वैदर्भीय महेश मानकरची चित्रकला थेट रशियात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 11:25 PM2019-10-26T23:25:30+5:302019-10-26T23:29:20+5:30
सर्जनशील कलावंताची प्रतिभा ही त्याच्या कलाकृतीतून उमटते. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीसारख्या छोट्या गावातही ती उमलते, फुलते आणि सातासमुद्रापार पोहोचते. भद्रावतीचा ध्येयवेडा चित्रकार महेश महादेव मानकर हे त्याचे नाव. महेशने जलरंगातून साकारलेल्या निसर्गचित्रांची मोहिनी ‘रशिया एटलांटिस २०१९’ या कार्यशाळेत घातली गेली. जगभरातील प्रतिभावंत चित्रकारांसाठी महिनाभर चाललेल्या कार्यशाळेत देशाचे प्रतिनिधित्व करताना त्याने आपल्या निसर्गचित्रांची अमीट छाप उमटविली.
प्रा. सदानंद चौधरी
चित्रनिर्मितीसोबतच विविध देशातून आलेल्या चित्रकार मंडळींनी आपापल्या देशातील चित्र संस्कृतीवर तेथे विचारांचे आदानप्रदान केले. विदर्भातील तरुण चित्रकारांमध्ये जलरंग माध्यमातील निसर्गचित्रकार म्हणून महेश सर्वांना परिचित आहे. आतापर्यंत त्याच्या निसर्गचित्रांची निवड, फ्रान्स, इटली, नेपाळ, बांगला देशसह विविध देशांमध्ये झाली आहे. निसर्गचित्रांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्याची निवड झाली असून, अनेक पारितोषिकेही प्राप्त केलेली आहेत.
महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन आणि अनेक निसर्गदृश्ये त्याने चित्रातून जिवंत साकारली. जलरंगातून पडकी गाडी, चहाची केटली, सायकलसारख्या वस्तूंना दिलेला आकार चित्रातून बोलका झाला. भारतात अनेक ठिकाणी त्याने जलरंगावर कार्यशाळाही घेतल्या. निसर्ग चित्रातील लाईट अॅन्ड शेड दाखविण्यावर त्याने विशेष भर दिला आहे. एका छोट्या गावातून मोठे होताना महेशने केलेला संघर्षही उमद्या, नवोदित चित्रकारांसाठी एक आदर्श ठरतो. मुळातच चित्रकला ही उपजीविकेचे साधन ठरत नाही, हे जाणूनही त्याने कलेचा ध्यास सोडला नाही. सातत्य आणि परिश्रमामुळे आज रशियासारख्या देशात त्याला आपली निसर्गचित्रे पोहोचवता आली.
कॅनव्हासवरील चित्रशैलीतून त्याच्या प्रगल्भ शैलीचे दर्शन घडते. एखाद्या तरुण चित्रकाराची चित्रखोली कशी असावी आणि त्या रंगाशी जुळलेल्या त्याच्या नात्याचे दर्शन, या निसर्गचित्रांतून नक्कीच पाहायला मिळते. त्याने या चित्रांमधून अंतर्मनातील भावना प्रगट केल्या आहेत. थोडक्यात सुरेख, बांधेसूद व प्रमाणबद्ध अशा रंगलेपणामुळे त्याच्या चित्रकृती वेधक झाल्या आहेत. आजच्या या विज्ञानयुगात जगातील प्रत्येक चित्रकार आपल्या चित्रशैलीसाठी व रंगसंगतीसाठी इतक्या सुविधा असूनही धडपडत आहे. आजच्या चित्रकाराला एका क्लिकवर कुठल्याही वस्तूचा, चित्रांचा, शिल्पांचा म्हणजेच दृश्यकलेचा सहज अनुभव घेता येतो व त्याची मदतही मिळते. मात्र स्पर्धेत चित्रकाराला जिद्द, चिकाटी असल्याशिवाय यश मिळणे शक्य नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महेशने ही मजल गाठली आहे. तरुण वयात त्याने मिळविलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. या यशाचे श्रेय तो आपले आई-वडील व परिवारासह गुरुजनांना देतो महेशला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!