‘मियावाकी’ : विदेशी पद्धतीच्या या वृक्षारोपणाला हरकत आहे, ती का?
By समीर मराठे | Published: July 14, 2019 07:00 AM2019-07-14T07:00:00+5:302019-07-14T07:00:02+5:30
पारंपरिक पद्धतीने वाढणारी ‘देवराई’सारखी ‘नैसर्गिक’ जंगलं, की भरपूर खतं, पाणी देऊन कमीत कमी जागेत भसाभस वाढणारी ‘मियावाकी’ असा एक नवा वाद महाराष्ट्रात सध्या उभा राहिला आहे. या ‘हिरव्या’ वादाच्या दोन्ही बाजू..
समीर मराठे
कधीकाळी हिरवाईनं खच्चून भरलेल्या भारताचं जंगलक्षेत्र सध्या किती टक्के शाबूत आहे?
‘विकासा’साठी किती वृक्षांची रोज कत्तल होते?
वृक्ष आणि पर्यावरणाचा बळी देऊनच ‘विकासा’चं बाळ अंग धरणार का?
वनीकरणाच्या नावाखाली दरवर्षी कोटय़वधी रोपांची लागवड केली जाते. त्यातली किती रोपं जगतात? त्यातून किती जंगलं उभी राहिली?
‘प्रयोग’ करताना तो विदेशीच असला पाहिजे आणि त्यासाठी देशी पद्धतीकडे दुर्लक्षच झालं पाहिजे का?
‘देवराई’सारख्या देशी तंत्रज्ञानाला सरकारी पातळीवर आजवर कधीच, कोणीच संजीवनी का दिली नाही?
- पर्यावरण आणि वृक्षलागवडीचा विषय निघाला की प्रत्येकवेळी हे आणि असे प्रश्न उभे राहतातच. आताही ते उभे राहिले आणि पर्यावरणवाद्यांनी यावर जागर घातला, याचं कारण ‘मियावाकी’!
अटल आनंदवन योजनेंतर्गत महाराष्ट्रात शंभर ठिकाणी या पद्धतीनं जंगलं उभी करण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकताच घेतला आणि त्याच्या अंमलबजावणीलाही आता सुरुवात झाली आहे.
अनेक पर्यावरणवाद्यांनी यावर उघड आक्षेप घेतला आहे. वनविभागाने मियावाकी या ‘खर्चिक’ पद्धतीचा ‘अभ्यास’ केला आहे का? त्यापेक्षा कमी खर्चात ‘देवराई’सारख्या परिपूर्ण परिसंस्थेच्या वाढीसाठी, आहेत त्या देवराया जगविण्यासाठी निधी देता आला नसता का? - असे अनेक प्रश्न पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केले आहेत.
अनेक शासकीय अधिकार्यांना व्यक्तिगत स्तरावर आक्षेप मान्य आहेत. त्यामुळेच, याकडे ‘प्रयोग’ म्हणूनच पाहायला हवं, असा बचावात्मक पवित्रा घेताना ते दिसतात.
पर्यावरण अभ्यासक उपेंद्र धोंडे यांनी तर या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना थेट वनमंत्र्यांनाच पत्र लिहिलं आहे.
जगभरात कुठेही मियावाकी पद्धतीच्या जंगल लागवडीमधून दीर्घकालीन फायद्या-तोटय़ांचा अभ्यास, संशोधन झालेलं नसताना महाराष्ट्रात त्याचा आग्रह का? - असा प्रश्न उपस्थित करून ‘मियावाकी तंत्रज्ञानातून अटल आनंदवन’ याऐवजी ‘अटल आनंदवन योजनेतून भारतीय देवराईसारख्या तंत्र परंपरांचं पालन’ असा बदल करण्यात यावा, अशी अपेक्षाही धोंडे यांनी व्यक्त केली आहे.
‘मियावाकी’ला तुमचा विरोध का, असं विचारल्यावर धोंडे सांगतात, भारतात आज अनेक ठिकाणी जंगलक्षेत्र पाच टक्क्यांच्याही खाली गेलेलं असताना मियावाकी हा आशेचा किरण ठरू शकतो, त्यामुळे मी मियावाकीचा टीकाकार नाही, मात्र प्रसारकर्ताही कधीच असू शकत नाही.
धोंडे म्हणतात, ‘मियावाकी तंत्राचा इतिहास दहा वर्षापेक्षा जास्त नाही. आपलं पारंपरिक तंत्रज्ञान विदेशी तंत्रापुढे निष्प्रभ आहे, असाच चुकीचा संदेश आपण कायम देत असतो. परसबाग, नक्षत्रवटी, वनराई, ग्रामबन, सप्तर्षीबन, शिवपंचायतन, स्मृतिवन, कुरण, जैवइंधनवन. असे अनेक पर्याय उपलब्ध असताना सरकारी पातळीवर आपण त्यांना ना कधी उत्तेजन दिलं, ना निधी, ना ते टिकवायचा प्रय} केला. त्याविषयी आपण काही बोलतही नाही. ‘प्रयोग’ जरूर करा; पण जे आपल्या मातीतलं आणि सिद्ध आहे, त्याच्याही वाढीसाठी काही प्रय} करणार की नाही? हाच खर्च स्थानिक तंत्रावर केला असता, केला, तर यापेक्षा अधिक आणि चिरंतन लाभ होऊ शकेल.’
यासाठी दोन धावपटूंचं उदाहरण धोंडे देतात. म्हणतात, ‘समजा एकाला भरपूर खुराक दिला, तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा निरंतर सराव घेतला, बुटांपासून तर ट्रॅक अन् तंत्रार्पयत सर्व अत्याधुनिक सुविधा पुरवल्या आणि दुसर्याला मात्र यातलं काहीही न पुरवता अर्धपोटी आणि अनवाणी पायांनी पळायला, स्पर्धा करायला लावली, तर जे परिणाम दिसतील, तेच इथेही दिसतील आणि मग तुम्ही म्हणाल, ‘आपल्याच’ पोरात काही दम नाही. असं होऊ नये. आपली असलेली जंगलं, देवराया, माणसं, कार्यकर्ते. यांनाही जपा, त्यांच्याकडे लक्ष द्या आणि मग बघा, काय परिणाम दिसतो ते!.’
महाराष्ट्राचे माजी मुख्य वनसंरक्षक आणि ‘वृक्ष संवर्धिनी’ या संस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे म्हणतात, ‘पारंपरिक पद्धतीत ज्या गोष्टीला शंभर र्वष लागत होती, ते केवळ पाच वर्षात करता येईल असं मियावाकींचं म्हणणं आहे. हा प्रयोग यशस्वी होईल की नाही, त्याचे दीर्घकालीन फायदे काय, आत्ता तरी माहीत नाहीत; पण हा प्रयोग काही प्रमाणावर करून पाहायला हरकत नाही. यासाठी लागणारा खर्च मात्र प्रचंड आहे !’
नाव न छापण्याच्या अटीवर एका अभ्यासकानं सांगितलं, बालहट्ट, स्रीहट्ट आणि राजहट्ट असे तीन प्रकारचे हट्ट असतात. या हट्टांना आपण काही करू शकत नाही. कितीही अव्यवहार्य वाटले, तरी ‘समाधाना’साठी बर्याचदा ते करावे लागतात. तसाच हा राजहट्ट आहे.
दुसर्या अभ्यासकाचं म्हणणं होतं, वनमंत्र्यांना आता घाई झाली आहे. आपल्या कारकिर्दीत आपण हे हे करून दाखवलं. ‘दाखवण्या’च्या या सोसापोटीच हा निर्णय घेतला आहे. एकूणच ‘मियावाकी’संदर्भात पर्यावरण अभ्यासकांच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत. झाडं लावण्याला त्यांचा विरोध नाही, मात्र त्याची व्यवहार्यता, पर्याय तसासले जावेत, असा त्यांचाही हट्ट, आग्रह आहे.
***
‘मियावाकी’ म्हणजे काय?
1 अत्यंत कमी जागेत जास्तीत जास्त झाडं लावण्याची पद्धत म्हणजे ‘मियावाकी’. मातीचा पोत लक्षात घेऊन मोठय़ा प्रमाणात खतं, अन्नद्रव्यं वापरल्याने या पद्धतीनं येणारी झाडं पारंपरिक पद्धतीपेक्षा तीस पट वेगानं वाढतात आणि तुलनेनं खूप लवकर ‘जंगलसदृश’ परिस्थिती निर्माण होते.
2 जपानमधील वनस्पतीशास्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांनी हे तंत्र विकसित केलं असल्यानं या पद्धतीला ‘मियावाकी’ असं म्हटलं जातं. या पद्धतीत 500 चौरस मीटर क्षेत्रात 1500 झाडांचं जंगल तीन वर्षात उभं राहू शकतं. भारतात शुभेंदू शर्मा याने या पद्धतीचा प्रचार, प्रसार मोठय़ा प्रमाणात सुरू केला आहे.
3 या नव्या तंत्राच्या दीर्घकालीन फायद्या-तोटय़ांविषयी अजून संशोधन व्हायचं बाकी आहे आणि त्याची सिद्धताही पडताळली जायची आहे.
4 या पद्धतीत झाडं लावण्यापूर्वी सुमारे तीन फूट खोल खड्डा खणतात. त्यातील सगळी माती काढून शेणखत, गहू-भाताचा कोंडा, विविध खतं टाकलेली नवी माती भरून झाड लावतात.
5 भरपूर पाणी, भरपूर खतं दिल्याने ही झाडं तीस पट वेगानं वाढतात; पण त्यासाठीचा खर्चही पारंपरिक पद्धतीपेक्षा किमान तीस पट अधिक आहे. एका गुंठय़ाला तीन लाख किंवा अध्र्या एकरासाठी तीन ते साडेतीन कोटी रुपये इतका खर्च येतो.
**************
‘मियावाकी’वर घेतले जाणारे आक्षेप
1 ‘मोनोकल्चर’ किंवा एक पीकपद्धती जशी चूक, तसंच ‘मियावाकी’च्या माध्यमातून नैसर्गिक जंगलालाही एका विशिष्ट पॅटर्नमध्ये बसवणं चूक.
2 शहरातली एक-दोन गुंठय़ातली हिरवाई ऑक्सिजन नक्कीच देईल, त्याने मनाला विरंगुळाही मिळेल; पण निसर्ग पुनस्र्थापनेचा तो ठोस, खात्रीशीर उपाय नाही.
3 खर्च आणि फायदा यांचा तुलनात्मक विचार करता हा उपाय अतिशय अव्यवहार्य आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेरील आहे.
4 पारंपरिक पद्धतीतील भावनात्मकता, आपलेपणाची, स्वतर् केल्याची आणि जबाबदारीची भावना इथे नाही.
5 ज्यांना आपला पैसा वापरून कमी जागेत राक्षसी वेगानं ‘मियावाकी’ जंगल उभं करायचंय, त्यांच्यासाठी हा प्रयोग वाईट नाहीच; पण निसर्ग पुनस्र्थापनेसाठी देवरायांसारखा पर्याय यापेक्षा कित्येक पट उपयुक्त ठरू शकतो.
6 काय हवं-नको, हे ठरवून तयार केलेला ‘मियावाकी’ हा बंदिस्त जंगलाचा कृत्रिम पर्याय आहे, तर काय हवं-नको या निवडीचं स्वातंत्र्य हजार वर्षाहूनही अधिक वय असलेल्या आपल्या प्राचीन शोध पद्धतीनं निसर्गालाच बहाल केलेलं आहे.
7 ‘मियावाकी’त जागेची अनुपलब्धता तर पंचवटी, नक्षत्रवटी, वनराई, वृक्षमंदिर, सप्तर्षीवन, स्मृतिवन. या पद्धतीत जशी जागा, तसे पर्याय उपलब्ध आहेत.
*************
मियावाकी आणि देवराईची तुलना चुकीची - - विवेक खांडेकर (मुख्य वनसंरक्षक)
‘मियावाकी’ की ‘देवराई’?. असा प्रश्न उभा करून सध्या मियावाकीवर टीका सुरू आहे. मुळात मियावाकी आणि देवराई यांची तुलना करणंच चुकीचं आहे. ‘मियावाकी’ हा एक ‘प्रयोग’ आहे आणि त्याकडे प्रयोगाच्या पातळीवरच पाहिलं पाहिजे. अतिशय कमी जागेत जंगल उभं राहू शकणं हे मियावाकीचं वैशिष्टय़. पारंपरिक पद्धतीनुसार एक हेक्टर जागेत साधारण एक हजार झाडं उभी राहू शकतात. मात्र मियावाकी तंत्रानुसार तेवढय़ाच जागेत तब्बल तीस हजार झाडांचं जंगल उभं राहू शकतं. अर्थातच यासाठी पारंपरिक पद्धतीच्या सुमारे तीस पट अधिक खर्च येतो. पण या पद्धतीमध्ये 13, 14 प्रकार आहेत. कोणती पद्धत आपण अवलंबतो, त्यानुसार खर्चात फरक पडतो. या तंत्राचा जन्मच अगदी अलीकडचा असला, तरी प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? त्याचे निष्कर्ष काही काळानंतर आपल्या समोर येतील. शहरी भागात जागेची टंचाई असते. प्रदूषणाचं प्रमाण जास्त असतं. तातडीनं वृक्षारोपण करण्याची गरज असते. अशा ठिकाणी मियावाकी तंत्रज्ञान अधिक उपयोगी ठरू शकतं. त्यानुसार अटल आनंदवन योजनेंतर्गत ठरावीक ठिकाणं निवडून या पद्धतीनं वृक्ष लागवड केली जाणार आहे.
(लेखक लोकमत वृत्तपत्रसमूहात उपवृत्तसंपादक आहेत.)