लातूर भूकंपात वाचलेली मिरॅकल बेबी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 06:20 AM2018-09-30T06:20:12+5:302018-09-30T06:20:12+5:30

30 सप्टेंबर 1993. बरोब्बर 25 वर्षांपूर्वी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील भूकंपात जवळपास 52 गावे जमीनदोस्त आणि सुमारे दहा हजार लोक मृत्युमुखी पडले होते. मात्र त्या विध्वंसातही एक हास्य फुललं होतं..

Miracle Baby in Latur earthquake! | लातूर भूकंपात वाचलेली मिरॅकल बेबी!

लातूर भूकंपात वाचलेली मिरॅकल बेबी!

googlenewsNext

-धर्मराज हल्लाळे


धरणीकंपाने उद्ध्वस्त झालेल्या मंगरूळमध्ये सहाव्या दिवशी शोधकार्य सुरू होते. सात फूट मातीचा ढिगारा बाजूला केला जात होता. जमीनदोस्त झालेल्या 52 गावांतील बचाव कार्यात पाच-सहा दिवसांनंतर कोणी जिवंत सापडेल, ही आशाच मावळली होती. त्याचवेळी ढिगा-यात मातीने माखलेली दीड वर्षांची प्रिया सापडली. लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी यांनी तिला अलगद बाहेर काढले. आयुष्याची दोरी बळकट असलेल्या चिमुकल्या प्रियाने स्वत:च्या चेह-यावरची माती स्वत:च दूर केली अन् ‘पाणी’ हा शब्द उच्चारला.

भूकंपानंतर सहाव्या दिवशी सापडलेली प्रिया जवळगे ही ‘मिरॅकल बेबी’ म्हणून त्यावेळी चर्चेत आली. ती पहाटे सापडल्याने तिच्याच नावावर ‘गुडमॉर्निंग प्रिया’ (जी.एम. प्रिया) हे रुग्णालय दापेगावला सुरू झाले. 
आज 25 वर्षांनंतरही भूकंपाच्या कटु आठवणी प्रियाच्या मनात घर करून आहेत. त्यावेळी आई-वडील बचावले होते. परंतु, तिच्याच घरातील काका, काकू, आत्या, त्यांची मुले अशा एकत्र कुटुंबातील नऊ जण दगावले होते. व्यंकटराव जवळगे आणि त्यांच्या पत्नीला आपली दीड वर्षांची मुलगी दिसत नव्हती. घराचा ढिगारा बनला होता. शोधाशोध केली. पाच दिवस उलटले, तरी पत्ता लागत नव्हता. सर्वांनीच आशा सोडली होती. मात्र व्यंकटराव हिंमत हारले नव्हते. मुलीचा शोध घ्या म्हणत होते. बचावकार्यासाठी आलेल्या लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी यांनीही मग काही जवान सोबत घेतले. श्वान पथकास पाचारण केले. जवळगे यांच्या घराचा परिसर खोदण्यास सुरुवात केली. सात फूट मातीचा ढिगारा उपसला. आश्चर्य म्हणजे प्रिया जिवंत होती! 
प्रिया जवळगे या आता शिक्षिका बनल्या आहेत. दापेगावमध्येच एका खासगी शाळेत त्या शिकवतात. नांदूरगा येथील गोपाळ शिंदे यांच्यासमवेत त्यांचा विवाह झाला. शिंदे सध्या सातारा येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. प्रियाचे वडील वर्षभरापूर्वी वारले. आई सोबत आहे. प्रियाला भूकंप आठवत नाही. परंतु, आईने सांगितलेल्या वेदनादायी आठवणी आजही प्रियाची सोबत करतात.

 

जीवनदात्याबरोबरची  अनोखी भेट.

1993च्या भूकंपात बचावकार्यासाठी सैन्यही किल्लारी परिसरात दाखल झाले होते. लेफ्टनंट कर्नल बक्षी हे मदतकार्यासाठी मंगरूळला होते. त्यांनी प्रियाला वाचवले तेव्हा ती दीड वर्षांची होती. तिचे वडील म्हणाले, तुम्ही आमच्यासाठी देवमाणूस होऊन आलात. त्यावेळी बक्षी म्हणाले, हा माझा फोटो ठेवा, ती मोठी झाल्यावर तिला याबद्दल सांगा. आपल्याला जीवनदान देणा-या व्यक्तीची भेट व्हावी, अशी प्रियाची इच्छा होती. त्यांच्याच गावातील एक जवान दयानंद जाधव सैन्यात होता. योगायोगाने त्याची बक्षी यांच्याशी भेट झाली. बक्षींनाही तो प्रसंग आठवला. 24 वर्षांनंतर 13 ऑगस्ट 2017 रोजी ते प्रियाच्या गावी आले. त्यावेळी प्रिया, त्यांची आई आणि बक्षी या सा-याच्या डोळ्यांत पाणी होते!. 

(लेखक लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत उपवृत्त संपादक आहेत.)

dharmraj.hallale@lokmat.com

 

Web Title: Miracle Baby in Latur earthquake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.