मराठी सिनेमाचाही ‘पुष्पा’ हाेईल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 02:26 PM2022-02-13T14:26:21+5:302022-02-13T14:27:32+5:30
‘पुष्पा’ सिनेमासाठी केलेले डबिंग, टीव्ही मालिकेतील पुनरागमन व सर्वभाषक नाटकांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म यासाठी सध्या चर्चेत असलेला अभिनेता श्रेयस तळपदे याच्याशी साधलेला हा संवाद.
रवींद्र मांजरेकर -
‘पुष्पा’ सिनेमाच्या डबिंगचा अनुभव कसा होता? त्यासाठी काय वेगळा प्रयत्न केला?
‘लायन किंग’साठी मी त्याआधी आवाज दिला होता. या सिनेमासाठी मला विचारले तेव्हा फार आश्चर्य वाटले. मी आधी तो सिनेमा पाहिला. सिनेमाची एकूण ठेवण, नायकाचा स्वॅग हे सगळे मला भावले. मी त्या नायकासाठी डबिंग करायला होकार दिला, फक्त मला माझ्या पद्धतीने करू द्यावे, एवढेच सांगितले. सिनेमाचा ट्रेलर आल्यावर मलाही थोडे दडपण आले, डब करताना सिनेमाच्या भव्यतेचा अंदाज आलाच होता. डबिंग ही तुमचे पडद्यावरचे काम आणखी चांगले करण्याची संधी असते. मी त्यादृष्टीनेच पाहिले. सगळे मिळून १८-१९ तास डबिंग केले. देशभरात प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमातली गोष्ट प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचावी, असा प्रयत्न होता. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर त्याला मिळालेला प्रतिसाद थक्क करणारा होता. ओटीटीवर असूनही चित्रपटगृहात हा सिनेमा तुफान चालतो आहे. एकेक सिनेमा आपले स्वत:चे नशीब घेऊन येतो, ही इंडस्ट्रीतील भाषा अशावेळी पटते.
मराठी चित्रपटांना असे दिवस कधी येतील, परभाषेतील कलाकार त्यांच्या भाषेत मराठी सिनेमा घेऊन जाईल?
लवकरच येईल. त्याची सुरुवात झालेली आहे. त्यादृष्टीने पुष्पा हा सिनेमा सगळे नियम बदलणारा ठरतोय. दक्षिणेतील सुपरस्टारचा सिनेमा हिंदीत डब झाल्याने देशभरात पोहोचलाय. आधी काही गोष्टी खूप बंदिस्त होत्या. टीव्हीत काम केले की, सिनेमात काम मिळेल का, दक्षिणेतील स्टार हिंदीत चालतील का, असे खूप विषय असायचे; पण आता तसे काहीच नाही. आताच्या प्रेक्षकांना मनोरंजन हवे आहे. मग ते मोठा पडदा, टीव्ही, मोबाइल, ओटीटी कुठेही असो. कलाकृतीचे भाषिक स्थलांतर वेगाने होत असल्यामुळे हिंदी-मराठी, तमिळ सिनेमांचे रिमेक होत आहेत. ‘आरआरआर’ची सगळे वाट पाहत आहेत. मराठी सिनेमा एकेकाळी परदेशात प्रदर्शित होत नव्हता, आता तेही सुरू झाले आहे. ज्या झपाट्याने गोष्टी बदलत आहेत ते पाहता, मराठी चित्रपटांनाही असा देशभरातील प्रेक्षक लवकरच मिळू लागेल. मराठी चित्रपटांचेही पुष्पासारखेच भले होईल.
चित्रपट, ओटीटी, टीव्ही मालिका या सगळ्यात सातत्याने दिसणे याला यश म्हणता येईल का, ते किती काळ टिकेल?
हो. प्रत्येक अभिनेत्याच्या बाबतीत ती वेळ येतेच. तो त्या काळात सगळीकडे असतो. त्या काळात तो काय वैविध्यपूर्ण करतो त्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. अमिताभ बच्चन यांचे उदाहरण घेऊ. २०००मध्ये त्यांची दुसरी इनिंग सुरू झाली. त्यालाही आता २२ वर्षे झाली. ते सगळ्या माध्यमात आहेतच की. लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत आहेत, तोवर काहीच अडचण नाही. सलमान खान, अक्षय कुमार यांचीही नावे घेता येतील. ते खूप काम करतात. वेगवेगळ्या माध्यमांत दिसतात. प्रेक्षक कंटाळलेले नाहीत. त्यांना त्यांची आणखी कामे पाहायची आहेत. त्यामुळे सगळीकडे दिसणे हे यशाचेच एक लक्षण आहे. एकेकाळी हा मुद्दा होता... आता तसा नाहीये. तुम्ही जर प्रेक्षकांचे मनोरंजन करत असाल तर मग तुम्ही कितीही वेळा या, कुठेही दिसा. प्रेक्षकांना काही फरक पडत नाही.
कोरोनाकाळातील अनुभव कसा होता
मनोरंजन क्षेत्राचे सगळे संदर्भ कोरोनाने बदलले. टीव्ही मालिकांत येण्याचा निर्णय मी कोरोनामुळेच घेतला. ओटीटी प्लॅटफॉर्म तयार केला. कोरोनामुळे मला माझ्या सुरक्षित कोशातून बाहेर पडण्याची उर्मी मिळाली. लोकांचे नुकसान खूपच झाले हे खरेच आहे; पण तरीही त्यातून ज्यांनी सकारात्मकपणे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, त्यांना फायदाही झाला.