बाबूजी जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 06:00 AM2018-11-25T06:00:00+5:302018-11-25T06:00:02+5:30
निवडणुका जवळ आल्या की, बाबूजींची आठवण काँग्रेसवाल्यांना होणारच. आता तर, घमासान लढाई आहे. अशा या लढाईत बाबूजी हवेच होते. ‘एकटा राहिलो तरी चालेल, कॉँग्रेसचाच झेंडा खांद्यावर घेऊन उभा राहीन’ - अशी जाहीर भूमिका घेणारे बाबूजीच !!
- मधुकर भावे
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ‘लोकमत’ समूहाचे संस्थापक-संपादक
जवाहरलालजी दर्डा यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने...
बाबूजींचा आज स्मृतिदिन.
बघता बघता एकवीस वर्षं झाली. या कालावधीत देशाने चार निवडणुका पाहिल्या. १९९९, २००४, २००९ आणि २०१४. परवा अखिल भारतीय कॉँग्रेसच्या महाराष्ट्र निवडणूक निरीक्षक श्रीमती सोनल पटेल मुंबई आणि महाराष्ट्रात विविध शिबिरे घेण्यासाठी आल्या होत्या, तेव्हा त्यांच्याशी चर्चेचा योग आला. गप्पांमध्ये बाबूजी म्हणजे जवाहरलालजी दर्डा यांचा विषय निघाला. बाबूजींची आठवण निघाली नाही असे क्षण एकवीस वर्षात क्वचितच असतील. निवडणुका जवळ आल्या की, बाबूजींची आठवण कॉँग्रेसवाल्यांना होणारच. आता तर, घमासान लढाई आहे. अशा या लढाईत बाबूजी हवेच होते.
तो काळ अशाच घमासान लढाईचा होता. आता जशी कॉँग्रेस पराभूत झाली आहे तशी त्यावेळी म्हणजे १९७७ साली कॉँग्रेस पराभूत झाली होती. खुद्द इंदिराजी पराभूत झाल्या होत्या. संजय गांधी पराभूत झाले होते. त्यावेळच्या पराभवात कॉँग्रेस मनातून हादरली नव्हती उलट पराभव झाल्या दिवसापासून नव्या जिद्दीने कॉँग्रेस नेते आणि कार्यकर्ते हिमतीने उभे राहिलेले दिसत होते.
बरोबर चाळीस वर्षांपूर्वीची परिस्थिती आज जशी न तशी आहे. फरक आहे तो काही महत्त्वाच्या तपशिलांमध्ये. कॉँग्रेसचा घट्ट विचार घेऊन ठाम उभे राहणाऱ्या नेत्यांची आज वानवा आहे. ‘हारे तो क्या हुआ... फिर जीत जाऐंगे’ हा निर्धार व्यक्त करणाºया इंदिराजी आणि त्यांच्या विचाराचा झेंडा खांद्यावर घेऊन लढणारे त्यावेळचे नेते - त्यात महाराष्ट्रात बाबूजी आघाडीवर होते- आज प्रकर्षाने आठवतात. त्यावेळच्या पराभवानंतर इंदिराजी तडक आल्या होत्या विदर्भात. नागपुरात. बाबूजींच्या घरी. तेथूनच त्यांची पवनार यात्रा सुरू होणार होती. पराभव झालेल्या नेत्याच्या मागे लाखो लोक उभे आहेत हे त्याच दिवशी दिसले. इंदिराजींचा निर्धार त्याच दिवशी व्यक्त झाला. ही सगळी महासंघर्षाची तयारी बाबूजींनी केली होती. इतिहास कसा घडतो त्याचे हे टप्पे आहेत. ते दिवस आज आठवतात...
इंदिराजी पवनारला रवाना होण्यापूर्वी नागपुरात बाबूजींच्या घरी आल्या. तिथे छोटी न्याहरी घेऊन पुढे निघायचे होते. कॉँग्रेसचे तरु ण नेते श्री. रणजीतबाबू देशमुख यांनी त्यांची लाल रंंगाची अद्यावत कार इंदिराजींकरिता तयार ठेवली होती. बाबूजी काही बोलले नाहीत. न बोलताच त्यांनी ‘लोकमत’ची एक साधी जीप फुलांनी शृंगारून तयार ठेवली होती. बाबूजींचा राजकीय अंदाज होता की, विनोबाजींना भेटायला जाताना इंदिराजी रणजीतबाबूंच्या कडक गाडीत बसणे पसंत करणार नाहीत. ऐनवेळी घोळ नको म्हणून बाबूजींनी तयार ठेवलेली जीपच इंदिराजींनी इतक्या सहजपणे स्वीकारली... आजही इंदिराजींचे ते वाक्य आठवते आहे. त्या म्हणाल्या होत्या,
‘ये गाडी ठीक रहेगी...’
- आणि झटकन त्या जीपमध्ये चढल्या.
सोबत जांबुवंतराव धोटे होते. जांबुवंतरावांसारख्या जहाल लोकनेत्याला कॉँग्रेसच्या प्रवाहात आणण्याचे जे काम झाले, त्यात बाबूजींची राजकीय युक्तीच कामाला आली होती, हे आज कितीजणांना माहिती असेल? १९८० साली नागपूर शहरातून लोकसभेचे कॉँग्रेसचे उमेदवार जांबुवंतराव धोटे होते आणि या उमेदवारीची शिष्टाईसुद्धा बाबूजींच्या मार्फतच झाली होती हेसुद्धा अनेकांना माहीत नसेल.
नागपूरचे एकच तिकीट नव्हे!
१९८०च्या लोकसभा निवडणुकीतील विदर्भातली जवळपास सर्व तिकिटे इंदिराजींनी बाबूजींच्या शब्दानुसारच दिली होती याचा मी साक्षीदार आहे. १९८०च्या निवडणुकीची घोषणा व्हायच्या अगोदर, निवडणुकीची रणनीती काय असावी याच्या चर्चेसाठी इंदिराजींनी दिल्लीला एक बैठक बोलावली होती. या बैठकीला त्यांनी निवडक लोकांना बोलावले होते. त्यात बॅ.अंतुले, वसंतराव साठे, आंध्रचे गुंडुराव, लोकसभेतले विरोधी पक्षनेते सी.एम. स्टिफन, राजस्थानचे मुख्यमंत्री जग्गनाथ पहाडीया आणि जवाहरलालजी दर्डा. त्याही बैठकीचा मी साक्षीदार आहे. ती मुख्य बैठक होण्यापूर्वी बाबूजींची वेगळी भेट इंदिराजींनी घेतली आणि प्रचाराची रणनीती ठरवली. जनता पक्षाच्या राजवटीत सामान्य माणूस तारेच्या कुंपणात फसला असून, त्याला इंदिराजी हात देऊन बाहेर काढत आहेत असे एक अर्कचित्र बाबूजी सोबत घेऊन गेले होते. सर्वांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर इंदिराजींनी बाबूजींकडचे ते अर्कचित्र सगळ्यांना दाखवले आणि सर्वसहमतीने तेच मान्य झाले. पुढे सर्व देशभर सर्व भाषेत तेच चित्र झळकले. डिसेंबर अखेर आणि १९८०च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होऊन जनतेने इंदिराजींना पुन्हा सत्तेवर बसवले.
इंदिराजींची पंतप्रधानपदी निवड झाली १२ जानेवारी १९८०ला. त्यादिवशी त्या एवढ्या गडबडीत होत्या, व्यस्त होत्या; पण आठवण ठेवून त्यांनी बाबूजींना बोलावले. एवढेच नव्हे तर वेळात वेळ काढून ‘लोकमत’साठी त्यांनी विशेष मुलाखतही दिली. निवडणूक प्रचार दौºयात मुंबईतल्या सभेत त्यांनी जाहीरपणे सांगून टाकले होते,
‘विदर्भ मे मै लोकमत के हथियारसे लड रही हूॅँ...’
आज पंतप्रधान मोदी कॉँग्रेसच्या ज्या चार पिढ्यांचा उल्लेख करीत आहेत त्यातल्या तीन पिढ्यांशी म्हणजे पंडितजी, इंदिराजी आणि राजीवजी- यांच्याशी बाबूजींचा थेट संबंध आला. कॉँग्रेसचा विचार बाबूजींनी कधीही सोडला नाही. एवढेच नव्हे तर १९९५साली महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार पराभूत झाले, तेव्हा या एकाच नेत्याने ठामपणे जाहीर केले होते, ‘एकटा राहिलो तरी चालेल, काँग्रेसचाच झेंडा खांद्यावर घेऊन उभा राहीन’.
आज या सगळ्या घटनांची आठवण होते.
विदर्भात बाबूजी म्हणतील त्या व्यक्तीला उमेदवारी दिली गेली. चिमूरमधून उमेदवार नव्हता. बाबूजींनी ‘लोकमत’च्या सेवेतले त्यावेळचे लढाऊ विलास मुत्तेमवार यांना उमेदवारी देऊन खासदार केले. पुढे ते पाचवेळा खासदार झाले आणि एकदा राज्यमंत्री झाले. अमरावतीतून ‘लोकमत’चे प्रतिनिधी प्रकाश चौधरी यांच्या पत्नी उषाताई चौधरी यांना उमेदवारी मिळाली, त्या पाचवेळा खासदार झाल्या. भंडाऱ्यातून केशवराव पारधी हे खासदार झाले. चंद्रपूरची तर गंमत आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार राजे विश्वेश्वरराव यांच्याविरोधात कॉँग्रेसजवळ उमेदवार नव्हता. जनता पक्षाचे चंद्रपूर जिल्ह्याचे त्यावेळचे अध्यक्ष शांताराम पोटदुखे यांना कॉँग्रेसमध्ये घेऊन चंद्रपूरचे तिकीट दिले गेले आणि ते चारवेळा खासदार झाले आणि एकदा अर्थखात्याचे राज्यमंत्री झाले. त्यांचे कॅबिनेट मंत्री होते डॉ. मनमोहन सिंह. यवतमाळमधून सदाशिवराव ठाकरे बाबूजींचे खास मित्र होते.
आणखी एक गोष्ट आठवते. त्यावेळचे काँग्रेसचे ‘सेक्रेटरी जनरल’ (हे पद त्यांच्याकरिताच निर्माण केले होते) हेमवंतीनंदन बहुगुणा यवतमाळला बाबूजींच्या घरी आले. पुढे लोकसभेचे अध्यक्ष, देशाचे गृहमंत्री झालेले शिवराज पाटील यांचा कॉँग्रेस प्रवेश बाबूजींनी त्यांच्या यवतमाळच्या घरात करून घेतला हे कितीजणांना माहिती असेल?
पंचवीस वर्षे बाबूजींच्या सोबत राहिलो. एका राजकीय अधिष्ठानावर बाबूजी जगले. विचाराची आणि जगण्याची फारकत त्यांनी कधी होऊ दिली नाही. त्यांच्यातले मोठेपण महाराष्ट्राला कळले नाही असे मला वाटते. कोणी कसाही वागला तरी आपण खालच्या पायरीवर उतरू नये ही त्यांची भूमिका राहिली. आपण वरच्या पायरीवर उभे राहावे. नेहमी राष्ट्रीय विचार करावा, अशी त्यांची दृष्टी होती. त्यामुळे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असलेले वसंतराव नाईक यांना राजकीयदृष्ट्या सोडताना बाबूजींची घालमेल झाली तरी, बाबूजी निर्णयापासून दूर झाले नाहीत.
या सगळ्यामागे बाबूजींच्यामधले माणूसपण फार मोठे होते. छोट्यातल्या छोट्या माणसांशी ते इतके समरस व्हायचे की, छोट्या माणसालाही त्यामुळे संकोच वाटावा. परिवाराची दु:खे त्यांनी वाटून घेतली. पंचवीस वर्षात बाबूजींच्या तोंडून मी कधीही अपशब्द ऐकला नाही. कोणत्याही नेत्याबरोबर कितीही मतभेद झाले तरी, त्या नेत्याबद्दल वावगा शब्द त्यांनी कधी उच्चारला नाही. मंत्रिमंडळात सतरा वर्षे राहिले. पण राजकारण आणि पत्रकारिता याची भेसळ त्यांनी होऊ दिली नाही.
इंदिराजींचे आणि बाबूजींचे ॠणानुबंध घट्ट होते; पण पत्रकारितेमध्ये हा स्नेह त्यांनी कधीही येऊ दिला नाही. त्याचे असे झाले की, श्रीमती सीमाताई साखरे या ‘लोकमत’मध्ये ‘मधुमालती’ हे महिलांच्या प्रश्नांवरचे सदर चालवीत असत. इंदिराजी आणि मेनका गांधी यांच्यात कौटुंबिक मतभेद निर्माण झाले आणि मेनकाजींनी घर सोडले. या घटनेवर ‘मधुमालती’मध्ये सीमातार्इंनी कडक लेख लिहिला. शीर्षक होते ‘सुनेला बाहेर काढणारी खाष्ट सासू’! त्यावेळी मी संपादक होतो. मी इंदिराजी आणि मेनका यांच्या छायाचित्रांसह तो लेख प्रसिद्ध केला.
लेख प्रसिद्ध झाला, त्याच दिवशी त्याची झेरॉक्स प्रत इंदिराजींच्या टेबलावर कोणीतरी पोहोचवली (त्यांचे नाव मला माहीत आहे) श्री. फोतेदार यांच्याकडून बाबूजींना फोन आला. मॅडमनी बोलावल्याचे त्यांनी सांगितले. बाबूजी भेटीला गेल्याबरोबर इंदिराजींनी त्यांच्यासमोर लेखाची प्रत ठेवली. बाबूजी शांतपणे म्हणाले,
‘मॅडम, मेरे साथ अलग अलग विचारधारा रखनेवाले लोग काम करते है, उनका अपना नजरिया होता है, आपने इसे इतनी गंभीरता नही लेना चाहिए...’
एका क्षणात इंदिराजी म्हणाल्या, ‘ठीक है, कोई बात नही..’
दिल्लीहून परत आल्यावर सीमाताई बाबूजींना भेटायला गेल्या. म्हणाल्या, ‘माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला’. बाबूजी एका क्षणात म्हणाले, ‘ताई, तुम्ही तुमचे काम करत राहा. माझी चिंता करू नका..’
बाबूजी सांगायचे, लोकमत हे वृत्तपत्र अकरा महिने लोकांबरोबर असते,
आणि निवडणूक आली की एक महिना पक्षाबरोबर !
विजयबाबू, राजनबाबूंना एक नम्र सांगणे आहे. निवडणूक जवळ आली आहे, बाबूजी देत असलेला तो महिना तुम्हीही द्या, महाराष्ट्राचे चित्र पालटेलच, देशाचेही चित्र पालटेल, एवढी ताकद लोकमतमध्ये आहे...’
(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आहेत)
manthan@lokmat.com