गुरुजींची प्रतिभा..

By admin | Published: June 10, 2016 05:03 PM2016-06-10T17:03:00+5:302016-06-10T17:03:00+5:30

शिकण्या-शिकवण्यात वेगळेपण आणणा-या उपक्रमशील शिक्षकांबरोबरच साहित्य, कला आणि समाजकार्यातही मुशाफिरी करणारे अनेक सर्जनशील लेखक आहेत

Master's talent .. | गुरुजींची प्रतिभा..

गुरुजींची प्रतिभा..

Next
>हेरंब कुलकर्णी
(लेखक शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आणि प्रयोगशील शिक्षक आहेत.)
 
शिकण्या-शिकवण्यात वेगळेपण आणणा-या उपक्रमशील शिक्षकांबरोबरच साहित्य, कला आणि समाजकार्यातही मुशाफिरी करणारे अनेक सर्जनशील लेखक आहेत. खेडय़ापाडय़ांतल्या केवळ
आपल्या शाळांतच नव्हे, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांची कामगिरी वाखाणली गेली आहे.
 
उपक्रमशील शिक्षकांची अनेकदा चर्चा होते, पण शाळेबाहेर साहित्य, कला, समाजकार्यात मुशाफिरी करणारे शिक्षकही आहेत. एकेकाळी महाराष्ट्रात सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचे नेतृत्वच अनेक शिक्षक करीत होते. त्यातून शिक्षक चळवळी, साहित्य आणि शिक्षक याचे एक अभिन्न नाते निर्माण झाले. आज अल्पसंख्येने असले तरीही शिक्षक या क्षेत्रत काम करताहेत. 
 
यासंदर्भात सामाजिक आंदोलनात प्रभावी नाव आहे गिरीश फोंडे. कोल्हापूर महापालिका शाळेत शिक्षक, पण वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रॅटिक युथ या जागतिक विद्यार्थी संस्थेचे ते आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. झिम्बाब्वे येथे झालेल्या 150 देशांच्या अधिवेशनात गिरीशची निवड झाली. आजपर्यंत 20 पेक्षा जास्त देशांना भेटी देऊन तेथील राष्ट्राध्यक्षांच्या भेटी त्यांनी घेतल्या आहेत.. डाव्या चळवळीतील गिरीशने कोल्हापूर परिसरात 26 गावांत दारूबंदी घडवली. 
संगमनेर येथील सुखदेव इल्ले व त्यांच्या मित्रांनी आधार फाउंडेशन सुरू केले आहे. यात ते वंचित मुलांच्या शिक्षणाचा वर्षाचा खर्च काढून अनेकांना त्याचे पालकत्व देतात. या आधार गटात सर्व शिक्षक आहेत. 
महेश निंबाळकर हे बार्शीजवळ पारधी व भटक्या विमुक्त मुलांची निवासी शाळा चालवतात. ही शाळाबाह्य मुले गोळा करून त्यांना शिकवण्याचे आव्हानात्मक काम ते करतात.
नचिकेत कोळपकर (मालेगाव) राष्ट्र सेवा दलाचा जिल्हा संघटक म्हणून अनेक उपक्रम राबवतो. अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रत विनायक सावळे हा कार्यकर्ता नंदुरबार जिल्ह्यात काम करतो. नरेंद्र दाभोलकर यांचा हा आवडता कार्यकर्ता डाकीण प्रथेविरुद्ध संघर्ष करतो. 
नरसिंग झरे अनसारवाडा (निलंगा) या वस्तीशाळा शिक्षकाने गोपाळ समाजासाठी अथक 20 वर्षे काम करून या समाजातील महिलांना स्वयंरोजगार आणि तरुणांना बॅँडपथक काढून दिले. भटके विमुक्त परिषदेचे तो राज्यस्तरावर काम करतो. किसन चव्हाण हा भटक्या विमुक्तांची लढाई लढतो. त्याचे ‘आंदकोळ’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. विजय सिद्धेवार हे चंद्रपूरला दारूबंदी घडविणा:या श्रमिक एल्गार आंदोलनाचे उपाध्यक्ष आहेत.
नागपूरचे प्रसेनजित गायकवाड हे ‘प्रगतशील लेखक संघ’ चालवितात व विद्रोही चळवळीचे काम करतात. असे अनेक शिक्षक आहेत, ज्यांनी शिक्षणाचे आपले नियमित काम सुरू ठेवून विविध आघाडय़ांवर उल्लेखनीय काम केले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या अहमदनगर शाखेने संजय कळमकरांच्या नेतृत्वाखाली 18 लाख रुपये जमा केले. आत्महत्त्या केलेल्या जिल्ह्यातील शेतक:यांच्या कुटुंबीयांना ही मदत देऊन त्यांनी मोठे सामाजिक भान व्यक्त केले. अमरावतीच्या सुनील यावलीकर यांची ‘अस्वस्थ वर्तमान’ ही प्रयोगशील कादंबरी व ‘संतांचे सामाजिक प्रबोधन’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. अशोक कौतुक कोळी चांगली कथा व कविता लिहितात. कुंधा या कथासंग्रहाला राज्य पुरस्कार मिळालाय. पाथर्डीच्या कैलास दौंड या शिक्षकाचे पानधुई व कापूसकाळ या कादंब-या, एका सुगीची अखेर हा कथासंग्रह, त-होळीचे पाणी हा ललितसंग्रह व चार कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
पेंग्विन या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने संजय बोरुडे यांच्या इंग्रजी कवितेचे पुस्तक प्रसिद्ध केले, तर नोबेल पुरस्कारप्राप्त जर्मन लेखक हर्मन हेस्से याच्या सिद्धार्थ कादंबरीचा व मीनाकुमारीच्या कवितांचा अनुवाद असे दर्जेदार लेखन आहे. संदीप वाकचौरे व संतोष मुसळे वृत्तपत्रत सातत्याने स्तंभलेखन करतात. 
कलाक्षेत्रत काही शिक्षक आहेत. शाहीर संभाजी भगत हे शिक्षक आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळ, रंगभूमी, शाहिरी यात त्यांचे योगदान महाराष्ट्र जाणतो. 
अमरावतीचे संजय गणोरकर हे प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार आहेत. 
उमेश घेवरीकर (शेवगाव, नगर) यांनी 25 बालनाटय़ांचे दिग्दर्शन व 10 वर्षे सतत नाटय़ अभिनय प्रशिक्षण आयोजित केले आहे. चित्रपटात भूमिकाही केली आहे. 
वसंत अहेर (नगर) हे प्रसिद्ध जादूगार आहेत. त्यांनी लहान मुलांसाठी खास जादूचे प्रयोग विकसित केले आहेत. सुनील यावलीकर कोलाज या कलाप्रकारात काम करतात. अनेक शहरांत त्यांची प्रदर्शने लागलीत. 
अशोक डोळसे खडूवर शिल्प कोरतात, तर शेष देऊरमल्ले (चंद्रपूर) काष्ठशिल्प करतात. सुभाष विभुते हे मुलांसाठी ऋग्वेद नियतकालिक चालवितात. ही सारी यादी परिपूर्ण नाही. पण हे शिक्षक इतके प्रतिभावंत असूनही शिक्षण विभाग शासन म्हणून त्यांची दखल घेत नाही. यांच्या क्षमतांचा शिक्षण विभागाच्या विकासासाठी उपयोग करीत नाहीत. उलट अनेक अधिका:यांना हे वेगळे शिक्षक शालेय कामाकडे दुर्लक्ष करतात अशीच भावना असते. या शिक्षकांनीही आपल्या क्षमता विद्याथ्र्यात संक्रमित करून कार्यशाळा घ्यायला हव्यात. यातून ही कोंडी फुटू शकेल. शासनाने शिक्षकांचे साहित्य संमेलन विभागनिहाय आयोजित करून लेखक कलावंत शिक्षकांना प्रोत्साहन द्यायला हवे.
 
प्राथमिक शिक्षक विद्यापीठ स्तरावर!
 
प्राथमिक शिक्षकांची पुस्तके प्राध्यापक शिकवितात. रमेश इंगळे (एकूण पाच विद्यापीठात), कैलास दौंड, संजय बोरुडे, बालाजी इंगळे, संदीप वाकचौरे यांची पुस्तके विविध विद्यापीठांत अभ्यासक्र मात आहेत. श्रीकांत काळोखे (पाथर्डी) हे सहा महिने अमेरिकेतील महाविद्यालयात निमंत्रित शिक्षक म्हणून गेले होते.
 
शिक्षक कवी.
 
महाराष्ट्रातील एकूण कवींत शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. वेंगुल्र्याचे प्रयोगशील कवी वीरधवल परब यांच्या ‘दर साल दर शेकडा’ या कवितासंग्रहाला राज्य पुरस्कार मिळाला आहे. ‘ममा म्हणो फक्त’ हा त्यांचा नवा संग्रह आहे. नितीन देशमुख (चांदुरबाजार, अमरावती) यांची गझल भीमराव पांचाळेंनी गायली आहे. गोविंद पाटील (भुदरगड, कोल्हापूर), प्रेमनाथ रामदासी (सोलापूर), विठ्ठल जाधव व बाळासाहेब गर्कळ (शिरूर, बीड), श्रीराम गिरी व सतीश साळुंखे (बीड), संदीप काळे असे अनेक लक्षणीय कवी आहेत. सूर्यकांत डोळसे यांनी 17 हजार वात्रटिका लिहिल्या असून, गेली 13 वर्षे ते वात्रटिकांचे स्तंभलेखन करीत आहेत. या कवितांचे 30 संग्रह प्रसिद्ध असून, हे सारे विक्रम ठरावेत. भरत दौंडकर (शिरूर, पुणो) यांच्या कविता अनेक वृत्तवाहिन्यांवर दिसतात. रामदास फुटाणोंच्या काव्य सादरीकरणात महाराष्ट्रात शेकडो कार्यक्रमात भरतने ग्रामीण भागातील वेदना आणि बदलत्या संस्कृतीवर कविता सादर केल्या आहेत. त्याच्या ‘गोफणीतून निसटलेला दगड’ या संग्रहालाही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Web Title: Master's talent ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.