सार्थक प्रवास..

By admin | Published: June 17, 2016 05:28 PM2016-06-17T17:28:46+5:302016-06-17T18:02:16+5:30

प्रवास तीन प्रकारचे असतात. गरजेपोटी केलेला प्रवास, स्वानंदासाठी केलेला प्रवास आणि ‘सात्त्विक’ प्रवास. तिसऱ्या प्रकारातला प्रवास ‘राजस’ या प्रकारात मोडतो. या प्रकारच्या प्रवासाची पदचिन्हे काळाला मिटवता येत नाहीत. गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर, कोलंबस, डॉ. कोटनीस, डॉ. खानखोजे यांचे प्रवास अशा प्रकारचे आहेत.

Meaningful journey .. | सार्थक प्रवास..

सार्थक प्रवास..

Next

 

ज्ञानेश्वर मुळे

काही प्रवास माणूस गरजेपोटी करतो. कोर्टकचेरीची कामं असोत किंवा नोकरीसाठीचा प्रवास असो, मी त्याला अपरिहार्य प्रवास किंवा ‘तामसी’ प्रवास मानतो. दुसरा प्रवास स्वानंदासाठी, कुंभमेळ्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटनासाठी जाणारी मंडळी. यांचा प्रवास आनंददायी, ज्ञानवर्धक, अनेकदा आध्यात्मिक किंवा प्रेरणादायी असतो. त्याला आपण ‘सात्त्विक’ प्रवास म्हणू. तिसऱ्या प्रकारचा प्रवास जो ‘राजस’ या सदरात जातो, तो आहे गांधीजींचा आफ्रिकेचा प्रवास व वास्तव्य. आंबेडकरांनी अमेरिकेला कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी केलेला प्रवास, सावरकरांचा अंदमानपर्यंतचा प्रवास व तिथला कारावास. कोलंबस, वास्को डी गामा आणि मार्को पोलो यासारख्या धाडशी प्रवाशांचे ऐतिहासिक प्रवास, सोलापूरच्या डॉ. द्वारकानाथ कोटणीसांचे चीनमधले वास्तव्य व मृत्यू असा प्रवासांचा नकाशा बनवायचा तर आपोआपच जिथे या लोकांनी काम केले ते स्थानबिंदू ठळकपणे दाखवावे लागतील. शिवाय त्यांना जोडणाऱ्या रेषा जाडजूड दाखवाव्या लागतील. या ‘राजस’ लोकांच्या कार्यव्याप्तीला भूगोल आणि इतिहासाचे बंधन नव्हते. भूगोल बदलण्याची आणि इतिहासाचे नव्याने विश्लेषण करण्याची ताकद या व्यक्तींकडे होती. त्यांची पदचिन्हे काळाला मिटवता येत नाहीत.
अशाच प्रकारचा प्रवास एका मराठी माणसानेही केला आहे. डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे त्यांचं नाव. ते वर्ध्यात जन्मले. पण टिळकांच्या जीवनसंदेशाने ते पेटून उठले. तो शोध त्यांना जपानमार्गे अमेरिकेत घेऊन गेला. ते वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीतून आणि ओरेगॉन इथून पदवीधर झाले. त्यांचे क्रांतिकारी काम त्याआधीच सुरू झाले होते. त्यांनी पोेर्टलंडमध्ये १९०८ साली इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. त्यानंतर समविचारी लोकांना घेऊन गदर पार्टीची स्थापना केली. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारून ‘हिंदू-जर्मन कॉन्स्पिरसी’त भाग घेतला. स्वत:च्या क्रांतिकारी कार्यासाठी ते तुर्कस्तान, बलुचिस्तान, इराण या प्रदेशात फिरले. एम. एन. रॉय वगैरे दिग्गज कम्युनिस्टांबरोबर ते रशियाला गेले. लेनिनला १९२१ ला भेटले. ब्रिटिशांनी त्यांना ‘अतिशय धोकादायक व्यक्ती’ म्हणून घोषित केले व भारतात येण्याची बंदी घातली. त्यांनी ‘कोमागाता मारू’ या प्रसिद्ध बोटीतील भारतीय प्रवाशांना कॅनडात उतरण्याची परवानगी मिळावी यासाठी कॅनडात जाऊन तिथल्या सरकारशी वाटाघाटी केल्या. त्या फसल्या. शेवटी ते मेक्सिकोत गेले आणि तिथल्या मक्याच्या पिकांवर नवनवे प्रयोग करून मेक्सिकन हरित क्रांतीचे ते जनक ठरले. त्यांना प्रेमाने ‘कॉर्न किंग’ असे म्हटले गेले आहे. मेक्सिकोतील बुद्धिवंतांच्या चळवळीत त्यांना मानाचे स्थान मिळाले. 
मेक्सिकोतील प्रसिद्ध चित्रकारांनी आणि आंतरराष्ट्रीय छायाचित्रकारांनी त्यांच्या कार्यावर आधारित चित्रे काढली आणि छायाचित्रे घेतली. या माणसाचे कर्तृत्व काळाच्या पडद्याआड कोरले गेले असले, तरी मराठी माणसाच्या आणि भारतीयांच्या मनावर का नसावे, याचे मला वारंवार कोडे पडले आहे.
प्रत्येकजण जसा स्वत:च्या जीवनावर व्हिडीओ बनवू शकतो तसाच तो जीवनप्रवासाचा आलेख किंवा नकाशाही बनवू शकतो. आपल्या जीवनातली महत्त्वाची ठिकाणं नकाशावर चिन्हित करा, त्या बिंदूंना रेषांनी जोडा आणि शेवटच्या बिंदूला जन्मस्थानाशी जोडा आणि समोर येणाऱ्या साध्या, जाळीदार किंवा गुंतागुंतीच्या नकाशात स्वत:च्या जीवनाचे प्रतिबिंब शोधा. काहींचा नकाशा आपल्या जिल्ह्याइतका, काहींचा फक्त राज्याइतका, तर काहींचा देशातल्या काही स्थानांपुरता येईल. जीवनाचा मगदूर त्या व्यक्तीच्या जीवनाचा नकाशा बनतील. 
जे लोक उथळ, छोटं, संकुचित जगले त्यांना त्यांचा नकाशा सांगेल, बाबारे (किंवा बाईसाहेब), काय केलंत तुम्ही तुमच्या जीवनाचं? हा इतका तकलादू नकाशा? निदान चार कोस चालायचं तरी? पण आपण टिंबे आहोत. आमच्या नकाशात दररोजची रटाळ दिनचर्या. एक मागता दोन डोळे मिळालेले असूनही आपण नुसते काडी चघळत बसलेले गणपत वाणी!
याउलट वेळ मिळेल तेव्हा आंबेडकरांचं चरित्र समोर घ्या. त्यांच्या जीवनातले स्थानबिंदू जोडा आणि बघा केवढा चैतन्यमय नकाशा समोर येतो. महू, बडोदा, इंग्लंड, अमेरिका, भारतीय संविधान आणि दीक्षाभूमी. खडतर प्रवास पण उल्लंघता येणारा एव्हरेस्ट जिंकणारा महामानव. तेच सुभाषचंद्र बोस यांचं. केवढा जबरदस्त प्रवास, केवढी जबरदस्त वळणं, केवढी देशनिष्ठा, केवढे परिश्रम. त्यांच्या जीवनाचा नकाशा ते तुमच्या- आमच्यासारखे हाडामासांनी बनले होते या कल्पनेलाच छेद देतो आणि शेवटी आमचे खास आमच्या मातीतले डॉ. खानखोजे. जपानमध्ये क्रांतिसेवा या संस्थेची स्थापना, डेमोक्रॅटिक पार्टी आॅफ इराणी नॅशनॅलिस्टचे ते कमांडर. त्यांच्या ‘नॅशनल आर्मी’ने ब्रिटिशांचा पराभव केला. पण नंतर त्यांना माघार घ्यावी लागली. ते सोविएत रशियात गेले तर हजारोंनी त्यांचं स्वागत केलं. मेक्सिकोने त्यांना भारत सरकारबरोबर संबंध प्रस्थापित करण्याचा अधिकार दिला. पण आपल्याला ते कळाले नाहीत.
कारण? फार सोपं. त्यांच्या जीवनप्रवासाचा नकाशा बनवता आला नाही आपल्याला. ‘मी कधीही क्षमायाचना करणार नाही’ असं म्हणणारा हा महाक्रांतिवीर हातात निखारे घेऊन जगला. आम्ही त्यांच्यापासून दूर राहिलो. कारण ते निखारे आपल्याला झेपले नाहीत.
(उत्तरार्ध)

असा एक मराठी माणूस आहे ज्याच्या पदस्पर्शाने जवळजवळ सगळे खंड पुनित झाले. पण त्याला भारतच काय महाराष्ट्रसुद्धा विसरला आहे. हा माणूस विलक्षण जीवन जगला. वेगळ्या अर्थाने सुभाषचंद्र बोसांइतकाच हा माणूसही भव्यदिव्य व प्रखर होता. सुभाषबाबूंइतकाच या माणसाचा प्रवास रहस्यमय होता. तो क्रांतिकारी होता, विचारवंत होता, ध्येयवादी होता आणि एक महान शास्त्रज्ञ होता. डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे त्यांचं नाव..

Web Title: Meaningful journey ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.