मग्रामापासून ते मुंबईतील त्यांच्या महाअंत्ययात्रेपर्यंतची अनेक दुर्मिळ छायाचित्रं या ग्रंथात पाहायला मिळतात.
लोकमान्यांचा काळ म्हणजे १८५६ ते १९२0. इंग्रजांनी भारतावर आपली पुरती पकड बसवली होती. आधुनिकीकरणाचं जोरदार वारं भारतात वाहू लागलं होतं. त्या काळात छायाचित्रांची कला प्राथमिक अवस्थेत व र्मयादित वर्गालाच उपलब्ध होती. टिळक सार्वजनिक जीवनात असल्यामुळं त्यांच्या छायाचित्रांना ही र्मयादा आली नसावी. मात्र, तरीही अनेक प्रसंगांची छायाचित्रं नाहीत. ती तशी नसल्याची खंतही संपादकांनी व्यक्त केली आहे.
आहे ती छायाचित्रं जमवणंही तसं अवघडच होतं. पुस्तकाच्या कर्त्यांनी ते चांगल्या पद्धतीने पार पाडलं आहे. टिळकांचं ६४ वर्षांचं आयुष्य सुरुवातीचा शिक्षणाचा काळ वगळता धकाधकीचंच गेलं. छायाचित्रांमधून ते स्पष्टपणे जाणवतं. तरुणपणातील टिळक ध्येयाने भारलेले दिसतात. वार्धक्यातील टिळकांच्या चेहर्यावर सार्वजनिक जीवनातील सगळ्या धकाधकीचं प्रतिबिंब स्पष्टपणे उमटलेलं दिसतं. नजरेतील करारीपणा मात्र सुरुवातीच्या छायाचित्रांपासून कायम असलेला लक्षात येतो. या छायाचित्रांमधून त्या वेळचा काळ जिवंत होतो, हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. गायकवाड वाड्याचं छायाचित्र पाहिलं, की हे जाणवतं. गणेशोस्तव, शिवजयंती, विजयादशमीचा मेळावा यानिमित्तानं लोकमान्य अनेक ठिकाणी व्याख्यानाला जात. त्यांच्या उपस्थितीत पानसुपारीचे कार्यक्रम होत असत. अशा कार्यक्रमांची छायाचित्रं आहेत. त्यातील एकामध्ये महात्मा गांधी व जीना यांच्या मध्ये टिळक आहेत.
कोलकत्ता काँग्रेसमधील एक छायाचित्र गमतीशीर आहे. लोकमान्य टिळक एका साध्या बादलीतून गडूने पाणी घेत अंघोळ करता करता अंतूकाका फडणीस यांच्याबरोबर चर्चा करत असतानाचे हे छायाचित्र आहे. त्यावरून टिळकांचा साधेपणा दिसतो. लंडनमधील टिळक, मंडालेच्या तुरुंगातील टिळक, सत्काराच्या कार्यक्रमातील टिळक अशी अनेक छायाचित्रं पुस्तकात आहेत. त्यांची मांडणीही वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. त्यात कालखंडाचा विचार करण्यात आला आहे. चित्रमयचरित्र पाहिल्याचा आनंद त्यामुळेच मिळतो. लेखणीची चपराक, लोकमान्यांच्या सहवासात, चित्रकारांच्या कुंचल्यातून अशा शीर्षकांखाली काही छायाचित्रं आहेत.
टिळक चरित्राचे अभ्यासक अरविंद गोखले या ग्रंथाचे संपादक आहेत. या कालखंडाचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे मार्गदर्शक असून, शैलेश टिळक यांच्या संकल्पनेतून पुस्तक साकार झालं आहे.
(लेखक लोकमत पुणे आवृत्तीमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत.)