ये मास्क बडा है मस्त मस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 06:04 AM2020-08-09T06:04:00+5:302020-08-09T06:05:13+5:30
चित्रानं डिझायनर साड्या विकायचं सोडून मास्क बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना मांडली तेव्हा घरात जरा वादळ उठलंच. नवर्याला आणि सासूबाईंनाही ही कल्पना पटली नाही. पण एके दिवशी खुद्द सासूबाईंनीच चित्राला विचारलं, ‘अगं, आमच्या ग्रुपसाठी बारा मास्क मिळतील का दोन दिवसांत आणि त्यावर ज्येष्ठांना काही सवलत?.
- मुकेश माचकर
‘अगं काय डोकं फिरलंय की काय तुमचं? काय रे सुधीर? तू काही बोलत कसा नाहीस चित्राला? मोठय़ा माणसांचं जरा काही ऐकायचंच नाही असं ठरवलंयत का तुम्ही?’ जेवणाच्या टेबलावर आईंनी (म्हणजे सासूबाईंनी) ही प्रतिक्रिया दिली, तेव्हा चित्रा शांत होती. तिला वेगळं काही अपेक्षितही नव्हतं आणि अर्थातच तिच्या मतावर ती ठामही होती.ङ्घ
ही प्रतिक्रियाही ती पहिल्यांदा ऐकत नव्हती. बरोब्बर चार वर्षांपूर्वी त्या याच डायनिंग टेबलावर हीच वाक्यं बोलल्या होत्या. तेव्हा तिने मल्टिनॅशनल कंपनीतली वरच्या पदावरची नोकरी सोडायचं ठरवलं होतं, तेव्हा आई म्हणाल्या, ‘असं कसं गं तुम्हा मंडळींना सुखाचं आयुष्य दु:खात लोटावंसं वाटतं? आता पुढच्या वर्षी सीएफओ की काय बनणार आहेस म्हणालीस ना कंपनीची? ते सोडून हे शिंपीकाम कुठून शिरलं तुझ्या डोक्यात? म्हणजे ते काम काही हलकं असतं असं नाही मानत मी. पण, ज्याने त्याने आपली कामं करावीत ना! म्हणजे आपल्या शिक्षणाला साजेशी.’
आई मागासलेल्या विचारांच्या अजिबात नव्हत्या. लग्नानंतर चित्रा नोकरी करणार आहे, हे सुधीरने सांगितल्यावर त्या म्हणाल्या होत्या, ‘म्हणजे काय? तुझ्यावर अवलंबून राहाता कामा नये तिने. कमावत्या बाईला वेगळंच स्थान असतं कुटुंबात. मी आयुष्यभर कारकुनी केली ती का?’
वरुणच्या म्हणजे पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी सहा महिन्याच्या बाळाला सोडून ऑफिसला जाण्याची वेळ आली तेव्हाही त्याच म्हणाल्या तिला, ‘अगं कुटुंबातली, शेजार्यांची, नातेवाइकांची खूप बाळं लहानाची मोठी केली आहेत मी. माझा नातू काय जड आहे का मला? तू जा ऑफिसला. काम सगळ्यात महत्त्वाचं.’
पण, चार वर्षांपूर्वीच्या सासूबाई जरा वेगळ्या होत्या. चित्राची कल्पनाही थोडी धाडसीच होती. लहानपणापासून तिच्या हातात चित्रकला होती, ती फार छान वेगळ्या प्रकारचे कपडे निवडते म्हणून लहानपणापासून मैत्रिणी आणि मित्रही तिला सोबत घेऊन जायचे कपडेखरेदीला. सुधीरच्या तर संपूर्ण वॉर्डरोबचा ताबा तिच्याकडेच होता. आईंनाही तिने पसंत केलेल्या साड्या आवडायच्या. गेल्या काही वर्षांपासून तिने मॅचिंगचे काही वेगळे प्रय} केले होते तिच्या स्वत:च्या ड्रेसिंगमध्ये. तेही लोकांना आवडायचे. हळूहळू ती साड्यांना वेगळ्या बॉर्डर लाव, मिक्स अँण्ड मॅच कर, असं काय काय करायला लागली, मैत्रिणींना, ऑफिसातल्या सहकार्यांना, नातेवाईक बायकांना करून द्यायला लागली, तेव्हा नेहा म्हणाली, ‘अगं तू हे काय फुकटचे उद्योग करते आहेस? यू आर अ ब्रॅण्ड बाय युअरसेल्फ. उतर मैदानात. कर डिझायनर साड्यांचा उद्योग सुरू.’
तिच्यापाशी तिची पुंजी होती, आत्मविश्वास होता, सुधीर सेटल्ड होता आणि वय तिच्या बाजूला होतं. अर्थकारणात तर तिला गती होतीच. त्यामुळे तिने नीट बिझनेस प्लॅन बनवला, योग्य ती योजना शोधून लोन मिळवलं आणि ‘सुचित्रा सारीज’ची सुरुवात झाली. त्या एका चर्चेनंतर आईही नंतर तिला कधीच काही बोलल्या नाहीत. चित्राने बस्तान बसवलं, तेव्हा त्याही खूश झाल्याच होत्या; पण, कुठेतरी त्यांच्या मनात सूक्ष्म अढी राहून गेली असावी.
आजची परिस्थिती तर आणखी वेगळी होती.
चित्राने डिझायनर मास्क बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना मांडली होती.
‘तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला सर्मथ आहातच आणि तू यातही यशस्वी होशील, याची मला खात्री आहे. हा काळही वाईट आहेच; पण, जॅग्वार बनवणार्या टाटांनी चार महिने गाडी खपली नाही म्हणून लहान पोरांची सायकल बनवायला घेतल्यासारखं वाटतंय मला हे,’ आई म्हणाल्या.
त्यांना तसं वाटणं स्वाभाविकच आहे, हे चित्रालाही कळत होतं. मोठय़ा कंपनीत मोठय़ा पदावर असलेली सून डिझायनर साड्या विकते यात ‘तिने नोकरीवर लाथ मारून मोठा व्यवसाय उभा केला,’ अशी प्रतिष्ठा होती. डिझायनर साड्या बनवणारी चित्रा डिझायनर मास्क बनवते आहे, हे मात्र फारच डाउनग्रेड झाल्यासारखं होतं.
कधी नव्हे ते सुधीरनेही तिला हे बोलून दाखवलं.
चित्रा त्याला म्हणाली, ‘एकतर काम हे काम असतं, त्यात काही छोटंमोठं नसतं, असं मी मानते, मला माहिती आहे तूही तसंच मानतोस. लक्षात घे. पाच महिने माझ्या सगळ्या ताया घरांत बसून होत्या गेल्या आठवड्यापर्यंत. त्यांनाही आवडत नाहीये बसून पगार खाणं. माझ्या सगळ्या ऑर्डर पडून राहिल्या आणि आता बर्याच कॅन्सल झाल्या आहेत. लोकांच्या प्रायोरिटीज बदलणार आहेत येत्या काळात. कोरोनाने बेसिक्सवर आणलंय सगळ्यांना. आणि मी एकदम वेगळंच काहीतरी नाही करू शकत. आय हॅव टु बी इन टेक्स्टाइल्स. आता लॉकडाऊननंतर पहिल्यांदा सगळ्या कारखान्यात आल्या तेव्हा शकुंतलाला ही आयडिया सुचली. ती म्हणाली, हे मटेरिअल नुसतं पडून राहण्यापेक्षा आपण मास्क बनवू या. दीप्तीने लगेच डिझाइन्सही बनवली. अरे, क्लायंटला दहा हजाराची डिझायनर साडी घ्यायला सांगायला माझीही जीभ रेटत नाही. आता शंभर-सव्वाशे रुपयांचा मास्क घ्या,ङ्घकोरोनासाठीच्या मास्कचे सगळे निकष पूर्ण करणारा मास्क आहे, असं सांगताना काही वाटत नाही आणि त्यांनाही ऑर्डर देताना छान वाटतं,’ सुधीरला हे पटण्यासारखं होतं. ते पटलंच, पण आई? आता दुसर्यांदा आपण त्यांचं मन मोडलं, असं वाटून खंतावली ती.
त्या संध्याकाळी आईंच्या व्हॉट्सअँपवर त्यांच्या टेकडी ग्रुपमधल्या उषाताईंचा मेसेज आला मास्क चॅलेंजचा. सगळ्याच साठीपलीकडच्या, कुणाला डायबिटीस, कुणाला ब्लडप्रेशर. घरातून बाहेर पडायची सोय नव्हती. मग असा काहीतरी टाइमपास चालायचा.
पटापट फोटो काढून टाकले 15 जणींनी ग्रुपवर. एकेकीने चमत्कारिक तर्हा केली होती. कुणी पोपटासारख्या नाकाचा मास्क लावला होता, कुणी झेंड्यासारखे रंग भरले होते, अत्यंत मस्करीखोर सुधाने तर माकडटोपी घातली होती मास्क म्हणून. त्या स्पर्धेत जिंकली अनुराधा. तिचा मास्क होताच तसा ऐपतदार, खानदानी खणाचा. आईंनी अनुराधाला मेसेज टाकला. किती छान आहे गं तुझा मास्क! अनुराधाचा रिप्लाय आला, अय्या, तुझ्याच सुनेने बनवलाय की गं! आमच्या नेहानेच मागवलेत माझ्यासाठी दोन मास्क. तिच्या ऑफिसातल्या मैत्रिणींनीही मागवलेत मास्क तिच्याकडून. अग आमचा निहार तर कालच म्हणाला चित्राला, आम्ही पुरुषांनी काय घोडं मारलंय, आमच्यासाठीही बनव की डेनिमचे मास्क!.. आईंनी कपाळाला हात लावला!
दुसर्या दिवशी सकाळी चहा पिता पिता आई अगदी सहज म्हणाल्या, ‘मी काय म्हणते चित्रा, आमच्या ग्रुपसाठी 12 मास्क मिळतील का गं मला दोन दिवसांत?’ चित्रा चमकलीच. सुधीरही चक्रावला. आई कशाचीही दखल न घेता बोलत राहिल्या, ‘त्या नेहाच्या सासूला दिलेस ना, त्याच प्रकारचे. पण डिझाइन मात्र मी निवडणार. कॅटलॉग पाठवून दे माझ्या व्हॉट्सअँपवर आणि ज्येष्ठ नागरिकांना काही सवलत वगैरे देता का तुम्ही?’
खूप दिवसांनी नेहा खळखळून हसली. आईंच्या चेहर्यावरही प्रसन्न गोडवा भरून राहिला होता!
चित्र : गोपीनाथ भोसले
mamnji@gmail.com
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)