पंढरपुरातील सुविधांचे मेगासंकुल : भक्त निवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:10 AM2019-02-17T00:10:44+5:302019-02-17T00:11:51+5:30
कोल्हापूरचे ख्यातनाम आर्किटेक्ट व इंजिनिअर प्रमोद बेरी यांनी पंढरपूर येथे १२०० यात्रेकरू राहू शकतील, अशा मेगा संकुलाची उभारणी केली आहे. या ‘भक्त निवास’च्या उभारणीबद्दल त्यांनी सांगितलेले स्वानुभव...
-प्रमोद बेरी
कोल्हापूरचे ख्यातनाम आर्किटेक्ट व इंजिनिअर प्रमोद बेरी यांनी पंढरपूर येथे १२०० यात्रेकरू राहू शकतील, अशा मेगा संकुलाची उभारणी केली आहे. या ‘भक्त निवास’च्या उभारणीबद्दल त्यांनी सांगितलेले स्वानुभव...
पंढरपुरात येणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, योग्य दरात राहण्याच्या जागा कमी पडत आहेत. नेमकी ही गरज लक्षात घेऊन, काही वर्षांपूर्वी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे तत्कालीन अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांनी या मोठ्या प्रकल्पाला हात घालण्याचे ठरविले. आम्ही पूर्वी केलेले तुळजापूर देवस्थान तसेच इतर काही आश्रम व मंदिरे पाहून समितीने आम्हाला हे काम आर्किटेक्ट या नात्याने सोपविण्याचे ठरविले.
आमच्या ताब्यात दिलेल्या पाच हेक्टरच्या प्लॉटमध्ये भक्तांच्या निवासासाठी उत्तरेकडे बांधलेल्या तीन छोट्या इमारती अस्तित्वात होत्या. कवायतीला उभ्या असलेल्या तीन सैनिकांप्रमाणे एकामागून एक असे त्यांचे स्वरूप होते. असेच साचेबंद प्लॅनिंग न करता काहीतरी वेगळे करावे असे मनात होते. सुदैवाने प्लॉटच्या उंच-सखल भागाची ठेवण मदतीला आली. आमच्या नव्या सहा बिल्डिंगच्या प्लॅनिंगसाठी उरलेला पंचकोनी प्लॉट हा मध्याकडे बराच खोलगट होता. हा भाग अधिक खोदून येथे तबक उद्यान केले व तीच माती वर टाकून एका लेव्हलला चौफेर इमारती केल्या तर भव्यता तर वाढेल; पण इतरही फायदे होतील, ही संकल्पना मनात ठाम केली. तबक उद्यानाभोवतालच्या संकुलाच्या प्रत्येक इमारतीचे प्रवेशद्वार आतील अंगास घेतल्याने व तबक उद्यान व इमारतीमधील सहा मीटरचे अंतर हे पूर्णत: पादचारीसन्मुख केल्याने व फक्त बाहेरून वाहन येण्यासाठी रस्ता ठेवल्याने, पादचारी व वाहने यांचा नेहमीचा होणारा विवाद टळला. त्यामुळे आतमधील पाथवेमध्ये व बागेत अगदी लहान मुलेही निर्धास्तपणे बागडू शकतील. यामुळे होणारा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे पंढरपूरसारख्या उष्ण, कोरड्या वातावरणामध्ये तबक उद्यान लॉनने होणारा सुखद तापमान बदल तसेच थोडीशी गरज असणारा दमटपणा हाही सहजसाध्य झाला.
कुठलाही यात्रेकरू मोठ्या रस्त्याकडील मुख्य प्रवेशद्वारातून आत येईल. एका विशिष्ट तरंगत्या पॅसेज वेमधून सेंट्रल रजिस्ट्रेशनला येईल व तेथून त्याची सोय आतील पाच इमारतींत कुठेही होऊ शकेल. या पाच इमारतींमध्येही पोट-रजिस्ट्रेशन काउंटर्स असल्याने त्यांची कधीच दिशाभूल होणार नाही. त्यांचे वाहन मात्र बाहेरील रस्त्याने येऊन परस्पर पार्क होईल व लिफ्ट वा मागील जिन्याने ते रजिस्ट्रेशनला दाखल होतील. महाराष्ट्रात सर्व पुरातन वास्तूंना वापरला जाणारा काळा दगड हा बहुतांश इमारतीला आवरण म्हणून वापरला गेला आहे. अशा दगडी आवरणाच्या वस्तुमानामध्ये गुलाबी सॅँडस्टोन लुकच्या कलाबुतीदार कमानी व त्याला साजेसे खांब व जाळीकाम निवडले आहे. कमानीच्या माथ्यावर असणाºया स्लॅबला गुलाबी सॅँडस्टोन लुकच्या ब्रॅकेट्स दिल्याने कमानी अधिक खुलल्या आहेत. प्रत्येक इमारतीच्या गच्ची लेव्हलला आपल्याकडे जुन्या राजवाड्यात हमखास दिसणारी घुमटाकार छत्री दिली आहे. तबक उद्यानाला जाणाºया प्रत्येक आगमन कट्ट्यावर अशा तीन छत्र्यांची मांडणी केली आहे. एकूणच आतील अंगणात आल्यावर, त्या काळात आपण गेलो आहोत असे वाटू लागते. सर्व फर्निचर कामदेखील नक्षीयुक्त करून ग्रॅनाईटचे टॉपिंग दिल्याने तेही पिरियड लुकचे झाले आहे. इमारतीचे ग्राफिक्ससुद्धा याच थीमवर बेतले आहे.