पुरुष, स्त्रिया आणि फुलके

By admin | Published: November 28, 2015 06:33 PM2015-11-28T18:33:52+5:302015-11-29T14:50:27+5:30

पुरुष जीव तोडून काही सांगतात, तेव्हा स्त्रियांनी थोडं लक्ष देऊन ऐकायला काय हरकत आहे, नाही का?

Men, women and herbs | पुरुष, स्त्रिया आणि फुलके

पुरुष, स्त्रिया आणि फुलके

Next
आधुनिक स्त्रीच्या वाटेत असलेले अडथळे यशस्वीपणो ओलांडण्याची ‘इल्म’ जाणून असलेल्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्त्रियांना एकत्र आणून दरवर्षी एका नव्या चर्चेला व्यासपीठ देणारी ‘लोकमत विमेन समीट’. या परिषदेचं पाचवं सत्र नुकतंच पुण्यात संपन्न झालं. या सत्रदरम्यान प्रामुख्याने रंगली ती दोन सत्रं. देशातल्या तरुण पिढीची भाषा जाणून असणारे लोकप्रिय, बेस्ट सेलर लेखक चेतन भगत आणि ख्यातनाम अभिनेत्री, सामाजिक विचारवंत आणि कार्यकर्ती शबाना आझमी. त्या दोघांशी झालेल्या संवादाचा अंश या अंकात!
 
        
 
चेतन भगत
 
शाळा कॉलेजात असताना घरच्यांना माझ्याकडून फार अपेक्षा नव्हत्या. माझं घर फारच पारंपरिक विचारांचं, जुन्या वळणाचंच होतं. मी फारफार तर एखादा एस.टी.डी. बूथ टाकीन आणि घरगृहस्थी चालवण्याइतपत तरी कमाई करीन ही माझ्याबद्दलच्या स्वप्नांची परमावधीच होती. वडिलांना तर वाटे, या मुलाला इतपत जमलं तरी पुरे! पण त्या अडनिडय़ा वयात माझ्या आईने माझ्यावर विश्वास ठेवला. मी माझ्या आयुष्यात एस.टी.डी. बूथहून बरं काही करू शकतो, याची खात्री तिला कशी कोण जाणो, पण होती. तिच्यामुळेच मी पुढे आयआयएममध्ये गेलो, आणि पुढे इथवर आलो.
‘फाईव्ह पॉइंट समवन’ हे माझं पहिलं पुस्तक. त्याचा ड्राफ्ट घेऊन मी किती प्रकाशन संस्थांचे उंबरठे ङिाजवले, आणि किती नकार पचवले. शेवटी रूपा या प्रकाशन संस्थेत मला माझी एडिटर भेटली, ती स्त्रीच! तिला आवडलं ते लेखन. मग तिनेच माझ्या प्रवासातले अडथळे दूर केले.
माझी पत्नी अनुषा. मी कॉर्पोरेट जगातली बडी नोकरी सोडून पूर्णवेळ लेखक होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तीच माझ्या पाठीशी होती. तिने नोकरी करून घराची जबाबदारी उचलली नसती, तर हा बिनभरवशाचा मार्ग मी कधीही निवडू शकलो नसतो.
माझ्या इथवर पोचण्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला एका स्त्रीनेच हात दिला आहे. आज माझ्या ऑफिसमध्येही सर्वच स्त्रिया आहेत.
- इतकी जबरी पार्श्वभूमी असताना, स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी असतात, या रडगाण्याला माझ्या विचारात कसं स्थान असेल?
- ते नाहीच!
आजूबाजूला नुसतं बघितलं तरी हे कळेल. त्यासाठी वाद-प्रतिवादांचीही काही गरज उरलेली नाही. स्त्रियांच्या समानतेच्या लढय़ाला माझा पाठिंबाच आहे हे खरं, पण एक नक्की. समानता म्हणजे स्त्रियांनी पुरुष बनणं नव्हे! या दोघांमध्ये जसे शारीरिक फरक आहेत, तसे मानसिक क्षमता आणि स्वभाववैशिष्टय़ांचे, क्षमतांचेही फरक आहेत. या फरकांचा विचार आणि सन्मान करणं मला महत्त्वाचं वाटतं.
स्त्रियांनी स्वत:च्या हक्कांबाबत जागरूक असणं, आग्रही असणं आणि प्रसंगी त्याकरता विरोध पत्करून लढे उभारणंही स्वाभाविकच आहे. पण या लढय़ात स्त्रियांना पुरुष बनावंसं वाटतं, तेव्हा मोठी चूक होते, हे नक्की! 
आज आपण ज्या व्यवस्थेत राहतो आहे, ती व्यवस्था पुरुषांनी बनवलेली आहे. मनुष्यजातीचा गेल्या पाच हजार वर्षाचा इतिहास पाहिला तर त्यावर पुरुषांचं वर्चस्व स्पष्ट दिसतं. आधुनिक जगही त्याला अपवाद नाही. ठरावीक चौकटीतच बसवलेले कामाचे तास, साप्ताहिक सुटी या गोष्टी पुरुषांनी त्यांच्या सोयीने ठरवलेल्या आहेत. एक घर असेल, घरापासून तीन तासांवर एका इमारतीत ऑफिस असेल, तिथे रोज सकाळी नऊ वाजता पोचावं लागेल ही चौकट ठरवताना निर्णयप्रक्रियेत एखादी स्त्री असती, तर तिने या अशा करकचलेल्या नियमावल्या मुळातच मोडून काढल्या असत्या. आज आता लग्न झालेल्या, मुलांना जन्म देऊन वाढवणा-या स्त्रिया या चक्रात मुकाट फिरतात, कारण त्यांना घराबाहेर पडून काम करू देणारी ती एकच व्यवस्था आहे. आता यात बदल घडवले आहेत ते तंत्रज्ञानाने. घरी बसून ऑफिसचं काम करणं, फ्लेक्झी अवर्स हे पर्याय आज वापरले जाऊ लागले आहेत. उद्या कदाचित एकच काम (म्हणजे नोकरी) दोन स्त्रियांनी त्यांच्या सोयीने वाटून घेऊन करणं (यात अर्थात पुरुषही आले) हेही शक्य होऊ शकेल.
पण या झाल्या प्रॅक्टीकल गोष्टी.
स्त्री चळवळीला त्यापेक्षा नेहमीचे वाद-प्रतिवाद जास्त महत्त्वाचे वाटतात. म्हणून मग माङयासारख्या पुरुषाने काही वेगळी बाजू मांडण्याचा नुसता प्रयत्न केला, तरी मग मला सगळीकडून शिव्या बसतात.
‘कॉकटेल’ नावाच्या एका सिनेमात स्वतंत्र, आधुनिक तरुणीची भूमिका करणारी दीपिका पदुकोन नायकाचं मन जिंकून घेण्यासाठी फुलके करायला शिकते असं दाखवलं होतं. ते बघून आलेल्या वैतागात मी एक लेख (फुलकामेकर) लिहिला होता. फुलके करता येणं म्हणजेच स्त्रीत्वाची इतिकर्तव्यता आहे का? - असा प्रश्न करणा:या त्या लेखानंतर मला सगळ्यात जास्त शिव्या खाव्या लागल्या. म्हणजे गरमागरम फुलके करावे तर ते बाईनेच असं म्हटलं तरी (पुरुषाला) मार. आणि फुलके करण्याच्या कौशल्याला काय असं सोनं लागलंय, म्हटलं तरी पुन्हा शिव्याच? 
या पारंपरिक भांडणातून बाहेर पडणं जरुरीचं आहे स्त्रियांनी आणि पुरुषांनीही! समानतेचा आग्रह जरूर धरावा, पण स्त्रियांनी पुरुष बनण्याचा वेडा हट्ट करू नये असं मला प्रामाणिकपणो वाटतं. स्त्रियांना घर सांभाळायचं आहे की करिअर करायचं आहे, की दोन्ही करायचं आहे असा चॉईस विचारला जातो, त्याची चर्चा होते तेव्हा मी म्हणतो, पुरुषांना कुणी विचारतं का असा चॉईस?
मग ते स्त्रियांच्या बाबतीत तरी का असावं? तिला जे करायचं आहे, ते करण्यासाठी तिला मोकळीक असावी आणि मुख्य म्हणजे घराबाहेरची कामं करताना घर सांभाळण्यासाठी, मुलं वाढवण्यासाठी तिला सहभाग आणि इतर पूरक व्यवस्था मिळाव्यात. ही खरी समानता आहे, असं मला वाटतं. माझी बायको एका मोठय़ा बॅँकेत मोठी ऑफिसर आहे. आणि हो, तिला आजही फुलके बनवता येत नाहीत. पण म्हणून काही बिघडत नाही.
 
पुरुषांचे पाच सल्ले
समानतेच्या लढाईत स्त्रियांनी दिलेले सल्ले पुरुषांना नेहमीच ऐकावे लागतात. पुरुषांना ती संधी क्वचितच मिळते. मी आज ती संधी घेतो. मला अतीव प्रिय असलेल्या स्त्रियांसाठी माझे पाच सल्ले :
 
1 चढाओढ आणि तुलना 
स्त्रिया एकमेकींशी फार तुलना करतात आणि एकमेकींना सतत ओचकारत असतात, हे काही बरं नाही. दुसरीची जाडी, साडी, दागिने, नवरा, नोकरी - प्रत्येक गोष्टीवर त्यांची बारीक नजर असते. साधा ढगळ ब्लाऊज असो नाहीतर फिस्कटलेला एखादा पदार्थ, एकमेकींच्या चुका काढण्यात यांना फार रस असतो आणि वेळही. नात्यातली चढाओढ तर आणखीच तीव्र! त्यावर तर सिरियल्सचा बाजार इतका तेजीत चालतो. आधीच त्यांच्या वाटय़ाला इतकी मोठी लढाई असताना त्या एकमेकींशी इतक्या चढाओढीने वागून नवे ताण का निर्माण करतात हे मला खरंच उमगत नाही. आज स्वत:चे समाजात स्थान निर्माण करणा:या महिलाच एकमेकांचे पाय ओढताना, लढताना दिसून येतात. हे चुकीचे असून, ते बदलण्याची आवश्यकता आहे.
 
 
2 मन मारणं
यात स्त्रिया फार माहीर. इतरांना नव्हे, स्वत:ला फसवणं, सतत झाकाझाक करणं, पटलं नसलं तरी वरवर पटल्यासारखं दाखवणं, स्पष्ट न बोलणं, नीट नकार न देणं, मन मारून पुरुषाचा इगो सांभाळण्यासाठी धडपडत राहणं, योग्य वेळी नेटका विरोध न करणं.. कशाला हे सगळं?
 
3 पैशापेक्षा नाती महत्त्वाची!
कादंबरीत किंवा सिरीयलमध्येच शोभणारी ही डायलॉगबाजी. स्त्रिया त्याला फार सहज बळी पडतात. माहेरची असो वा सासरची, संपत्ती आणि पैशाच्या व्यवहारात काटेकोर असणं स्त्रियांनी आतातरी शिकायला हवं.  संपत्तीमधला समान हक्क स्त्रियांनी इतक्या सहजासहजी सोडून देता कामा नये. त्यासाठी वेळप्रसंगी वडील, भाऊ, पती यांचा दबाव झुगारला पाहिजे. 
 
4 स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षा
- या गोष्टी पूर्ण करण्यासाठी झगडण्याऐवजी त्या अपु:या राहिल्या म्हणून झुरत बसण्यातच स्त्रियांची शक्ती खर्ची पडताना मी पाहतो. असं का असावं? 
 
5 नात्यांची मिसळ आणि मेलोड्रामा
नात्यागोत्यांची जपणूक महत्त्वाची खरीच, पण त्यासाठी स्त्रियांनी किती जीव आटवावा? किती स्वप्नं मारावीत? किती तडजोडी कराव्यात? किती खस्ता खाव्यात?
मुलगी, बहीण, पत्नी, सून, आई म्हणून इतरांशी असलेली नाती महत्त्वाची खरीच, पण स्वत:शी असलेलं नातं? 
- त्याचा स्त्रियांना फार चटकन विसर पडतो.
असं होता कामा नये, नाही का?
 
 
  शब्दांकन : राहुल कलाल

 

Web Title: Men, women and herbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.