Makar Sankranti 2022: इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे येणारा एकमेव सण; जाणून घ्या मकरसंक्रांतीचे खगोलशास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 09:34 AM2022-01-14T09:34:08+5:302022-01-14T09:34:25+5:30

Makar Sankranti 2022: सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करत वर्षभरात बारा राशीतून फिरताना दिसतो. अशा बारा संक्रांतींपैकी सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत होणारे संक्रमण आपण मकरसंक्रांत म्हणून साजरे करतो.

Makar Sankranti only festival that comes according to the English calendar; see the astronomy of Makar Sankranti | Makar Sankranti 2022: इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे येणारा एकमेव सण; जाणून घ्या मकरसंक्रांतीचे खगोलशास्त्र

Makar Sankranti 2022: इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे येणारा एकमेव सण; जाणून घ्या मकरसंक्रांतीचे खगोलशास्त्र

Next

- विनय जोशी, खगोलशास्त्र अभ्यासक (vinayjoshi23@gmail.com)

भारतीय संस्कृतीतील सगळ्या सणात इंग्रजी तारखेप्रमाणे येणारा एकमेव सण म्हणजे मकरसंक्रांत होय. सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करत वर्षभरात बारा राशीतून फिरताना दिसतो. अशा बारा संक्रांतींपैकी सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत होणारे संक्रमण आपण मकरसंक्रांत म्हणून साजरे करतो. सध्या १४-१५ जानेवारीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो म्हणून हा सण इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे आहे.

मकर संक्रमणापेक्षा उत्तरायण आरंभ ही या सणाची मुलभूत संकल्पना आहे. सूर्याचे रोज निरीक्षण केले असता सूर्य हा सहा महिने उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकताना दिसतो. २२ डिसेंबर रोजी सूर्य त्याच्या दक्षिणतम बिंदूवर असून यावेळी सगळ्यात मोठी रात्र आणि सगळ्यात लहान दिवस असतो. यानंतर हळूहळू सूर्य उत्तरेकडे सरकायला लागत उत्तरायण सुरु होते.दिनमान वाढत थंडी कमी होऊ लागते.उत्तर गोलार्धात यावेळी हिवाळा असल्याने  २२ डिसेंबर नंतर दिनमान वाढणे ,सूर्याची उष्णता वाढणे या गोष्टी शेती,पशुपालन आणि दैनंदिन जीवनात कार्यक्षमता वाढवायला अनुकूल ठरतात.म्हणून अगदी प्राचीन काळापासून उत्तर गोलार्धातील बहुतांश संस्कृतीत २२ डिसेंबर हा उत्सव म्हणून साजरा होत असे.प्राचीन रोमन संस्कृतीत सॅर्टनालीया,इराणमध्ये शब-ए - यल्दा,चीनमध्ये डॉंगझी, जपानमध्ये तोजी या नावाने उत्तरायण साजरे केले जात असत.

भारतातदेखील  वैदिक काळापासून  उत्तरायण आरंभ साजरे केले जात आहे.पहिल्या शतकाच्या आसपास २२ डिसेंबर रोजी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत असे.यामुळे हा सण मकरसंक्रमण म्हणून साजरा होऊ लागला .थंडीपासून बचाव करण्यासाठी तीळ-गुळ यांसारखे उष्ण पदार्थ खाणे ,काळे कपडे घालणे अशा प्रथा सुरु झाल्या.कृषी संस्कृतीच्या साह्चार्यातून याकाळात शेतात पिकलेले धान्य ,फळे देवाला अर्पण करून एकमेकांना वाण देणे सुरु झाले.लोहडी (पंजाब ), भोगाली बिहु(आसाम)खिचड़ी संक्रांत(बिहार).पौष संक्रान्ति(बंगाल),पोंगल(तमिळनाडू), मकर वल्लाकु(केरळ) अशा वेगवेगळ्या नावाने संपूर्ण भारतात मकरसंक्रमण साजरे केले जाते.

पण पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याचे मकर संक्रमण ४०० वर्षात सरासरी ५.५ दिवस पुढे जात सध्या १४-१५  जानेवारीला संक्रांत येते आहे.भविष्यात मकर संक्रमण अधिक पुढे जात मकरसंक्रांत उन्हाळ्यात येऊ लागेल.आणि या सणाच्या प्रथांचा ऋतूचक्राशी संबंध उरणार नाही.भारतीय सणवार हे निसर्गातील बदलांना विचारात घेऊन आखले गेले आहे.यामुळे संक्रांतीला सांगितलेल्या रूढी २२ डिसेंबर पासूनच करायला सुरवात करणे हेच भारतीय संस्कृतीचे प्रवाहीपणा जपण्याच्या दृष्टीने योग्य ठरेल!

 

Web Title: Makar Sankranti only festival that comes according to the English calendar; see the astronomy of Makar Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.