वैैशिष्टयपूर्ण भोजनगृहे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 07:00 AM2019-09-29T07:00:00+5:302019-09-29T07:00:09+5:30

पुण्यातील अनेक भोजनगृहांना अनेक वर्षांची खास परंपरा आहे. त्यांनी आपापली वेगवेगळी वैशिष्ट्ये जपली आहेत. काही भोजनगृहे त्यांच्याकडे मिळणाऱ्या खास मेनुमुळे ओळखली जातात. त्याविषयी...

Luxurious dining halls | वैैशिष्टयपूर्ण भोजनगृहे 

वैैशिष्टयपूर्ण भोजनगृहे 

Next

- अंकुश काकडे

बादशाही बोर्डिंग हाऊस : 
टिळक रोडवरील बादशाही बोर्डिंग हाऊस १९३२ मध्ये वामनराव नागेश छत्रे यांनी सुरू केले. वामनअण्णांचे बोर्डिंग हाऊस म्हणून आजपर्यंत प्रसिद्ध आहे. सुरुवातीच्या काळात ताट-पाट असे त्याचे स्वरूप होते. जवळपास १९७७ पर्यंत ती व्यवस्था होती. या बोर्डिंगमध्ये जवळपास सर्वच कर्मचारी हे कोकणातील. त्या काळात राईस प्लेटची किंंमत होती फक्त २ रुपये, २ भाज्या, १ मूद भात, ४ चपात्या, ताक, पापड, लोणचं असं स्वरूप असे. पुढे पुढे त्यात अनेक बदल झाल्याचे आपण पाहतो. पण दर रविवारी होणारी फिस्ट आजपर्यंत तशीच आहे. मसालेभात, आळूभाजी, बटाटा हे मात्र आजपर्यंत तसेच सुरू आहे. दर रविवारी अनेक कुटुंबे डबे घेऊन जातात. या ठिकाणची आणखी वैशीष्ट्ये म्हणजे येथे फॅ मिलीसाठी वगेळी व्यवस्था केली आहे.
शांताराम सुर्वे, रघुनाथ वाघ यांनी केवळ १५ रुपये पगारावर येथे कामाला सुरुवात केल्याचे ते सांगतात. असे अनेक वर्षानुवर्षे काम करणारे कोकणी कर्मचारी तेथे आहेत. बादशाहीमध्ये भरत नाट्य मंदिर, टिळक स्मारक मंदिरमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर अनेक कलावंत तेथे जेवायला येत. पंडित भीमसेन जोशी, शरद तळवलकर, निळू फुले, राम नगरकर येथे नेहमी येत. मात्र येथे येण्यापूर्वी भाज्या जरा तिखट करा असे राम नगरकर आवर्जून सांगत अशी आठवण वामनअण्णांचे चिरंजीव सदानंद छत्रे सांगतात. या बोर्डिंगमध्ये गेल्यानंतर पुणे ज्या पाट्यांसाठी प्रसिद्ध आहे, अशा सूचना येथे आपणांस पाहावयास मिळतील... ‘आजची भाजी काय आहे ती अगोदर पाहून घ्या, मागून तक्रार चालणार नाही, हात धुण्याच्या जागेत नाक शिंंकरु नये, जेवण करताना फक्त जेवणच करा, मोबाईलवर बोलू नका. एका ताटात एकानेच जेवण करावे’ अशा अनेक पाट्या येथे पाहायला मिळतील.
आस्वाद बोर्डिंग हाऊस :
नवी पेठेत कृष्ण हरदास पथावर अगदी माझ्या घरासमोर असलेले आस्वाद बोर्डिंग हाऊस १९७५ मध्ये सुरू झाले. कै. दामोदर मानकर आणि त्यांच्या बंधूंचे विठ्ठल मंदिराजवळ किराणा मालाचे दुकान होते. शेजारीच त्यांची पिठाची गिरणीही होती. आपण किराणा माल विकतो, यातील आपल्याला चांगली माहिती आहे, तर आपण एखादी खानावळ काढू असा त्यांच्या डोक्यात विचार आला, त्यांनी तो काही लोकांकडे बोलून दाखविला, पण हा रस्ता थेट वैकुंठ स्मशानभूमीकडे जातो, तेथून अनेक प्रेतयात्रा जातात, तेव्हा येथे खानावळ कशी चालेल? अशी अनेकांनी शंका व्यक्त केली. पण दामोदरअण्णांनी मात्र ती सुरूकरण्याचा निर्णय घेतला. त्यांची स्वत:ची जागा होती तेथे. त्यांनी ३६ लोकांसाठी खाणावळ सुरूकेली.
पहिले २-३ महिने त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण तेथे रिक्षावाले मात्र दुपारी जेवायला आवर्जून येत. रिक्षाची रांग फार मोठी तेथे असे. तेव्हा कॉलेजला जाणारे बाहेरगावचे विद्यार्थी उत्सुकतेने कसे जेवण मिळते हे पाहत. आणि त्याला मात्र मोठा प्रतिसाद मिळत गेला. त्या काळात तेथे रोज जवळपास दुपार-संध्याकाळ मिळून ३०० मेंबर होते. सुरुवात अगदी १ रुपया थाळी : २ चपात्या, भात, २ भाज्या, आमटी, लोणचे, लिंंबू असे स्वरूप. पाठीमागेच भटारखाना असल्यामुळे गरम जेवण मिळत असे. मीदेखील त्याचा स्वाद अनेक वेळा घेतला. (अर्थात पैसे देऊनच). मग पुढे दरवर्षी ४ आणे त्यात वाढ होत गेली. सुरुवातीला १ रुपयास मिळणारी थाळी आता ६० रुपये झाली आहे, पण पदार्थ मात्र त्या वेळी होते, तेवढेच आहेत. दामोदरअण्णांसोबत उल्हास, शाम हे त्यांचे पुतणे देखील तेथे लक्ष देत. पुढे मानकर यांनी आपले जुने सायकल दुकान, किराणा माल दुकान, पिठाची गिरणी बंद करून नंतर १९८४ मध्ये आज जेथे दुर्वांकुर डायनिंंग हॉल आहे, तेथे त्यांनी स्वाद नावाचे हॉटेल सुरू केले. पुढे २००० मध्ये ते बंद करून दुर्वांकुर सुरू झाले. आज तेथेदेखील थाळी सिस्टिम सुरू आहे. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी येणारी ग्रामीण भागातील मंडळी आवर्जून तेथे जेवायला जातात. दहीवडा, थालीपीठ ही त्यांची खासीयत आहे. (लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

Web Title: Luxurious dining halls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.