पुणेरी कट्टा - राजकीय नेत्यांची पंचाईत होते तेव्हा.....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 06:00 AM2018-11-18T06:00:00+5:302018-11-18T06:00:06+5:30

राजकीय नेत्यांना अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भेटणे, दशक्रिया विधीसाठी जाणे क्रमप्राप्त असते. अनेक वेळा पूर्ण माहिती न घेता काही पुढारी जातात अन् त्यांची होते पंचाईत!

Manthan- When the political leaders were scared ..... | पुणेरी कट्टा - राजकीय नेत्यांची पंचाईत होते तेव्हा.....

पुणेरी कट्टा - राजकीय नेत्यांची पंचाईत होते तेव्हा.....

googlenewsNext

- अंकुश काकडे-  
राजकीय नेत्यांना अनेक वेळा आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या, प्रतिष्ठित लोकांच्या सुखदु:खात सहभागी व्हावे लागते. पण अनेकवेळा त्यांची गल्लत होते. माझी देखील एकदा पंचाईत झालेली आहे. माझ्या सासुरवाडीकडील एक नातेवाईक पूना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होते, पत्नीचा सारखा आग्रह..त्यांना भेटून या...मग एके दिवशी मी गेलो. मला भेटावयाचे होते ते पेशंट होते रूम नं. ३१४ मध्ये. पण गडबडीत मी गेलो रूम नं २१४ मध्ये. तेथील पेशंटचे नातेवाइकांनी मला पाहताच लगेच आत घेतले. मीदेखील पत्नीने दिलेली सफरचंदाची पिशवी त्यांना दिली आणि फार चौकशी न करता लगेच काढता पाय घेतला. रात्री पत्नीने विचारले, आला का भेटून. मी म्हणालो, हो... दुसºया दिवशी पत्नी त्यांना भेटायला गेली, चौकशी केली तर त्यांनी मी आलो नव्हतो असे सांगितले. झाले, पत्नी आश्चर्यचकित झाली, मला विचारले. मी सांगितले, मी खरंच गेलो होतो. तिला रूम नंबर सांगितला तेव्हा माझी चूक तिच्या लक्षात आली. रूम नंबरच्या घोटाळ्यामुळे मी भलत्याच पेशंटला भेटून आलो होतो.
सध्याचे एक आमदार एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये एका कार्यकर्त्याच्या वडिलांना भेटावयास गेले. तेथे त्यांनी चौकशी केली तर त्यांना माहिती मिळाली, की ते दोन दिवसांपूर्वीच गेले. आमदारांना फार वाईट वाटले, त्यांनीही फार चौकशीत वेळ न घालवता, त्यांच्या घरच्यांना भेटू म्हणून तडक त्यांचे घर गाठले, तर पाहतो तर काय, ज्यांना भेटावयास ते हॉस्पिटलमध्ये गेले ते एकदम ठणठणीत होते. (‘गेले’ याचा अर्थ घरी गेले असे न घेता त्यांनी कसा घेतला पाहा.)
अशीच परिस्थिती अनेक वेळा दशक्रिया विधीच्या वेळी होते. तेथील छोटी जागा, एकाच वेळी ६-७ दशक्रिया विधी, शिवाय अनेक जण कुणाचा दशक्रिया विधी आहे, त्यांचा फोटोदेखील लावत नाहीत, नावदेखील लिहित नाहीत. शिवाय सर्व मृतांचे नातेवाइकांनी केस काढलेले असतात, त्यामुळे ते बºयाच वेळा ओळखूही येत नाहीत. त्याशिवाय हल्ली दशक्रिया विधीच्या वेळीही भाषणे केली जातात. शिवाय त्या अगोदर कुणीतरी हभपचे कीर्तन! अप्पा शिंदे नावाच्या गृहस्थांचा दशक्रिया विधी होता. मी गेलो तर तेथे माझ्या ओळखीच्यांनी मला दशक्रिया विधीच्या ठिकाणी नेले. तेथे काही जणांची भाषणे सुरू होती, मलाही दोन शब्द बोला म्हणून सांगितले. नाही म्हणता येईना. मी भाषण केले. अप्पा अतिशय सभ्य गृहस्थ होते. त्यांनी समाजाची चांगली सेवा केली. ते सर्वार्थाने समाधानी होते. आणि म्हणूनच त्यांच्या पिंडाला काकस्पर्श लगेच झाला. हे ऐकताच सगळे जण आपापसात कुजबुजू लागले. मला मात्र काही कळेना (प्रत्यक्ष त्यांच्या पिंडाला जवळपास अर्धा तास कावळा शिवला नव्हता) शिरूर तालुक्यातील एका गावी दशक्रिया विधीला मी गेलो, तेथे बीडमधील एक कीर्तनकार कीर्तन करण्यासाठी आले होते. त्यांनी सुरुवातच केली, ‘मी येथे दशक्रिया विधीच्या कीर्तनासाठी आलोय, मेलेली व्यक्ती कोण होती, कशी होती, मला काही माहिती अगोदर दिली नाही. पण येथे आल्यावर मला सजमले, की ती व्यक्ती दारू प्यायची, गावात भांडणं करायची, अख्खा गाव त्याला कंटाळला होता,अशावेळी मी त्यांच्याबद्दल काय बोलणार, मी कीर्तन करणार नाही.’ झाले, मृताच्या नातेवाईकांनी तेथेच त्या कीर्तनकाराला सपाटून मार दिला. तेव्हापासून त्यांनी दशक्रिया विधीचे कीर्तन करायचे सोडून दिले. दौैंड तालुक्यातील एका गावी दशक्रिया विधी गावापासून दूर नदीकाठी होतात. तेथे जवळपास झाडे झुडपे काही नाहीत. त्यामुळे तेथे बºयाच वेळा कावळे येतच नाहीत. खूप वेळ वाट पाहावी लागते. अशाच एका दशक्रिया वेळी जवळपास पाऊण तास झाला तरी कावळा पिंडाला शिवला नाही. मृताचे नातेवाईकसारखे सारखे जाऊन पिंडाचे दर्शन घेत होते. त्यातच मृताच्या एका नातवाने केस काढले नव्हते. ते गावातील वडीलधारी मंडळींनी पाहिले आणि त्याला केस काढायला सांगितले. पण तो राहायला शहरात होता, त्यामुळे तो काही केस काढेना. शेवटी जबरदस्तीने त्याचे केस काढले आणि त्याला पिंडाचे दर्शन घ्यायला सांगितले. आणि अहो काय आश्चर्य ...पाऊण तास पिंडाला न शिवणारा कावळा लगेच पाच मिनिटांत पिंडाला शिवला. असंही घडतं काही वेळा....
पुरंदर तालुक्यात एक दशक्रिया विधी होता. मृत व्यक्ती प्रख्यात होती. त्यामुळे पंचक्रोशीतून मोठा समाज जमला होता. झाले, एका मंत्र्याचे भाषण सुरू झाले. मी तालुक्यासाठी हे केलय, ते करणार आहे, येथेसुद्धा दशक्रियासाठी चांगला घाट बांधणार आहे. वगैरे, वगैरे. त्याचे आपले चालू होते. तेवढ्यात गावातील एक वयस्कर गृहस्थ उभा राहिला आणि जोरात म्हणाला, ‘अहो, हे काही केले नाही तरी चालेल, पण दहाव्याला येताना बरोबर ४-५ कावळे घेऊन येत जा.’ हे ऐकून अशा दु:खाच्या वेळीदेखील सर्व उपस्थित समाजाने टाळ्या वाजविल्या. कारण त्या गावात दशक्रियाचे वेळी अनेक वेळा कावळा पिंडाला शिवत नाही. (अशा वेळी मग शेवटचा उपाय म्हणून कणकेची गाय पिंडाला शिवतात) 
(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
.........................
 

Web Title: Manthan- When the political leaders were scared .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.