‘लुक्का’

By admin | Published: August 5, 2016 05:34 PM2016-08-05T17:34:22+5:302016-08-05T18:13:42+5:30

अमेरिकन मरीन दलात काम करून ती आता ‘निवृत्त’ झाली आहे. तब्बल ४०० पेक्षाही अधिक महत्त्वाची कामे पार पाडताना बंडखोरांना पकडून देण्यापासून अनेकांचे प्राणही तिने वाचवले आहेत. तिच्या याच बहादुरीमुळे व्हिक्टोरिया क्रॉसच्या तोलाचे पदक तिला बहाल करण्यात आले आहे.

'Lukka' | ‘लुक्का’

‘लुक्का’

Next
>कल्याणी गाडगीळ
(न्यूझीलंडस्थित लेखिका कला, संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
 
लुक्का ही १२ वर्षांची जर्मन शेफर्ड कुत्री. 
स्फोटकं हुडकून काढायची हे तिचं मुख्य काम. 
अमेरिकन मरीन दलात काम करून ती आता ‘निवृत्त’ झाली आहे. तब्बल ४०० पेक्षाही अधिक महत्त्वाची कामे पार पाडताना बंडखोरांना पकडून देण्यापासून अनेकांचे प्राणही तिने वाचवले आहेत. तिच्या याच बहादुरीमुळे व्हिक्टोरिया क्रॉसच्या तोलाचे पदक तिला बहाल करण्यात आले आहे.
 
सकाळी-सकाळी हातात गरम चहाचा कप घेऊन टीव्हीवरच्या बातम्या पाहायला बसणे ही एक सवय होऊन गेली आहे. बातम्या ऐकण्याची ही सवय चांगली की वाईट असा प्रश्न नेहमीच पडतो कारण बहुतांशी बातम्या या हिंसेसंबंधीच असतात. सिरीयामधील बॉम्बस्फोट, आयसिलचे घातपात, बलात्कार, चोऱ्या, पूर, भूकंप, सुनामी, ज्वालामुखीचे उद्रेक, रेफ्यूजींचे लोंढे... सगळ्या दु:खद बातम्याच असतात. तरीही त्या का पाहायच्या? दिवसाची सुरुवात अशी नकारात्मक गोष्टींनी का करायची? कारण कधीतरी या सर्वांना मागे लोटून एखादी बातमी अशी येते ज्यामुळे दिवसच नव्हे तर महिनासुद्धा आनंदाने, कौतुकाने ओसंडून वाहू लागतो. अशीच एक बातमी ५ एप्रिल २०१६ रोजी टीव्हीवर पाहायला मिळाली. मन भरून आले.
लुक्का या जर्मन शेफर्ड (अल्सेशियन) कुत्रीला ब्रिटनमधील व्हिक्टोरिया क्रॉसच्या तोलाचे मानले जाणारे पीडीएसए डिकिन मेडल (पदक) बहाल करण्यात आले. लुक्काचा मालक गनरी सार्जंट ख्रिस विलिंघम हे मेडल घेण्यासाठी लुक्कासह लंडनला विमानाने पोचला. लुक्काच्या गळ्यात हे पदक घालतानाचे तिच्या मालकासह घेतलेले फोटो टीव्हीवर झळकले. मालकाची कौतुकभरली नजर व अभिमान लहान लहान कृतीतूनही ओसंडत होता. ही बातमी प्रमुख बातम्यांच्या वेळात दाखविणाऱ्या चॅनेलवर दाखवली जात होती. अनेक वृत्तपत्रांतही ही बातमी त्यादिवशी मुख्य पानावर झळकली. 
लुक्का ही १२ वर्षांची जर्मन शेफर्ड कुत्री. ती अमेरिकन मरीन दलात सहा वर्षे काम करीत होती. तिचे काम काय होते? मालकाबरोबर तो नेईल तिथे जायचे व काही शस्त्रे, स्फोटके, हत्त्यारे कुठे लपविलेली आहेत का हे वासाने शोधून काढायचे व ती शोधून अमेरिकन दलातील सैनिकांचे प्राण घातपातापासून वाचवायचे. त्यासाठी तिला खास प्रशिक्षण देण्यात आले होते.
लुक्का अमेरिकन दलात काम करीत असताना, ती ज्या परिसरात काम करीत होती तेथील एकाही सैनिकाला प्राण गमवावे लागले नाहीत. परंतु मार्च २०१२ मध्ये ती जेव्हा कार्पोरल जुआन रोद्रिगेझ याच्याबरोबर अफगणिस्तानात शस्त्रे / स्फोटके शोधण्याचे काम करीत होती तेव्हा तिने ३० पौंड वजनाचे रस्त्याच्या कडेला लपवून ठेवलेले एक स्फोटक शोधून काढले. स्फोटक शोधले पण ते स्फोटक वापरण्यासाठीची योजना काय आहे हे तिथे लगेच शोधत असतानाच तिथे असलेल्या दुसऱ्या बॉम्बचा स्फोट झाला व त्या स्फोटात तिचा पुढचा डावा पाय जागच्या जागी तुटून उडाला व तिच्या छातीला खूपच भाजले. आश्चर्याची गोष्ट अशी की, या स्फोटात एकही सैनिक मात्र जखमी झाला नाही. लुक्काला ताबडतोब जर्मनीला नेऊन तिच्यावर उपचार करण्यात आले. दहा दिवसात बरी होऊन ती चालायलासुद्धा लागली.
अफगणिस्तानात ‘कामावर’ जाण्यापूर्वी तिने सार्जंट विलिंघम यांच्याबरोबर इराकमध्येही दोनवेळा जाऊन काम केलेले आहे. त्यावेळी तिने हाताने बनवलेली स्फोटके, बॉम्ब अशा अनेक गोष्टी सापडवून दिल्या होत्या. इतकेच नव्हे तर चार बंडखोरांना सापडवून देण्याचे कामही तिने केले होते. इराक व अफगणिस्तानात मिळून ४०० च्या वर महत्त्वाची कामे तिने पार पाडली आहेत. विलिंघम या तिच्या मालकाच्या मते लुक्का अत्यंत बुद्धिमान, इमानदार असून, तिला आपले शोधकाम करण्यात कमालीचे स्वारस्य आहे.
जेन मेक्लोघलिन या पी.डी.एस.ए.च्या डायरेक्टर जनरलच्या मते लुक्काचे उल्लेखनीय शौर्य व आपल्या कामाला वाहून घेण्याची वृत्ती यामुळे पी.डी.एस.ए. डिकिन मेडल मिळण्यासाठी तिच्याइतका योग्य दुसरा प्राणी मिळणार नाही. तिच्या शस्त्रे, स्फोटके सापडविण्याच्या निर्धारामुळे जगातील अत्यंत भयानक अशा लष्करी झुंजीत तिने अनेक सैनिकांचे प्राण वाचविले आहेत. आता ती तिच्या मालकाच्या घरी ‘रिटायर्ड आयुष्य’ आनंदाने घालवित आहे. विलिंघमला तिचे भरपूर लाड करायला व तिच्या मागण्या पुरवायला फार आवडते. आपल्या कामाला वाहून घेणे, शौर्य, जिवाची पर्वा न करता धाडस करणे असले गुण प्राण्यांमध्ये असतात हे माणसाला केव्हाच कळले आहे. त्याचा उपयोगही आदिकालापासून चालू आहेच. प्राण्यांना विविध गोष्टी शिकविण्याची माणसाची बुद्धी व कला यांचेही कौतुक वाटतेच; पण माणसांनाच आता प्राण्यांकडून इमानदार, कामाच्या वेळी काम करणे, तेही अळंटळं न करता चोखपणे करणे हे शिकायची गरज निर्माण झाली आहे असे वाटायची वेळ आली आहे.
म्हणून लुक्काचे उदाहरण आता शाळेतील मुलांपुढे ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोणाला दिले जाते  पदक?
पी.डी.एस.ए. डिकिन मेडल हे १९४३ साली युनायटेड किंग्डममधील मरीना डिकिन यांनी दुसऱ्या महायुद्धातील चांगले काम करणाऱ्या प्राणी व पक्षी यांसाठी स्थापन केले. पी.डी.एस.ए. म्हणजे ढीङ्मस्र’ी ऊ्र२स्रील्ल२ं१८ ाङ्म१ र्रू‘ अल्ल्रें’२. हे पदक काशाचे (ब्रान्झ) असून, आजवर ते ३१ कुत्री, ३ घोडे, १ मांजर व दुसऱ्या महायुद्धातील एअर फोर्समध्ये काम करणाऱ्या ३२ कबुतरांना दिले गेले आहे. त्यातील तीन कबुतरे रॉयल एअर फोर्समध्ये काम करणारी होती व त्यांनी एका घळीमध्ये पडलेल्या विमानांतील कर्मचाऱ्यांचे प्राण वाचविले होते. लुक्का ही हे पद मिळविणारी अमेरिकन मरीन दलातील पहिली कुत्री आहे.

Web Title: 'Lukka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.