फेसबुकवरील पोस्टला राजकारण समजणे गाढवपणा

By संदीप प्रधान | Published: April 10, 2023 09:18 AM2023-04-10T09:18:11+5:302023-04-10T09:18:41+5:30

व्हर्च्युअल आणि रिअल अशा दोन प्रतलांवर वावरण्याच्या सध्याच्या काळात राजकारण हेही दोन्ही पातळ्यांवर लढले जाते.

Mistaking Facebook posts for politics | फेसबुकवरील पोस्टला राजकारण समजणे गाढवपणा

फेसबुकवरील पोस्टला राजकारण समजणे गाढवपणा

googlenewsNext

व्हर्च्युअल आणि रिअल अशा दोन प्रतलांवर वावरण्याच्या सध्याच्या काळात राजकारण हेही दोन्ही पातळ्यांवर लढले जाते. सोशल मीडियावर विरोधी पक्षाच्या धोरणांवर, नेत्यांवर, आंदोलनांवर टीका-टिप्पणी करण्याकरिता सर्वच राजकीय पक्षांनी ट्रोलर्सच्या टीम तयार केल्या आहेत. याखेरीज पदाधिकारी स्वत: उत्साहाने पोस्ट करतात. ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांनी सातत्याने फेसबुकवर केलेल्या टीकात्मक पोस्टमुळे शिंदे गटामध्ये रोष होता. तोच उफाळून आला व त्यांना मारहाण केली गेली, असा शिंदे यांचा दावा आहे. दुर्दैवाने काही राजकीय पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियावरील त्यांचा वावर हेच रिअल पॉलिटिक्स वाटू लागले आहे. त्यामुळे व्हर्च्युअल पॉलिटिक्स करणारे पदाधिकारी तेथे मिळणाऱ्या लाइक्सला जनाधार समजू लागले आहेत. हाच ट्रेन्ड बळावला तर भविष्यात लोकांमधील राजकीय पक्षाचे नामोनिशाण मिटेल.

आपल्या प्रत्येकाची सध्या दोन प्रतलांवर ओळख आणि जगणे आहे. एक व्हर्च्युअल, तर दुसरी रिअल. रिअल लाइफमध्ये आपण जे आहोत तसेच आपण व्हर्च्युअल लाइफमध्ये आहोतच असे नाही. रिअल लाइफमध्ये आपण अनेक संकटांचा सामना करीत असलो, दु:खी असलो तरी व्हर्च्युअल लाइफमध्ये आपल्या त्या समस्यांचे पडसाद न उमटतील, याची काळजी अनेकजण घेतो. अर्थात अनेकांच्या मनातील वेगवेगळ्या कारणांमुळे असणारी खदखद ही व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर बाहेर पडते. अशावेळी राजकीय नेत्यांची विधाने, महागाई, हिंदुत्व, इतिहास वगैरे विषय हेच निमित्त असते.

गेल्या आठ वर्षांत सोशल मीडियाचे महत्त्व सर्वच राजकीय पक्षांना जाणवल्यामुळे ते प्रचाराचे मोठे साधन झाले आहे. भाजपने २०१४ च्या पूर्वीच देशभरातील ३० ते ३५ लाख व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आपला विचार, संदेश पोहोचविणारे सदस्य पेरले आहेत. अन्य पक्षांनीही त्याचे अनुकरण केले आहे. सर्वच पक्षांनी आपल्या विरोधी पक्षाच्या प्रमुख दहा ते पंधरा नेत्यांच्या मागे ट्रोलर्सचा ससेमिरा लावून दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्याची लाइव्ह पत्रकार परिषद सुरू झाली, फेसबुक लाइव्ह सुरू झाले किंवा त्याने ट्वीट केले की, हे ट्रोलर्स अर्वाच्च भाषेत प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात करतात.   

रोशनी शिंदे आणि त्यांच्यासारखे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यात गैर काहीच नाही; परंतु, राजकारण म्हणजे दररोज फेसबुकवर चार-पाच पोस्ट केल्या, दिवसभरात डझनभर ट्वीट केली व व्हॉट्सॲपवर विरोधकांचा प्रतिवाद केला, एवढे मर्यादित नाही.  लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविले पाहिजेत. विषयांचा अभ्यास करून ते सोडविण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. 

लाइक म्हणजे मोठी लोकप्रियता?   
दुर्दैवाने फेसबुकवरील पोस्टला दोन-अडीच हजार लोकांनी लाइक केले म्हणजे आपल्याला मोठी लोकप्रियता लाभली, असा गैरसमज कार्यकर्ते करून घेतात. नेत्याची भलामण करणाऱ्या पोस्ट करणारे कार्यकर्ते हे नेत्यांच्या गळ्यातील ताईत बनतात. त्यांनाच पदे दिली जातात. दररोज तिन्ही त्रिकाळ वाहिन्यांवर येऊन बाइट देणारे अलीकडे स्वयंभू नेते झाले आहेत. सोशल मीडियावरील लोकप्रियता हे अळवावरचे पाणी आहे. पक्ष व नेत्याने रिअल वर्ल्डमध्ये स्वत:ला भक्कम करण्याकरिता कष्ट घेण्याचा मार्ग कठीण असला तरी तोच योग्य मार्ग आहे.

Web Title: Mistaking Facebook posts for politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.