अर्थ

By admin | Published: March 25, 2017 03:04 PM2017-03-25T15:04:06+5:302017-03-25T15:04:06+5:30

‘अर्थ’मधली पूजा ही ‘त्या’ काळातल्या अनेकींचं ‘स्वप्न’ होतं, जे सिनेमातून पडद्यावर आलं.. आणि आता बेगमजान! या दोघीही त्यांच्या काळाच्या नायिका आणि समकालीन स्वातंत्र्याची ‘व्यक्तिरुपं’ आहेत!

Meaning | अर्थ

अर्थ

Next

 - महेश भट

लोग आसमा में लकीर खिंच देते है और कहते है की आप उड सकते हो, लेकीन आपका आसमा यहांतक ही है..!- असं कसं चालेल? नाही चालणार! ज्याचं त्याचं आकाश  ज्याला त्याला खुलं हवं!!

‘अर्थ’मधली पूजा ही ‘त्या’ काळातल्या अनेकींचं ‘स्वप्न’ होतं, जे सिनेमातून पडद्यावर आलं.. आणि आता बेगमजान! या दोघीही त्यांच्या काळाच्या नायिका आणि समकालीन स्वातंत्र्याची ‘व्यक्तिरुपं’ आहेत!



शबाना आझमीची प्रमूख भूमिका असलेला अर्थ हा सिनेमा मी  १९८४ साली केला. आणि आता येवू घातलेला बेगम जान. साल २०१७- हा फार मोठा प्रवास आहे. अर्थमधली पूजा, ती हादरलेली, एका क्षणी असहाय झालेली बाई होती. पण तिनं एक स्वप्न पाहिलं, स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं. मी जगू शकते, माझ्या जगण्याला ‘अर्थ’ असू शकतो आणि त्यासाठी मी कुठल्याही पुरुषावर अवलंबून नाही हे तिनं त्या गोष्टीत सांगितलं. ही गोष्ट हे काही त्या काळाचं वास्तव नव्हतं, अनेकींचं ‘स्वप्न’ होतं, जे सिनेमातून पडद्यावर आलं.
- आणि आता बेगमजान. ती त्या कहाणीची नायिका आहे. ती पिडीत-शोषित बाई म्हणून समोर येत नाही. तीच काय कुठलीही धाडसी बाई, स्वत:च्या इच्छेनं जगू पाहणारी बाई ही काही ‘पिडीत’ रडूबाई नसते, ती हिरॉईनच असते तिच्या गोष्टीची.
अर्थ ते बेगमजान या प्रवासात काय बदललं असं मला विचाराल तर मला वाटतं माझ्या एक लक्षात आलं की, स्त्रीवाद या गोष्टीला कुठलाही लिंगवाद नाही. स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती हे काही फक्त बायकांपुरते विषय नाहीत. बायकाच बायकांना छळतात हे आपण अवतीभोवती अनेकदा बघतो आणि काही पुरुष बायकांसाठी, त्यांच्या हितासाठी आयुष्यभराच्या लढाया लढतात हेही या समाजाचं वास्तव आहे. म्हणून मी म्हणतो की स्त्रीवाद या गोष्टीला लिंगभाव चिकटवू नये. समाजातली ५०% लोकसंख्या जर महिलांची आहे तर त्यांचं जगणं हे कुठल्याही लिंगसापेक्ष चौकटीत कसं कोंबता येईल?
माझंच उदाहरण सांगतो, मी जो काही आहे त्याचं मोठं श्रेय माझ्या आईचं आहे. आणि आता माझ्या मुलीनं मला नवीन ओळख दिली आहे. 
आजचं वास्तव आहे बायकांच्या हाती असलेली सत्ता. अलिबाबाचा जादुई चिराग होता, त्याच्यात एक जीन होता. तशाच पुरुषी चिरागाच्या आत कोंडून घातलेली ‘जीनी’ आता तो चिराग फोडून बाहेर आली आहे. त्या जिनीला पुन्हा त्या अंधाऱ्या दिव्यात कोंडता नाहीच येणार!- पण म्हणून सारंच बदललं का? 
‘अर्थ’मधली पूजा अनेकांना हवीशी वाटली, जवळची वाटली पण ते आजही आपल्या समाजाचं वास्तव आहे का?- तसं कसं असेल? लोक सिनेमे पाहतात. ते एकप्रकारचं विंडो शॅपिंग असतं. त्यांना सिनेमाच्या गोष्टीतली काही पात्र आवडतात, त्यांचा प्रवास आवडतो, जे आपण नाही ते ती पात्र करतात ते पाहून समाधान वाटतं. पण म्हणून त्या पात्रांसारखंच काही कुणी लगेच वागत नाही, वागू शकतही नाही... कारण, ते शक्य नसतं.
अर्थमधल्या पूजाचा नवरा शेवटी तिच्याकडे येतो, पण ती नकार देते त्यालाही, आणि प्रियकरालाही. दोघांना नाकारुन ती तिसरा पर्याय जगणं म्हणून स्वीकारते. हे सिनेमात घडतं, वास्तवात घडतं का?
पूजासारखं जगणं ही त्याही काळी अनेकींची अ‍ॅस्पिरेशन, मनोमन दडलेली इच्छा होती. ते जगणं प्रत्येकीच्या वाट्याला येत नाही. आजही नाही. सिनेमाच्या कथेत अशी स्वप्नं असतात, अनेकांची ही अशी स्वपं्न समाजाच्या चौकटींना भयंकर छेद देणारी असतात. जी वास्तवातल्या माणसांचीच असतात, पण त्या स्वप्नांचं प्रकटीकरण म्हणून सिनेमा समोर येतो. माणसांच्या अनेक स्वप्नांचं माध्यम सिनेमा बनतो. सिनेमा इज अ एक्सप्रेशन आॅफ दॅट ड्रीम. ती स्वप्नच मग समाजातल्या अनेकांच्या जाणिवांना आकार देतात.
२० वर्षाचा होतो मी तेव्हापासून सिनेव्यवसायात काम करतो आहे, गेल्या ४७ वर्षात खूप गोष्टी बदलल्या, पण खूप गोष्टी तशाच राहिल्या..त्यातलई क म्हणजे सेन्सॉर बोर्ड! सेन्सॉरच्या लढाया आजही लढाव्याच लागतात. खरंतर आजच्या डिजिटल काळात आशयावर काही बंधनं उरली नाहीत, तो सर्रास सर्वत्र सर्व माध्यमांतून फिरतोच. पण म्हणून सगळ्याच माध्यमांत सगळाच आशय चांगला वाटतो, रुचतो, पचतो असं नाही. काय स्वीकारायचं, काय दाखवायचं, काय मांडायचं यासाठी सेन्सॉरच्या पलिकडे आपल्या स्वत:तलंच एक ‘इनसाईड सेन्सॉर’ आपल्याला जागं ठेवावं लागतं. ते माझ्यातलं अंतर्गत नियमनाचं केंद्र मी मानतो, त्यानुसार तरतम करण्याची, तारतम्य दाखवण्याची जबाबदारी स्वत:च स्वीकारावी लागते. 
गेल्या दहा वर्षात आपला देश जितका बदलला तितका तो गेल्या ३००० वर्षांत बदलला नव्हता. आज आपल्या घरात माध्यमांनी सारं जग आणून ओतलं आहे. रिमोट आपल्या हातात आहे तसे जगण्याचे सारे निर्णयही घ्यायला आपण स्वतंत्र आहोत असं आपल्याला वाटतं. पण ते तसं नाही. त्या स्वातंत्र्यालाही मर्यादा आहे. आपल्या वाट्याचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि लादल्या गेलेल्या मर्यादा भेदून टाकण्यासाठीची लढाई प्रत्येक पिढीला लढावीच लागते.
आणि या काळात तर ती लढाई जास्त जोरकस होईल. थेट आपल्या व्यक्तिगत आयुष्यात येवून लढण्याचा पुकारा करेल अशी चिन्हं आहेत. आपण एका प्री-सेन्सॉरशिपच्या वातावरणात जगतो आहोत. सिनेमाच्या संदर्भात तर हे जास्त जाणवतं. एका सिनेमासाठी काही करोडो रुपये लागलेले असतात. त्यामुळे लेखकाला कागदावर प्रत्येक शब्द लिहिण्यापूर्वी, दिग्दर्शकाला कुठलाही शॉट शूट करण्यापूर्वी यासाऱ्याचा परिणाम काय होईल याचा विचार करावा लागतो, निर्माते तसा विचार करतात. कारण का तर त्या पैशाचा परतावा! राजकीय पक्ष, सामाजिक संघटना ते अगदी समाज या साऱ्यांचा दरारा सेन्सॉरशिपच्या रुपात असा काम करण्यापूर्वीच बंधनं आवळू लागला आहे.
आपल्या समाजात परस्पर विरोधी विचारांना मांडण्याची एक मोकळीक होती. एक खुली जागा होती. विचार पटो ना पटो, टोकाचे विचार मांडण्याची मोकळीक घेता यायची. आता तो खुलेपणा, ती मोकळीक, समाजातल्या या मोकळ्या जागा आकसायला लागल्या आहेत. हे आकसणं धोकादायक आहे.यासंदर्भात आता प्रत्येकाला आपापल्या स्तरावर व्यक्तिगत लढाई लढावी लागणार आहे. ही प्रत्येकाची लढाई आहे, प्रत्येकानं ती आपल्यापुरती जरी आपल्या आयुष्यात लढली तरी फार आहे. प्रत्येक पिढीतच अशा ज्या व्यक्तिगत लढाया माणसं लढत राहिली त्यांनी मोठे बदल घडवले. आम्ही आमच्याकाळात ज्या लढाया लढलो त्याचा फायदा आज सिनेमात काम करणाऱ्यांना होताना दिसतो आहे.
स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावतच रहायला हव्यात. लोग आंस्मा में लकीर खिंच देते है और कहते है की आप उड सकते हो, लेकीन आपका आस्मा यहांतक ही है..!
- असं कसं चालेल? नाही चालणार!
ज्याचं त्याचं आकाश ज्याला त्याला खुलं हवं, आकाशात उडण्यासाठीच्या सीमारेषा कुणी ठरवणार असेल तर ते कसलं उडण्याचं स्वातंत्र्य?
आणि म्हणून मी म्हणतो की अशा आकाशातल्या सीमारेषा कुणी ओढत असेल तर त्या पुसण्याचं काम ज्याला त्याला व्यक्तिगत पातळीवरच करावं लागेल, त्या त्या लढाया लढाव्याच लागतील!
अशा लढाया लढणारी माणसं वास्तवात असतात. त्यांच्या कहाण्या सिनेमांनी सांगायला हव्या. सिनेमा हा मनोरंजनाचा व्यवसाय आहे हे मान्य. पण जे वास्तवातले नायक-नायिका आहेत, जे लढताहेत, जे बदल घडवताहेत त्यांचा आवाज होण्याचं काम सिनेमानं केलं पाहिजे. हॅपी एण्डिंगचे सिनेमे खूप झाले त्यापलिकडे जावून जे लढे आहेत, त्या लढ्यांना अधिक बुलंद करण्याचं, ते लढे पसरवण्याचं काम सिनेमानं केलं पाहिजे. तसं झालं तर मर्यादित स्वातंत्र्याच्या रेषा पुसायला मदत होईल, स्वातंत्र्याचं आकाश उंचावत नेता येईल..


शब्दांकन 
- अविनाश थोरात

Web Title: Meaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.