'त्या' १६३ जणी... त्यांचा 'मायबोली कट्टा' अन् 'पावनखिंड'द्वारे वॉशिंग्टनमध्ये फडकलेली मराठी पताका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2022 06:01 PM2022-03-20T18:01:36+5:302022-03-20T18:03:07+5:30

रविवार, १३ मार्च २०२२ ला warehouse cinemas फ्रेडरिक या ठिकाणी मायबोली कट्ट्याचा पहिलावहिला प्रयोग, "पावनखिंड" चित्रपटाचे प्रसारण करायचे ठरले. हा हा म्हणता म्हणता केवळ २ दिवसांत चित्रपटाची सगळी तिकिटं विकली गेली!

mayboli katta organized Pawankhind movie show in Washington DC | 'त्या' १६३ जणी... त्यांचा 'मायबोली कट्टा' अन् 'पावनखिंड'द्वारे वॉशिंग्टनमध्ये फडकलेली मराठी पताका!

'त्या' १६३ जणी... त्यांचा 'मायबोली कट्टा' अन् 'पावनखिंड'द्वारे वॉशिंग्टनमध्ये फडकलेली मराठी पताका!

Next

या लेखाची सुरुवात होते आमच्या 'मायबोली कट्ट्याने' किंवा असं म्हणूया ना 'साता समुद्रापार वसलेल्या मराठी भाषिक महिलांचा आपल्या हक्काचा,आपुलकीचा, प्रेमाचा कट्टा - 'मायबोली कट्ट्याने'. तर, अमेरिकेत वॉशिंग्टन डी.सी भागात (म्हणजे मेरीलँड, डी.सी. आणि व्हर्जिनिया या राज्यांमध्ये) ६ वर्षांपूर्वी आमच्या मायबोली कट्ट्याची सुरुवात एक छोटा व्हाट्सअँप ग्रुप म्हणून झाली आणि बघता बघता वरील तिन्ही राज्यांमधल्या जवळ जवळ १६३ जणी या ग्रुपमध्ये समाविष्ट झाल्या. सगळ्यांना एकत्र जोडायचा उद्देश एकच "स्त्री शक्तीला नमन करून आणि तिचे सामर्थ्य जाणून एक 'स्वयंपूर्ण' असा ग्रुप तयार करायचा जिथे स्त्री असणे हीच एक केवळ प्रवेशाची अट. सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर या ग्रुपचा उद्देश आपल्या देशापासून दूर, आपल्या लोकांपासून दूर असलेल्या आपण "आपल्या" मराठी लोकांना, खास करून मराठी मैत्रिणींना एकत्र जोडायचे. कारण स्त्री हा कुटुंबाचा केंद्रबिंदू असते. तिच्यामुळेच संपूर्ण कुटुंब अंतर्गतरित्या आणि सामाजिकरित्या सुद्धा जोडलं जातं. 

आमच्या "मायबोली कट्टा" ग्रुपमध्ये विविध क्षेत्रात अग्रणी असलेल्या मैत्रिणी आहेत, विविध कलांमध्ये पारंगत असलेल्या, घर, नोकरी सांभाळून सामाजिक आणि कौटुंबिक जवाबदारी पार पडणाऱ्या हिरकणी आहेत. अतिशय उत्कृष्टपणे गृहिणीची भूमिका पार पडणाऱ्या गृहलक्ष्मी देखील आहेत. आमची ऍडमिन टीम "संसाधन व्यवस्थापन" अर्थात "Resource management" वर सुद्धा काम करतेय. जेणेकरून कुठल्याही मैत्रिणीला तिच्या वैयक्तिक बाबतीत किंवा कोणत्या सामाजिक /सामूहिक कार्यक्रमासाठी काहीही मदत लागली तर बाहेर धाव घेण्याआधी तिला अंतर्गत आपल्या या ग्रुपमधून सहकार्य होऊ शकेल. विशेष म्हणजे तसं प्रत्यक्ष रित्या घडतंय. नारी शक्तीचा प्रत्यय सगळ्यांना यायला लागलाय. एकजुटीने राहून, एकमेकींना धरून इथे अमेरिकेत आपण भारतात असतो तर आपली मराठी अस्मिता जपण्यासाठी जे काही करू शकलो असतो ते सगळं अगदी व्यवस्थित पद्धतीने करण्याचा आत्मविश्वास आमच्यात जागा व्हायला लागला आहे. याचे अगदीच ताजे उदाहरण म्हणजे नुकताच मेरीलँडमध्ये यशस्वीरित्या पार पडलेला "पावनखिंड" या सुप्रसिद्ध चित्रपटाचा प्रयोग!! हा प्रयोग म्हणजे "मायबोली काट्याने" इथल्या भूमीवर रोवलेलं यशाचं  प्रतीक असलेलं ध्वज चिन्ह आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात घरातूनच होते म्हणतात ना, तसंच या प्रयोगाच्या चर्चेला सुद्धा सुरुवात घरातूनच म्हणजे आमच्या या ग्रुपमधूनच झाली.

आपण सगळे लहानपणापासूनच छत्रपती शिवरायांच्या आणि त्यांच्या शूर मराठी मावळ्यांच्या शौर्यगाथा ऐकत आलो  आहोत. पावनखिंडीतील लढाई त्यात अग्रणी आहे. महाराजांचे शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे मावळे यांच्या पावनखिंडीतील बलिदानाची गाथा सांगणारा मराठी चित्रपट "पावनखिंड" सध्या भारतातच नाही तर सर्वत्र जगभरात गाजतोय. त्यावेळीची परिस्थिती आणि मराठी सैनिकांचे रोमांचकारी शौर्य मोठ्या पडद्यावर हुबेहूब दाखवण्याचे कार्य चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी आणि कलाकारांनी अतिशय चोख पार पाडलंय. आजच्या युवा पिढीला शिवरायांचा थोर मराठी इतिहास कळावा आणि प्रत्येक मराठी माणसाला मराठी असण्याचा अभिमान वाटावा, हे हा चित्रपट पाहिल्यावर घडण्यावाचून राहत नाही. अशावेळी साहजिकच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्याची उत्सुकता प्रत्येक मराठी मनाला असणार यात काहीच नवल नाही. हीच चर्चा आमच्या ग्रुपमध्येही सुरू झाली आणि हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात बघायला मिळाला तर किती चांगलं होईल, याचा प्रस्ताव मांडण्यात आला. 

बघता बघता किती तरी सदस्यांचा या प्रस्तावाला पाठिंबा सुद्धा मिळाला. मग काय! शिवरायांचे नाव घेऊन काम सुरू देखील झाले! आमची मैत्रीण प्रिया जोशी, जी ग्रुपमधील सगळ्यात सक्रिय सदस्यांपैकी एक आहे, तिचा या प्रस्तावाला वास्तविक स्वरूप देण्यात वाघिणीचा वाटा आहे. पटापट कार्यक्रमाची आखणी मांडण्यात आली. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता जवळचे चित्रपटगृह शोधून तिथे संपर्क करण्याचा आणि नंतर प्रयोगासाठी प्रायोजक शोधण्याचा. मेरीलँडमधील आमच्या आपल्या या 'मायबोली कट्टा'मधीलच एका मैत्रिणीच्या "ड्रीम ऍक्ट एंटरटेनमेंट" या संस्थेने प्रायोजक होण्याची स्वतःहून तयारी दाखवली. चित्रपटाचे वितरण करण्यासाठी श्री. प्रमोद पाटील यांच्या "सावली एंटरटेनमेंट" या संस्थेकडे प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यांनी सर्व दृष्टीने मदत करण्याची तयारी दर्शवली. 

रविवार, १३ मार्च २०२२ ला warehouse cinemas फ्रेडरिक या ठिकाणी मायबोली कट्ट्याचा पहिलावहिला प्रयोग, "पावनखिंड" चित्रपटाचे प्रसारण करायचे ठरले! चित्रपट बघायला येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सगळ्यांचा आवडता पदार्थ "वडा पाव" उपलब्ध करून देण्याचे मायबोली कट्ट्यातील एका मैत्रिणीने आवडीने कबूल  केले.  या प्रयोगासाठी येथील मराठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगायचा झाला तर, हा हा म्हणता म्हणता केवळ २ दिवसांत चित्रपटाची सगळी तिकिटं विकली गेली!  हे सर्व अर्थातच सगळ्यांच्या शुभेच्छा आणि मोठ्यांच्या आशीर्वादाने पार पडले. अमेरिकेत बऱ्याच वर्षांपासून सक्रियपणे मराठी लोकांना एकत्र आणण्याचे कार्य करणाऱ्या बृहन् मराठी मंडळाच्या अध्यक्षा विद्या जोशी यांनी चित्रफितीद्वारे त्यांच्या शुभेच्छा मायबोली कट्ट्यासाठी पाठवल्या आणि या उपक्रमाचे कौतुक देखील केले. डी.सी. मेट्रो एरियामधील इतर मराठी मंडळांनी दिलेला पाठिंबा खरोखरच उल्लेखनीय आहे. "एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ" या ओळींचा खऱ्या अर्थाने इथे अनुभव आला.

अशा प्रकारे प्रयोगाचा दिवस उजाडला! आदल्याच दिवशी आलेल्या हिमवादळामुळे रस्त्यावर साठलेल्या बर्फाची, थंडीची पर्वा ना करता प्रेक्षक मंडळी वेळेवर चित्रपटगृहात हजर होती. मराठी मैत्रिणी मराठमोळ्या साड्या नेसून, नथी घालून अगदी हौशेने तयार होऊन आल्या होत्या. बरीच पुरुष मंडळीसुद्धा मराठी वेशात होती. नुकत्याच शिथील झालेल्या covid नियंत्रणामुळे सगळे एकमेकांना बघून भेटून आनंदात दिसत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चित्रपट बघण्याची उत्सुकता दिसत होती.  प्रवेशद्वारावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सुंदर हार घालून सजवली होती. चित्रपटगृहात पावनखिंड चित्रपटाचे मोठे बँनर लावण्यात आले होते. पाठीमागे लावलेल्या सुगम संगीताने वेगळंच वातावरण तयार झाल होतं. प्रिया जोशीच्या निवेदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रायोजक, आयोजक, वितरक आणि समस्त प्रेक्षकांचे आभार मानून शिवगर्जनेसोबत चित्रपटाला सुरुवात झाली. पावनखिंड या अप्रतिमरित्या सादर केलेल्या चित्रपटाने प्रेक्षकांना २ तास ३३ मिनीटं अक्षरशः खिळवून ठेवले होते. चित्रपट संपताच सगळ्यांच्या चेहेऱ्यावरचे भाव टिपून घेण्यासारखे होते. छत्रपती शिवरायांचा लाभलेला वारसा आणि मराठी असण्याचा अभिमान याने अमेरिकेतील मराठी मन ओतप्रोत झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज कि जय!! हर हर महादेव !! या गर्जनांनी सातासमुद्रापलीकडे असलेलं अमेरिकेतील चित्रपटगृह खरोखर "पावन" झालं !!

लेखिका: सौ. अश्विनी तातेकर देशपांडे
संपादिका: सौ. प्रिया जोशी

Web Title: mayboli katta organized Pawankhind movie show in Washington DC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.