‘बाई’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 06:01 AM2020-02-16T06:01:00+5:302020-02-16T06:05:11+5:30

खाँसाहेब उस्ताद अब्दुल हलिम जाफर खाँ  यांची काही प्रकाशचित्ने मी काढली होती. ती देण्यासाठी त्या दिवशी मी मुंबईला त्यांच्या घरी आलो होतो. तिथे विजयाबाई मेहतांच्या ‘हमिदाबाई की कोठी’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. तिथे आणि नंतरही त्यांच्या प्रसन्न मुद्रा मला टिपता आल्या.  काळ सरकत होता. त्यांचा सोनेरी काडीचा चष्मा,  बॉयकट केलेले, मागे वळवलेले केस आणि  अप्रतिम स्कीन कॉम्प्लेक्शन या गोष्टी  तशाच राहिल्या आहेत. फक्त आता  त्या काळ्याभोर केसांच्या जागी आलीय चंदेरी चमचम.

Memories of Vijayabai Mehata by Sateesh Paknikar | ‘बाई’

‘बाई’

Next
ठळक मुद्देबाई, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुमच्या या खेळात, या रंगलेल्या प्रयोगात आम्हा सर्वांना तुम्ही सामावून घेतलं. आमची इवलीशी आयुष्यं समृद्ध केलीत!

- सतीश पाकणीकर

मुंबईच्या माहीम दग्र्याजवळच्या त्या छोट्याशा गल्लीत मी वळलो. तीन महिन्याच्या आत मी दुसर्‍यांदा त्या गल्लीत येत होतो. कारणही तसेच होते. माझ्या कॅमेरा बॅगेत मी तीन महिन्यांपूर्वी टिपलेली खाँसाहेब उस्ताद अब्दुल हलिम जाफर खाँ यांची काही प्रकाशचित्ने होती. ती त्यांना देण्यासाठी मी आज खास मुंबईत आलो होतो. काही अंतर गेल्यावर त्यांचे घर आले. ती एक जुन्या काळी बांधलेली इमारत होती. मध्यभागी मोकळा अंगणवजा चौक व डाव्या बाजूस लाकडी जिना. पण आज तेथे जरा गर्दी दिसत होती. बरेच लोक जमून त्या इमारतीकडे उत्सुकतेने पाहत होते. गर्दीतून वाट काढत जिन्यापाशी पोहोचलो. तेवढय़ात एका माणसाने मला अडवले आणि विचारले, ‘कहाँ जाना है?’ मी त्याला सांगितले की, मला खाँसाहेबांना भेटायचे आहे. तो काही मानायला तयार होईना. त्याला मी बॅगेतून फोटोही काढून दाखवले. पण तो ढिम्म. इतक्यात आमच्या फोटोसेशनच्या वेळी हजर असलेला खाँसाहेबांचा शिष्य तेथे पोहोचला. त्याने मला ओळखले व त्या माणसाला त्याने मला सोडायला सांगितले. पुढच्याच क्षणाला आम्ही दोघेही त्या लाकडी जिन्याने वर चढू लागलो. चढता चढता मला कळले की खाँसाहेबांच्या घरात एका फिल्मचे शूटिंग सुरू आहे. मग मला गर्दीचाही उलगडा झाला.
त्या शिष्याने मला दिवाणखान्यात बसायला सांगितले व तो खाँसाहेबांना सांगायला आत गेला. शूटिंगच्या युनिटमधील काही तंत्नज्ञ तेथे ये-जा करीत होते. इतक्यात आतील कोठीच्या खोलीतून अचानकपणे माझा एक मित्न कलादिग्दर्शक श्याम भूतकर बाहेर आला. आम्ही दोघेही एकमेकांकडे बघून चकित. मी त्याला माझ्या येण्याचे कारण सांगितले आणि त्याने मला त्या फिल्मविषयी. तो त्या फिल्मसाठी कलादिग्दर्शन करीत होता. पाच मिनिटे आमचे इतर बोलणे झाले आणि आतल्या खोलीतून ‘त्या’ बाहेर आल्या. फुलाफुलांची साडी, सोनेरी काडीचा चष्मा, बॉयकट केलेले आणि मागे वळवलेले काळेभोर केस आणि अप्रतिम असे स्कीन कॉम्प्लेक्शन !
- ‘बाई’! म्हणजे साक्षात विजयाबाई मेहता समोर होत्या. त्यांच्याही चेहर्‍यावर मला पाहून प्रश्नचिन्ह अवतरले. याला येथे कोणी सोडला?. असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर मला वाचता आले; पण श्यामने पुढे होऊन मी त्याचा मित्न असल्याचे सांगितले व मी फोटोग्राफर असल्याचे सांगायलाही तो विसरला नाही. माझ्या डोळ्यांसमोरून क्षणार्धात काही काळापूर्वी पाहिलेल्या ‘वाडा चिरेबंदी’मधील दृश्यांची मालिका तरळून गेली. तो प्रयोग पाहणं म्हणजे एक रसरशीत अनुभव होता. एकेकाळी ऐश्वर्य व भरभराट अनुभवलेली धरणगावकर- देशपांडे यांची ती वास्तू, त्याच्या कर्त्या कुटुंबप्रमुखाचं नुकतंच झालेलं निधन, क्रियाकर्मासाठी वाड्यात एकत्न जमलेले ते सगळे कुटुंबीय, त्यांच्यात वडील गेल्याच्या दु:खापेक्षा इस्टेटीच्या वाटणीचा मनात घोळणारा विचार, मृत्यूच्या त्या सावटाखाली दुसर्‍या दिवशी संपत्तीची वाटणी होणार म्हणून तिजोरीतले सगळे दागिने अंगावर चढवून कंदिलाच्या प्रकाशात उभी राहिलेली ती सून आणि मागच्या भिंतीवर पडलेली तिची लांबलचक अशी सावली. ही सगळी दृश्यं जणू आत्ताच घडताहेत असा तो अनुभव. अर्थातच यामागे होती ती ‘विजया मेहता’नामक व्यक्तीची कल्पकता आणि दिग्दर्शन. आणि आत्ता प्रत्यक्ष त्याच समोर उभ्या होत्या. 
इतक्यात खाँसाहेबही आले. मी त्यांच्याकडे त्यांचे फोटो सोपवले. त्यांना ते फार आवडले. त्यांनी ते बाईंच्या हातात देताना त्या फोटोसेशनविषयीची आठवणही सांगितली आणि माझी बाईंशी ओळख करून दिली. आता ही दुहेरी ओळख झाल्यामुळे व मी काढलेले फोटो बाईंनाही आवडल्याने मी रिलॅक्स झालो. मी तेथे थांबून शूटिंगचे काही फोटो काढले तर चालतील का असं त्यांनाच विचारलं. त्यांनी होकार दिला. खरं तर मी फक्त खाँसाहेबांना फोटो देण्यासाठी आलो होतो; पण आता माझ्या पोतडीत अजून एका अनुभवाची भर पडणार होती. चित्नपटाच्या शूटिंगच्या अनुभवाची.
त्या फिल्मचे नाव होते ‘हमिदाबाई की कोठी’ आणि साल होते 1985-86. साधारण पंधरा ते वीस जणांची ती टीम होती; पण सगळ्यांचं वागणं एकदम एकच कुटुंब असल्यासारखं. माझ्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकेका फ्रेममधून काव्यात्म अनुभव देणारे सुप्रसिद्ध असे कॅमेरामन ए.के. बीर हे ती फिल्म शूट करीत होते. ज्यांच्या नुसत्या निरीक्षणातूनही बर्‍याच गोष्टी शिकायला मिळतील असे कॅमेरामन. अशोक सराफ, भारती आचरेकर, नीना कुलकर्णी, सुहास पळशीकर, सुनील रानडे, जनार्दन परब, प्रदीप वेलणकर असे सर्व कलाकार त्या कुटुंबाचे घटक होते आणि अर्थातच त्यांच्या सगळ्यांच्या कुटुंबप्रमुख म्हणजे ‘बाई’!
पुढच्या दृश्याची तयारी सुरू झाली होती. कॅमेरामन बीर कॅमेर्‍याचा अँगल व प्रकाशयोजना करण्यात गढून गेले. सत्तार, बहारवाला, शब्बो व सईदा यांचा एकत्रित असा तो प्रसंग. एकाच थाळीत ते सर्व जेवण करीत आहेत असा. कमीत कमी वेळेत प्रकाशयोजना करून व एक रिहर्सल घेऊन बाईंनी थोड्याच वेळात तो प्रसंग चित्रित केला. प्रतिभावान दिग्दर्शक किती किमान सूचना देऊन आपल्याला पाहिजे तसे हावभाव कलाकारांकडून काढून घेऊ शकतो याचं ते अप्रतिम उदाहरण होतं. मी ते अनुभवत होतो अन् बरोबरच मधूनच फोटोही टिपत होतो.
आता विनय म्हणजे प्रदीप वेलणकर कोठीच्या पायर्‍या चढून येतानाचे दृश्य चित्रित करायचे होते. सिनेमाची ही एक अजब गंमत आहे की कोणतेही दृश्य कोणत्याही वेळी चित्रित करून मग त्याचे संकलन करता येते. प्रसंग मागे पुढे शूट झाले तरी काही बिघडत नाही. बैठकीच्या खोलीबाहेरच्या गच्चीतून कॅमेरा खाली पाहत होता. अंगणातून जिन्याकडे पॅन होत होत मग जिन्यातून समोरून असा कॅमेरा हलणार होता. पायजमा-झब्बा व खांद्याला शबनम या वेशातला विनय म्हणजे प्रदीप वेलणकर हे अंगणाच्या दुसर्‍या बाजूस जाऊन उभे राहिले. बीर यांनी कॅमेर्‍याला डोळा लावला आणि त्यांच्या लक्षात आले की शूटिंग पाहायला ज्या लोकांनी गर्दी केलीय ते सर्व कॅमेर्‍याच्या ‘फील्ड’ मध्ये येत आहेत. त्यांना आता ऐन शॉटच्या वेळी बाजूला करायचे ही मोठी कठीण गोष्ट असणार होती. खालच्या माणसाने गर्दी हटवली.      ‘अँक्शन’.. ‘कॅमेरा रोलिंग’ घोषणा झाली. आणि इतक्यात गर्दीतील कोणीतरी परत मध्ये आला. ‘कट. कट.’ पुन्हा घोषणा. असे तीन-चार वेळेला झाले. ए. के. बीर यांच्यासारख्या कसलेल्या कॅमेरामनलाही त्या गर्दीतील काही लोक चकमा देत होते. गर्दीला कोण आवर घालणार? हा प्रश्न होता. काम अडत होते. बाईंना हे कळले. त्या गच्चीत आल्या. एकूण परिस्थिती त्यांनी जाणून घेतली. मग त्या बीर यांना हळूच म्हणाल्या, ‘बीर, तू फ्रेम लावून तयार राहा. मी गर्दीचे काय करायचे ते बघते.’ प्रदीप वेलणकर परत आपल्या ठरलेल्या जागेवर पोहोचले. कॅमेरा तयार झाला. 
बाईंनी युनिटमधल्या तीन-चार जणांना खालच्या अंगणात; पण वेलणकर जिथे उभे होते त्याच्या विरुद्ध बाजूस जाऊन उभे राहायला सांगितले. त्याही गच्चीच्या दुसर्‍या टोकाला जाऊन उभ्या राहिल्या. तेथून वाकून त्या खालच्या लोकांना सूचना करायला लागल्या. आता दिग्दर्शिकाच कोणाला तरी सूचना करतीय म्हटल्यावर गर्दीने आपला मोहरा तिकडे वळवला. तिथे काहीतरी शूटिंग होणार आहे, असा देखावा करण्यात बाई यशस्वी झाल्या होत्या. ए.के. बीर तिकडे तयारच होते. त्यांनी एकाच टेकमध्ये प्रदीप वेलणकरांचे दृश्य यशस्वीपणे पूर्ण केले. अगदी छोटीशी अडचण होती; पण अनुभवी दिग्दर्शक अशा अडचणीवरही आयत्यावेळी कसा मार्ग काढतो याचा प्रत्यय सर्वांनाच आला होता. बाई मोठय़ा का आहेत हे अशा छोट्या छोट्या प्रसंगांतून सगळे अनुभवत होते.
दुपारी जेवणाची सुट्टी. सगळं युनिट अंगणात जमा झालं. लाकडी टेबल-खुर्ची. कामामधील मधल्यावेळचा निवांतपणा. आधीच्या कामाचं अवलोकन आणि पुढच्या दृश्यांची जुळवाजुळव. त्याबद्दल चर्चा. आणि मला त्यात बाईंच्या काही मुद्रा मिळाल्याचा आनंद.
पुढेही अनेक कार्यक्रमात त्यांच्या प्रसन्न मुद्रा मला टिपता आल्या. काळ सरकत होता. त्यांचा सोनेरी काडीचा चष्मा, बॉयकट केलेले, मागे वळवलेले केस आणि अप्रतिम असे स्कीन कॉम्प्लेक्शन या गोष्टी तशाच राहिल्या आहेत. फक्त आता त्या काळ्याभोर केसांच्या जागी आलीय चंदेरी चमचम.
1951 साली विल्सन कॉलेजच्या स्नेहसंमेलनात झालेल्या ‘मी उभा आहे’ या प्रयोगापासून ते अगदी ‘नागमंडल’ या 1993 सालच्या प्रयोगापर्यंतच्या बाईंच्या प्रवासाचा विचार करायचा झाला तर त्याला ‘बहुआयामी’ अशीच उपमा द्यावी लागेल.
एकदा दूरदर्शनवर झालेल्या त्यांच्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, ‘मी नाट्यक्षेत्नात का रमले याचं एक साधं कारण मला गवसलं. मराठीत नाटकाच्या प्रयोगाला ‘खेळ’ म्हणतात. हिंदीत ‘खेल’ म्हणतात. इंग्रजीमध्ये नाटकाला ‘प्ले’ म्हणतात तर र्जमन भाषेत म्हणतात ‘श्पील’ म्हणजे खेळच ! या खेळात सहभाग सर्वांचा. – कलाकार, लेखक, दिग्दर्शक, नटसंच आणि अर्थातच प्रेक्षकही. या खेळाला लय आणि ताल जीवनातील भाव-भावनांचा, मूर्त-अमूर्ताचा, सत्य-असत्याचा.’
बाई, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुमच्या या खेळात, या रंगलेल्या प्रयोगात आम्हा सर्वांना तुम्ही सामावून घेतलं. आमची इवलीशी आयुष्यं समृद्ध केलीत!

sapaknikar@gmail.com                                
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)

Web Title: Memories of Vijayabai Mehata by Sateesh Paknikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.