मीटूनं दिलेलं आपल्याल्या कळलं का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 07:15 AM2018-11-18T07:15:12+5:302018-11-18T07:20:01+5:30
वेळीच अन्यायाला विरोध करणं आणि विरोध करूनही तो थांबत नसेल तर कायद्याचा आधार घेणं या दोन गोष्टी महिलांना वेळीच जमणंही गरजेचं वाटतं.
- गोरक्ष काळे, नाशिक
समाजात घडणारी कोणतीही चळवळ ही समाजाला एक दृष्टी आणि भान देत असते. ‘मीटू’ चळवळीनेही हे भान प्रत्येकाला दिलंय असं वाटतं. ‘मंथन’मधील असीम सरोदे यांचा ‘मीटूनंतर काय?’ हा लेख वाचताना या गोष्टीची जाणीव प्रकर्षाने होत होती.
मीटूचं वादळ आलं. आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडाला. पण आता वादळाचा जोर ओसरल्यावर पुढे काय, हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्याच मनात आहे. असीम सरोदे यांनी त्याचं उत्तर लेखातून दिलंय. पण तरीही सामान्य माणूस त्याच्या त्याच्या पातळीवरही खूप काही करू शकतो. प्रत्येकानं (इथे पुरुषच म्हणायचं आहे.) आपल्या दृष्टिकोनावर काम करून बघितलं तर. हा दृष्टिकोन फक्त कामाच्याच ठिकाणी बदलून चालणार नाही. तो घरातल्या महिलांच्या बाबतीतही बदलायला हवा. म्हणजे कामाच्या ठिकाणी पुरुषांना महिलांशी समानतेनं आणि आदरानं वागण्याचे विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत. महिलांच्या बाबतीत आदर बाळगणं ही पुरुषांच्या बाबतीत सवयीची गोष्ट होईल असं वाटतं. अर्थात स्त्री-पुरुष समानता याबद्दल खूप बोललं जातं. पण ही गोष्ट किती अवघड आहे हे मीटूने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट वाटते ती ही की स्त्रीनं घरीदारी आपल्यावर झालेल्या अन्यायाला त्वरित वाचा फोडणं गरजेचं आहे. पूर्वी आवाज उठवल्यावर काय होईल, अशी भीती स्त्रियांना होती; पण आता जर स्त्रीच्या म्हणण्यात तथ्यं असेल तर समाज, कायदा हे तिच्यापाठीमागे भक्कमपणे उभे राहू शकतात. म्हणूनच वेळीच अन्यायाला विरोध करणं आणि विरोध करूनही तो थांबत नसेल तर कायद्याचा आधार घेणं या दोन गोष्टी महिलांना वेळीच जमणंही गरजेचं वाटतं.
कुटुंब हा समाजाचा घटक. कुटुंबातूनच समाज घडतो. अवघा समाज बदलणं हे केवळ अशक्य. पण बदलाची ही सुरुवात कुटुंबातून नक्की होऊ शकते. मुलांची जडणघडण होत असताना त्यांचा मुलींविषयीचा दृष्टिकोन संवादातून तपासणं, त्यावर वेळोवेळी चर्चा होणं या छोट्या छोट्या गोष्टीही मोठा परिणाम करू शकतात असं वाटतं.
बदल आपोआप होत नसतो. तो कोणी त्रयस्थ व्यक्ती किंवा व्यवस्था करत नसते. त्या बदलाचे पाईक आपल्या प्रत्येकालाच व्हावं लागतं. मीटूनं याचं भान पुन्हा एकदा करून दिलं आहे.