मागे वळून पाहताना

By admin | Published: January 21, 2017 10:45 PM2017-01-21T22:45:12+5:302017-01-21T22:45:12+5:30

काम आवडीचं असलं तरआपलं देहभान हरपतच.मोठेपणाचे सगळे गंडेदोरे मग गळून पडतात.

Looking back and forth | मागे वळून पाहताना

मागे वळून पाहताना

Next

शब्दांकन : पराग पोतदार

सामाजिक आरोग्यासाठी झटणारे डॉ. अभय बंग, मानसिक आरोग्यासाठी काम करणारे डॉ. आनंद नाडकर्णी आणि नैसर्गिक जगण्याचा आनंद घेणारे डॉ. अनिल अवचट..साधना प्रकाशनाच्या पुढाकाराने पुण्यात नुकतीच एक अनोखी मैफल रंगली.  या मैफलीतलं एक संवादसूत्र.. खास तरुणांसाठी...

'मी'चा तुरुंग

आपण सारेच ‘मी’च्या तुरुंगात बद्ध असतो. त्यातून मुक्त होणं म्हणजे समाजाशी नातं जोडणं!
 
समाजामध्ये अनेक प्रश्न असतात. मला एखादा प्रश्न दिसला की तो आणखीन दोनतीनदा दिसतो आहे का हे मी पाहतो. नंतर तो आकडेवारीने जरा पडताळून, तपासून पाहतो. समाजात एखादा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आणि तो समाजासाठी आवश्यक आहे, असं भूत एकदा डोक्याला लागलं की उत्तरापर्यंत पोहोचायला मला सहसा पाच वर्षं लागतात. परीक्षेतल्या प्रश्नांसारखे समाजातले प्रश्न काही एकदोन मिनिटांत सुटत नसतात. ते सुटायला वेळच लागतो. माझ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात मी आणि राणी मिळून असे समाजातील किती प्रश्न सोडवू शकू असा विचार मनात आल्यानंतर प्रत्येक प्रश्नाला पाच वर्षे धरली तर किमान दहा प्रश्नांना हात घालू शकू. सोडवू शकूच असंही नाही. तसा प्रयत्न मात्र सुरू आहे. 
सामाजिक कामाच्या शाखा नसतात. शाखा दुकानाच्या असतात. सामाजिक कामाची शाखा कशी असेल? दिव्याने दिवा लागतो. मग ती त्याची शाखा उरत नाही, तोदेखील संपूर्ण दिवा होऊन जातो. म्हणून स्वयंप्रेरणेने, स्वयंप्रज्ञेने प्रश्न सोडवण्यासाठी धडपड करणारी नवी माणसं, शोधक उभे करण्यासाठी म्हणून निर्माण संस्थेची स्थापना करण्यात आली. सिद्धार्थाचा बुद्ध करण्याचा प्रयत्न का? याचा विचार करताना मला पहिला प्रश्न असा पडतो की, सिद्धार्थ जर राजकुमार बनून त्या राजमहालातच राहिला असता तर काय झालं असतं? आपल्याला त्याचं नाव तरी माहिती झालं असतं? जगामध्ये हजारो, लाखो राजे होऊन गेले. त्यातलाच एक सिद्धार्थ झाला असता. सिद्धार्थ बनण्यात काही गंमत नाही. आयुष्यभर राजकुमार राहिलात तरी त्याला काही भविष्य नाही अथवा इतिहासही नाही. 
आपल्यापैकी प्रत्येकजण मी नावाच्या एका तुरुंगात बंद असतो. जसजसे आपण मोठे होतो तसतसे स्पर्धा, तुलना यातून मी नावाच्या तुरुंगात विटा रचल्या जातात. त्यात अनारकली चेंबली जाते तसे आपण मी नावाच्या तुरुंगात चेंबले जातो. 
आपण ती जाहिरात पाहिली असेल.. मूल धावत येतं आणि आईला म्हणतं, आई मला ९० टक्के गुण मिळाले. पण त्याची आई त्याला विचारते, लेकीन राजू को कितने मिले? म्हणजे याला ९० टक्के मिळाले त्याचे काही कौतुक नाही. दुसऱ्याच्या तुलनेत अधिक मिळाले तरच मी त्याचं कौतुक करणार. याचाच अर्थ मित्रदेखील शत्रू, स्पर्धक आहे. म्हणजे जगात तू एकटा आहेस असा संदेश आईच मुलाला देते. 
प्रत्येक माणसाला जी एकटं करून टाकते आणि दुसऱ्याविरुद्ध कायम दुश्मन म्हणून उभं करते अशी आजची समाजरचना आहे. युवांना या ‘मी’च्या तुरुंगातून मुक्त केलं पाहिजे. ‘मी’च्या तुरुंगातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे समाजाशी संबंध जोडणं! जेव्हा मी समाजात जाईन, समाजातील दु:ख पाहीन आणि त्या दु:खाशी जेव्हा माझं नातं जुळेल तेव्हा आपण ‘मी’च्या तुरुंगातून मुक्त होतो. 
मी जेव्हा एखादं आव्हान घेतो तेव्हा पहिल्यांदा माझा मी मला कळतो, दिसतो. आव्हानांना सामोरं गेल्यावरच तरुणांनाही त्यांचे आत्मभान येईल. स्क्रीनसमोर बसून, आरशासमोर उभं राहून नाही येणार हे आत्मभान. यूपीएससी-एमपीएससी देऊनही नाही कळणार. तरुण जेव्हा जीवनाला सामोरे जातील, चारही अंगांनी त्याला भीडतील, टकरा घेतील तेव्हा त्यांना कळेल ‘मी’ काय चीज आहे ते... महाराष्ट्रातील ‘मी’च्या तुरुंगात अडकलेल्या युवांना ‘आम्ही’च्या अवकाशात मुक्त करायचे आहे, जोडून घ्यायचे आहे आणि त्यात जीवनाची सार्थकता शोधायची आहे. असा तरुण महाराष्ट्रात निश्चितपणे आहे. ‘निर्माण’ हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 
स्वत:च्या आयुष्यातील गरजा कमी केल्या तर आयुष्याचं काय करायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आपलं राहतं. गरजा जास्त ठेवल्या तर तेच आयुष्य विक्रीला काढावं लागतं. तरुण वयातच हे भान आलं तर संपूर्ण आयुष्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो.
 
अनुभव
काम आवडीचं असलं तर आपलं देहभान हरपतच.मोठेपणाचे सगळे गंडेदोरे मग गळून पडतात.
मी कोण आहे हा माझा प्रवास सातत्याने सुरू आहे. ज्यावेळी मी बिहारच्या लोकांसाठी अन्नछत्र चालवत होतो, त्यावेळी अन्नासाठी खूप लांबून लोक यायचे. मुलं, वृद्ध, स्त्रिया.. एक दिवस मठाचं दार उघडलं तर तिथं पायरीवर एक बाई पडलेली. पांढरं मळकट लुगडं.. ती बाई तिथंच गेलेली होती... तिला एक घास जरी मिळाला असता तरी तिचा जीव वाचला असता असं वाटून गेलं. तिच्यावर काय परिस्थिती आली असेल हे सगळं माझ्या डोळ्यासमोर आलं आणि त्याक्षणी मी त्यांचा झालो. झुमरीतलय्या वगैरे भाग आहे, तिथं अभ्रकाच्या खाणी आहेत. त्याचे कण उडत असतात. ते छातीत जाऊन बसले की टीबी होतो. २५-३० वर्षांची तरुण माणसं मरतात. त्या गावात मोठी माणसंच नाहीत. कारण तरुणपणीच माणसं जातात. वयाच्या सातव्या आठव्या वर्षी काम करतात. पोटात अन्न नसेल तर औषधं तरी कुठली उपयोगी पडणार? टीबी हा दारिद्र्याचा आजार आहे हे जाणवलं. त्यातून जी उद्विग्नता आली त्यातून माझी सारी स्वप्नं विरघळली. त्या प्रसंगानंतर माझ्या आयुष्यात परिवर्तन झालं. आपण कितीही मोठे झालो आणि ही माणसं अशीच राहिली तर आपल्या नुसत्या मोठं होण्याला काय अर्थ आहे? माझ्या जीवनातला एक नवा अध्याय सुरू झाला. 
खरं सांगायचं तर मला कसलीही महत्त्वाकांक्षा नाही. पण एखादा विषय डोक्यात आला की तेच करत सुटतो. मला कोणाचाही राग येत नाही. कुणाशी स्पर्धाही करावी वाटत नाही. तरीही मी छान जगतो आहे. आपल्या आवडीचं काम आपण करत असू तर आपल्या कपड्यांकडेसुद्धा आपलं लक्ष नसतं. अनेकदा माझ्या शर्टच्या गुंड्या वरखाली झालेल्या असतात. शर्ट फाटके असतात. जंगल पाहताना देहभान हरपणं, दगडं, झाडं पाहणं.. आपण कुणीतरी मोठे आहोत ही भावनाच लोप पावते. पण त्याचवेळी आपण इतके मोठे आहोत की या निसर्गाचंच एक अंग आहोत अशी भावना निर्माण होते. देहभान हरपण्याचा हा अनुभव तुमच्या हाताशी आहे का हे महत्त्वाचं. तेच खरं. आयुष्यात बाकी काही लागतच नाही..
 
किंमत
माझ्याकडे दोन नोटा आहेत.एक खिशात आहे आणि दुसरी मनात. कुठली नोट मोठी?
चटकन नाउमेद होणारा तरुण खरंच क्रिएटिव्ह असतो का हे जरा तपासून पाहायला हवे. कारण क्रिएटिव्ह माणूस हार मानत नाही. जर मी स्वत:ला क्रिएटिव्ह समजत असेन तर टिकण्यासाठी आवश्यक धडपड करणं अटळ आहे. 
जीवन जर एक रहाटपाळणा मानलं तर त्यात येणाऱ्या प्रत्येक अनुभवाकडे मी कसं पाहतो हे महत्त्वाचं. आपल्याला आपल्या दृष्टिकोनाकडे पाहायला शिकायला हवं आणि दुसरीकडे दृष्टिकोन, विकासासाठीचे अनुभव अधिक सकस आणि छान कसे असतील याकडेही लक्ष द्यायला हवं. 
कोणत्याही प्रसंगाकडे, अनुभवाकडे आपण कसं पाहतो यावर खूप काही अवलंबून असतं. काही वर्षांपूर्वी माझ्यावर एक शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया करणारे माझे मित्रच होते. अ‍ॅनेस्थेशिया देताना माझ्या सर्व गोष्टी अत्यंत नॉर्मल होत्या. काय अनुभव येणार हे आपल्या हातात नाही, परंतु त्याकडे कसं पाहावं हे मात्र आपल्या हातात आहे. तसंच मी केलं. त्या अनुभवातून आपण आपली ‘वाट लावायची’ की दृष्टिकोन चांगला ठेवून त्यातून ‘वाट काढायची’ हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. 
ज्या काळात साधेपणा हे सूत्र आजूबाजूला दिसत असतं तेव्हा ते अंगीकारणं तुलेनेनं सोपं असतं. परंतु जेव्हा समाजात त्याचा अभाव दिसत असतो तेव्हा साधेपणाचा स्वीकार करायला जास्त धैर्य लागतं. 
समजा माझ्याकडे दोन नोटा आहेत, एक माझ्या खिशात आहे आणि दुसरी माझ्या मनात आहे. मनात जी नोट आहे तिचं मूल्य अनंत आहे. खिशातल्या नोटेवरच्या किमती बदलणाऱ्या आहेत. त्या शून्यसुद्धा होऊ शकतील. मग माझ्यापुढे चॉइस काय तर माझ्या खिशातल्या नोटेच्या मूल्यावरती किंवा अवमूल्यनावरती मी माझं मूल्य ठरवायचं, की माझ्या मनातल्या नोटेबरोबरची माझी बांधिलकी मी प्रस्थापित करायची? - ते मात्र आपलं आपल्यालाच ठरवावं लागतं.

Web Title: Looking back and forth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.