मंडालेचा महामानव

By admin | Published: June 14, 2014 06:26 PM2014-06-14T18:26:47+5:302014-06-14T18:26:47+5:30

बंगालची फाळणी १६ ऑक्टोबर १९0५ रोजी झाली; पण त्याआधी लोकमान्य टिळकांनी ‘आणीबाणीची वेळ’ हा अग्रलेख (१५ ऑगस्ट १९0५) लिहून फाळणीच्या कुटिलतेवर घणाघात केला होता.

Mandalay's superintendent | मंडालेचा महामानव

मंडालेचा महामानव

Next

- अरविंद गोखले

 
बंगालची फाळणी १६ ऑक्टोबर १९0५ रोजी झाली; पण त्याआधी लोकमान्य टिळकांनी ‘आणीबाणीची वेळ’ हा अग्रलेख (१५ ऑगस्ट १९0५) लिहून फाळणीच्या कुटिलतेवर घणाघात केला होता. इंग्रजांच्या डोक्यात कोणते विष घोळते आहे, ते लोकमान्य टिळकांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. आज बंगाल आहे, उद्या ते याच आधारावर देशाची फाळणी तर करणार नाहीत ना, हा त्यांच्या विचारांमागला भाग होता. त्या फाळणीचा सूत्रधार लॉर्ड कर्झन होता. ‘फोडा आणि झोडा’ हे राजकारण त्याच्या मुळाशी होते. हिंदू-मुस्लिम यांच्यात आगलावेपणा करायची ती उठाठेव होती. त्यामुळे लोकमान्य टिळकांप्रमाणेच लाला लजपतराय, अरविंद घोष, बिपिनचंद्र पाल आदींनी इंग्रजांविरुद्ध उठाव करण्याची हीच वेळ आहे, हे मनाशी निश्‍चित केले होते. या सर्वांना त्या वेळी काँग्रेस पक्षाची साथ मिळाली असती, तर या देशाचे स्वातंत्र्य बर्‍याच अंशी आणखी जवळ आले असते आणि तेही अखंड स्वरूपात मिळाले असते. इंग्रजांना बंगालप्रकरणी माघार घ्यावी लागली होती; पण देशाच्या दृष्टीने मध्ये बराच मोठा काळ गेला होता.
अशावेळी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व जहालांकडे असावे म्हणजे सरकारला जेरीस आणून स्वातंत्र्याच्या दृष्टीने आक्रमक पावले टाकता येतील, हा टिळकांचा उद्देश होता; पण त्यानंतरच्या बनारस, कलकत्ता आणि सुरतेच्या काँग्रेस अधिवेशनांमध्ये नेमस्तांनीच बाजी मारली होती. काँग्रेस हे देशातल्या राजकीय पुढार्‍यांचे विचारविनिमयाचे आणि श्रद्धेचे केंद्र आहे, असे टिळकांनी स्पष्ट केले होते; पण त्यांनाच सुरतेस काँग्रेसबाहेर घालविण्यात आले. याचा त्यांना सात्विक संताप होता. सुरतेत जे घडले, ते अनाकलनीय नव्हे, तर अनावश्यकही होते. सुरतेच्या काँग्रेस अधिवेशनात २७ डिसेंबर १९0७ रोजी मांडव उधळण्यात आला. त्या व्यासपीठावर टिळक एकटेच हाताची घडी घालून उभे. खुच्र्या, छत्र्या असे बरेच काही त्यांच्या दिशेने येत होते. त्यांचा बचाव करायला नामदार गोखले धावले खरे; पण या गोंधळासाठी नेमस्तांनी केलेली तयारी लपून राहणे शक्य नव्हते. पोलिसांनी मधे पडून मंडप मोकळा केला. नेमस्त पुढार्‍यांनी एक मेळावा दुसर्‍या दिवशी बोलावला आणि एका प्रतिज्ञापत्रावर सह्या करून देणार्‍यालाच आत प्रवेश द्यायचा निर्णय त्यांनी घेतला. नेमस्तांचे नेतृत्व फिरोजशहा मेहता, रासबिहारी घोष आणि गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडे होते. अर्थातच, जहाल पंथाच्या मंडळींना आतमध्ये प्रवेश नव्हता. टिळकांनी सह्या करून आत प्रवेश घ्यावा, असे मत मांडले; पण ते अरविंद घोष यांना मान्य नव्हते. टिळकांना समेट घडावा, असे वाटत असतानाही त्यांना नेमस्त नेत्यांनी भेटायचेही टाळले. हा घाव जिव्हारी बसणारा होता. भेटी नाकारण्यात आल्या. सलग दुसर्‍या-तिसर्‍या दिवशीही त्यांचे प्रयत्न चालू होते; पण नेमस्तांच्या डोक्यात विजय शिरला होता. परिणामी बंगालच्या फाळणीविरोधात तीव्र आंदोलनाचा निर्धार क्षीण झाला.
मुझफ्फरपूर येथे ३0 एप्रिल १९0८ रोजी बाँबचा पहिला प्रयोग पार पडला. किंग्जफोर्ड या न्यायाधिशाने बंगालच्या फाळणीला विरोध करणार्‍या तरुणांना फटक्यांची शिक्षा सुनावली होती; त्यामुळे त्याला मारण्याचा विचार बंगाली तरुणांनी केला होता. पांडुरंग महादेव (पुढल्या काळात सेनापती) बापट या तरुणाने बाँबची माहिती मिळवलेली होती आणि ती बंगालपर्यंत पोहोचलेली होती. त्यातूनच प्रशिक्षित बनलेले खुदीराम बोस आणि प्रफुल्लकुमार चक्रवर्ती ऊर्फ चाकी यांनी किंग्जफोर्डला खलास करायचे ठरविले. तथापि गफलत झाली आणि प्रिंगल केनेडी या अधिकार्‍याच्या पत्नीला आणि त्यांच्या मुलीला बाँबस्फोटात उडविण्यात आले. बंगालमध्ये बाँब हे खेळणे बनले आणि त्याच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटू लागल्या. याच काळातले टिळकांचे अग्रलेख म्हणजे लेखणीतून जणू ठिणग्या उसळून बाहेर येत असल्याचे भासावे इतके जहाल होते. गायकवाड वाड्यातील झडतीमध्ये टिळकांनी स्वहस्ते लिहून ठेवलेल्या एका कार्डावर स्फोटक द्रव्याविषयीच्या दोन पुस्तकांची आणि  त्यांच्या प्रकाशकांची नावे आढळली. टिळक मुंबईत गेले होते, ते दोनच दिवसांपूर्वी राजद्रोहाच्या आरोपाखाली पकडण्यात आलेले काळकर्ते शि. म. परांजप्यांना कायदेशीर मदत करण्याच्या हेतूने; पण त्यांनाच अटकेत टाकण्यात आले. टिळकांवर भरण्यात आलेला खटला आठ दिवस चालून न्यायमूर्ती दावर यांनी २२ जुलै १९0८ रोजी टिळकांना सहा वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. १३ सप्टेंबर रोजी त्यांना मुंबईमार्गे ब्रह्मदेशात रंगूनला (आताच्या म्यानमारमध्ये यांगूनला) नेण्यात आले. मंडालेच्या तुरुंगात ते २४ सप्टेंबर रोजी पोहोचले. तेव्हाच्या मुंबई सरकारने त्यांची सक्तमजुरीची शिक्षा ९ सप्टेंबर रोजी एका ठरावाने रद्द करून ती साध्या कैदेची केली. तेवढाच काय तो त्यांना दिलासा होता. टिळक त्यामुळेच किमानपक्षी मंडाले आणि काही काळ मेकटिलाच्या तुरुंगात असताना आपला आवडता पुस्तक वाचनाचा छंद जोपासू शकले आणि तिथेच त्यांनी ‘वेदांग ज्योतिष’ आणि ‘गीतारहस्य’ या दोन ग्रंथांचे लेखन केले. टिळकांनी मंडालेला जे ग्रंथ मागवले होते, ते ठेवायला पुण्यातून सहा लाकडी कपाटे पाठविण्यात आली होती. आपले भाचे धोंडोपंत विद्वांस यांना मंडालेहून लिहिलेल्या पत्रात आपल्याला कोणकोणते ग्रंथ हवे आहेत आणि ते आपल्या कोणत्या कपाटात सापडतील किंवा कोणत्या ग्रंथातील कोणता संदर्भ आपल्याला हवा आहे आणि तो कोणत्या पानावर सापडेल इथपर्यंतचे थक्क करणारे तपशील पाहायला मिळतात. त्यांनी लिहिण्यासाठी योजलेल्या ग्रंथांमध्ये हिंदू धर्माचा इतिहास, भारतीय राष्ट्रीयत्व, भारताचा रामायणपूर्व इतिहास, शांकरदर्शन, प्रांतिक कारभार, हिंदू कायदा, इन्फिनिटेसिमल कॅल्क्युलस, भगवद्गीता रहस्य- नीतीशास्त्र, श्रीशिवाजी महाराजांचे चरित्र, खाल्डिया आणि भारत. यापैकी गीतारहस्य हा विषय त्यांनी लिहिला आणि तो फेब्रुवारी १९११ मध्ये लिहून पूर्ण केला. त्यांना प्रकृतीने साथ दिली असती, तर यापैकी श्रीशिवरायांचा इतिहास तसेच खाल्डिया आणि भारत हे ग्रंथ अतिशय वाचनीय ठरले असते. खाल्डियन आणि भारतीय वेद यांच्यातले साम्य हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. 
एकाच वेळी ते आपल्या पत्नीची, मुलांची, देशाची, रायगडावर असलेल्या श्रीशिवछत्रपतींच्या छत्रीसाठी निधी जमवायची, अशा कितीतरी गोष्टींची काळजी करत होते. त्यातच त्यांना हैड्रोसिल, डिस्पेप्शिया, त्यामुळे अतिसार, हिरड्यांचा त्रास आणि सर्वात वाईट म्हणजे मधुमेहाचा त्रास सुरू झाला. हा तुरूंग किती भयानक होता त्याचा अनुभव त्यांच्यानंतर पाच वर्षांनी त्याच कारागृहात गेलेल्या सुभाषचंद्र बोस यांना आला. मंडालेची हवा इतकी वाईट आहे, की आमच्यापैकी कुणालाही बौद्धिक श्रम करण्याची ताकद उरलेलीच नव्हती, अशा स्थितीत लोकमान्यांनी दोन ग्रंथ कसे सिद्ध केले आणि भाषांचा आणि अन्य महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास करणे, हे केवळ एखाद्या ज्ञानयोग्यालाच शक्य आहे, असे त्यांनी म्हटले होते.
सहा वर्षे त्या काळकोठडीत काढल्यानंतर एक दिवस उगवला तो सुटकेचा. ८ जून १९१४ रोजी टिळक आपल्या कोठडीत बसलेले असताना अचानक कारागृहाच्या पर्यवेक्षकाने त्यांना सामानाची आवराआवर करण्यास सांगितले.  १५ जून १९१४ रोजी रात्री ८ वाजता टिळक आणि त्यांच्याबरोबरचे शिपाई मद्रास बंदरात पोहोचले. तिथेच त्यांना मोटारीत बसवून मद्रास स्टेशनवर नेण्यात आले. १६ जूनचा दिवस प्रवासात गेला. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना हडपसर स्टेशनवर उतरवून घेण्यात आले. त्यांची मोटार जेव्हा एम्प्रेस गार्डन ओलांडून पुढे आली, तेव्हा टिळकांना वाटले आता आपली खरेच सुटका होणार. 
टिळकांची मोटार पुण्यात गायकवाड वाड्यासमोर उभी राहिली. टिळकांनी दिंडी दरवाजाची कडी हलकेच वाजवली. आतून आवाज आला ‘कौन?’ टिळकांनी आपला परिचय दिल्यावर दिंडी दरवाजा लगेच उघडला गेला नाही. ओळख पटविण्यासाठी विद्वांसांनाच पाचारण करण्यात आले. त्यांनी ओळखले, की आपल्यामागे वाड्याची देखभाल व्यवस्थित ठेवण्यात आली आहे. इंग्रजांनी मात्र त्यांच्यावर पाळत ठेवण्यास पोलिसांना बजावले होते, त्यानुसार वाड्याबाहेर चौक्या उभारल्या गेल्या. तरी टिळकांना भेटणार्‍यांच्या गर्दीच्या महापुराला ते थोपवू शकलेले नव्हते. ही गर्दी मंडालेहून परतलेल्या एका महामानवाच्या दर्शनासाठी होती. टिळक स्वदेशी परतले, हा या सर्वांच्या मनस्वी आनंदाचा भाग होता. बरोबर शंभर वर्षांनंतर त्या दिवसाचे स्मरण.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Web Title: Mandalay's superintendent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.