मुक्त श्वासाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 06:05 AM2018-12-30T06:05:00+5:302018-12-30T06:05:12+5:30

जी गोष्ट सांगायची ती सांगणारे सांगत आहेत, जी गोष्ट पहावीशी वाटली ती पाहणारे पाहू लागले आहेत.

Mithila Palkar on why Web series is her first home.. | मुक्त श्वासाची संधी

मुक्त श्वासाची संधी

Next
ठळक मुद्देवेबसिरिज हे मनोरंजनाचं वेगानं विस्तारत जाणारं माध्यम आहे. पाहणाऱ्या प्रत्येकासाठी या माध्यमात काहीतरी आहे.

- मिथिला पालकर

वेबसिरिज हे माझं पहिलं घर !
वेबसिरिज हे मनोरंजनाचं वेगानं विस्तारत जाणारं माध्यम आहे. यात तर काही शंकाच नाही. माझ्या कामाची सुरुवातच वेबसिरिजमधून झाली, म्हणून माझ्यासाठी ते पहिलं माध्यम आहे, आपलं पहिलंवहिलं घर असतं तसं ! पाहणाऱ्या प्रत्येकासाठी या माध्यमात काहीतरी आहे. प्रत्येक जॉनरचं, प्रत्येक घाटाचं, वेगवेगळ्या पोताचं त्या माध्यमात काही ना काही आहे. ज्याला छोटंंंसं काही पहायचं नाही, सलग काही पहायचं नाही त्याच्यासाठी सिनेमेही आहेत.
या माध्यमात काम करणाऱ्या प्रत्येकाला हे माध्यम एक खास गोष्ट देतं - स्वातंत्र्य !
कला तशीही स्वतंत्र असते, मुक्तपणे व्यक्त होण्याचंच माध्यम असते. आता तंत्रज्ञानानं, इंटरनेटनं त्याला नवीन आयाम दिला आहे. या माध्यमांत तर कलेला काळवेळेचंही बंधन नाही. त्यापासूनही हे मुक्त आहे. आणि हे मुक्त स्वातंत्र्यही दुहेरी आहे. हे माध्यम कलाकाराला जसं मुक्त स्वातंत्र्य देतं, तसं निर्मात्यांनाही देतं. तसंच ते प्रेक्षकांनाही देतं. किती मिनिटांचे, तासांचे कार्यक्रम करायचे याचं काही बंधन कलाकारांवर, निर्मात्यांवर नाही. त्याचे किती भाग करायचे, कसे करायचे, भाषा कोणती, म्हणजे अभिव्यक्तीची रीत कोणती असे प्रश्न हे माध्यम विचारत नाही.
प्रेक्षकांचंही तेच. आपल्याला आवडेल ते कधी पहायचं, अमुकच वेळी पहायचं, तमुकच वेळी रीटेलिकास्ट असेल, ठरल्याजागेवर बसूनच पहायचं असंही काही प्रेक्षकांवर बंधन नाही.
जी गोष्ट सांगायची ती सांगणारे सांगत आहेत, जी गोष्ट पहावीशी वाटली ती पाहणारे पाहू लागले आहेत.
भारतीय संदर्भात म्हणायचं तर या नव्या माध्यमांनी कलाकार आणि कला निर्मात्यांना ‘धाडस’ करण्याचंही बळ दिलं. एक चर्चा अशीही असते की, इथल्या मुक्त स्वातंत्र्याचा गैरवापर होईल. लोक काय वाट्टेल ते करतील, पण ज्यांना स्वातंत्र्याची किंमत कळते, ते ‘काहीही’ करतील इतके ‘बावळट’ नसतात. नाहीत. स्वातंत्र्यासह जबाबदारी येते, त्या जबाबदारीसह व्यक्त होणं, सकस अभिव्यक्ती असणं आणि ते लोकांना आवडणं हे सारं कलाकारांनाही ‘जबाबदार’ बनवेल असं मला वाटतं !
बदलत राहणं, हा या माध्यमाचा स्वभावच आहे.. ते सुरू राहील !
(लेखिका वेब माध्यमात आपला ठसा उमटवणारी
ख्यातनाम अभिनेत्री आहे.)

manthan@lokmat.com

Web Title: Mithila Palkar on why Web series is her first home..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.