मांडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 08:30 AM2018-05-06T08:30:19+5:302018-05-06T08:30:19+5:30
मांडूबद्दल निर्माण झालेल्या प्रेमातून साकार झालेल्या चित्र-शिल्पांचं प्रदर्शन पुण्याच्या आर्ट टू डे गॅलरीत येत्या बुधवारपासून सुरू होतं आहे. त्यानिमित्ताने या ‘पुनर्मांडणी’चा शोध...
- चंद्रमोहन कुलकर्णी
मांडूवरच्या प्रेमाची चित्रं
मध्य प्रदेशच्या मांडवगड येथील परिसराच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तूंच्या ढासळलेल्या कमानी, तुटके घुमट, मोठमोठे महाल, पाणथळ जागा, जागोजागी विखुरलेले दगड, संगमरवराच्या फरश्या, तुटलेल्या खिडक्या, जाळीदार कमानी, लांबलचक भिंती, आकाशाकडे हात पसरून उभे ठाकलेले गोरखचिंचेचे वृक्ष, काटेरी झाडंझुडपं या सगळ्याच्या पुनर्मांडणीचा देखणा घाट ख्यातनाम चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी घातला आहे.. मांडूबद्दल निर्माण झालेल्या प्रेमातून साकार झालेल्या चित्र-शिल्पांचं प्रदर्शन पुण्याच्या आर्ट टू डे गॅलरीत येत्या बुधवारपासून सुरू होतं आहे. त्यानिमित्ताने या ‘पुनर्मांडणी’चा शोध...
दगडादगडाखाली सापडतात
इतिहासातल्या कहाण्यांच्या मजकुरामधले स्वल्पविराम
आणि ढासळलेल्या एकेका कमानींखाली
परिच्छेद सुरूहोतात पत्थरांची ड्रॉप लेटर्स घेऊन.
मांडू.
मध्य प्रदेशच्या इतिहासाचे जागोजागी विखुरलेले तुटके फुटके अंश. सत्ताधीशांच्या प्रेमकहाण्यांचे प्रतिध्वनी वाहतात इथले वारे. जीव दडपून जाईल असे जहाजाच्या आकाराचे महाल झोपाळ्यांचे खांब आणि हत्तींचे भलेमोठे पाय रोवून उभे इथे महाल.
आकाशाकडे बाहू पसरून उभे ठाकलेले गोरखचिंचेचे महावृक्ष.
वाळक्या देहाच्या काटक्याकुटक्या
आणि कबरींना सोबत करतात इथे बेवारशी भटकी कुत्री.
कोसळलेलं नक्षीकाम
फुटका उजेड उरी बाळगणारे तुटके झरोके
आणि फडफडत्या पंखांनी जुने निरोप पोहचवणारी गिर्रेदार पाखरं.
खड्ड्याखुड्ड्यांच्या वळणवाटा,
दगड दगड दगड दगड
विटा विटा विटा विटा
संगमरवराच्या भिंतीवरची,
प्रियतमेच्या कपाळावरच्या झुल्फांप्रमाणे दिसणारी
उर्दू लिपीतली अगम्य अक्षरं
**
खूप मोठ्या आकाराचं प्रचंड काहीतरी
ढासळल्याची भावना अंगभर पसरलेले आपण
हताश होऊन बसकण मारतो एका गोरखचिंचेखाली
जुन्या पाषाणाचे हुंकार ऐकू येतात आपल्याला.
आपल्या हातातल्या कागदावर उमटू लागतात रेषांची भेंडोळी
काळी पांढरी काळी पांढरी.
आपल्या काळापासून मैलोगणती दूर एकटे आपण.
आपण पुन्हा उलगडू पाहतो इतिहासातल्या कहाण्यांचे अध्याय.
इतिहासाच्या पुस्तकाची पानं उलटत उलटत
स्थापत्यशास्त्राच्या एकेक पायºया उतरत उतरत
आपण पोहोचतो महाप्रचंड विहिरीच्या तळाशी,
थंडगार.
हिरव्यागार जर्द पाण्यात विरघळून जातो तुमचा वर्तमानकाळ
लालतांबडे मासे कुरतडू लागतात तुमच्या हातापायांचे तळवे
आणि तुमची त्वचा आणि तुमचं नावगावपत्ता.
तुमचा वाहन परवाना, तुमचं क्रेडिट कार्ड, आधारकार्ड.
तुटतं तुमचं नेटवर्क, वायफाय नष्ट होतं.
ओळखं तुमची बरबाद होते, मातीत मिसळता तुम्ही.
**
तुम्ही रंगीत कागद हातात घेता,
घेता तुम्ही काळी शाई आणि घेता तुम्ही पांढरी शाई
पुनर्रचना करता स्थापत्यशास्त्राची
पुन्हा मांडणी करता
पुन्हा न्याहाळता दगड अन् दगड मांडवगडाच्या जमिनीवरचा,
ढकलत ढकलत आणता मोठमोठे आकार
तुम्ही अंगाखांद्यावरनं वाहून आणता
आणि पुन्हा ठेवता जागेवर,
तुम्हाला हव्या असलेल्या जागेवर.
भिंतीच्या भिंती उभारता तुम्ही.
भिंतीच्या भिंती पाडता परत तुम्ही.
एका नव्या, ढासळलेल्या शहराची पुनर्रचना करता तुम्ही.
पुनर्मांडणी करता तुम्ही मांडूची,
पुनर्मांडणी.
मांडूची पुनर्मांडणी.