आमदार महोदय, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे..! अधिवेशनात पायरी सोडणाऱ्या आमदारांना खुलं पत्र

By अतुल कुलकर्णी | Published: August 28, 2022 05:57 AM2022-08-28T05:57:39+5:302022-08-28T06:14:54+5:30

Maharashtra Politics: राज्याचे पावसाळी अधिवेशन ‘न भूतो न भविष्यती’ झाले. यावेळी ज्या पद्धतीने काही सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धमाल केली, त्याला तोड नाही. ‘पायरी सोडणे’ हे विशेषण खूप दिवसांनी आपल्यामुळे वापरायला मिळाले... काय ती मारामारी.... काय ते अंगावर धावून जाणं... काय त्या घोषणा... एकदम ओक्के...!

MLA sir, Maharashtra is proud of you..! | आमदार महोदय, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे..! अधिवेशनात पायरी सोडणाऱ्या आमदारांना खुलं पत्र

आमदार महोदय, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे..! अधिवेशनात पायरी सोडणाऱ्या आमदारांना खुलं पत्र

Next

- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 
सन्माननीय आमदार महोदय, 
नमस्कार. 
राज्याचे पावसाळी अधिवेशन ‘न भूतो न भविष्यती’ झाले. यावेळी ज्या पद्धतीने काही सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धमाल केली, त्याला तोड नाही. ‘पायरी सोडणे’ हे विशेषण खूप दिवसांनी आपल्यामुळे वापरायला मिळाले... काय ती मारामारी.... काय ते अंगावर धावून जाणं... काय त्या घोषणा... एकदम ओक्के...!
 या अधिवेशनाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली. सगळे जण मराठीसाठी भांडत असताना, आपण जे मोलाचे योगदान दिले, त्यासाठी कविवर्य कुसुमाग्रज स्वर्गात आनंदाने मोहरून गेले असतील..! पन्नास खोके - एकदम ओक्के, पन्नास खोके - चिडलेत बोके, गद्दारांना ताटवाटी - चलो चले गुवाहाटी..., गाजर देणं बंद करा - ओला दुष्काळ जाहीर करा..., खड्ड्यांचे खोके - मातोश्री ओके..., लवासाचे खोके - बारामती ओके... एक से बढकर एक यमक जुळवून केलेल्या ओळी मराठी साहित्यात पुढच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील, यात शंका नाही.
छोटे-मोठे सगळे नेते अधिवेशन काळात पूर्ण वेळ मराठी साहित्य समृद्ध करण्याच्या मागे लागले होते. (हात धुऊन मागे लागले होते, हे वाक्य वापरायचे की नाही, तेही तुम्हीच सांगा) कोणी म्हणाले, सुरतेवर स्वारी झाली - राज्याची बदनामी झाली... तर काहींनी, ‘थांबवा आता शब्दांचे वार - आमचे मित्र अजित पवार...’, अशी नवी घोषणाही जन्माला घातली. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केल्याचा परिणाम तत्काळ दिसला. मुख्यमंत्र्यांनी देखील ‘देवेंद्र और हम है साथ साथ - मेरा नाम है एकनाथ...’, अशी चारोळी नाही, दुओळी ऐकवली.  पण महाराष्ट्राच्या लक्षात राहिली ती विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेली फ्री स्टाईल..! कोण घोषणा देत होतं... कोण कोणाच्या अंगावर धावून गेलं... कोणाच्या गळ्यात गाजराच्या माळा होत्या... हे सगळं पुढचे काही महिने तरी चर्चेत राहील. परवा दारावर भाजीची गाडी आली. गाजरं घ्यायला गेलो तर गाडीवाला म्हणाला, हातात देऊ की माळ करून देऊ...? इतका खोलवर परिणाम आजपर्यंत विधिमंडळातल्या कोणत्या गोष्टीचा झाला असेल... यावर संशोधन करावे, असे वाटत आहे..! कधी नव्हे ते अजितदादा, राजेश टोपे यांनी फिफ्टी - फिफ्टी बिस्किटांचे पुडे हातात धरून जाहिरात केली. तेव्हा त्यांचे माध्यम सल्लागार संजय खोडके यांनी बिस्किटांच्या कंपनीकडे जाहिरातीचे बिल पाठवून दिल्याची चर्चा रंगली...! ही माहिती टोपेंना कळाली तसे त्यांनी मलाही त्यातले पन्नास पुडे पाठवा, अशी गळ खोडकेंना घातल्याची वदंता आहे..!
सगळेच आमदार असे नव्हते. काही आमदार सभागृहात बसत होते. कामकाजात भाग घेत होते. प्रश्न विचारत होते.
अभ्यासू मंत्री, आपल्या विभागाने किती डास मारले..? त्यांचे शवविच्छेदन कसे केले..? हे खुलासेवार सांगत होते. तर काही अभ्यासू सदस्य, मारले गेलेल्या डासांपैकी किती नर व किती मादी प्रजातीचे होते..? त्यांच्या शवविच्छेदनातून कोण जास्त आक्रमक असल्याचे सिद्ध झाले..? असे प्रश्न विचारून विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण करत होते..! काही म्हणा, दोन आठवडे छान गेले. अधिवेशन संपून आपण आपापल्या मतदारसंघात गेलात... पोळ्याचा सण उत्साहात साजरा केला... भविष्यातही आपल्याकडून मराठी साहित्यात आणि विज्ञानात अशीच भर पडावी, ही अपेक्षा..!             -  तुमचाच, बाबूराव

Web Title: MLA sir, Maharashtra is proud of you..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.