एकटीची संवेदना 'मैत्र' फुलवी
By admin | Published: June 28, 2014 06:38 PM2014-06-28T18:38:03+5:302014-06-28T18:38:03+5:30
परिस्थितीमुळे स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या एकाकीपणातून मार्ग काढण्यासाठी पुण्यात ‘मैत्रगट’ साकारला आहे. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी भेटून व्यथांना विधायकतेची वाट देणार आहेत. या उपक्रमाविषयी...
Next
नीलिमा शिकारखाने
गावात थोडं बंदचं वातावरण. पंधरा-एक दिवसांपूर्वी पेपरमध्ये येऊन गेलेली एक-एकट्या स्त्रियांच्या मेळाव्याची सविस्तर बातमी आणि त्यात केलेली, एक जूनच्या रविवारी परतभेटीची आठवण.. म्हणून अडचणीवर मात करून मोठय़ा संख्येने जमल्या होत्या, त्या सार्याजणी. आल्या होत्या एकट्या-एकट्या एकटेपणाच्या असंख्य व्यथा घेऊन. मदतीचा हात मिळावा या अपेक्षेनं काही घाबरत, काही चाचपडत, काही उमेदीने, तर काही एकटीची ताकद एकवटून वेगळा इतिहास घडवण्याच्या जिद्दीने आल्या होत्या. एक-दोघी तर एकटेपणाने एवढय़ा ग्रासल्या होत्या, की त्यांना त्यांचा स्वत:चा विश्वासच वाटत नव्हता; हे फोनवर केलेल्या चौकशीवरूनच जाणवत होते; पण देवयानीताईंनी फोनवरून दिलेला दिलासा, उमेद या बळावर त्या सभेला वेळेत पोहोचल्या. सार्या बोलल्या, मोकळ्या झाल्या, थोड्या सुखावल्या आणि असंख्य सख्यांच्या सोबतीने भारावल्या. जाताना आनंदाचा ठेवा घेऊन परत भेटण्याच्या ओढीनं गेल्या.
त्या रविवारची ती भारावलेली संध्याकाळ (तीन तास). ‘वंचित विकास’ संस्थेच्या प्रेरणेतून एक-एकट्या स्त्रियांसाठी आकाराला येत असलेल्या ‘मैत्रगट’च्या भेटीची होती. संघटनेच्या मीना कुर्लेकर, सुषमा शास्त्री आणि त्यांच्या सहकारी तसेच काही समविचारी, जाणीवपूर्वक काही सामाजिक योगदान देऊ इच्छिणार्या त्यांच्या मैत्रिणी यांनी मिळून या एक-एकट्या स्त्रियांच्या ‘मैत्र गट’ची कल्पना साकार करण्याचे ठरवले आहे. १ मे- महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या ऑफिसमध्येच भेटण्याचे ठरविले. तुफान पाऊस असूनही त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. तेव्हाच सर्वानुमते महिन्याच्या पहिल्या रविवारी भेटण्याचे ठरले. एक जूनची दुसरी भेट; तिलाही प्रचंड प्रतिसाद.
त्या असंख्य सख्या एकट्या, एकांकी जगत आहेत. काहींचा एकटेपणा परिस्थितीने लादलेला, तर काहींचा अपघाताने आलेला. काहींना असहायतेमुळे स्वीकारावा लागलेला, तर काहींनी आनंदाने स्वीकारलेला. का तर कुटुंबात असूनही एकटेपणा जगणार्या. असे एक ना असंख्य पदर होते त्यांच्या व्यथेचे. सार्याजणी आपापल्या परीने झगडत आहेत, वाट शोधत आहेत. पडत-उठत एकटेपणाला भिडत आहेत. त्यांचा झगडा सभोवतालच्या नात्याशी आहे, समाजाशी आहे, आर्थिक समस्यांशी आहे, तसाच तो शारीरिक कष्ट आणि भावनांशी आहे. पाल्याला वाढवण्यासाठीचा आहे आणि तो आहे हक्कांच्या माफक इच्छेसाठीदेखील.
या ‘मैत्रगटा’ची बांधणी करणार्या सख्यांना कल्पना होती, या सार्या अनेकविध लढय़ांची; पण त्यांना हीदेखील जाणीव आहे, की जर या त्यांच्या लढय़ात त्यांना सोबत मिळाली कोणा समविचारी, समदु:खी, समऊज्रेची, तर ही लढाई सुखकर होईल. त्यांच्या व्यथांच्या, अडचणींच्या, खंतावलेल्या जाणिवांना भावनिक बळ देऊन, सोबतीचा विश्वास देऊन, एकजुटीच्या ताकदीने बळ देऊन त्यांना त्यांच्याच लढाईत यशस्वी करता येणे शक्य आहे. त्यासाठी एकटीला साद सार्याजणींनी हा प्रकल्प उभा करायचा ठरवले गेले.
दर महिन्याच्या पहिल्या रविवारची भेट आता निश्चित झाली आहे. त्या भेटी नव्या मैत्रिणींचा परिचय करून घेणे व देणे, एखाद्या विषयावर प्रत्येकीने पाच मिनिटे तरी स्वत:चे विचार मांडणे. अडचणीतल्या सखीला चर्चेतून मार्ग दाखवणे. एखाद्या निमंत्रिताचे विचार ऐकणे. कधी गाण्यांचा छोटा कार्यक्रम, कधी खेळ, कधी काव्यवाचन, कधी छोटी सहल, असे त्या भेटीचे प्रयोजन असेल. एक-एकट्या स्त्रियांच्या बरोबर या ‘मैत्र गटा’स परिपक्व अधिक सुजाण करण्यासाठी विविध सामाजिक क्षेत्रांत यशस्वीपणे कार्य करणार्या समुपदेशन करणार्या, कायदेशीर सल्ला देऊ शकणार्या वेगवेगळ्या पदवीधर अभ्यासू महिलाही असणार आहेत.
(लेखिका वंचित विकास संस्थेच्या कार्यकर्त्या आहेत.)