मैहर
By admin | Published: February 27, 2016 02:19 PM2016-02-27T14:19:45+5:302016-02-27T14:19:45+5:30
एका कलावंत मित्रला भेटायचं म्हणून मी काही वर्षापूर्वी मैहरला गेलो होतो. मैहर मध्य प्रदेशात. नवी खूण सांगायची तर पन्ना अभयारण्याच्या अगदी जवळ. राजामहाराजांच्या काळात कलाकर्तृत्वाचं नितांत सुंदर रूप असलेल्या मैहरचा वैभवी इतिहास ऐकून होतो
Next
>- सुधारक ओलवे
एका कलावंत मित्रला भेटायचं म्हणून मी काही वर्षापूर्वी मैहरला गेलो होतो.
मैहर मध्य प्रदेशात. नवी खूण सांगायची तर पन्ना अभयारण्याच्या अगदी जवळ. राजामहाराजांच्या काळात कलाकर्तृत्वाचं नितांत सुंदर रूप असलेल्या मैहरचा वैभवी इतिहास ऐकून होतो. प्रत्यक्षात मात्र धुराचे लोट उठणा:या गल्ल्यांनी, राजवाडय़ाच्या भग्न अवशेषांनीच माझं स्वागत केलं. तो फुफाटा खाली बसला की मात्र वैभवी मैहरच्या एकेकाळच्या खुणा आपल्याला मोहात पाडू लागतात. ते भग्न अवशेष पाहूनही तेव्हाच्या राजेशाही जगण्याची कल्पना येते. मैहरच्या महाराजांच्या वंशजांनी माझं राजेशाही परंपरेनं राजमहालात स्वागत केलं. मात्र राजेशाही वारसा सांगणा:या त्या वास्तूच्या भिंतीचे पोपडे पडत होते. गालिचे आणि रजयांना धस लागलेली होती. सोफ्यांवर धुळीचे थर बसले होते आणि या सा:यात शतकभरापूर्वीच्या वैभवी खुणांचे साक्षीदार म्हणून काही फोटोफ्रेम पोपडेपडू भिंतीला लटकलेल्या होत्या.
एकेकाळी या संपन्न राजघराण्याने संगीताला राजाश्रय दिला आणि मैहर हे गायन-वादन-संगीत कलावंतांसाठी अत्यंत महत्त्वाचं केंद्र बनलं. महान भारतीय संगीतकार बाबा अलाउद्दीन खान यांचं मैहर हे गाव. मैहरच्या राजांचे ते दरबारी गायक होते. प्रसिद्ध मैहर घराणं, त्या घराण्याच्या गायकीचा अंदाज आणि त्याचा बाज बाबा अल्लाउद्दीन खान यांनी बांधला. त्यांच्या गायनातील शिस्तीच्या, कलेप्रती समर्पणाच्या अनेक सुरस कहाण्या आजही प्रसिद्ध आहेत. भारतरत्न पं. रविशंकर हे त्यांचेच शिष्य. बाबांच्या उशाशी बसून त्यांनी संगीताचा रियाज केला आहे. पं. रविशंकर हे बाबांचे पुढे जावईही झाले.
इतिहासाचं आणि लोकसाहित्याचं असं बोट धरून मी मैहरमध्ये फिरत होतो. त्रिकुट पर्वतावरचं मॉँ शारदेचं मंदिर ही मैहरची आणखी एक ओळख. एक आख्यायिका अशी की, शिवजी सतीचा गतप्राण देह घेऊन प्रवास करत असताना तिच्या गळ्यातला हार इथे पडला. सती म्हणजे मॉँ, माई, आणि तिच्या गळ्यातला हार इथं पडला म्हणून ही जागा माई-हार-मैहर! खरंतर मध्यप्रदेशच्या इतिहासातल्या हारातलंच मैहर नावाचं हे एक मौल्यवान, अनोखं रत्न आहे.
काळाच्या वेगवान रेटय़ात ते रत्न विस्मृतीत गेलं आहे, त्याच्यावर धुळीचे थर बसले आहेत.
आता फक्त मैहरच्या फुफाटय़ाच्या गल्ल्यांमधून मैहर घराण्याचं वादन ऐकू येतं, काही संगीतवेडी माणसं त्या जुन्या चिजा वाजवत राहतात.
एकेकाळी राजामहाराजांच्या श्रीमंती सान्निध्यात बहरलेलं हे घराणं, आज निव्वळ काही चिजांची याद देत मैहरमध्ये भेटतं..
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल
पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार
‘लोकमत’ समूहाचे फोटो एडिटर आहेत.)