अजिंक्यवीर घडवू या

By admin | Published: November 29, 2014 02:14 PM2014-11-29T14:14:50+5:302014-11-29T14:14:50+5:30

खेळाची आवड मुलांच्या मनात खोल रुजवायची आणि त्यासाठी लागणारी मेहनत घ्यायला जी शिस्त लागते, ती त्यांच्यामध्ये निर्माण करायची, ही पालकांची मुख्य जबाबदारी आहे. ती त्यांनी जर नीट पार पाडली नाही, तर मुलगा अजिंक्यवीर बनणे अशक्यच आहे.

Make a surprise | अजिंक्यवीर घडवू या

अजिंक्यवीर घडवू या

Next

 भीष्मराज बाम

 
प्रश्न : माझा मुलगा छान टेनिस खेळतो. तो आता फक्त १0 वर्षांचा आहे; पण त्याच्यापेक्षा मोठय़ा मुलांनाही तो सहज हरवतो. त्याच्या प्रशिक्षकांचेही मत त्याच्या खेळाबद्दल फार चांगले आहे. आम्हाला त्याने सवरेत्तम खेळाडू होऊन विम्बल्डनसारख्या मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकाव्यात, असे वाटते. आमचे नातेवाईक आणि मित्रमंडळी आम्हाला वेड्यात काढतात. तो स्पर्धेमध्ये कधी-कधी ढेपाळतो तेव्हा मग आम्हाला दोघांनाही फार वाईट वाटते. तोही रडत बसतो, चिडतो आणि व्यायाम, सराव वगैरे करायचे नाकारतो. आम्ही त्याच्या स्पर्धा बघायलासुद्धा जाऊ नये, असे प्रशिक्षक म्हणतात. पण, आम्हाला ते पटत नाही. काय करणे योग्य होईल?
उत्तर :- मुलांना खेळाडू घडवावे, असे वाटणारे पालक भेटले, की खूप आनंद होतो. सगळे पालक कितीही सुस्थितीत असले, तरी ते मुलांच्या शाळा-कॉलेजच्या शिक्षणाबद्दलच काळजी करताना दिसतात. तो शिक्षणाचा सर्वांत सोपा भाग आहे. खेळ आणि कला शिकणे हे जास्त अवघड आणि मुलांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. या गोष्टी जर लहान वयात शिकल्या नाहीत, तर त्यांच्या मेंदूची वाढ नीट होत नाही आणि भय जिंकून आव्हानांना तोंड देणे त्यांना कठीण होऊन बसते. आणि जराही मनाविरुद्ध गोष्ट घडली, की निराशा कब्जा घेऊन टाकते व जीवन जगणे असह्य व्हायला लागते. घरी सर्व जण मुलांचे लाडच करीत असतात; पण बाहेरचे जग फार दुष्ट असते. ते सर्वच लोक आपल्याविरुद्ध आहेत, असा मुलांचा समज होत असतो. घरचे लोक म्हणतात तितके आपण खरोखरच चांगले आहोत की नाही, हे खेळाच्या मैदानावरच मुलांना समजते. पालकांची भूमिका ही असायला हवी, की मुलाला आपले कर्तृत्व सिद्ध करूनच बाहेर मानसन्मान मिळणार आहे. त्यासाठी त्याला स्वत:पासून तोडावेच लागते. मुलांना शाळेत घालतो तेव्हा आपण किती दिवस त्यांच्याबरोबर जाऊन बसतो? केव्हा तरी त्यांना हे कळायलाच हवे, की आपण जितके चांगले होऊ, तितकाच मान आपल्याला मिळणार आहे. जे अभ्यासातले कौशल्य मिळविण्यासाठी करायला हवे, तेच खेळाच्या मैदानावरही करायला हवे. आपल्या मुलाला तुम्ही खेळाची आवड लावली ते अतिशय उत्तम केले; पण त्याच्या स्पर्धांच्या वेळीसुद्धा मायेची पाखर घालण्याचा प्रयत्न तुम्ही करणार असाल, तर ते त्याच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरेल. शाळेत जसा शिक्षकाचा अधिकार तुम्ही मान्य करता, तसाच खेळाच्या मैदानावर क्रीडा प्रशिक्षकाचा अधिकार मान्य करायला हवा. तिथे जाऊन तुम्ही लुडबुड करणार असाल, तर तुमचा मुलगा सर्वोत्तम खेळाडू बनणे शक्य नाही.
सरावाच्या, व्यायामाच्या आणि आहाराच्या बाबतीत बहुतेक पालकांची तक्रार असते, की मुले यासंबधीची शिस्त स्वीकारायला तयार नसतात. याला मुख्य कारण असे, की स्वत: पालकच यातील शिस्त पाळत नाहीत; मग त्या शिस्ती चांगल्या आहेत, हे मुलांना पटणार कसे? मुले तोंडाने सांगून कधीच शिकत नाहीत. ती पाहूनच शिकत असतात. जर मुलांना शिस्त लावायची असेल, तर पालकांनी स्वत:ला शिस्त लावून घेतली पाहिजे. याला दुसरा पर्याय नाही आणि आपण मुलांचे किती लाड करायचे, यालाही र्मयादा असते. आपल्या आवडीनिवडींना मुरड घालून जे करायला पाहिजे ते करायलाच हवे, हे शिकणे हीच तर विकासाच्या टप्प्यांची पहिली पायरी आहे. त्याला तितिक्षा असे म्हणतात. ही साधना पालकांनी आधी केलेली नसेल, तर आता करायला हवी आणि आपण आता ही शिस्त पाळू या, असा संकल्प करायला हवा. मला माझ्या वडिलांनी सकाळी लवकर उठण्याची सवय लावली आणि मीसुद्धा ती लावून घेतली, याचे मुख्य कारण म्हणजे ते माझ्याआधी उठलेलेच असत. मग मलाही लोळत पडायची लाज वाटायला लागली आणि आता इतक्या वर्षांनंतरही एखाद्या वेळी उठायला उशीर झाला, तर मला फार मोठी चूक केल्यासारखे वाटत राहते.
बालवयातल्या खेळाडूंचे पालक त्यांनी सामने जिंकावेत, यासाठी अधीर झालेले असतात. त्याचेच दडपण या छोट्या  खेळाडूंवर जास्त येते. बालवयातले सामने हे त्यांना अनुभव मिळावा म्हणून आयोजित केलेले असतात. त्यातली सर्व बक्षिसे ही उत्तेजनासाठी असतात. आता हे जर पालकांनाच कळाले नाही, तर बालकांना कसे कळेल? आधीच हार पत्करणे लहान मुलांना मुळीच आवडत नाही आणि पालक जर जिंकण्याला इतके महत्त्व द्यायला लागले, तर ते नाराज होण्याची भीती मुलांच्या मनात घर करून बसते. खेळाची आवड मुलांच्या मनात खोल रुजवायची आणि त्यासाठी लागणारी मेहनत घ्यायला जी शिस्त लागते, ती त्यांच्यामध्ये निर्माण करायची ही पालकांची मुख्य जबाबदारी आहे. ती त्यांनी जर नीट पार पाडली नाही, तर मुलगा अजिंक्यवीर बनणे अशक्यच आहे. असंख्य श्रेष्ठ गुणवत्ता असलेली मुले पालकांच्या दडपणाला कंटाळून थोडी मोठी झाल्याबरोबर खेळच सोडून देताना दिसतात. आपला मुलगा विम्बल्डन चॅम्पियन व्हावा, असे वाटणे ही फार चांगली गोष्ट आहे. पण, आम्ही त्याला विम्बल्डन चॅम्पियन करू, असे म्हणत असाल, तर आपल्याला मुळीच न पेलणारी जबाबदारी तुम्ही घेत आहात, असे वाटते. त्याने काय बनवायचे ते तो ठरवणार आहे. अगदी ईश्‍वरसुद्धा ही जबाबदारी घेत नाही, तोही गुणवत्ता देऊन बाकीचे सारे आपल्यावर सोडत असतो. तुम्ही फक्त उत्तम पालक व्हायचे; मग उत्तम माणूस, उत्तम खेळाडू, यशस्वी कीर्तिमान व्यक्ती होणे या 
सार्‍या जबाबदार्‍या त्याच्या आहेत. त्याने त्या चांगल्या पार पाडाव्यात, यासाठी आपण सर्वांनी फक्त 
आशीर्वाद द्यायचे असतात. कारण, विम्बल्डन जिंकणारा खेळाडू निर्माण झाला, तर तो फक्त तुमचा मुलगा, अशी त्याची ओळख राहिलेलीच नसते. तो संपूर्ण भारताचा एक मानबिंदू झालेला असतो. मग 
सर्व जगाला तुमची ओळख ‘त्याचे पालक’ अशी 
होत असते. यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणती 
असू शकेल?
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व 
सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Make a surprise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.