आनंद ऑर्डर करण्यासाठी मेन्यू कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 06:00 AM2021-05-30T06:00:00+5:302021-05-30T06:00:05+5:30

हे घ्या एक मेन्यू कार्ड! यातली कुठलीही एक भावना निवडा, की आनंद आलाच समजा तुम्हाला भेटायला!

Menu card to order pleasure.. | आनंद ऑर्डर करण्यासाठी मेन्यू कार्ड

आनंद ऑर्डर करण्यासाठी मेन्यू कार्ड

Next
ठळक मुद्देमन प्रसन्न ठेवायला हवं, आनंदी आणि हसमुख असायला हवं; पण ते जमत नाही. याची अनेक कारणं आहेत.

-डॉ. राजेंद्र बर्वे

‘तुला काय होतं सांगायला की, मनात होकारात्मक भावना ठेवायला? म्हणे मन करा रे प्रसन्न!’- एका डॉक्टर मित्राच्या फोनवरचा हा संवाद. ‘तू खूप रागावला आहेस आणि तावातावानं बोलतो आहेस, हे लक्षात येतंय माझ्या. त्यामुळंच तुला मन प्रसन्न ठेवायला हवंय!’-मी शांतपणे उत्तरलो.

‘मला सांग या होकारात्मक भावना म्हणजे काय रे भावा?’- त्याच्या स्वरात त्रागा होता.

मी थोडा गप्प राहिलो. मग म्हणालो ‘हे बघ, तुझ्या रागामागे, चिडचिडण्यामागे दु:ख आहे, निराशा आहे, तुला असहाय वाटतंय, ते माझ्यापर्यंत पोहोचलं आणि मीही थोडा व्यथित झालो. कारण तू माझा मित्र आहेस, उमदा गडी आहेस. रसरशीतपणे जगण्याची धडपड करतो आहेस, तो मित्र मला हवाय परत. म्हणून श्वासाचा पॉज घेतला आता! तर तुझ्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न एकदम मस्त आणि थेट आहे. ‘होकारात्मक भावना म्हणजे काय रे भावा?’

तो थोडा विसावला असावा. म्हणाला ‘म्हणजे मी तसे टीव्हीवरचे हसण्याचे कार्यक्रम बघतोही! हसतो पण मोठ्यानं. पण ते भाव टिकत नाहीत रे!’- मित्रहो, ही सगळ्यांचीच तक्रार आहे. मन प्रसन्न ठेवायला हवं, आनंदी आणि हसमुख असायला हवं; पण ते जमत नाही. याची अनेक कारणं आहेत. एक म्हणजे शाळेतल्या शिक्षकांपासून पालकांपर्यंत सगळे सांगतात, ‘आनंदाने जगा’ पण ते कसं हे कोणीही शिकवत नाही! आनंदी राहणं हे कौशल्याचं काम असतं, हे कोणीच सांगत नाही. दुसरं म्हणजे आनंदी राहणं, मन प्रसन्न राखणं ही गोष्ट आपण निवडायची असते. म्हणजे दु:ख, निराशा, दिशाहीन वाटणं, हे सुरक्षितता शोधण्याचे मनाचे स्वयंचलित इशारे आहेत. आपल्या सहज उपजत प्रतिक्रिया आहेत. या भावनांना अगदी घट्ट ‘वेल्क्रो’ चिकटपणा असतो, तर आनंदीपणा, प्रसन्नता या भावनांना निवडून पकडून ठेवायचं असतं; हे लक्षातच येत नाही.

- आपण आनंदी का नाही? हा प्रश्न विचारून- विचारून अधिकच दु:खी होतो. मित्रहो, कपड्यांच्या दुकानात आपण किती बारकाईनं सर्व पाहतो. हवा तो रंग, पोत, किनार, पदर निवडून घेतो. तशाच होकारात्मक भावना निवडता येतात. आपल्याला मॅच होणाऱ्या भावना आपोआप कशा मिळतील?

यापुढं मी तुमच्यासमोर होकारात्मक भावनांचं एक मेन्यू कार्य ठेवतो. यातली हवी ती भावना घ्या, सर्वांचा ‘भाव’ एकच... मनाची प्रसन्नता!

आमच्याकडं प्रत्येक होकारात्मक भावनेबरोबर विनोद बुद्धी फ्री मिळते. तिच्याशिवाय जीवन रुचकर होत नाही.

एकनिवडा, बाकीचेआनंदआमचेयेथेफुकट!

) मजाकरणे : मोठमोठ्या पार्ट्या, परदेशी प्रवास इत्यादी गोष्टी सध्या वर्ज्य. घरात राहून मस्त आवडती गाणी ऐकणं, त्या तालावर हवं तर कसंही मनसोक्त नाचणं. सगळ्यांनी एकदम नाचल्यास विशेष धमाल येते.

) खुशराहणं : रोज सकाळी आरशात बघून मी मस्त दिसत आहे, हसलो तर फारच छान दिसतो; असं आरशाला सांगायचं. दिवसातून दहा-बारा वेळा सांगावं. कारण आरसा विसराळू असतो.

) अभिमानबाळगणं : अभिमान वाढवण्याकरता व्यायाम आवश्यक. शरीर मस्तपैकी तयार होतं, बाहू फुरफुरतात... आहे की नाही मस्त बॉडी’ असं म्हणण्यासाठी रोज २०-३० मिनिटं व्यायाम करणं ही अट आहे.

) हसणं, हसवणं : आपण हसायचं असल्यास निर्भेळ विनोद सांगायला सुरुवात करा. कुचेष्टा करणाऱ्या, टोमणे मारणाऱ्या व्हॉटस्‌ॲप विनोदांना मज्जाव आहे. मनाला गुदगुल्या करणारे विनोद. बेस्ट म्हणजे स्वत:वर हसलात, तर सगळ्यांनाच गंमत वाटते.

) मनातराग, चिंता, काळजी : या अशा भावना धान्याबरोबर मिळणाऱ्या खड्यांसारख्या असतात. त्या खड्यांशी आपण भांडत नाही, निवडून- निवडून फेकून देतो आणि मगच बासमती तांदळाचा सुगंधी पुलाव करतो!

) सहसंवेदनआणिसाहाय्य : दुसऱ्याचं दु:ख, वेदना आणि निराशा पाहून आपल्या मनातही तशाच भावना दाटून येतात. स्वाभाविकच आहे. अशावेळी ‘पॉज’चं बटन वापरा. दहा-वीस दीर्घश्वास घ्या, हलके- हलके सोडा, त्या उच्छ्‌वासावाटे ते भाव विरून जातात. मग लगेच मदतीचा हात पुढे करा. बिनस्पर्शाची मिठी मारा आणि आपल्या होकारात्मक भावना वाटून टाका.

) आशाबाळगणे : बदल हे एकच कायम टिकणारे वास्तव असते. हे दिवसही जाणारच आहेत, हे म्हणा.

) कृतज्ञता : ही भावना सर्वांत प्रभावी! आपल्या जमेची बाजू ठळक दिसते.

) प्रेम : हाच तो अडीच अक्षरी शब्द- प्रेम म्हणजे दुसऱ्याची कदर त्याचा अवकाशाचा आदर आणि सर्वस्वी स्वीकार.

सध्या यातली एक होकारात्मक भावना निवडलीत तरी त्यावर उरलेल्या मोफत आणि शिवाय विनोद बुद्धीचा बोनस!

(ख्यातनाम मनोविकारतज्ञ)

drrajendrabarve@gmail.com

Web Title: Menu card to order pleasure..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.