जिन्हें नाज़ है हिंद पर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:04 AM2019-09-15T06:04:00+5:302019-09-15T06:05:10+5:30
काळाच्या कायम पुढे असलेले प्रख्यात उर्दू कवी आणि गीतकार साहिर लुधियानवी यांच्या हस्ताक्षरातील पत्ने, डायर्या, कविता व छायाचित्ने नुकतीच मुंबईतील एका भंगाराच्या दुकानात सापडली. तीन दशकांपूर्वी या दुनियेतून एक्झिट घेतलेला साहिर भंगारात टाकायच्या लायकीचा झालाय? खरं तर सांप्रदायिकतेच्या भयावह माहोलात आज एक नाही तर अनेक साहिर आपल्याला हवे आहेत.
- लीना पांढरे
एक सुरेल कहाणी ऐकली होती. हृदयविकाराच्या झटक्याने अचानक गझलसम्राज्ञी बेगम अख्त़र अल्लाहला प्यारी झाली आणि ही खबर समजल्यावर लखनऊमधील एक भंगार विकणारा माणूस ऊर फुटून ढसढसा रडला. अख्तर अचानक जाण्याचा दर्द त्याला साहवला नाही आणि त्याने आपले जीवन संपवलं.
भंगारवाल्याची ही कहाणी आठवायचं कारण असं की, नुकतीच वर्तमानपत्नात एक बातमी झळकली. प्रख्यात उर्दू कवी आणि गीतकार साहिर लुधियानवी यांच्या हस्ताक्षरातील पत्ने, डायर्या, कविता व छायाचित्ने मुंबईतील एका भंगाराच्या दुकानात सापडली. एका संस्थेने फक्त तीन हजार रुपयांमध्ये हा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी विकत घेतला. हे परविरदगार, तेरा लाख-लाख शुक्रिया की, या भंगारवाल्यांना हा लखाखत्या सोन्याचा खजिना सापडला आणि त्यांनी तो सांभाळला.
तीन दशकांपूर्वी या दुनियेतून एक्झिट घेतलेला साहिर भंगारमध्ये टाकायच्या लायकीचा झालाय का? सांप्रदायिकतेचा भयावह माहोल लक्षात घेता आज एक नाही तर अनेक साहिर आपल्याला हवे आहेत. शोषणाच्या विरोधात खडे होणारे आणि धर्मनिरपेक्षतेचा नारा देणारे प्रगतिशील लेखक, कवी, विचारवंत यांचा आवाज आज क्षीण होतो आहे?. ‘जिन्हें नाज़ है हिंद पर वो कहां है?’ असं विचारणारा प्यासा सिनेमातील कवी विजयला याद करण्याची आपल्याला आज सक्त जरूरत आहे.
ये फुलों के गजरे,
ये पीको के छींटे,
ये बेबाक नजरे,
ये गुस्ताख फिकरे,
ये ढलके बदन
और ये बीमार चेहरे
जिन्हें नाज़ है हिंद पर
वो कहां है?
‘धूल का फूल’ या चित्नपटात साहिरचं एक गीत आहे,
‘तू हिंदू बनेगा
न मुसलमान बनेगा,
इन्सान की औलाद है
इन्सान बनेगा.’
‘फिर सुबह होगी’ या चित्नपटातील गीतामध्ये त्याचा दुर्दम्य आशावाद झळकतो.
जिस सुबह की खातिर
जुग-जुग से हम सब
मर-मरकर जीते है..
इन भूखी प्यासी रु हों पर
इक दिन तो करम फर्माएगी
वो सुबह कभी तो आएगी..
‘प्यासा’मधील कवी विजयचं गीत पुरोगामी साहिरची कैफियत होती..
ये दुनिया,
जहां आदमी कुछ नही है
वफा कुछ नही,
दोस्ती कुछ नही है
जहां प्यार की कद्र ही
कुछ नहीं है
ये दुनिया अगर
मिल भी जाए तो क्या है !
साक्षात जन्मदात्याने अव्हेरलेला, तलाकशुदा अम्मीसोबत दरबदर ठोकरे खात लुधियाना, दिल्ली, लाहोर, मुंबई असं वणवणत राहिलेला, फाळणीच्या वणव्यात होरपळलेला, गरिबीचे चटके सोसलेला साहिर आपल्या मेहबूबाला सांगतो की, यमुनेच्या किनार्यावरील त्या संगमरवरी ताजमहालाच्या छायेत तो तिला कदापी भेटणार नाही कारण.
इक शहनशाहने
दौलत का सहारा लेकर
हम गरिबों की मोहब्बत का
उड़ाया है मजाक !
मेरे मेहबूब,
कहीं और मिला कर मुझसे.
साहिर-अमृताची मोहब्बत की दर्द भरी दास्तां, स्वत: अमृताने ‘अक्षरों के साये’ या आत्मकथेत बयान केलेली आहे. ज्योतिषाने अमृताला तिच्या कुंडलीत कालसर्प योग सांगितला होता; पण असंही म्हटलं होतं की हा कालसर्पयोग तुमच्यासाठी छत्नयोग ठरेल; तुम्हाला शुभ फल प्रदान करेल. तेव्हाच अमृताने खूणगाठ बांधली की, उभं आयुष्य आता सर्पफण्याच्या सावलीतच जगायचं आहे.
लाहोर, अमृतसर या दोन शहरांच्यामध्ये प्रीतनगर हे छोटंसं गाव आहे. या गावात उर्दू, पंजाबी मुशायरांचा कार्यक्रम एका संध्याकाळी होता. महफिल रंगात आलेली असतानाच पाऊस बरसू लागला होता. मुशायरा संपला आणि मुशायरातील सहभागी दहा-पंधरा लोक बसस्थानकाकडे जायला निघाले.
दाटून आलेली संध्याकाळ होती. झिरमिरता पावसाचा पडदा तर मधेच सोनेरी ऊन. सार्या हवेलाच पावसाचं अत्तर लागलं होतं. ऋतूने टोना केला होता. साहिरच्या कवितांनी मुग्ध झालेली अमृता त्याच्यासह चालत होती. त्या कलत्या संध्याकाळच्या उन्हातून चालत जाताना साहिरची लांब सावली पडली होती. स्तब्धपणे साहिरच्या सावलीत अमृता चालत होती. दूरवरील झाडांतून वारा वाहताना पानांची होणारी सळसळ फक्त ऐकू येत होती.
अमृता म्हणते, ‘माझ्या आणि साहिरमध्ये फक्त मौनाचा रियाज होता; मौनातूनच लेखणीने कागदावर नक्षत्नांची गीतं उमटू लागली. पतझडीने पाण्यात झरणार्या पानांसारखी.’
अमृता पुढे म्हणते, पत्थर व चुना पुष्कळ होता. त्यातून जमिनीच्या चिमुकल्या तुकड्यावर भिंती उभ्या केल्या असत्या तर आमचं घर झालं असतं. पण तसं घडलं नाही. पत्थर व चुना वाटांवर पसरत गेला आणि आम्ही दोघे तमाम उम्र त्या वाटा तुडवत राहिलो. वाटा कधी बदलत राहिल्या तर कधी एकमेकांना चिरत गेल्या. कधी वाटा गुमनाम होत राहिल्या तर कधी एकमेकांच्या गळ्यात पडणार्या वाटा पाठमोर्या होऊन लुप्त पावत गेल्या. कधी वाटा चकित होऊन थबकल्या, तर कधी त्यावर चालणारी पावलं..
लाहोरमध्ये असताना साहिर अमृताच्या घराजवळ येत असे. कोपर्यावरील दुकानापाशी थांबून एखादं पान घेत असे किंवा सिगारेट शिलगावत असे. तिथून अमृताच्या घराची खिडकी त्याला दिसायची. तो तासन्तास खिडकीकडे पहात तिष्ठत उभा राहात असे, जसा जॉन किट्स आपल्या प्रियेची एखादी परछाई दिसेल म्हणून हिमवर्षावात तिच्या घराच्या फाटकाजवळ थांबून राहायचा. त्यातूनच साहिरने स्वप्न पाहिले असेल की,
‘तेरे घर के सामने
एक घर बनाऊंगा
दुनिया बसाऊंगा
तेरे घर के सामने.’
‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया’, म्हणणार्या कलंदर साहिरला अमृतापासून जुदा व्हावं लागलं तेव्हाही त्यांनं सांगितलं,
कल तुमसे जुदा हो जाऊंगा
जो आज तुम्हारा हिस्सा हूं.
या अधुर्या अफसान्यानंतर साहिरसाठी सार्या वाटा बंद होत गेल्या. संधिप्रकाशाची करकरीत भूतवेळ मनात जागे करणारे त्याचे आर्त शब्द होते.
कहीं ऐसा न हो,
पांव मेरे थर्रा जाये
और तेरी मरमरी बाहों का
सहारा न मिले
अश्क बहते रहें
खामोश सिहय रातों में
और तेरे रेशमी आंचल का
किनारा न मिले.
मुंबईच्या सिनेसृष्टीने साहिरला पैसा, शौहरत सबकुछ बहाल केलं. पण अमृतापासून बिछडलेला साहिर अंतर्यामी सतत जळत होता. साहिर-अमृता यांचे प्रेम सफल झालं नाही. पण एक सुंदर वळण, कलाटणी देऊन तो दर्दभरा अफसाना साहिरनं संपवला.
जो अफसाना जिसे
अंजाम तक लाना न हो मुमकिन
उसे इक खूबसूरत मोड देकर
छोडना अच्छा
चलो एक बार फिर से
अजनाबी बन जाये हम दोनो.
pandhareleena@gmail.com
(लेखिका साहित्याच्या अभ्यासक असून, इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत.)