कविवर्य वसंत बापट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 06:01 AM2020-07-19T06:01:00+5:302020-07-19T06:05:02+5:30

वसंत बापट. चैतन्याने सळसळणारा व लहान मुलाच्या उत्साहाने  जीवनावर प्रेम करणारा हा कवी. त्यांचे कविता वाचनही तसेच.  ते कविता वाचू लागले की, ती कविता  छापील फासातून मुक्त होऊन चैतन्यमय व्हायची. त्यांच्याशी अनेकदा भेट झाली. पण प्रत्येक वेळी त्यांच्यात दिसला  तो केवळ चैतन्याचा आणि तारुण्याचा झराच !

The memories of great Poet Vasant Bapat.. | कविवर्य वसंत बापट..

कविवर्य वसंत बापट..

Next
ठळक मुद्दे25 जुलै रोजी कविवर्य वसंत बापट यांचा जन्मदिन. त्यानिमित्त.

- सतीश पाकणीकर 
कलादालनाच्या भिंती महान गायक पं. कुमार गंधर्व आणि पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या प्रकाशचित्रांनी सजल्या होत्या. 1992च्या जानेवारी महिन्यात कुमारजी गेले. लागोपाठ सप्टेंबर महिन्यात मल्लिकार्जुन गेले. भारतीय अभिजात संगीतात आपापला अमिट असा ठसा उमटवून. साहजिकच त्या काळात त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या स्मरणात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. बहुतेक सर्व शास्रीय संगीताचे कार्यक्रम. वेगळ्या प्रकारे त्या दोघांना र्शद्धांजली अर्पावी या हेतूने मी त्यांच्या विविध मैफलीत काढलेल्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केले होते. त्याचं उद्घाटन करण्यास प्रमुख पाहुणे म्हणून आले होते कविवर्य वसंत बापट. एक नट, दिग्दर्शक, तमासगीर, वक्ता, लेखक, निवेदक व यशस्वी प्राध्यापक असे कर्तृत्व गाजवलेले कविवर्य, कुमारजी व मल्लिकार्जुन या दोघांचेही चाहते आणि मित्र. त्यामुळे त्यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचं कविमन हळवं न होतं तरच नवल. मग तेच त्यांच्या वक्तृत्वातही पाझरलं. 
कुमारजी आणि मल्लिकार्जुन यांची महती सांगून ते म्हणाले की - ‘सामान्य माणसंही पुष्कळदा चांगल्या गोष्टीचं वेड लावून घेतात, त्यात माझी गणना आहे. या आमच्यासारख्या सामान्यांना वेड लागतं ते मात्र असामान्यांचंच. त्याच्यापेक्षा जरासुद्धा एक पायरी कोणी खाली असलं तर चालत नाही. असेच दोन असामान्य कलावंत म्हणजे कुमारजी व मल्लिकार्जुन. त्यांच्या या ज्या भावमुद्रा आहेत त्या गानमुद्राही आहेत. या प्रकाशचित्रातून आपल्याला त्या गाण्यातल्या जागा दिसायला लागतात. ही प्रकाशचित्रं पाहणं म्हणजे या दोघांची मैफल परत अनुभवणं आहे’, असं म्हणत त्यांनी एक त्यांचीच कविता सादर केली.
‘तसाच आपला आमचा तो                                                             
मुक्या मुक्या मनामध्ये घेत असे अबोल ताना                                             
गाणे जन्मा येण्यापूर्वी, त्याला सूर लख्खं दिसतो                                            
इथे तिथे पीळ देतो, गोफ विणतो हसत असतो                                             
मुका सूर, मुका ताल                                                          
म्हणून तर त्याचे गाणे, जन्मा आले नव्हते काल’. 
त्यांचे पंधरा मिनिटांचे मनोगत आणि या कवितेने उपस्थितांची मनोमन दाद घेतली.
माझं ऑफिस त्यावेळी शनिवार पेठेत नंदादीप काडर्सच्या र्शी. सदानंद महाजन यांच्या इमारतीत बेसमेंटमध्ये होते. तेथून जवळच ‘साधना’ साप्ताहिकाचे ऑफिस. त्यामुळे कधी काही प्रकाशचित्रे देण्यासाठी तेथे जावे लागे. त्यावेळी र्शी. ग. प्र. प्रधान सर व र्शी. वसंत बापट सर हे संपादक म्हणून काम पाहत. प्रदर्शनानंतर एकदा गेलो असताना मी बापटसरांना प्रदर्शनात भेट म्हणून दिलेली डेलिया फुलाची कृष्ण-धवल फ्रेम त्यांच्या बसण्याच्या जागेच्या मागेच लावलेली दिसली. प्रधानसरांशी माझी ओळख करून देत ते प्रकाशचित्र मी काढले आहे, असे सांगत सर म्हणाले, ‘नुकतेच मी एका फुलांच्या प्रदर्शनात त्या सर्व प्रकाशचित्रांवर माझ्या चार-चार ओळींच्या कविता लिहून दिल्या होत्या. पण तुमचे हे प्रकाशचित्र म्हणजेच एक कविता आहे.’ इतका मोठा अभिप्राय दिलखुलासपणे देण्याला जे मोठं मन लागतं त्याचा अनुभव मी घेत होतो.
खरं तर त्यांची एक अप्रतिम अशी ‘डेलिया’ नावाची कविता आहे. त्यात दोन ओळी आहेत -
‘यास ना अभिसार ठावा यास ना अभिशाप लाभे                                     
हाय, या भाळीं कशाला रेखिलें वरदान सारें’  
बापटसर एक कार्यक्रम आयोजित करणार होते. त्यात त्यांचे निरूपण आणि सत्यशील देशपांडे यांचे गायन असा कार्यक्रम होता. त्यांनी मला विचारले की - ‘त्याचे फोटो तुम्ही काढून द्याल का?’ मी लगेच होकार दिला. पण म्हटले की - ‘तुम्ही माझ्या ऑफिसवर येणार होता. आणि मी तुमची प्रकाशचित्रं टिपणार होतो तो कार्यक्रम कधी करायचा?’ यावर त्यांनी त्यांचे नेहमीचे हास्य चेहर्‍यावर आणत मला वेळ दिली. आणि बरोबर काय काय आणू? असा प्रश्न विचारला. मी त्यांना झब्बा, जाकीट, शाल या गोष्टी घेऊन या असे सांगितले.
तो शुक्रवार होता. तारीख 25 जून 1993 असावी. संध्याकाळी चारच्या सुमारास बेसमेंटचा जिना उतरत कविवर्य आले. मस्त फुला-फुलांचा शर्ट, फ्रेम नसलेला षटकोनी काचेचा चष्मा, मागे फिरवलेले व कंगव्याच्या दातांच्याही रेघा दिसतील असे चप्प केस, सत्तरी पार करूनही चैतन्याने सळसळणारा व लहान मुलाच्या उत्साहाने जीवनावर प्रेम करणारा हा कवी अत्यंत सहजतेने स्थानापन्न झाला. मला आश्चर्य वाटत होते की ते येताना ठरल्याप्रमाणे काहीच घेऊन आलेले नाहीत. ते आश्चर्य फार काळ टिकले नाही. काहीच वेळात त्यांची बॅग घेऊन त्यांचा सहायकही आला. मग आम्ही त्यातील शर्ट, झब्बा, जाकीट, शाल यांची निवड केली. त्यांचा चेहरा इतका प्रसन्न व बोलका होता की त्याला इतर कशाची गरजच पडू नये. त्यामुळे अगदी साध्याही मेक-अपचा प्रश्नच नव्हता. मी प्रकाशयोजनेची तयारी केली. नेहमीप्रमाणे मी रंगीत व कृष्ण-धवल अशा दोन फिल्मवर चित्रण करणार होतो. त्याची त्यांना कल्पना दिली. त्यांच्या चेहर्‍यावर तेच मंद स्मित उमलले.
आमचा फोटो-सेशन सुरू झाला. लोकमानसाचे भान असलेला हा लोकांचा कवी माझ्यासमोर बसला होता. रचना शुद्धता, विलक्षण शब्दचापल्य, उत्तम शैली व एक अंगभूत अशी लय घेऊन येणार्‍या त्यांच्या काव्यात विविधताही किती? ‘सेतू’, ‘ऋतुराजांनो’, ‘विनोबा’, ‘गरुड’, ‘फुंकर’, ‘जिना’, ‘कुंपण’, ‘बाभूळझाड’, ‘मधुबाला’ अशा विलक्षण वेगवेगळ्या विषयांवर कविता रचणारा,  मराठी मातीबद्दल जाज्वल्य अभिमान प्रकट करणारे - ‘केवळ माझा सह्य कडा’ हे सांगणारा, ‘गगन सदन तेजोमय.’ असे प्रार्थनागीत लिहिणारा हा कवी शांतपणे माझी चाललेली लगबग बघत होता. माझ्या मनात ओळी घोळत होत्या -                                                         
‘शरदामधली पहाट आली तरणीताठी, 
हिरवे हिरवे चुडे चमकती दोन्ही हाती!’ 
रंगीत व कृष्ण-धवल एकामागोमाग एक असे फोटो टिपणे चालू होते. मी त्यांना म्हणालो - ‘सर, तुम्ही काव्य करण्यात मग्न आहात असं प्रकाशचित्र घेऊ या का?’ तेही उत्साहाने सरसावले. मी माझ्या टेबलवर तशी रचना केली. माझ्या फोटोग्राफीच्या पुस्तकांचा एक गठ्ठा ठेवला. त्यांना लिहायला एक कोर्‍या कागदांचे पॅड दिले. त्यांच्याही नकळत त्यांचा एक हात मूठ वळून डोक्याला टेकवला गेला आणि ते लिहू लागले. तल्लीन झाले. पुढच्याच क्षणाला माझ्या कॅमेर्‍याने त्याचे काम केले होते. शर्ट, झब्बा, जाकीट बदलत आम्ही फोटो काढत गेलो. मला हव्या तशा त्यांच्या मुद्रा कॅमेरांकित होत गेल्या.
आता एकच एक्स्प्रेशन मला हवे असे वाटत होते. त्यांच्या कविता वाचनाचे. कवितेच्या सादरीकरणाचे. त्यांच्या या सादरीकरणाबाबत त्यांचेच घट्ट मित्र व कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहून ठेवलं आहे - ‘बुद्धिमत्तेप्रमाणेच वाणीच्या शक्तीचे जन्मजात देणे बापटांना लाभलेले आहे. त्यांची भाषणे ऐकताना त्यांच्या वाणीच्या शक्तीचा प्रत्यय येतो. पण बापटांच्या वाणीची ही शक्ती आपल्या सोळा कळांनी प्रगटते बापट कवितावाचन करताना. 
कवितेच्या रूपाने येणारा भाषेचा अनुभव हा सर्जनशील अनुभव असतो. इथे भाषा सांगून संपत नाही; ती रुजत राहते, उगवत राहते. बापटांनी वाचलेली कविता ऐकणे हा एक अलौकिक अनुभव असतो. ते र्शोत्यांसमोर कविता वाचतात तेव्हा जणू आपल्या जन्मजात प्रतिभाशक्तीने त्या कवितेच्या अस्तित्वाचा शोध घेत असतात. बापट कविता वाचू लागले की, आपण पुस्तकात किंवा मासिकात वाचलेली ही कविता छापील फासातून मुक्त होऊन चैतन्यमय उच्चार होते आहे याची सुखद जाणीव आपल्याला होऊ लागते.’
मी हा अनुभव त्यांच्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमात घेतला होता. पण आज त्यांचा र्शोता मी एकटाच होतो. मी त्यांना तसे सुचवले. एक क्षणभर विचारात पडून त्यांनी मला विचारले- ‘तुम्हाला आवडलेली माझी कविता कोणती? तीच म्हणतो.’ 
मागे मी जेव्हा प्रदर्शनाचे विचारायला गेलो होतो त्यावेळी त्यांनी त्यांच्या एका कवितेच्या काही ओळी सांगितल्या होत्या व ती कविता कुमारगंधर्व यांच्यावर आहे असे लोक म्हणतात असेही म्हणाले होते. मी त्यांना ती कविता ऐकवा असे म्हणालो. त्या कवितेचं नाव होतं ‘या एका कुमाराची कहाणी’. माझी मागणी ऐकून त्यांनाही आनंद झाला. दोन मिनिटे त्यांनी डोळे मिटले. ती शांतता एका अद्भुत अशा सादरीकरणाची नांदी होती. त्यांनी डोळे उघडले. माझा कॅमेरा तयारच होता. काव्य सुरू झाले.
‘सकाळच्या उन्हासरसे एकदा याने काय केले                                       
दिसेल त्या आकाराला सोन्याचे हात दिले                                                
टिंबा टिंबा मध्ये जसे बिंब आपले भरून ठेवले                                              
वडिलधार्‍या वडांचेही माथे जरा खाली लवले                                                   
एवढय़ामध्ये कोणीतरी कौतुकाची टाळी दिली         
तशी हा जो सावध झाला                                                                 
आपली आपण हाक ऐकून दूर दूर निघून गेला                                               
सूर्य सन्मुख सूर्यफूल एकटक तप करते                                                     
धरणीवरती पाय रोवून आकाशाचा जप करते                                                 
तसा तोही इमानदार उग्र एकाग्र झाला                                                    
तेव्हा म्हणे कोणी याला आदराचा मुजरा केला                                                
तशी हा जो तडक उठला                                                                 
मृगजळ पिण्यासाठी रानोमाळ धावत सुटला                                                   
खजुरीच्या बनांमध्ये संध्याकाळची सावली झाला                                              
तेव्हा याच्या देहावरून लमाणांचा तांडा गेला                                                
मग म्हणे कोणीतरी याच्यासाठी हाय म्हटले                                                  
तशी याने काय केले                                                                    
कोशासारखे वेढून घेतले कबीराचे सारे शेले                                                  
मीरेच्या मंदिरात मारवा होऊन घुमत राहिला                                                
कोणी म्हणतात निगरुणाच्या डोहाचाही तळ पाहिला                                             
एवढय़ामध्ये काय घडले                                                                   
महाकाळ मंदिरात सनातन डमरू झडले                                                      
कण्यामधल्या मण्यातून मल्हाराची नागीण उठली                                              
चंद्राच्या तळ्यामध्ये ओमकाराची लाट फुटली                                                   
तेव्हा म्हणे जरा कुठे कंठामधली तहान मिटली                                                
आता तसा कुशल आहे                                                                      
आता तसा कुशल आहे                                                                      
पण स्वप्नात दचकून उठे                                                                  
म्हणे माझा सप्तवर्ण शामकर्ण घोडा कुठे ?. 
त्या विलक्षण अशा अनुभूतीतून बाहेर येऊच नये असं वाटत होतं. एक अनन्य असा शब्द-सूर-छंद असा अनुभव होता तो. एका मैफलीचा आनंद. 
कविवर्यांनीच लिहिलेले शब्द मला आठवू लागले. ‘कविता ही आकाशीची वीज आहे. तिला धरू पाहणार्‍या शंभरांपैकी नव्याण्णव जणांना जळून मरणे भाग आहे. असे असले तरी कवितासेवेविषयी माझा जीव अभिलाषी आहे हे मात्र खरे. छंदाचा छंद लागला तेव्हापासून गद्य आणि काव्य यांच्या सीमारेषा पुसून टाकीपर्यंत बरीचशी वाटचाल माझ्याकडून झाली आहे. शिशुकाव्यापासून उपनिषदांपर्यंत काव्याचे सर्वच प्रकार माझ्या आवडीचे आहेत. ‘जिने मला वेडा केले’ त्या कवितेवर माझी फिर्याद नसली तरी या कामरूपिणीने बालपणापासून वार्धक्यात विसावेपर्यंत माझा हात हाती धरला आहे.’ 
खरोखरीच ‘शरदामधली पहाट आली तरणीताठी, हिरवे हिरवे चुडे चमकती दोन्ही हाती !’ असे काव्य करणार्‍या व कायम तरुणच जीवन जगलेल्या या लोकविलक्षण कविराजाला मनोमन नमस्कार !

sapaknikar@gmail.com
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)

Web Title: The memories of great Poet Vasant Bapat..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.