'गुरुजी' योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 06:01 AM2019-12-22T06:01:00+5:302019-12-22T06:05:03+5:30
योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार. आपल्या योगकलेने जगप्रसिद्ध होते, तरीही अतिशय नम्र आणि साधे व्यक्तिमत्त्व. माझ्या ‘थीम कॅलेंडर’साठी मी त्यांना फोटोची विनंती केली. पण ‘मी अतिशय छोटा माणूस असून, त्या लायकीचा नाही’, असं सांगून त्यांनी ठाम नकार दिला. प्रत्यक्ष भेटीत विनंती केल्यावर कसेबसे ते राजी झाले. त्यांची हवी ती भावमुद्रा मिळवण्यासाठी मला फार वेळ लागला नाही. त्यांचे हेच फोटो नंतर देश-परदेशातील विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झाले!
- सतीश पाकणीकर
साधारण 1937-38 सालचा सुमार. एक मुलगा; वय वर्षे 14-15 असेल. मलेरिया, टायफॉइड यांनी आजारी आणि हे कमी म्हणून की काय वर ट्युबरक्युलॉसिस म्हणजे क्षयरोगाचेही निदान झालेले. त्यातच जीवघेणी उपासमारी. हातापायाच्या जवळजवळ काड्याच. पोट फुगलेले. जास्त ताकद नसल्याने जमिनीकडे झुकलेली आणि खूप प्रयास करून वर येतेय अशी मान. त्यामुळे आलेले चेहर्यावरील हताशपण. अशा वर्णनाचा तो मुलगा कधी ‘टाइम’ मॅगझिनने ‘टॉपमोस्ट हण्ड्रेड इन्फ्लुएन्शल पीपल इन द वल्र्ड’ अशी यादी केली तर त्यात समाविष्ट होऊ शकेल? त्याच्यावर टपाल खात्याचे एखादे तिकीट निघू शकेल? खुद्द ऑक्सफोर्ड डिक्शनरी त्याच्या नावाची संज्ञा आपल्या शब्दकोशात अंतर्भूत करेल? किंवा इंटरनेट जगतात सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन ‘गुगल’ हे त्या मुलावर ‘डूडल’ प्रसिद्ध करेल?
या सगळ्या अशक्यप्राय वाटणार्या प्रश्नांचे उत्तर ज्या मुलाने ‘होय’ या उत्तरात परावर्तित केले त्या मुलाचे नाव म्हणजे बेल्लूर कृष्णमाचार सुंदरराजा अय्यंगार. म्हणजे अर्थातच योगाभ्यासात जगभरात योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार म्हणून प्रसिद्ध असलेले व त्यांच्या सर्व शिष्यांचे ‘गुरुजी’. जवळजवळ ऐंशी वर्षे ‘योगा’ शिकवणारे, वयाच्या अठराव्या वर्षी पुण्यात आलेले आणि नंतर वयाच्या अवघ्या शहाण्णव वर्षांपर्यंत पुण्यातच राहिलेले ‘गुरुजी’. पुण्यातील रमामणी अय्यंगार इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा असलेले ‘गुरु जी’.
मी थीम कॅलेंडर प्रकाशित करायला सुरुवात केल्याला दोन वर्षे झाली होती. 2005 या सालासाठी कॅलेंडरची थीम ठरवत होतो. प्रकाशचित्नणामुळे वेगवेगळ्या क्षेत्नातील ‘दिग्गज’ व्यक्तींचे चित्नण सुरू होते. मग याच विषयावर थीम करायला काय हरकत आहे? मनात विचार आला आणि लगेचच नावही ठरले. ‘दिग्गज’! आपल्या कार्य-कर्तृत्वाने सर्वसामान्यांच्या वाटा उजळून टाकणारे दिग्गज. मी लगेचच यादी तयार केली. काही व्यक्तींचे प्रकाशचित्नण मी केले होते. काहींची प्रकाशचित्ने माझ्या संग्रहात नव्हती. ज्यांचे प्रकाशचित्न माझ्याकडे आहे त्यांचे प्रकाशचित्न वापरण्यासाठी परवानगी विचारणारे पत्न त्यांना लिहिले व ज्यांचे चित्नण करायचे आहे त्यांनाही विनंती करणारे पत्न लिहिले. दिवस होता 2 नोव्हेंबर 2004.
रोज उत्तरांच्या वाटेवर ‘पोस्टमन’च्या येण्याच्या वेळेला मी उत्सुक असे. हळूहळू एक एक उत्तरे येऊ लागली. उत्साह वाढायला लागला. 16 नोव्हेंबर 2004. माझा जन्मदिन. पोस्टमन आला. त्याने माझ्या हातात एक लिफाफा दिला. रमामणी अय्यंगार इन्स्टिट्यूटकडून आलेला. उत्सुकतेने मी तो हळुवार उघडला. आत लेटरहेडवर टाइप केलेले पत्न होते. चंदेरी शाईने छापलेले एक चिन्ह डावीकडे व डॉ.बी.के.एस. अय्यंगार अशी झोकातली अक्षरे उजवीकडे. केवळ आठ ओळींचे ते पत्न मी वाचले. माझ्या उत्साहाचे कारंजे पुढच्याच क्षणी बंद झाले. पत्नातील मजकूर होता -
'My dear Sateesh Paknikar, Thank you very much for your letter and I am pleased to note that you are interested in portrait photography for the last twenty years and captured the moods of various eminent personalities of the society.
I do not belong to that category of personalities. I am just a yoga practitioner and I do not think that I come in that category. Therefore, please excuse me for my inability to appear in the calendar as it is not ethical for yoga student.'
Yours sincerely,
- B K S Iyengar.
पाकीट बंद करून मी टेबलावर ठेवले आणि विचार करू लागलो. त्यांना आता परत कसे गाठता येईल? मग मी ठरवले की, थेट इन्स्टिट्यूटवर जाऊन धडकायचे. मी गेलो. आत गेल्यावर त्यांचे स्वीय सहाय्यक तेथे बसलेले होते. त्यांना भेटलो. माझ्या आठवणीप्रमाणे त्यांचे नाव पांडुरंग शास्री. त्यांना माझी अडचण सांगितली. ते म्हणाले - ‘गुरुजींनी एकदा नाही सांगितले आहे. म्हणजे आता जरा अवघड आहे.’ मी प्रयत्न तर करून बघतो म्हणालो. त्यांनी मला चार दिवसांनंतरची वेळ दिली.
परत एकदा मी इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचलो. शास्रींना भेटलो. त्यांनी मला बसायला सांगितले. मग काही वेळाने समोरील जिना उतरून ते मला खाली घेऊन गेले. जाताना त्यांच्यासाठी आधीच्या ‘म्युझिकॅलेंडर’ व ‘आनंदयात्नी पु.ल.’ या कॅलेंडरच्या प्रतिबरोबर घेतल्या होत्या. डावीकडे वळल्यावर शेजारील टेबलामागे बी.के.एस. अय्यंगार बसले होते. टेबलावर डाव्या हाताला पुस्तकांचा ढीग तर उजव्या हाताला पत्नव्यवहाराचा गठ्ठा. ते पत्नव्यवहार पाहण्यात दंग होते. मोठय़ा थोरल्या आणि जाड भुवयांच्या आडून माझ्याकडे पाहून नजरेनेच खूण करून त्यांनी मला बसायला सांगितले. मी हातातील कॅलेंडर्स त्यांना दिली. बराच वेळ घेत त्यांनी दोन्ही कॅलेंडर्स नीट बघितली. मग म्हणाले - ‘येस माय फ्रेंड. ही कॅलेंडर्स चांगली झाली आहेत. पण मी यांच्यात कुठेच शोभत नाही. मी फार छोटा माणूस आहे.’ आणि त्यांच्या खास शैलीत हसायला लागले. ही संधी साधून मी म्हणालो - ‘सगळेच मोठे लोक असं म्हणतात. तसे तुम्हीही स्वत:ला छोटे म्हणवताय. पण जगभरातल्या सर्व लोकांनी तुम्हाला केव्हाच मोठं करून टाकलंय.’ ते परत हसले. पांडुरंग शास्री माझ्या अशा बोलण्याने चकित झाले होते. माझी मात्ना लागू पडली होती. एक क्षणाचा पॉज घेऊन मी लगेच पुन्हा म्हणालो - ‘मग कधी करायचा फोटोसेशन?’ त्यांनी मग शास्रींकडे पाहून सांगितले की, यांना येत्या सोमवारी 3 वाजता यायला सांगतो. तुम्हीही वेळ लिहून ठेवा. आनंदाने मी तेथून निघालो.
सोमवारी, 21 नोव्हेंबर 2004ला पावणेतीन वाजताच मी इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचलो. अय्यंगार सर त्यांच्या त्याच जागी पत्नव्यवहार पाहत बसले होते. लुंगी व अत्यंत साधी बंडी असा त्यांचा वेश होता. मी आल्याचे पाहिल्यावर त्यांनी मला अजून थोडा वेळ लागेल असे सांगितले. दहाच मिनिटांत त्यांनी काम आवरले. माझ्याकडे पाहून म्हणाले, ‘हं, चला. कुठे उभं राहू? हा आहे हा ड्रेस चालेल ना?’ त्यांनी अगदीच साधा पेहराव केलेला होता. पण आता हे सांगायचे कसे? मी त्यांना म्हणालो- ‘हं, चालेल हा ड्रेस. पण याच्यावर तुम्ही तुमचे नेहमीचे उपरणे घ्याल ना?’ ते एकदम मोठय़ाने हसले. माझ्या पाठीवर जवळजवळ धपाटा घातला आणि म्हणाले - ‘तुला सगळं माहीत आहे की !’ मीही हसलो. वैष्णव अय्यंगार मंडळी ही नेहमी सर्व व्यवस्थित आवरून झाल्यावर मगच खांद्यावर उपरणे घेतात ही माझी ऐकीव माहिती माझ्या कामाला आली होती.
पंधरा मिनिटांत सिल्कची लुंगी, तसाच कुडता, गळ्यात एक स्फटिकांची माळ, देवता व हनुमानाची प्रतिमा असलेली सोन्याची दोन लॉकेट्स, भुवयांच्या मधून कपाळाकडे गेलेली गंधाची उभी रेघ आणि सोनेरी जरीकाम केलेले निळ्या रंगाचे उत्तम असे उपरणे अशा पेहरावात हसतमुख चेहर्याने बी.के.एस. अय्यंगार फोटोसाठी सज्ज झाले होते. मला पंधरा-वीस मिनिटेच लागणार होती. इमारतीच्या मधल्या भागात सावली होती. त्या ठिकाणी बसून, उभे राहून मी त्यांचे हे वेगळेच रूप कॅमेराबद्ध करीत गेलो. काही फ्रेमनंतर मला हवी असलेली त्यांची भावमुद्रा मला मिळाली होती. कोणतीही विर्शांती न घेता सलग तीन तासांची जवळजवळ बारा ते पंधरा हजार वैयक्तिक योग प्रात्यक्षिके केलेली अशी जगातील एकमेव असलेली ही महनीय विभूती किती साध्या प्रकारे वावरत होती, याचेच आम्हाला आश्चर्य वाटत होते. त्यांच्याबरोबर उभे करून माझ्या सहायकाने, जितेंद्रने माझाही फोटो टिपला आणि आम्ही आनंदी मनाने तेथून निघालो.
‘दिग्गज’ कॅलेंडरचे प्रकाशन झाले. कॅलेंडरची प्रत पाहून अय्यंगार गुरुजी एकदम खूश झाले. मी त्यांना त्यांच्या सगळ्या फोटोंचा एक सेट भेट म्हणून दिला. त्यांना ती सर्वच प्रकाशचित्ने आवडली. ‘माझे शिष्य मला नेहमी माझा फोटो मागतात. मी यातील फोटो त्यांना दिला तर चालेल का?’ त्यांनी विचारले. मलाही खूपच आनंद झाला. नंतर अनेक वेळा इन्स्टिट्यूटकडून मला फोन येई. आणि मी त्यांना फोटोंच्या कॉपी देण्यासाठी जात असे. शहाऐंशी वयाचे अय्यंगार सर प्रत्येक वेळी कामाच्या व्यापात बुडून गेलेले दिसत. ते हयात असताना आणि ते हा भूलोक सोडून गेल्यावरही मी जगातील वेगवेगळ्या नियतकालिकांना, मासिकांना त्यांची प्रकाशचित्ने प्रसिद्ध करण्यासाठी देत राहिलो. ते काम अजूनही अधून-मधून सुरूच असते.
त्यांच्या शरीरातील प्रत्येक अन् प्रत्येक पेशी ‘योगा’मय झालेली असेल. योगाभ्यास कशासाठी करायचा, तर ‘शरीर आणि मनाच्या दु:खापासून मुक्त होण्यासाठी’ अशी सतत भावना ठेवणार्या अय्यंगार गुरुजींचे सांगणे होते की- 'Science is progressing. Art is progressing. Yoga is the combination of both science and arts. So yoga has to progress.
sapaknikar@gmail.com
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)