स्मरणांजली- अक्षर ' बाकी '
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 07:00 AM2019-06-02T07:00:00+5:302019-06-02T07:00:11+5:30
प्रख्यात कवी बाळकृष्ण भगवंत बोरकर ऊर्फ ‘बाकीबाब’... हे महाराष्ट्राच्या समृद्ध कविकुलांतले एक अग्रणी... त्यांच्या काव्यातील सौंदर्यस्थळे उलगडणारा लेख...
- अरुण काकतकर
‘पिलांस फुटुनी पंख त्यांची घरटी झाली कुठे कुठे
आतां आपुली कांचनसंध्या, मेघडंबरी सोनपुटे’
वृद्धत्वाला ‘संध्याछाया’ असं उदास संबोधन न देता, वयोमानानुसार आलेल्या शारीर थकव्यांतसुद्धा मनाची सोनेरी किनार अबाधित राखण्याचं आवाहन करणारे ‘बाकीबाब’... बाळकृष्ण भगवंत बोरकर हे महाराष्ट्राच्या समृद्ध कविकुलांतले एक अग्रणी...
‘जळल्यावाचुन नाही ज्योती, रडल्यावाचुन नाही प्रीती, कढल्यावाचुन नाही मोती
ना घणावाचुनी देवपणा
रे अजून थोडे सोस मना...
प्रसववेदनांविण ना सृष्टी,
तपनावाचुन नाही वृष्टी,
दु:खाविण ना जीवनदृष्टी
मेल्याविण मिळला स्वर्ग कुणा?’
अटळ, अबाधित सत्य, काही वैज्ञानिक, काही माणसाच्या भावभावनांशी निगडित... दुखºया, खंतावल्या सामान्यजनांच्या वेदनांवर फुंकर घालताना बोरकर काय छान उदाहरणं देतात, तशीच आणखी एक रचना अखंड प्रीतीची घट्ट वीण, भावस्पर्शी शब्दांतून व्यक्त करताना बोरकर ते ज्या माडापोफळीच्या, सागरतीराच्या स्वप्नभूप्रदेशात वातावरणात वाढले, तिथल्या एका दृश्याचाच छान दृष्टांत देतात,
‘विरले सगळे सूर तरीही उत्तर रात्र सुरेल
ओसरल्यावर आपण सजणी
अशीच ओलं उरेल..’
अतूट प्रेमाच्या वर्णनासाठी यापेक्षा कोणता दृष्टांत अधिक समर्पक असू शकतो? भरतीचा आवेग खळाळणारा तर ओसरणं? संथ, सबुरीनं, किनाऱ्याच्या कणाकणाला स्पर्श करीत... बोरकरांच्या कवितेत अत्युच्च काव्यगुणांबरोबरच भाषेची समृद्धी, प्रभावाने दृष्टोत्पत्तीस येते.
‘गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले’
या रचनेमधे, ते बाष्पवृत्त ढगाला, ‘मेघ’ असं न म्हणता, संस्कृतोद्भव ‘जलद’ हे विशेषणात्मक संबोधन
वापरतात...
कारण ‘मेघ’ श्वेत, जलविरहित असू शकतो, पण ‘जलद’? अधिक स्पष्टीकरणाची गरज नाही
एकेका शब्दाचे प्रचलित पदर उलगडून दाखवतानाच, त्या अर्थांपलीकडचे भाव अनावृत्त करणे हेच तर कविजनांचे कसब. या माझ्या उक्तीच्या पुष्ट्यर्थ, जाता जाता बोरकरांच्या आणखी एका रचनेचा उल्लेख अपरिहार्य आहे...
‘जळणाºया जळत रहा, जळतो सारेच आम्ही
जळण्याच्या लाख तºहा, राख मात्र जास्त कमी’
आता या ‘लाख तºहा’ कुठल्या? संपूर्ण कविता वाचा...आणि ‘जाणिवे’चा आनंद घ्या.
‘बाकीबाब’ पत्नीविरहाची वेदना प्रतिबिंबित करताना म्हणतात
‘तू गेल्यावर फिके चांदणे,
घर-परसूंही सुने, सुके...
मुले मांजरापरी मुकी अन्
दर दोघांच्या मधे धुके...
कविता वाचता वाचता शेवटाला याल आणि थक्क व्हाल...खात्रीनं सांगतो !
‘माझ्या दूरस्थ लाडक्यांनो...’
या आपल्या कवितेत, शिक्षण-व्यवसायानिमित्त, परदेशी स्थलांतरित भारतीयांना, तिथल्या ‘सांस्कृतिक’ धोक्यांबाबत सावध करताना बोरकर म्हणतात ‘आणि तुमच्या हृदयांतून उसळू दे इतकं गंगौदक की, त्यानं पण्यांगनेची पुण्यांगना होऊन जावी’ ‘पण्यांगनेची पुण्यांगना’ अशा केवळ एका उकारप्रदानांतून, लौकिकार्थानं कंचनी असणाºया स्त्रीला, गरती करून टाकण्याचा हा ‘चमत्कार’ केवळ बोरकरांसारखे भाषाप्रभूच करू शकतात..
कविवर्य ‘बाकीबाब’ बा. भ. बोरकरांची, अशीच एका ओकाराच्या जागी, उकार ठेवीत वेगळाच आयाम देणारी ही रचना-
‘विझवून दीप सारे, मी चाललो निजाया...’
या कवितेत पुढे एके ठिकाणी ते लिहितात,
‘मोकाट वारियांनो थोडे मुकाट व्हा रे !...’
‘जे न देखे रवी ते देखे कवी’...
यासाठी परकायाप्रवेशाची विद्या कवीला निसर्गत:च प्राप्त झालेली असते. मग श्रेष्ठ रचनाकार, ‘बाकीबाब’ त्याला अपवाद कसे असतील? एका ‘कोठी’वरच्या नायिकेची वरकरणी ‘हसवणूक’ करणारी; पण मनाच्या भळभळा वाहणाºया जखमेचे उदास अस्तर असणारी ही रचना ‘बाकीबाबां’चीच
‘विसर म्हणाया कधी तुझे
मी स्मरण ठेविले होते?
दिसल्यावर तू, हसले मी ते,
मुळांत होते खोटे...’
योग आणि भोग यांच्या सीमारेषेवर वसलं आहे बहुतेक गोवा,
बहुतेक वेळा, पांढरं स्वच्छ, करवतकाठी धोतर, गुडघ्याखालपर्यंत लांबीचा रेशमी झब्बा किंवा कुर्ता, छान तेल लावून मागे वळविलेला भरपूर केशसंभार, चेहेºयावर कायम एक मिस्कीलपणाकडं झुकणारं स्मितहास्य असं उमदं व्यक्तिमत्त्व होतं कविश्रेष्ठ बा. भ. बोरकरांचं... बहुतेक वेळा उजव्या हाताच्या तर्जनी आणि मध्यमा यामधे, तर कधी करांगुली आणि अनामिका यामधे विराजमान धूम्रकांड... म्हणजे अर्थातच सिगारेट? असायचीच...उंची मेक्सची...
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर, दूर क्षितिजावर समुद्राशी सलगी करू पाहणाºया कृष्णमेघांच्या पंक्तींचं ‘ओथंबलेपण’ न्याहाळताना ‘बाकीबाब’ सहजच लिहून जातांत...
‘समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला पांचवा महिना’
अशा मेघाच्छादित, हुरहुर लावणाºया वातावरणात ‘बाकीबाबां’च्या चित्तवृत्ती सजग होऊन ते उत्स्फूर्तपणे गायला लागतात-
‘गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले’
लाहीलाही झालेल्या तना-मनांबरोबरच, आसुसल्या भूमीला सचैल स्नान घडवून तृप्त
करून, मग अनेक वाटांनी पागोळणाºया ओघळणाºया, खळखळणाºया, झुळझुळणाºया, वाचलेल्या, साचलेल्या, उरलेल्या, मुरलेल्या, धावणाºया, बावणाºया अशा या पाण्याची विविध रूपं, बोरकरांनी आपल्या शब्दरंगांनी चितारली आहेत..
श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ... ‘साळीच्या बालकां’ना सुखावणारा, खुलविणारा, हसविणारा... त्याचं हे वर्णन आणखी एका प्रसन्न रचनेतलं...
इतकी अलंकृत कविता आहे की परत परत वाचावीशी वाटेल तुम्हाला...
‘फार दिवसांनी आज उन्हे सोनियाची आली...
चिंब साळिची बालके उब पीऊनीया धाली...
गोव्यासारख्या प्रदेशात मानसिक जडणघडण आणि वैचारिक उपज झालेले कविवर्य बोरकर, आसक्ती आणि विरक्तीच्या हिंदोळ्यावर, आपल्या कवितांमधून झोके घेताना वारंवार जाणवतात...
अशाच एका विरक्त मनस्थितीतल्या, बोरकरांनी लिहिलेल्या एका कवितेचं गीत रूप, ...
‘आतां माझ्या व्यथा-कथा कुणा न येती जाणता..
वृथा त्यांना का दूषण, ना ये मला न सांगता...’
या लेखात उल्लेखलेल्या सर्व कविता माझे मित्रवर्य, आगळ्या सुरावटींनी शब्द अलंकृत करणारे, चंद्रशेखर गाडगीळ यांनी स्वरांकित केल्या आहेत.
त्यांच्याही स्मृतीला अभिवादन !