गारूड गांधींचे, जयजयकार टिळक महाराजांचा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 07:58 AM2020-12-27T07:58:41+5:302020-12-27T08:00:12+5:30
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असलेले नागपूरचे काँग्रेस अधिवेशन १९२० साली झालेत्या अधिवेशनाच्या शताब्दीचे स्मरण
- श्रीमंत माने
शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ इतिहासकार, इतिहासाचे अभ्यासक, लेखक महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांच्यातील कथित वाद, दुरावा, मतभेद रंगवत आले. ब्रिटिश इंडियामध्ये अफगाण सीमेपासून म्यानमारपर्यंत भारतीय उपखंडावर प्रचंड प्रभाव असलेल्या या दोन नेत्यांचा स्वातंत्र्य चळवळीविषयीचा दृष्टिकोन, नेतृत्त्वगुण, संघटनकौशल्य आदींबाबत एकसारखेपणा नसेल. तसे होणेही नव्हते; पण, दोघांमध्ये राजकीय शत्रुत्व वाटावे असे टाेकाचे मतभेद होते का? भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असलेले नागपूरचे काँग्रेस अधिवेशन १९२० साली झाले. त्यातून या प्रश्नाचा काही उलगडा नक्की होतो. कारण, या अधिवेशनावर गारूड होते महात्मा गांधींचे, तर जयजयकार होता लोकमान्य टिळक महाराजांचा.
गांधी दक्षिण आफ्रिकेतून १९१५ मध्ये परत आले, तोपर्यंत देशाचे सर्वोच्च नेते होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. पण, त्यांना कधीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला नाही. सुरतेच्या फाटाफुटीनंतर १९०८चे अधिवेशन नागपुरात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. पण, टिळकांना राजद्रोहाच्या खटल्यात शिक्षा होऊन मंडाले तुरुंगात रवानगी झाली. सुटका झाल्यानंतर १९१६ च्या लखनौ कराराच्या निमित्ताने टिळकांनीच हिंदू-मुस्लीम ऐेक्याचा पाया घातला. नंतर सर व्हॅलेंटाइन चिरोल यांच्या विरोधातील खटल्यामुळे ते इंग्लंडमध्ये अडकून पडले. ते भारतात परत येताच पाठीराख्यांनी मध्य प्रांतात अधिवेशनाच्या निमित्ताने संधी साधण्याचे ठरविले. अधिवेशन नागपुरात की जबलपूरमध्ये घ्यायचे यावर मात्र मतभेद झाले. वऱ्हाडातील नेत्यांनी मध्य प्रांतातील मराठी नेत्यांच्या पारड्यात वजन टाकल्याने अखेर नागपूरचा निर्णय झाला. पण, टिळकांच्या नशिबी काँग्रेसचे अध्यक्षपद नव्हतेच. अधिवेशनाच्या आयोजकांसाठी ते 'टिळक महाराज' होते. १ ऑगस्ट १९२० ला मुंबईत टिळकांचे निधन झाले. पाठीराख्यांवर जणू वज्राघात झाला.
हतोत्साही नागपूरकरांनी पाँडेचेरीला जाऊन योगी अरविंदांना अध्यक्षपद स्वीकारण्याचे साकडे घातले. स्वागत समितीचे सरचिटणीस डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे व डॉ. केशव बळीराम हेडगेवार त्यासाठी तिकडे गेले होते. परंतु, सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेऊन ध्यानसाधनेत उर्वरित आयुष्य घालविणाऱ्या योगी अरविंदांना राजी करण्यात त्यांना यश आले नाही. मद्रास प्रांतातील चक्रवर्ती विजयराघवाचारी यांच्या अध्यक्षतेत अधिवेशन यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष सेठ जमनालाल बजाज यांच्या नेतृत्वात नागपूरकरांनी नव्याने कंबर कसली. 'नागपूर काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणीतरी अनोळखी दाक्षिणात्य नेते निवडले गेले', असे गेली शंभर वर्षे सांगितले गेले. पण, प्रत्यक्षात तसे नव्हते. १८ जून १८५२ ला मद्रास प्रांतातील चेंगलपट्टू जिल्ह्यात जन्मलेले, प्रागतिक विचारांचे, काळाच्या पुढे पाहणारे सी. विजयराघवाचारी यांची ओळख 'लॉयन ऑफ साउथ इंडिया' अशी होती.
हिंदू-मुस्लीम ऐक्याचा टिळक प्रयोग
टिळकांचा हिंदू-मुस्लीम ऐक्याचा प्रयोग असहकार आंदोलनाच्या रूपाने गांधींनी पुढे नेला. १३ एप्रिल १९१९ चा जालियनवाला बाग नरसंहार, त्यामुळे निर्माण झालेला असंतोष, तो शमविण्यासाठी आणलेल्या माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणांचा फोलपणा, सुधारणांची लालूच कामी येत नाही हे पाहून आणलेला रौलेट ॲक्ट हा जुलमी कायदा आणि खिलाफत चळवळीच्या रूपाने मुस्लिमांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोष ही असहकार आंदोलनाची पार्श्वभूमी होती. टिळकांच्या निधनादिवशीच असहकार आंदोलन सुरू झाले. त्यासाठी कोलकातात विशेष सत्र बोलावून गांधींनी आंदोलनाच्या निर्णयावर संमती मिळविली होती. नागपूर अधिवेशनात त्या संमतीवर शिक्कामोर्तब झाले.
बॅ. जिनांची हुर्यो आणि उपहासात्मक महात्मा
लोकमान्य टिळकांशी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचे संबंध चांगले असले तरी महात्मा गांधींशी मात्र ते तिरकस वागत. त्याची चुणूक नागपूर अधिवेशनातही दिसली. भाषणात वारंवार ते ''''मिस्टर गांधी'''' असा उल्लेख करत राहिले. सभामंडपातून 'महात्मा म्हणा', 'महात्मा म्हणा', असा गलका झाला की ते उपहासाने 'महात्मा'म्हणायचे. गांधींच्या स्वराज्य संकल्पनेवरही त्यांनी टीका केली. त्या ठरावातील कायदेशीर व शांतीपूर्ण शब्दांचा छल केला. 'रक्तपाताशिवाय न्याय हक्क कसे मिळू शकतील', असा प्रश्न विचारला. परिणामी, गांधींचे गारूड असलेल्या सभागृहाने जिनांची हुर्यो उडवली. भाषण थांबवण्यास भाग पाडले. महात्मा गांधींनी ध्वनिक्षेपकाचा ताबा घेऊन, 'आपल्याला महात्मा म्हणा' असा अजिबात आग्रह नसल्याचे सांगितले. त्यावरही अनुयायांनी जल्लोष केला.
मराठी गीते, टिळक महाराजांचा जयजयकार
मराठी नेते व मराठी भाषेचा प्रभाव हे नागपूर काँग्रेसचे वैशिष्ट्य. उद्घाटनावेळी पं.विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी 'वंदे मातरम्' गायिले. 'आनंदकंद ऐसा, हा हिंद देश माझा' हे प्रसिद्ध गीत लिहिणारे आनंदराव कृष्णाची टेकाडे यांची 'हे राष्ट्ररूपिणी गंगे, घेई नमस्कार माझा' आणि 'जयहिंद देवीची बोला, हर हर महादेव बोला', ही गीते अधिवेशनात राष्ट्रगीते म्हणून गायिली गेली. प्रत्येकवेळी सभामंडपात 'लोकमान्य टिळक महाराज की जय' अशा घोषणा निनादल्या.