नजर कोरोनातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 06:09 PM2020-04-24T18:09:08+5:302020-04-24T18:09:52+5:30
आपण काय केल्याने कोरोनावर मात करता येते हे आता सगळेच समजून आहेत; पण यातूनही प्रबोधनाच्या नावावर लुटालूट करणारे कमी नाहीत. लोकांनी यावेळीही जागृत असणे शहाणपणाचे आहे. लोकांची मानसिकता अशी का हे समजत नाही की, कठीण परिस्थितीतही फायदा करून घ्यावा !
डॉ. नगिना माळी
- प्रत्येक देश सगळ्याच बाबतीत स्वयंपूर्ण असेलच असे नाही. म्हणूनच परस्परावलंबन ही गोष्ट नेहमी राहील. सध्या कोरोना आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गाव सोडून बाहेर जाणे तर सोडाच, पण घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे लॉकडाऊन वाढत आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त घराबाहेर पडणे धोक्याचे आहे. वास्तव पाहता कोरोना काळात सगळ्यांनीच स्वत:ची काळजी घेणे अपेक्षित आहे. जनतेला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आपले भारत सरकार व प्रशासन प्रबोधन व काळजी घेते आहे. या काळात अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी, स्वयंसेवक, सफाई कामगार जी सेवा देत आहेत, ती उल्लेखनीय आहे. आज या काळात खरे देव हीच माणसं आहेत! काही लोकांनी या काळात परिस्थितीचा फायदा घेतला हेही तितकेच खरे आहे. समाजातील लोकांनी सरकारला जी मदत केली, त्यांनी आपली ‘सामाजिक जबाबदारी’ पार पाडली. सर्वसामान्य जनताही घरी राहून ‘सामाजिक जबाबदारी’ पार पाडत आहे असेच म्हणावे लागेल! कोरोनावर येणारी काही माहिती दिशाभूल करणारीही येते आहे. त्यापासून आपण सावधान होणे गरजेचे आहे.
घरातून काम करू शकणारी मंडळी आपली कामे नियोजनानुसार करीत आहेत; पण ज्यांचे मशिनरीवरच्या कामाचे स्वरूप आहे, त्यांचा प्रश्न उरतोच! कसे ना कसे तरी ते हे लोक दिवस गुंतवित आहेत. या काळात सगळ्यात जास्त वेळ मिळत आहे तो छंद जोपासण्यास, लेखन, वाचन, कलाकृती, नवीन मेनू यांस. घरातील लोकांना आपल्याच लोकांसोबत वेळ मिळत आहे. काहींना घरी राहणे जमतही नसेल; पण इलाज नाही म्हणून काही ना काही करणे भाग आहे. शेतकरी देशाचा राजा, पण हाच राजा दयनीय झाला आहे. शेतकरी कुठेतरी भरकटत जात आहे आणि व्यापारी त्यांच्या जिवावर पैसा कमवीत आहेत. फळबागायतदारांची व फूलबागायत लोकांची अवस्था यापेक्षा काही वेगळी नाही. कधी दर पाडून मागणारे व्यापारी लोक तोच माल ग्राहकांना दुप्पट किमतीने विकतात; पण कोणास म्हणावे तरी काय! रिस्क घेऊन सगळीच घराबाहेर पडत आहेत. काही कारणांनी काही ठिकाणचे दवाखाने बंद राहिले. लोकांना यामुळे कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले!
‘
इथे कोरोना झाला आहे तिथेही होऊ दे’ म्हणत व होम क्वारंटाईनमध्ये असतानाही घराबाहेर फिरणारे कमी नाहीत! आज लोक सेवा करीत करीत, मरण पावत आहेत व इथे काळजी न घेता दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणारेही आहेत. मानसिकता बदलणार कधी? या कठीण काळात जे लोक कोरोनाची लक्षणे दिसत आहेत त्यांच्याशी जसे वागत आहेत, खरच यावर विचार करावा!
आज लॉकडाऊन वाढविण्याची गरज का भासली? याला आपणच जबाबदार आहोत! जगात खूप कमी देश आहेत, ज्यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. अत्यावश्यक सेवा मिळत आहेत यापेक्षा अजून काय हवे! जीव जगविण्यासाठीच्या गोष्टी सुरू आहेत.
कोरोनाचा प्रसार कसा होतो हे माहिती असूनही लोक हवी तशी काळजी घेताना दिसत नाहीत. थोडी सवलत दिली तर त्याचा गैरफायदा सुरू होतो. नियम तोडून जर स्वत:सच धोका निर्माण करीत आहोत, तर मग शासनाचा निर्णयच योग्य आहे. पण हेही तितकेच खरे की, हाती नियम आले त्यांनी कधी योग्य, तर कधी अयोग्य रीतीने वापरले! हे जनताही जाणून आहे. कोरोना लागण होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. लोक भीत आहेत व त्यावरच तासोन्तास गप्पा होऊन वातावरण अजूनच भीतीदायक होत आहे. डॉक्टर व शासकीय कर्मचारी प्रबोधनाचे काम करण्यासाठी घरी येत आहेत. आपण काय केल्याने कोरोनावर मात करता येते हे आता सगळेच समजून आहेत; पण यातूनही प्रबोधनाच्या नावावर लुटालूट करणारे कमी नाहीत. लोकांनी यावेळीही जागृत असणे शहाणपणाचे आहे. लोकांची मानसिकता अशी का हे समजत नाही की, कठीण परिस्थितीतही फायदा करून घ्यावा!
लोकांच्या नजरा बदलत आहेत. साधे खोकले तरी ‘याला कोरोनाची लागण झाली असावी’ या वाक्यावर इतका विश्वास बसला आहे की, लोक माणूसकी विसरत आहेत! हा विश्वास कधी भीतीने, तर कधी अफवाने तयार होतो. मानसिकता पण अशी की, खºयापेक्षा अफवांवर विश्वास जास्त. शेजारधर्म पण दूर जावा? काळजी घेतली तर काहीही होत नाही यावर विश्वास का ठेवीत नाहीत!
महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्याकडे समाज वेगळ्या नजरेने पाहत आहे. त्यांच्या कुटुंबाशी व्यवहार करणे बंद आहेत. ‘निघून जावा इथून’सारख्या भाषेत बोलले जाते. ‘वाळीत’ टाकण्याची पद्धत आठवते येथे. ज्यांना सामान्य सर्दी, खोकला, ताप आहे (पण कोरोनाची लक्षणे नाहीत), त्यांच्याकडे लोक वेगळ्या नजरेने पाहतात. परदेशातून आलेल्या लोकांना (कोरोनाच्या चाचण्या झालेल्या असूनही, तशी लक्षणे नसूनही) शेजारी त्यांच्या घरीही शांतपणे राहू देत नाहीत. शासनाचे लोक व डॉक्टर वरचेवर त्यांची विचारपूस करीत आहेत ते ठीकच आहे; पण केवळ त्रास देण्यासाठी शेजारी त्यांच्याविषयी अफवा पसरवत आहेत याला काय म्हणावे! होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेल्यांकडे बघण्याची नजरच बदलून गेली. हा भेदभाव नाही तर काय आहे! ‘रोग घेऊन आलास काय, जावा अॅडमीट व्हा, तुम्ही चांगले नाहीत’ अशा भाषेस या लोकांना सामोरे जावे लागत आहे. असे आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा ते डोकं ‘जगावे कसे’ याला लावले तर जीवन आनंदी होईल! आपण या आपत्तीची कशी लागण होते हे न समजून घेता सगळ्यांनाच एका पारड्यात मोजत आहोत.
ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत, त्यांनी जी काळजी घ्यावी ती काहीकडून घेतलीही जात नाही. आपल्यासोबत आपण दुसºयासही मारत आहोत हे लक्षात येऊ नये का! या स्थितीत काळजी घेण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही. मनावर ताबा ठेवून सगळ्यांनीच या आपत्तीला सामोरे जायला हवे. शासन सगळे प्रयत्न करीत आहे, लोकांनी त्यांना साथ देणे गरजेचे आहे. आज जग यास सामोरे जात आहे आणि आपण ‘माझे कसे होईल’ यावर ठेपले आहोत. एकीकडे मरण पावणाºयांची संख्या वाढत आहे आणि दुसरीकडे लोक बिनधास्त नियम तोडत आहेत! जग यावर उपाय शोधत आहे व दुसरीकडे फायदा कसा होईल यावर
लक्ष! एकीकडे प्रबोधन होत आहे व दुसरीकडे अफवांवर विश्वास ठेवून आपल्याच लोकांना आपलेच लोक गावाबाहेर काढत आहेत! भेदभाव होत आहेत! सध्या तर समाजात असाच दृष्टिकोन दिसत आहे. आपल्याकडे कोरोनाविषयी हवी ती जाणीव-जागृती नसल्याने हे होत आहे. या काळात ज्यांनी फायदा घेतला, त्यांना लोक ओळखून ठेवतील! जिवावर बेतून ज्यांनी कामं केली ती नेहमीच आदरणीय राहतील. आज प्रत्येकजण घरी राहून वेळ घालवित आहेत. प्रश्न समोर येतात ते म्हणजे, जे रस्त्यावरच घर करून राहिले आहेत त्यांनी करावे काय! भीक मागून पोट चालविणारे त्यांचे काय? हातावर पोट भरणारे त्यांचे काय? रोज करावे तेव्हा खावे त्यांचे काय? अगदीच सांगावे तर जे पशू-पक्षी, प्राणी लोकांमध्ये राहून जगत होती, थोड्या खाऊसाठी फिरत होती, त्यांचे काय? शुकशुकाट असणाºया रस्त्यावर तेही सगळेच शोधत असतीलच; पण ते पाहायलाही माणूस नाही!
कोरोनाने काही चांगल्या बाबीही दिल्या. आज पर्यावरण स्वच्छ व प्रदूषणविरहित झाले आहे. यामुळे जागतिक तापमानवाढ रोखण्यास थोडी तरी मदत झाली. याचा फायदा प्राण्यांनाही झाला. लोकांना आपल्या काही मर्यादित गरजा असतात, जगायला फार काही पैसा लागत नाही, पैशापेक्षा आपले कुटुंब महत्त्वाचे, आपण भौतिक व क्षणिक सुखाच्या मागे लागून काही फायदा नाही, अंतिमत: शरीर धडधाकट तर सगळं ठीक हे समजून गेले. आहे त्यावर जगायची किंमत समजली. मोबाईलवर शेवटी किती वेळ बसणार हा विचार करून घरच्या लोकांशी गप्पा सुरू झाल्या. आईचे घरचे काम काही कमी झाले नसले तरी घरच्यांना घरच्या जेवणाची किंमत समजत आहे. मुलांच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत आहे. समाजात छेडछाड, भांडणे कमी झाली. दारू नावाचा प्रकार या काळात पुरता दूर झाला. अशा घरातील चार पैसे घरी राहिले. अपघातांचे प्रमाण कमी झाले. काही मर्यादित गरजाच पूर्ण होत असल्याने लोकांच्या बचतीतही वाढ होत आहे. ‘सेवेचे व्रत’ असणारे व्यवसाय देशसेवेस कामास आले व त्याचा फायदा झाला. अशा कठीण प्रसंगी आपल्या देशास इतर देशाकडून धोकाही असू शकतो हे विसरून नाही चालणार!
(लेखिका सांगली जिल्ह्यातील काकाचीवाडी येथील आहेत.)