एक ऋषितुल्य गुरू - पं जितेंद्र अभिषेकी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 08:46 AM2021-09-21T08:46:47+5:302021-09-21T08:47:11+5:30
पं. जितेंद्र अभिषेकी बुवा म्हणजे मराठी संगीत रंगभूमीला नवजीवन देणारे, संगीतातील नानाविध प्रकार हाताळणारे, सुरांच्या राज्यावर प्रदीर्घ अधिपत्य गाजवणारे महान कलाकार.
- रघुनाथ फडके
गुरुवर्य पं. जितेंद्र अभिषेकी बुवांचा २१ सप्टेंबर हा जन्मदिन. बुवांचा जन्म १९३२ मधला. बुवांना जाऊन जवळपास २३ वर्षे झाली. मात्र, बुवांचे नाव ऐकले किंवा घेतले की, अभिषेकी बुवा, त्यांचा सहवास आणि त्यांच्या आठवणींमध्ये अगदी रममाण व्हायला होते. आयुष्यातील तो एक सुवर्णकाळ होता, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यानिमित्ताने अभिषेकी बुवांच्या सहवासातील आठवणींना उजाळा द्यायचा हा छोटासा प्रयत्न.
अभिषेकी बुवा म्हणजे मराठी संगीत रंगभूमीला नवजीवन देणारे, संगीतातील नानाविध प्रकार हाताळणारे, सुरांच्या राज्यावर प्रदीर्घ अधिपत्य गाजवणारे महान कलाकार. संगीतकार, रचनाकार, गायक, वक्ता, विचारवंत आणि एक अलौकिक गुरू म्हणजे पं. जितेंद्र अभिषेकी बुवा. लहानपणापासून अभिषेकी बुवा आणि सुधीर फडके म्हणजेच बाबुजी यांच्या गाण्यावर अत्यंत प्रेम. अगदी दैवतच. त्यामुळे त्यांच्या गाण्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करायचो आणि अनेक स्पर्धेत पहिल्या क्रमांकाची बक्षिसे मिळवायचो. माझे प्राथमिक शिक्षण पं. रत्नकांत रामनाथकर यांच्याकडे सुरू झाले. हे सुरू असतानाच गोवा कला अकादमीची शिष्यवृत्ती मिळाली आणि पं. अभिषेकीबुवांचे शिष्यत्व लाभले. मुंबईला बुवांच्या घरी संगीत साधनेसाठी जाणे, हा माझ्या आयुष्यातील टर्निग पॉइंट ठरला. बुवांचा सहवास म्हणजे परिसस्पर्शच.
बुवांकडील गायनाच्या शिक्षणाबाबत सांगायचे झाले, तर बुवांच्या घरी पहाटे ४ वाजता तानपुरे लागायचे आणि रियाज सुरू व्हायचा. सकाळी ८ ते ११ व संध्याकाळी ३ ते ८ पर्यंत शिकवणी व रियाज सुरू असायचा. बुवांची शिकवण्याची पद्धत मला अतिशय भावली. अत्यंत कठीण किंवा जोड राग ते अगदी सोप्या पद्धतीने शिकवत. त्यामुळे रियाज करणे खूप आवडायचे. तसेच तसा कठीण राग तयार करणे आणि सादर करणे यातही एक वेगळी मजा येत असे. बुवा कीर्तन परंपरेतून संगीत क्षेत्रात आले. माझेही काहीसे तसेच झालेले. बुवांचे वडील बाळूबुवा अभिषेकी आणि माझे वडील गजानन बुवा फडके यांचे अगदी घरोब्याचे संबंध. अर्थात बाळूबुवा वयाने, अनुभवाने, मानाने आणि विद्वत्तेने फार मोठे होते. त्यांच्याबद्दल वडिलांकडून अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. अभिषेकी बुवांचे वडील कीर्तनासाठी प्रत्येक गावात चालत जात असत. केवढा मोठा हा त्याग. अशा थोर कीर्तनकारांचा विद्वान सुपुत्र म्हणजे आमचे अभिषेकी बुवा.
गुरुंबद्दल कितीही लिहिले, बोलले, तरी ते कमीच आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा असे म्हटले जाते. अभिषेकी बुवांनी शिष्यांना अमूक एक गोष्ट करू नका, ऐकू नका, असे कधीही सांगितले नाही. संगीतातील कोणताही प्रकार समजून घेण्यास किंवा त्याचा अभ्यास करण्यास अभिषेकी बुवांनी कधीही आडकाठी केली नाही. शिक्षण सुरू आहे, म्हणजे बाहेर कार्यक्रम करू नका, मैफिलींना जाऊ नका, असेही कधी म्हटले नाही. बुवा नेहमीच मुक्तहस्ते शिष्यांना, विद्यार्थ्यांना दोन्ही हातांनी देत राहिले. अभिषेकी बुवांसोबत मैफिलीत जाणे किंवा बुवांच्या मागे तंबोरा साथीसाठी बसणे म्हणजे पर्वणीच. यातून बुवांची सादरीकरणाची पद्धत, मैफील काबीज करण्याची हातोटी या सर्व गोष्टी अगदी जवळून पाहायला मिळाले. एक नेहमी जाणवायचे, ते म्हणजे मैफिलीचा विलक्षण अनुभव आणि समोर बसलेल्या रसिकांची पारख. यातून एक किस्सा आठवतोय, तो म्हणजे मध्य प्रदेशातील सतना येथील ग्रामीण भागात झालेली मैफील. कोण्या एका जाणकार व्यक्तीच्या ओळखीने बुवा तेथे गेले होते. मोकळे मैदान, उंच स्टेज, जुन्या पद्धतीची ध्वनीयोजना, एकूणच सर्व काही आनंदी आनंदच होता. मात्र, तरीही बुवांनी कोणतीही कुरबूर केली नाही. मैफिलीची सुरुवात थोड्या वेगळ्या रागेश्री रागाच्या ख्यालने केली. काही वेळानंतर श्रोत्यांमधून आरडाओरडा, गोंधळ सुरू झाला. बुवांना काही कळेना. ते क्षणभर थांबले आणि एकामागोमाग एक द्रुत बंदिशी गायला सुरुवात केली. बुवा थांबतच नव्हते. साथीदारांचीही तारांबळ उडाली. काहीवेळाने श्रोते स्तब्ध झाले. श्रोत्यांना शास्त्रीय संगीतापेक्षा हलक्या-फुलक्या बंदिशी, तराणे पसंत पडतील, हे बुवांनी नेमकेपणाने हेरले. पुढे संपूर्ण मैफील त्याप्रमाणे सादर केली. मैफील संपली आणि श्रोत्यांनी बुवांसमोर अक्षरशः लोटांगण घातले. हीच बुवांची किमया.
अभिषेकी बुवांसोबत अनेक दौरे केले. अगदी देशभर फिरलो, असे म्हणणेही उचित ठरेल. बुवांमुळे शास्त्रीय संगीतातील तसेच संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज, मातब्बर आणि गुणी कलाकारांच्या भेटीचा योग आला. केवळ निरीक्षणातून, समोरच्या कलाकारांच्या गाण्यातून, सादरीकरणातून अमूल्य गोष्टी शिकायला मिळाल्या. अशीच एक आठवण म्हणजे भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची अविस्मरणीय भेट. अभिषेकी बुवा प्रत्येक भाऊबीजेला अगदी न चुकता लता दीदींकडे जात असत. पण, १९८२ मध्ये ते दिदींकडे जाऊ शकले नाहीत. कारण त्याच दिवशी दिवाळीच्या निमित्ताने अभिषेकी बुवांचा मुंबई दूरदर्शनवर थेट कार्यक्रम प्रसारित होणार होता. हे सगळे कळताच दिदींनी तो कार्यक्रम पाहिला. त्या कार्यक्रमाला मी आणि बुवांची धाकटी बहीण तानपुरा साथीला होतो. सगळी गाणी रंगत गेली आणि त्या सर्वांवर कळस चढवला तो ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या गाण्याने. त्या कार्यक्रमात प्रा. वीणा देव यांनी घेतलेल्या मुलाखतीत बुवांनी कवी बा. भ. बोरकर यांच्याविषयी भरभरून बोलले. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे मी आणि शौनक (अभिषेकी बुवांचा मुलगा) दिदींना घेऊन बुवांच्या घरी मयूर सोसायटीमध्ये आलो. बुवांना पाहताच त्या म्हणाल्या की, काल काय जीव ओतून तू गायला आहेस. खरोखरच, प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित असल्यामुळे जीव ओतून गाणे काय असते, ते आम्हीही अनुभवले. त्या दिवशी दिदींनी बुवांना ओवाळले आणि त्यानंतर सुमारे तासभर भरपूर गप्पा झाल्या. विशेष म्हणजे त्यानिमित्ताने मला दिदींचे चरणस्पर्श करण्याचे भाग्य लाभले. हे सर्व बुवांच्या घरी राहत असल्यामुळे शक्य झाले.
अभिषेकी बुवांकडे अनेकांनी गायनाचे धडे गिरवले आहेत. काहींनी प्रत्यक्ष गुरूकूल पद्धतीने, तर काही जणांनी संगीत नाटकांच्या निमित्ताने शिक्षण घेतले. यातील एक प्रसिद्ध गोमंतकीय रंगभूमी कलाकार म्हणजे रामदास कामत. आम्ही दोघेही गोव्याचे असल्यामुळे आमच्यात घरोबा जास्त. आम्ही भेटलो की, अन्य विषयांसह बुवांचा विषय हा कायम असतोच. असेच एकदा गप्पा मारताना रामदास कामत म्हणाले की, रघुनाथ आज जो मी काही आहे, तो अभिषेकी बुवांमुळेच आहे. याचे संपूर्ण श्रेय मी त्यांनाच देतो. दुसरी गोष्ट म्हणजे गिरीजाताई केळेकर या बुवांच्या गुरू. त्यांच्या नावाने गोव्यातील फोंड्याजवळ असलेल्या फर्मागुडी येथील गोपाळ गणपती मंदिराच्या प्रांगणात आणि बाप्पाच्या आशीर्वादाने अभिषेकी बुवांनी ‘गिरिजाताई संगीत संमेलन’ सुरू केले. या संमेलनात कलाकार समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी बुवांनी माझ्याकडे सोपवली. आणि गेली ३२ वर्षे ती अखंडपणे सुरू आहे. याची खूप धन्यता वाटते.
बुवांना मानवंदना म्हणून आणि त्यांचे स्मरण सदैव रहावे, यासाठी गेली २० वर्षे ठाणे येथे ‘पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती वंदना’ कार्यक्रमाचे आयोजन मी करत आहे. या निमित्ताने बुवांचा सहवास लाभलेल्या अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार, साथीदारांचा यथोचित सन्मान करण्याचा माझा प्रयत्न असतो. या कार्यक्रमाला रसिकांचा जो उदंड प्रतिसाद मिळतो तो पाहून अभिषेकी बुवांभोवती असलेले वलय आणि त्यांनी केलेले कार्य किती अजरामर आहे, याची प्रचिती येते आणि डोळे आपोआप पाणावले जातात. बुवांसारख्या तपस्वी कलाकाराचे लवकर जाणे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. अभिषेकी बुवा गोमंतकाचे भूषण होते. शेवटी एकच म्हणेन, सर्वात्मका सर्वेश्वरातील परममंगल भाव आणि कैवल्याच्या चांदण्यातील आर्तता आपल्याला कधीही विसरता येणार नाही.
(लेखक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आणि प्रसिद्ध गायक आहेत)