‘दरारा’ संपला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 06:02 AM2019-12-22T06:02:00+5:302019-12-22T06:05:04+5:30
डॉक्टर लागू मूळचेच बुद्धिवान आणि बुद्धिप्रामाण्यवादी. अभिनेत्यानं अभ्यासू आणि अभिनयाबाबत कठोरच असलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्यांचा स्वत:चा अभ्यासही अतिशय दांडगा होता. त्यामुळे रंगभूमीवर त्यांचा आदरयुक्त दरारा होता. त्यांच्या उपस्थितीत सगळ्यांनाच आपलं काम सर्वोत्तम व्हावं असं वाटायचं आणि त्यासाठी ते प्रामाणिक प्रय} करायचे. तो हवाहवासा दरारा आता पडद्याआड गेला आहे.
- डॉ. मोहन आगाशे
डॉ. श्रीराम लागू यांचं काम मी जवळून पाहिलं असलं तरी त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मला फारसा नाही. पण त्यांच्याबरोबर घडलेला एक किस्सा आजही स्मरणात कायम आहे.
मला नाट्य परिषदेच्या वतीने ‘जीवनगौरव पुरस्कार’ मिळाला. तो पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉक्टर बुद्धिप्रामाण्यवादी आणि विचारवंत म्हणून सर्वर्शुत. त्यामुळे सत्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात मी म्हटलं होतं, ‘पुण्यात हा जीवनगौरव पुरस्कार मला देण्यात आला आहे; पण हा पुरस्कार देण्याइतपत काही मी म्हातारा झालेलो नाही. पुण्याचा असल्यामुळं या विधानातून दोन अर्थ निघू शकतात. एक तर तुम्हाला उदंड असं काहीतरी दिलंय. त्यामुळे अजून काहीतरी चांगलं करा किंवा होत नसेल तर आता थांबा. काम बंद करा. पण मी मात्न पहिला अर्थ घेतो. मला मिळालेला जीवनगौरव पुरस्कार माझ्या डोक्यात न जाता उदंड असं काहीतरी मिळाल्याचं मानून भरीव कामगिरी मी केली पाहिजे. ही कामगिरी माझ्या हातून व्हावी, अशी मी ‘परमेश्वरा’कडं प्रार्थना केली असती; पण ‘परमेश्वर’ नाही यावर डॉक्टरांची इतकी र्शद्धा आहे की त्या र्शद्धेला तडा जावा असं मला वाटत नाही. त्यामुळं अशी प्रार्थना मी ईश्वराला न करता डॉक्टरांनाच करतो आहे’, असं मी म्हटलं. त्यावर डॉक्टर हसले आणि ‘असा पकडतोयस का मला’, असं गमतीनं म्हणाले.
डॉक्टर आणि माझी पहिली भेट झाली, तो किस्सादेखील असाच गंमतीशीर आहे. ‘अशी पाखरे येती’चे आमचे प्रयोग चालू असताना डॉक्टर नुकतेच रंगभूमीवर आले होते. वैद्यकीय व्यवसाय बंद करून त्यांनी पूर्णवेळ रंगभूमीला वाहून घ्यायचं ठरवलं होतं. ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकाचे त्यांचे प्रयोग सुरू होते. त्यावेळी डॉक्टरांकडे र्मसिडीज कार होती. मराठी नटाकडे र्मसिडीज असणं हीच तेव्हा मोठी दुर्मीळ गोष्ट होती. त्यावेळी राजा गोसावी यांना गडकरी पुलावर सायकल चालवत जाताना मी अनेकदा पाहिले होते. मीही मग सायकल दामटत त्यांना पकडायचो.
एक तेजपुंज, भरदार आवाज असलेले आणि आमच्याच बी.जे. मेडिकल कॉलेजचे; पण मला वीस वर्षांनी सिनिअर असलेले असे ते एक व्यक्तिमत्त्व होते. ते या कॉलेजमध्ये 1945 मध्ये आले आणि मी 1965 साली कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
जब्बार पटेल यांनी प्रथम माझी डॉक्टरांशी ओळख करून दिली होती. ही गोष्ट 1968-69 सालची. त्याकाळी डॉक्टरांशी बोलण्याइतपत माझं ज्ञान आणि वाचनही नव्हतं. त्यामुळं त्यांच्याकडे बघणं आणि आपण त्यांच्या ‘कंपनी’त आलो एवढचं काय ते कौतुक होतं.
त्यानंतर ‘घाशीराम कोतवाल’च्या निमित्तानं एक वाद महाराष्ट्रात गाजला होता. त्यात भालबा केळकर यांनी एका वृत्तपत्नात ‘त्या पापाचा धनी मी नाही’, असा लेख लिहिला होता. त्याला डॉक्टरांनी एका अनाहूत पत्नाद्वारे लगेचच दुसर्या दिवशी उत्तर लिहिलं. डॉक्टरांनी त्या पत्नात म्हटलं होतं, ‘तुम्ही तुमच्या संस्थेचं नाव बदला, स्वत:ला ‘प्रोग्रेसिव्ह’ समजू नका’.
‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाला त्यांनी पूर्णत: पाठिंबा दिला. जब्बारच्या नाटकांची घोषणाही डॉक्टरच करायचे. जब्बारने राज्यस्तरीय स्पर्धेला ‘लोभ नसावा ही विनंती’ हे नाटक मेडिकल कॉलेजतर्फे केलं होतं. त्यावेळी डॉक्टरांनीच नाटकाची घोषणा केली होती. डॉक्टर आणि जब्बार एकमेकांना खूपच जवळचे होते.
डॉक्टर आणि मी अभिनयाबाबत एकमेकांसमोर येण्याचे प्रसंग तसे फारसे आले नाहीत. ‘सामना’मध्ये डॉक्टर येतात ते माझं नाव ऐकून, असा एक प्रसंग आहे. ‘सिंहासन’मध्येदेखील माझा (बुधाजी गोडघाटे) आणि डॉक्टरांचा संवाद फोनवर आहे. रंगभूमी असो किंवा चित्नपट, मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी फारशी मिळू शकली नाही. जब्बारनं मात्र त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम केलं.
एक चित्नपट आठवतोय. ‘मसाला’. या चित्नपटामध्ये आम्ही एकत्न काम केलं; पण डॉक्टरांना त्यावेळी विसरायला होत होतं. संवाद नीट लक्षात राहात नव्हते. मात्र डॉक्टरांनी तेव्हा वयाची ऐंशी ओलांडली होती. तरीही त्यांनी उत्कृष्ट काम केलं. डॉक्टरांना माझा ‘अस्तु’ हा चित्नपट खूप आवडला होता. दीपा त्यांना ‘प्रभात’ चित्नपटगृहात तो पाहायला घेऊन आली होती.
डॉक्टर मूळचेच बुद्धिवान आणि बुद्धिप्रामाण्यवादी होते. अभिनेत्यानं अभ्यासू आणि अभिनयाबाबत कठोरच असलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्यांचा स्वत:चा अभ्यासही अतिशय दांडगा होता. त्यामुळे रंगभूमीवर त्यांचा आदरयुक्त दरारा होता. त्यांच्या उपस्थितीत कलाकारांसह सगळ्यांनाच आपलं काम सर्वोत्तम व्हावं असं वाटायचं आणि त्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करायचे. एक हवाहवासा दरारा आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. डॉक्टरांना विनम्र र्शद्धांजली !
(लेखक ज्येष्ठ अभिनेते आहेत.)
शब्दांकन : नम्रता फडणीस
प्रकाशचित्र : सतीश पाकणीकर