सजग स्वमग्नता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 06:01 AM2018-11-25T06:01:00+5:302018-11-25T06:05:02+5:30
गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी माइण्डफुलनेस थेरपीचा उपयोग होऊ शकतो, असे संशोधनातून समोर येते आहे.
- डॉ. यश वेलणकर
मानसिक आरोग्याचे तीन निकष जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केले आहेत; त्यातील तिसरा निकष अन्य व्यक्तींशी संपर्क साधून नाते जोडता येणे हा आहे. आॅटिझम म्हणजे स्वमग्नता हा त्रास असलेली व्यक्ती हेच करू शकत नाही.
या मिरर न्युरॉन सिस्टीमची प्रथम जाणीव माकडाच्या मेंदूवरील संशोधन करतानाच झाली. एखादी कृती प्रत्यक्ष करीत नसतानादेखील केवळ ती पाहिल्याने त्याचे प्रतिबिंब म्हणून मेंदूतील ज्या पेशी सक्रि य होतात, त्याच पेशी प्रत्यक्ष ती कृती करतानादेखील सक्रि य असतात. म्हणूनच मेंदूतील या पेशींना मिरर न्युरॉन असे नाव मिळाले. या पेशी माणसाच्या मेंदूतही असतात हे नंतर सिद्ध झाले.
मेंदूतील निरनिराळ्या भागात अशा पेशीचे जाळेच असते. मेंदूतील वाचा केंद्राशी संबंधित भागात त्या मोठ्या प्रमाणात असतात. या पेशी बोलायला शिकण्यासाठी महत्त्वाचे कार्य करीत असतात. आपले पहिले बोल आपण आईचे अनुकरण करीतच शिकत असतो, ते या मिरर न्युरॉनमुळेच. आपण चार-पाच जण गप्पा मारत बसलेलो असताना एकाला जांभई आली की सर्वांनाच जांभया येऊ लागतात तेदेखील मिरर न्युरोन्समुळेच. आॅटिझम हा विकार असणाऱ्या मुलामध्ये मिरर न्युरोन्स सिस्टीम विकसित होत नाही. हा आजार असणाऱ्या व्यक्तीना चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातील भावना ओळखता येत नाहीत, त्यांना दुसऱ्याची जांभई पाहून जांभई येत नाही.
अगदी लहानपणी म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षापासून या आजाराची लक्षणे दिसू लागतात. तिसऱ्या वर्षानंतर निश्चित निदान करता येते. हा आजार पूर्णत: बरा होत नसला तरी रुग्णाला काही कौशल्ये शिकवून त्याचा त्रास कमी करता येतो.
- अशी कौशल्ये शिकवताना माइण्डफुलनेस थेरपीचा उपयोग होऊ शकतो. या मुलात पहिले लक्षण जाणवते ते म्हणजे त्यांना ऐकू येते; पण ती बोलत नाहीत. एखादाच शब्द बोलतात, त्यांना स्वत:ची वाक्ये तयार करता येत नाहीत. ही मुले एकेकटेच खेळणे पसंत करतात, त्यांना हाक मारली तरी प्रतिसाद देत नाहीत. शाळेत जाऊ लागल्यानंतर ती गतिमंद आहेत असे लक्षात येऊ लागते. माणसाचे सुरुवातीचे बरेचसे शिक्षण अनुकरणातून होते. असे अनुकरण करणे शक्य होत नसल्याने ही मुले मागे पडतात.
‘तारें जमीन पर’ या हिंदी सिनेमातील इशान तुम्हाला आठवत असेल. त्याला डिस्लेक्सिया होता. असा त्रास असेल त्यावेळी मुलाला लेखन, वाचन नीट जमत नाही. स्वमग्नतेपेक्षा हा त्रास वेगळा असला तरी काही मुलात हे दोन्ही त्रास असू शकतात. कारण या दोन्ही त्रासांचे मूळ मेंदूत असते. बाह्य माहितीवर प्रक्रि या करणारी मेंदूतील केंद्रे अविकसित राहिल्याने असे होते. या आजारावर कोणतीही औषधे फारशी उपयोगी ठरत नाहीत. पण मानसोपचारामुळे त्यांचा त्रास कमी होऊ शकतो.
माइण्डफुलनेस थेरपीमधील काही कौशल्ये ही मुले शिकली तर त्यांचे अटेन्शन सुधारते, दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधताना येणारा तणाव कमी होतो, असे काही संशोधनात दिसत आहे.
नेदरलॅण्डमध्ये झालेल्या अशाच एका प्रयोगात आठ ते एकोणीस वर्षे वयाच्या पंचेचाळीस स्वमग्न मुलाना आणि त्यांच्या पालकांना माइण्डफुलनेस थेरपी दिली गेली. प्रत्येक आठवड्यात दीड तास हे सर्व जण एकत्र येऊन माइण्डफुलनेसचा सराव करीत होते. यामध्ये श्वासाची सजगता, शरीराकडे लक्ष देणे, शरीराच्या सजग हालचाली यासारखे नेहमीचे प्रकार होतेच; पण सजग संवाद हे एक विशेष ट्रेनिंग होते. त्याचबरोबर रूटीन कार्यक्र मात अचानक बदल घडवणे म्हणजे ट्रेनिंगची खोली अचानक बदलणे, मुलांच्या ठरलेल्या जागा बदलणे आणि या बदलांमुळे येणाºया तणावाला सजगतेने सामोरे जाणे असे ट्रेनिंगही होते. रोज घरी सजगतेचा सराव पालक आणि मुले यांनी एकत्र बसून करायचा, मन वर्तमानात आणण्याची एकमेकांना आठवण करायची, रोजच्या अधिकाधिक कृती सजगतेने करायच्या आणि रोजचा अनुभव डायरीत लिहायचा असा होमवर्क देखील होता. नऊ आठवडे असा सराव झाल्यानंतर या मुलांची आणि यांच्या पालकांची पुन्हा तपासणी केली. त्यानंतर दोन महिन्यांनी आणि पुन्हा एक वर्षांनी तपासणी करून मुले आणि पालकांमध्ये झालेले फायदे नोंदवले.
ही थेरपी सुरू करण्यापूर्वी केलेल्या तपासणीत आणि थेरपी पूर्ण झाल्यानंतर केलेल्या मुलांच्या तपासणीत त्यांच्यातील संवाद साधणे, भावनिक संतुलन आणि कृतीची सजगता या तीन गोष्टी सुधारल्याचे स्पष्ट झाले. हा परिणाम एक वर्ष झाल्यानंतरही दिसून आला. सर्वात जास्त फायदा मुलांच्या पालकांना झाला. त्यांचा मानसिक तणाव खूप कमी झाला, परिस्थितीचा स्वीकार करून आवश्यक ती कृती करण्याचे त्यांचे कौशल्य आणि त्यांच्या मुलांशी असलेले त्यांचे वागणे अधिक परिणामकारक झाले.
आपल्या देशात सध्या स्वमग्न मुलांवर उपचार करणारी केंद्रे खूप कमी आहेत. एक सामाजिक उपक्र म म्हणूनदेखील माइण्डफुलनेस थेरपिस्ट अशी केंद्रे सुरू करू शकतात, अशी केंद्रे असतील तेथे जाऊन पालक आणि मुले यांना माइण्डफुलनेसचे ट्रेनिंग देऊ शकतात. त्यामुळे गतिमंद मुलांचे आयुष्य अधिक सुखकर होईल, त्यांच्यातील सुप्त कौशल्ये विकसित होऊ शकतील. तारे जमीन पर केवळ सिनेमात न राहता प्रत्यक्षात दिसू लागतील.
माकडे आणि मिरर न्युरॉन
1 तुम्हाला ती माकडे आणि टोपीविक्या यांची गोष्ट आठवते आहे का? टोपीविक्याच्या टोप्या माकडानी पळवल्या आणि आपापल्या डोक्यावर घातल्या. आता त्या टोप्या परत कशा मिळवायच्या याचा विचार करीत असताना टोपीविक्याला एक कल्पना सुचली. त्याने आपल्या डोक्याची टोपी काढून खाली फेकली.
ते पाहून माकडानीदेखील त्यांच्या डोक्यावरच्या टोप्या काढून खाली टाकल्या.
2 ही नक्कल करण्याची कृती माकडांच्या मेंदूतील मिरर न्युरॉन सिस्टीममुळे होते.
3 माकडाच्या मेंदूत असते तशीच मिरर न्युरॉन सिस्टीम माणसाच्या मेंदूतही असते. त्यामुळेच आपण बोलायला शिकतो, दुसऱ्याच्या भावना समजू शकतो आणि प्रत्यक्ष खेळात सहभागी न होतादेखील तो खेळ पाहून आनंद घेऊ शकतो.
4 सिनेमातील शोकात्म दृश्य पाहताना रडू येते, हे आपल्या मेंदूतील मिरर न्युरोन्समुळेच होते.
5 ही सिस्टीम दुबळी असेल तर त्या व्यक्तीमध्ये स्वमग्नता हा आजार असतो असे मेंदू तज्ज्ञांना वाटते.
(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)
manthan@lokmat.com