गर्भवतींना हक्काचे ‘माहेर’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 06:03 AM2019-07-07T06:03:00+5:302019-07-07T06:05:07+5:30
जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच तालुके आदिवासीबहुल आहेत. तेथे कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अभिनव ‘माहेर’ ही योजना राबवली.
सुनील दुसाने (उपमुख्य कार्यकारी आधिकारी, एकात्मिक बालविकास योजना)
ठिकाण : नाशिक शहरी विभाग (पूर्वी जळगाव)
काय केले?
1. जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच तालुके आदिवासीबहुल आहेत. तेथे कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अभिनव ‘माहेर’ ही योजना राबवली.
2. गरोदर मातांना जर त्या गर्भवती असताना योग्य पोषण आहार मिळाला आणि गर्भातच तो बालकाला मिळाला तर जन्मणार्या बाळाचे वजन वाढू शकते, त्यामुळे त्यावर भर दिला.
3. त्यासाठी गर्भवतींना प्रशिक्षण दिले. नियमित आहार; विशेषत: दुपारच्या वेळी महिलांनी दुपारी आहार घेतल्यानंतर दोन तास डाव्या कुशीवर झोपल्यास नाळेतून गर्भातील बाळाला थेट आहार मिळतो, याबद्दल त्यांच्यात जागृती निर्माण केली.
4. योजना चांगल्या पद्धतीने राबविण्याचे ठरविल्यानंतर महिलांना घरात विर्शांती घेणे काहीसे अडचणीचे होते. त्यामुळे त्यांना अंगणवाडीतील काम संपल्यानंतर दोन तास ही वेळ निश्चित करण्यात आली.
5. गरोदर महिलांना घरी गेल्यावर आईच्या ममतेने सांभाळले जाते आणि आहार दिला जातो त्यामुळे या योजनेला ‘माहेर’ असे नाव दिले.
काय घडले?
1. या योजनेसाठी एक हजार गरोदर मातांची निवड करण्यात आली त्या त्या अंगणवाड्यांमध्ये त्यांची सोय करण्यात आली.
2. महिलांना घरून आहाराचे डबे आणण्यास सांगण्यात आले. त्यामुळे महिलांना एक अतिरिक्त आहार मिळाला.
3. ज्या महिलांची आहार आणण्याची स्थिती नव्हती त्यांना लोकवर्गणीतून आहार उपलब्ध करून देण्यात आला.
4. कुटुंबातील सासूसासरे, ज्येष्ठ सदस्यांमुळे तसेच कामामुळे महिलांना दुपारी विर्शांती मिळत नव्हती ती मिळाली.
5. या योजनेमुळे 58 टक्के मुलांचे वजन 3 किलो आणि त्यापेक्षा अधिक झाले.
6. 30 ते 35 टक्के मुले अडीच ते तीन किलो वजनाची जन्मली
7. याच योजनेच्या यशस्वीतेमुळे राज्य सरकारने योजनेला विस्तृत स्वरूप दिले आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना आणली
..तर जन्माआधीच कुपोषण आटोक्यात!
महिलांचे, विशेषत: गर्भवती महिलांचे आरोग्य चांगले असले, त्यांना वेळेवर मार्गदर्शन, पोषक आहार, विर्शांती मिळाली, तर जन्माला येणारे बालक सुदृढ असते. ग्रामीण आणि आदिवासी भागात नेमकी याच गोष्टीची कमतरता आहे. त्यामुळे अनेक बालके जन्मत:चा कुपोषित असतात. गर्भवती महिलांना हक्काचे ‘माहेर’ मिळाले आणि तिथे त्यांची घरच्यासारखी काळजी घेतली गेली तर कुपोषणाची समस्या बालकांच्या जन्माआधीच आटोक्यात येऊ शकेल.
- सुनील दुसाने
(मुलाखत आणि शब्दांकन : संजय पाठक, लोकमत, नाशिक)