‘अग्निपंखी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 06:04 AM2020-04-12T06:04:00+5:302020-04-12T06:05:16+5:30
भारताचा ‘मिसाइल मॅन’ आणि नंतर देशाचे राष्ट्रपती. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कायमच एक प्रेमळ सहजता होती. ना कुठला अहंकार, ना कुठला बडेजाव. राष्ट्रपती झाल्यांनतर त्यांचे काही फोटो काढायची संधी मला मिळाली. त्या कार्यक्रमातही त्यांचा वावर सामान्य माणसासारखाच होता. त्यांना मुळातच आवड होती उत्तम शिक्षक असण्याची. त्यामुळेच पाच वर्षांच्या यशस्वी ‘राष्ट्रपती’ कारकिर्दीनंतर दुसर्याच दिवसापासून चेन्नईमधील संस्थेत विद्यार्थ्यांना शिकवायला ते रवाना झाले!
- सतीश पाकणीकर
मे महिन्याची गरम संध्याकाळ. दिवस बुधवार. सन 2003. हिंजेवाडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील एक नवीन संस्था. इंग्रजी सी आकाराच्या त्या भव्य इमारतीमधील मोकळा भाग. गर्दीने खचाखच भरलेला. पण टाचणी पडली तरी आवाज यावा अशी शांतता. मी कॅमेर्यावर टेलिफोटो लेन्स लावली आणि समोरच्या डायसवरून बोलणार्या त्या वक्त्याचा फोटो टिपण्यासाठी उभा राहिलो. स्टेज व माझ्यात बरेच अंतर होते. त्यामुळे माझी 200 एम. एम. फोकल लेन्थची लेन्सही मला कमीच पडत होती. म्हणून मी हळूहळू पुढे पावले टाकीत काही अंतरावर जाऊन थांबलो. इतक्यात मला माझ्या खांद्यावर एकदम भक्कम अशा हाताची पकड जाणवली. मी लेन्समधून बघत कॅमेर्याचे बटन दाबले आणि त्या व्यक्तीकडे त्नासिक मुद्रेने पाहिले. ती व्यक्ती सी.आय.डी. ऑफिसर होती. त्यांनी मला हाताने खूण करून मागे येण्यास फर्मावले. मी गेलो. त्यांनी काही विचारायच्या आतच मी माझ्या गळ्यातील ‘ऑल अँक्सिस’चा पास व माझे सी.आय.डी.कडूनच मिळालेले ओळखपत्न दाखवले. त्यावर त्यांनी मानेनेच होकार भरला. मी परत एकदा फोटो टिपण्यात मग्न झालो. भारताचे ‘मिसाइल मॅन’ अशी ज्यांची ओळख होती त्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे फोटो मी काही पहिल्यांदाच काढत नव्हतो. आधीच्याच वर्षी त्यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी मी त्यांचे भारतरत्न लतादीदींबरोबर फोटो काढले होते. पण त्यावेळी ते एक शास्त्नज्ञ म्हणून आले होते, तर आता ते भारताचे अकरावे राष्ट्रपती झालेले होते. त्यामुळे यावेळी अशा व्यक्तीची सुरक्षा म्हणजे काय असते त्याचा मी अनुभव घेत होतो.
या घटनेच्या महिनाभर आधी मला फिनोलेक्सचे चेअरमन र्शी. प्रल्हाद पी. छाब्रिया; ज्यांना कंपनीतील सगळे ‘पी. पी. सर’ म्हणत, यांच्याकडून निरोप आला. त्यांनी नव्यानेच सुरु केलेल्या ‘आय स्क्वेअर आय टी’ या संस्थेचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. त्याचे प्रमुख पाहुणे होते राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम. मी फिनोलेक्ससाठी औद्योगिक प्रकाशचित्नण करीत होतोच. पण त्याचबरोबर मी पी. पी. सरांची पोट्र्रेट फोटोग्राफी केलेली असल्याने त्यांनी मला या कामासाठी बोलावले होते. फिनोलेक्सचे काही महत्त्वाचे अधिकारी, पी.पी. सरांची कन्या अरुणा कटारा व स्वत: पी. पी. सर सर्व तयारीवर जातीने लक्ष देत होते. सरांची अशी इच्छा होती की मी त्यांचे राष्ट्रपतींच्या बरोबर काही फोटो काढावेत. माझ्या दृष्टीनेही हा नवाच अनुभव असणार होता. कोण्या मोठय़ा व्यक्तीचे एरवीचे फोटोसेशन आणि हा फोटोसेशन यात बराच फरक होता. एरवी प्रकाशयोजना, त्याचा कमी अधिक प्रभाव, पार्श्वभूमी, व्यक्तीची बसण्याची अथवा उभे राहण्याची जागा, पेहराव यासारख्या बाबी माझ्या अखत्यारितील असत. इथे तर त्यातील काहीच नसणार. पण मी नकार द्यायचा मुद्दाच नव्हता. कार्यक्र माची तारीख जवळ येत होती. चार दिवस आधी मला अरुणा कटारा यांचा फोन आला. त्यांनी मला माझ्या फोटोच्या दोन कॉपीज घेऊन ‘आय स्क्वेअर आयटी’ मध्ये बोलावले. तेथे आलेल्या सरकारी यंत्नणेने माझी सर्व ‘कुंडली’ मांडून घेत माझ्या हातात एक ओळखपत्न व गळ्यात घालण्यासाठी एक पास दिला. त्या संपूर्ण भागामध्ये बिनतारी संदेशवहनाच्या गाड्या, पोलीस, बॉम्ब तपासणी पथके, श्वान पथके फिरत असल्याने एखाद्या छावणीचे स्वरूप आले होते. प्रत्यक्ष कार्यक्र माच्या दिवशी किती बंदोबस्त असेल याचा विचार करीत मी तेथून निघालो.
ठरल्याप्रमाणे 28 मे 2003 रोजी कार्यक्रमाच्या दीड तास आधी मी तेथे पोहोचलो. दारावरच तपासणीचे सर्व सोपस्कार झाल्यावर मी आत पोहोचलो. मी पोहोचताच अरुणा मॅडम एकदम माझ्याकडे येत म्हणाल्या- ‘सतीशभाऊ, एक प्रॉब्लेम झालाय. ज्याला आम्ही सगळ्या कार्यक्रमाचे फोटो काढायला सांगितले होते तो आत्ता उगवलाय. त्याने आधी त्याचे स्वत:चे फोटो व माहिती न दिल्याने त्याचा फोटोपास आता बनू शकणार नाही. त्यामुळे सिक्युरिटीचे पोलीस त्याला आत सोडायला तयार नाहीत. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आता तुम्हीच सगळे फोटो काढा.’ मी फोटो टिपताना उपलब्ध प्रकाशाचा वापर करणार होतो म्हणून मी फास्ट फिल्मचे जास्त रोल्स आणले होते. तरीही नेहमीचे दहा रोल्स माझ्या बॅगेत होते. पण अशा प्रकारच्या समारंभांची फ्लॅश फोटोग्राफी मी बंद करून सात-आठ वर्षे झाली होती. पण आत्ता पर्यायही नव्हता. मी अरुणा मॅडमला म्हणालो- ‘काही हरकत नाही. माझी थोडी जास्त पळापळ होईल. मी कार्यक्रम आणि पी.पी. सर व राष्ट्रपती यांचे जास्तीत जास्त फोटो घेण्याचा प्रयत्न करीन. पण पी. पी. सरांना तुम्ही याची कल्पना दिली आहे का? तसेच सिक्युरिटीच्या प्रमुखालाही हे सांगावे लागेल. माझी आणि त्यांची आत्ता तुम्ही गाठ घालून द्या.’ मॅडमनी अर्थातच याबद्दल सरांशी बोलणे केले होते. मला बरोबर घेऊन जात त्यांनी सिक्युरिटीच्या प्रमुखाला सर्व अडचण सांगून हेच आता सर्व फोटो काढणार आहेत, यांना सहकार्य करा अशी विनंती केली.
मी कॅमेर्यात नॉर्मल 100 एएसए ची फिल्म भरली आणि तयार झालो. कार्यक्रम सुरू झाला आणि माझा कॅमेराही. त्यामुळेच मी स्टेजच्या समोरील रिकाम्या जागेत उभे राहून फोटो घेत असताना मला त्या सीआयडी ऑफिसरने हटकले होते. कारण राष्ट्रपती, पंतप्रधान अशा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या भोवती जी रिकामी जागा ठेवलेली असते, ज्याला त्यांच्या भाषेत डी झोन असे म्हणतात, त्याच्या आत कोणालाही जाता येत नाही. आणि मी तर त्यांच्यापासून काही फुटांवरून फोटो टिपत होतो. पण मुख्य अधिकार्याचीच परवानगी मी घेतली असल्याने मी निर्धास्त होतो.
इतर भाषणे झाल्यावर राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम भाषणासाठी उभे राहिले. फक्त भारताचे अकरावे राष्ट्रपती नव्हे तर संपूर्ण भारतातील आतापर्यंतचे अत्यंत लोकप्रिय राष्ट्रपती. सगळी सभाच उभे राहून त्यांना अभिवादन करीत होती. टाळ्यांचा कडकडाट होत होता. त्यांनी अत्यंत नम्रपणाने या आदराचा स्वीकार केला. आणि जणू प्रेक्षकांशी वैयक्तिक हितगुज करीत असल्याप्रमाणे आपल्या भाषणाला सुरुवात केली. ना काही कागद न हाताशी कोणता संदर्भ. दक्षिण भारतीय उच्चारांचे हेलकावे असलेले साधे स्वच्छ इंग्रजी. पण र्शोत्यांच्या हृदयाला भिडणारे. मधूनच र्शोत्यांना एखादा प्रश्न. लगेचच त्याचे हसून उत्तर. आणि खास दक्षिणी शैलीत ‘ओक्के?’ अशी विचारणा. 2003 साली भारताची पुढच्या पंचवीस वर्षांची व्हिजन असलेली ही व्यक्ती म्हटलं तर एक द्रष्टा शास्त्नज्ञ होती अन् म्हटलं तर आत कुठेतरी एक अगदी लहान मूल दडलेली व्यक्ती होती. समोरच्या समुदायात जसे अनेक मान्यवर होते तसेच डॉ. कलामांची आवडती ‘जनरेशन’ म्हणजे युवाशक्तीही होती. बोलण्याच्या ओघात त्यांनी डिस्कव्हरी, इन्व्हेंशन आणि इनोव्हेशन या संज्ञांमधील फरक बारकाईने आणि उदाहरणातून स्पष्ट केला. हे करताना ‘मी किती र्शेष्ठ’ असा कणभरही अभिनिवेश नाही की आपल्या पदाचा वृथा अहंकारही नाही. मुलांना वाटावे की आपल्याला आपले शिक्षकच वर्गात शिकवत आहेत. त्यांचे एक वाक्य माझ्या मनात आजही सुस्पष्ट कोरले गेले आहे. बोलण्याच्या ओघात ते म्हणाले होते की- ‘इमॅजिनेशन लीड्स टू क्रिएटिव्हिटी, क्रिएटिव्हिटी ब्लॉसम्स थिंकिंग, थिंकिंग प्रोव्हाइड्स नॉलेज, नॉलेज रिझल्ट्स इन इनोव्हेशन, इनोव्हेशन मेक्स द नेशन ग्रेट ! वुइ हॅव टू मेक अवर नेशन ग्रेट ! ओक्के ?’
थोड्या वेळाच्या पण अत्यंत मुद्देसूद व विचारांनी भरलेल्या त्या भाषणानंतर राष्ट्रपतींनी ‘आय स्क्वेअर आयटी’ ही संस्था देशाच्या सेवेत अर्पण करीत असल्याची घोषणा केली. या कार्यक्रमानंतर संस्थेतील वेगवेगळ्या विभागात जाऊन तेथील विद्यार्थ्यांनी केलेले वेगवेगळे प्रोजेक्ट समजावून घेत त्यांना शाबासकीची थाप देत कौतुक केले. त्या सगळ्या ठिकाणी फोटो काढताना मला जाणवले की ‘आलोच आहे म्हणून बघू’ असा त्यांचा भाव नव्हता तर प्रत्येक ठिकाणी संयमाने आणि लक्षपूर्वक ऐकत, विषय समजावून घेत ते पुढील ठिकाणी जात होते. त्यांची एक गोष्ट मात्न सर्व ठिकाणी सारखीच होती ती म्हणजे त्या त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांशी लगेच ‘कनेक्ट’ होणे. कारण त्या व्यक्तीची मुळातच आवड होती ती एक उत्तम शिक्षक असण्याची.
मुळातीलच अशी वृत्ती असल्याने भारतीय ‘स्पेस अँड मिसाइल प्रोग्रॅम’चे सर्वेसर्वा असलेली ही व्यक्ती त्यानंतरच्या पाच वर्षांच्या यशस्वी ‘राष्ट्रपती’ कारकिर्दीपश्चात दुसर्याच दिवसापासून चेन्नईमधील संस्थेत विद्यार्थ्यांना शिकवायला रवाना झाली. स्वत:चा एक लॅपटॉप, एक सुटकेस, काही पुस्तके व स्वत:चे वीणा हे वाद्य घेऊन. ‘तुम्ही कोण म्हणून सार्या जनतेच्या लक्षात राहावे?’ या प्रश्नावर त्यांचे उत्तर होते की- ‘मला, मी एक शिक्षक म्हणूनच कायम लक्षात राहावे असे वाटते.’ कदाचित हे त्यांनी अंतज्र्ञानाने जाणले असावे. कारण 25 जुलै 2007 या दिवशी ‘क्रिएटिंग ए लिव्हेबल प्लॅनेट अर्थ!’ या विषयावर शिलाँग येथील आयआयएम संस्थेत विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
अत्यंत साधी राहणी, सचोटी, व्यापक व विशाल दृष्टिकोन, समाजाच्या सर्व थरांत असलेला सहज वावर हे स्वत:च्या रक्तात भिनवलेला व ‘अग्निपंख’ नावाने आत्मनिवेदन केलेला हा महामानव म्हणूनच कविता लिहून जातो की-
‘देखो धरती को जगमग देखो
पुछो किरणों से इसका कैसा नाता है
कुछ मीठा सा छू जाता है
एक जवाब वहीं से आता है
नहीं सिर्फ ये महज रोशनी
यहाँ ग्यान का प्रकाश जगमगाता है
शांती से रोशन है जो,
वही तो धरती माता है’
sapaknikar@gmail.com
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)